पुस्तक : सिंगल मिंगल (Single Mingle)
लेखक : श्रीरंजन आवटे (Shreeranjan Awate)
भाषा : मराठी
पाने : 208
ISBN : 978-81-7434-978-1

ही कॉलेजवयीन तरूण मुलाची प्रेमकथा आहे. कॉलेजमध्ये नायकाची एका मुलीशी प्रेमसंबंध जुळतात. पण पुढे मात्र तिच्याबद्दल काही गोष्टी कळल्यामुळे प्रेमात दुरावा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. शेवटी काय होतं सांगत नाही. पण हेच कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. 

मुलगा कॉलेजात शिकतो आहे, बऱ्याच मुलींमध्ये वावरणारा आहे, एका मुलीची ओळख होते, ओळखीचे रूपांतर प्रेमात मग प्रेमातले रुसवे-फुगवे होतात. कुठल्याही टिपिकल प्रेमकादंबरी प्रमाणे. सारखं पोरींमागे फिरूनही नायक अगदी हुशार असल्यामुळे  प्रत्येक परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतो. वादविवाद स्पर्धा, प्रेझेंटेशन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात छाप पाडत असतो. पूर्वीच्या टिपिकल हिंदी चित्रपटां सारखं. फक्त जुन्या चित्रपटासारखं गुलाबाला गुलाब टेकवून प्रेम व्यक्त होत नाही तर मुलगा-मुलगी त्यापुढे जाऊन शरीरसंबंधही ठेवतात. लेखक थोड्या बोल्ड शब्दात ते सूचित करतो. कादंबरीचा लेखक आणि घटना आजच्या असल्यामुळे एसेमेस, चॅटिंग, फेसबुक इ. चे संदर्भातून कथेत येतात. 

कादंबरी बोल्ड करण्याचा प्रयत्न आहे तसाच ती थोडी वैचारिक करायचाही प्रयत्न आहे. त्यामुळे भांडण झालं किंवा प्रेमभंग होणार असं वाटायला लागलं की उदास नायक लगेच तात्त्विक स्वगतं पाजळतो. अजून एखादी मुलगी आवडायला लागली की प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हानजे काय, ती मला आवडते म्हणजे काय अशी चर्चा पानभर करतो. अर्थबोध तर काहीच होत नाही. कादंबरीच्या ओघात ते सहज आल्यासारखे वाटत नाहीत. स्वतंत्र तुकडे वाटतात. 

एकूणच नवी बाटली जुनी दारू असाच प्रकार आहे. नवोदित लेखकाने नेहमीच्या सरधोपट मार्गावर लिखाण करायचा प्रयत्न करावा इतपतच कादंबरी आहे. नव्या लेखकाला प्रोत्साहन म्हणून वाचू शकता. श्रीरंरजन लिहीत राहतील आणि नवं काहितरी लिहितील अशा त्यांना शुभेच्छा.

————————————————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

————————————————————————————————

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————