पुस्तक : Shivaji – the Grand Rebel (शिवाजी – द ग्रॅंड रेबेल)

लेखक : Dennis Kincaid (डेनिस किंकेड)

भाषा : इंग्रजी

पाने : ३२७ (छोटी डायजेस्ट आकाराची)

ISBN : 978-81-291-3720-3



छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चरित्र डेनिस किंकेड या भारतात नोकरी करणाऱ्या ब्रिटिश व्यक्तीने लिहिले आहे. हे पुस्तक १९३७ साली प्रकाशित झाले. डेनिस किंकेडचे वडीलही भारतात सरकारी नोकरीत होते. त्यांचाही भारतीय इतिहासाबद्दल दांडगा अभ्यास होता व त्यावर अनेक पुस्तके लिहिली होती.


या पुस्तकाची ओळख करून देताना टी.एन. चतुर्वेदींंनी म्हटले आहे की “१९ व्या शतकात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे संशोधन आणि लेखन सुरू झाले. सुरुवातीला भारतीय लेखकांनी आणि मग इंग्रज लेखकांनी लिहायला सुरुवात केली. ग्रॅंड डफच्या मराठ्यांचा इतिहासात शिवाजी महाराजांना लुटारू, खंडणीखोर ठरवण्यात आलं. पुढे टिळक आणि होमरूल चळवळीमुळे शिवाजी महाराजांची स्थापना राष्ट्रीय नायक स्वरूपात झाली. यदुनाथ सरकार यांंनी सविस्तर इतिहास लिहिला. परंतु शिवाजी महाराजांची विकृत ओळख इंग्रजांच्या मनातून पुसून एक नायक म्हणून प्रतिमा उभी करण्यात महात्त्वाचा वाटा बजावला तो या पुस्तकाने“.  हे या शिवचरित्राचे वैशिष्ट्य आहे. 


प्रस्तावनेत लेखक म्हणतो की ,”बहुतेक इंग्रजांना, मुघलांची ओळख ही ब्रिटिशांच्या आधीचे राज्यकर्ते म्हणून असते. पण जेव्हा ते भारतातल्या ब्रिटिश राजवटीच्या वाढीचा इतिहास बघतात तेव्हा त्यांना ब्रिटिशांना विरोध करणारे कुणी मुघल दिसत नाहीत. त्यांचा  संघर्ष सतत मराठ्यांशी होताना दिसतो. दुर्दैवाने व्हिक्टोरियन इतिहासकार मात्र  मराठ्यांची बोळवण बंडखोर म्हणून करतात“. मुघलांनंतर शंभर वर्षे मराठा साम्राज्य देशात सर्वात बलशाली होते त्याची यथार्थ ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक त्याने लिहिले आहे. 


जिजाऊ-शहाजी राजे यांच्या लग्नापासून शिवाजी महाराजांच्या मृत्युपर्यंतचा इतिहास यात आहे. शिवचरित्रातले सर्व महत्त्वाचे प्रसंग यात येतात. पण हे प्रसंग नुसते दिले असते तर एक साम्राज्य जाऊन दुसरा राजा तयार झाला इतपतच बोध परकीय वाचकाला झाला असता. शिवाजी महाराज, फक्त एक राजे नव्हते, त्यांनी फक्त स्वतःच्या घराण्याचे राज्य सुरू केले असे नाही तर शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पिचलेल्या समाजाचा स्वाभिमान आणि स्वत्व जागे केले, त्यांनी राष्ट्र घडवले. हे इंग्रजी वाचकाला नीट समजावे म्हणून युरोपियन, रोमन इतिहासातले प्रसंगांचे संदर्भ दिले आहेत. तिथल्या व्यक्ती आणि घटनांच्या उपमा दिल्या आहेत.

उदा. शिवाजी महारजांच्या सुरुवातीच्या कारवायांकडे विजापूर दरबाराने पूर्ण लक्ष का दिलं नसेल या बद्दल लिहिताना दिलेला युरोपिय संदर्भ


(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)


याचा परिणाम नक्कीच युरोपियन वाचकांवर झाला. प्रत्यक्ष ब्रिटिश वॉईसरॉयने या पुस्तकाचे कौतुक केले. १९३७, ३९,४६,५१, ६७ साली पुन्हापुन्हा आवृत्त्या निघाल्या. 


सुरतेची लूट, छापेमारी युद्ध तंत्र किंवा प्रसंगी माघार घेण्याची याबद्दलही त्याने मराठ्यांची बाजू समजूतदारपणे विषद केली आहे. पुस्तकाचे स्वरूप कधी कादंबरी तर कधी ऐतिहासिक निबंध असे आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या लहानपणचे प्रसंग वगैरेत एखाद्या कादंबरीकाराप्रमाणे लालमहालाचं, तिथे त्यांचे आणि दादोजींचे, बालशिवाजी आणि जिजाऊंचे संवाद इ.ची कल्पना करून प्रसंग रंगवले आहेत. बाकी वेळा ऐतिहासिक निबंधाप्रमाणे घटनाक्रम दिला आहे. तो भागही “ललित” नसला तरी तितकाच सहज प्रवाही आहे. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे संदर्भही दिले आहेत. संदर्भ ग्रंथांबरोबरच पोवाडे आणि लोककथा काय म्हणतात याचाही उल्लेख करून कथा पुढे नेली आहे.


शिवचरित्राच्या आसपासच्या राज्यांचे, व्यक्तींबद्दलही जास्तीची माहिती मिळते. उदा. आदिलशाही स्थापन करणारी व्यक्ती ऑटोमन साम्राज्यातून जीव वाचवून कशी पळून आली, त्यांच्या आणि मुघलांमध्ये काय फरक होता, विजापूरचे ऐश्वर्य आणि मुसलमान राजवट असूनही शिल्पांनी सजवलेले शहर इ.; गोवळकोंड्याच्या राज्यात दारू, वेश्यावस्तीम आणि हिऱ्यांच्या खाणी यामुळे आलेली समृद्धी आणि सुखासीन निष्क्रिय राज्यकर्ते इ.; सुरतेच्या लुटीच्या वेळी मोगली अधिकारी व्यापाऱ्यांना मराठ्यांपासून वाचवू शकले नाहीत. इंग्रजांनी मात्र आपल्या वखारींचे रक्षण केलेच पण आजूबाजूचा भागही रखला. यामुळे व्यापारी समाजात मोगलांबद्दल अविश्वास आणि इंग्रजांबद्दल विश्वास निर्माण झाला. सुरक्षिततेची हमी देणाऱ्या इंग्रजांच्या मुंबईकडे व्यापाऱ्यांची पाउले वळली आणि आर्थिक राजधानी मुंबईचा प्रवास सुरू झाला. असे कितीतरी बारिक बारिक ज्ञानकण पुस्तकात हाती लागतात. त्यावेळच्या प्रवाशांम्ध्ये, दरबारी पत्रव्यवहारात, विशेषतः तेव्हाचे इंग्रज लोक चालू घटनांबद्दल काय म्हणत होते याचीही उदाहरणे वेळोवेळी दिली आहेत. ते वाचणेही मनोरंजक ठरते.


उदा. सुरतेच्या लुटीच्या वेळच्या पत्रव्यवहाराबद्दल

महाराजांचे निधन झाले तरी इंग्रजांना याची खात्री वाटत नव्हती. शत्रूला चकवा देऊन अवचित गाठायच्या शिवनितीने पोळलेले गोरे ताक देखील फुंकून पीत होते. वाचा हे

साडे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळावरचे ० वर्षांपूर्वीचे पुस्तक असले तरी पुस्तकाची भाषा सोपी, सुगम आहे. अनेक नवनवीन शब्द येतात. तरीही संदर्भावरून अर्थ कळतो. अर्थ नाही कळला आणि शब्दकोश बघायला लागला तर, “हं इथे हाच शब्द पाहिजे होता, एक नवीन अर्थछटा कळली”, असा आनंदाचा, शिकण्याचा भाग होता. “Hurr Hurr Mahadev”, “Pilawas & Birianis & kawftas” काहीवेळा अशी देशी शब्दांच्या फिरंगी स्पेलिंग्सची मजा येते.


शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे होतो. त्यामुळे एखाददुसरा तपशील वगळता मुख्य  शिवचरित्रात आपल्याला काही नवीन कळण्याची शक्यता कमी आहे. पण मराठी नसलेल्यांनी किंवा मराठी असूनही शिवचरित्राचे संस्कार ज्याच्यावर झाले नाहीत अशांना हे पुस्तक नक्कीच माहितीपूर्ण ठरेल. मराठी वाचकांना वर म्हटलेल्या थोड्या अवांतर पैलूंत रस असेल तर पुस्तक वाचण्याचा फायदा होईल.



———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )

———————————————————————————-





———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————