पुस्तक – शिन्झेन किस (Shinzen Kiss)
लेखक – शिन्इची होशी Shinichi Hoshi (星 新一 Hoshi Shin’ichi)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ भाषा – जपानी (Japanese)
अनुवादक – निस्सीम बेडेकर (Nissim Bedekar)
पाने – १६८
ISBN – 978-93-86493-48-4
प्रकाशन – रोहन प्रकाशन. ऑगस्ट २०१८
छापील किंमत – १९५/- रु.
शिन्इची होशी ह्या जपानी लेखकांच्या २१ कथांच्या अनुवादाचं हे पुस्तक आहे. अजूनपर्यंत “होशी” ह्यांचं काही लेखन किंवा त्यांच्याबद्दल काही वाचलं नव्हतं पण त्यांची आणि अनुवादकाची ओळख पुस्तकात पुढीलप्रमाणे करून दिली आहे.
ही ओळख वाचून आणि वेगळ्या संस्कृतीतील काही वाचायला मिळेल म्हणून उत्सुकतेने पुस्तक हातात घेतलं. आणि हे पुस्तक वाचताना निवड अगदी १००%खरी ठरली ह्याचा आनंद झाला.
ह्यात १९ लघुकथा आहेत तर २ दीर्घ कथा. लघुकथा म्हणजे काही ४ पानांच्या, ३ पानांच्या काही अगदी दीडदोन पानांच्या. पण प्रत्येक कथा दोन पानांत प्रसंग डोळ्यासमोर उभे करते. नाट्य समोर घडवते आणि पुढे ह्या काय घडेल ह्याची उत्सुकता निर्माण करते. अगदी रहस्य कथा नाही. प्रसंग साधेच पण तरी आकर्षक. म्हणूनच आपणही एका ठराविक, सध्या पद्धतीने विचार करतो आणि लेखक आपल्याला बेसावध गाठतो. गोष्टीचा शेवट वेगळाच होतो. तो शेवट वेगळा झाला तरी अतार्किक किंवा ओढूनताणून आणलेला वाटत नाही. त्यामुळे आपली फसगत झाली मजा येते.
सुरुवातीला काही गोष्टी वाचल्यावर लेखकाचं हे चकवणं लक्षात आल्यावर साहजिकच आपणही पुढच्या गोष्टी वाचताना अजून सावध, “हुशार” होतो. पण तरी लेखक आपल्यापेक्षा दोन पावलं पुढेच राहतो. आणि चकवाचकवी सुरूच राहते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेगळी, रंजक आहे.ह्यातल्या बऱ्याच गोष्टी वैज्ञानिक कल्पनारंजन (फँटसी) प्रकारच्या आहेत. म्हणजे प्रग्रहावरचे जीवन, मानवाव्यतिरिक्त इतर जीवांची संस्कृती,अचाट शोध इ. अश्या कथांमध्ये अद्भुततेची गंमत आणि अनपेक्षित शेवट अशी दुप्पट मजा आहे. “परग्रहावरचे शर्विलक” ही दीर्घ कथाही त्याच प्रकारची आहे.
“प्रेत हवं, प्रेत” ह्या दीर्घ कथेत एक शव वाहिनी एक प्रेत घेऊन जात असते आणि त्याच एकमेकांशी दुरान्वये संबंध नसलेल्या वक्तींच्या आयुष्यात समांतर घटना घडतात की सगळ्यांना त्या प्रेताला हात लावावा लागतो. आणि गोष्ट अनपेक्षित वळणावर संपते. खरंच इतकी कथाबीजे एकत्र गुंफण्याच्या लेखकाच्या सृजनशीलतेला दाद द्यायला हवी.
प्रत्येक कथा वेगळी आणि त्यातही त्या लघुकथा. त्यामुळे एकदोन गोष्टीबद्दल थोडं सांगून अंदाज येणार नाही आणि जास्त सांगितलं तर गोष्टीचा शेवट समजून भावी वाचकांचा रसभंग होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल ना लिहिता काही गोष्टींची उदाहरणे देतो.
“कंपनीचं रहस्य” – एका मोठ्या कंपनीला प्रतिस्पर्धी कंपनीचं रहस्य मिळवायचं असतं. म्हणून हेरगिरी करण्यासाठी एका हुशार व्यक्तीला खास दुसऱ्या कंपनीत घुसवतात. तो कंपनीत प्रगती करून महत्त्वाची माहिती मिळवत राहतो. आणि पुढे काय होतं ?
“रागीट काका” – मुलांना शिस्त लावण्यासाठी मुलांना धाक दाखवावा लागतो. पण आईवडिलांना शिस्त लावायला वेळ नसेल तर धाक दाखवण्यासाठी “रागीट काका” ही सेवा पुरवणारी कंपनी आलीये.
“डिलक्स तिजोरी”, “साक्षीदाराचा धंदा” – चोरावर मोर प्रकारच्या घटना
“अफलातून औषध”, “शैक्षणिक उशी” – ह्यात शास्त्रज्ञ अनोखे शोध लावतात. माणसाच्या स्वभावात बदल घडवणारे औषध आणि उशी बनवतात. आणि त्याचा परिणाम कसा धमाल होतो.
“परग्रहावरचे शर्विलक” – “अल्फा” नावाच्या परग्रहावर आता मनुष्याने वस्ती केली आहे. पृथ्वीवरून “अल्फा”ग्रहावर जायला यानातून बसून दोन मित्र निघतात. आणि त्यांना वाटेत अजून एक अपघात ग्रस्त यान दिसतं.
“सिहांचा छावा” ह्यात एक हुकूमशहा एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावतो. टी कशी तर त्याला एका सिंहाच्या छाव्याबरोबर एकत्र ठेवलं जातं. त्याने त्याला वाढवायचं. म्हणजे हळूहळू तो सिंह मोठा होऊन एक दिवस त्याला खाऊन टाकेल. आपल्याच हाताने आपलं मरण वाढवायचं. पण हा गुन्हेगार सुटू शकतो का ?
“शिन्झेन किस” – मध्ये पृथ्वीवरचे लोक परग्रहावर जातात. तिथल्या सुंदरी बघून “चुंबन” घेऊन पाश्चात्त्य पद्धतीने अभिवादन करण्यापासून ते स्वतःला रोखू शकत नाहीत. आणि मग काय गोंधळ उडतो.
निस्सीम ह्यांनी केलेला निर्दोष अनुवाद. जराही बोजडपणा नाही. मूळ मराठीतलं पुस्तक वाचत असल्यासारखंच वाटलं. अनोख्या शैलीच्या ह्या गोष्टी मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल निस्सीम बेडेकर ह्यांचे खूप आभार !
पुस्तकाची शैली तर मराठी लेखनाच्या दृष्टीने खूपच वेगळी आहे. ह्या गोष्टी “नीतीकथा” नाहीत. त्यांना काही संदेश द्यायचा आहे असा आग्रह नाही. कुठला विचार पुढे रेटायचा नाही. त्यामुळे निखळ कल्पनारंजनातला, आणि “असंही घडू शकतं” ची मजा घेणाऱ्या निखळ कथा आहेत. हे मला जास्त आवडलं. आबालवृद्धांना आवडतील, खिळवून ठेवतील अश्या ह्या गोष्टी आहेत.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–