पुस्तक – शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman)
लेखक – रिचर्ड फाईनमन (Richard Feynman)
भाषा – मराठी (Marathi)
अनुवाद – माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
पाने – ४२३
मूळ पुस्तक – Surely you are joking Mr. Feynman
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
ISBN – 978-81-938036-4-6
रिचर्ड फाईनमन हे भौतिकशास्त्रात संशोधन करणारे नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ होते
एखाद्या शास्त्रज्ञाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला माहिती नसेल तर आपल्या डोळ्यासमोर एखादी साचेबद्ध प्रतिमा उभी राहील. सतत काहीना काही प्रयोग करणारी ; विचारात गढलेली; प्रयोगशाळेत आणि वाचनात रमणारी अशी व्यक्ती डोळ्यासमोर येईल. मुलांना शिकवणे, चर्चासत्रात भाग घेणे, वैज्ञानिक पेपर मांडणे अशा वेळीच त्यांचा इतर लोकांशी संपर्क हा होत असेल. शास्त्रज्ञाच्या गप्पांचा विषय सुद्धा विज्ञानतंत्रज्ञान या भोवतीच फिरत असेल असा आपल्याला वाटेल.
पण रिचर्ड फाईनमन मात्र या प्रतिभेपेक्षा खूप वेगळे होते हे आपल्याला त्यांचं पुस्तक वाचून कळतं. ते गप्पिष्ट होते. लोकांच्या खोड्या काढण्यात त्यांना मजा यायची. वेगवेगळ्या कलांमध्ये त्यांना रस होता. इतकंच काय अगदी पार्ट्यांमध्ये जाणं, बारमध्ये जाऊन पोरी पटवणे इथपर्यंत त्यांची मजल जात होती. पण ह्या सगळ्यामागे थिल्लरपणा नव्हता तर एखादी गोष्ट कशी चालते, त्यामागे काय तर्क असतो हे समजून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनात होती. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचं कुतूहल आणि त्याचा कार्यकारणभाव समजून घेणे त्यासाठी स्वतः प्रयोग करणं हे कुठल्याही शास्त्रज्ञासाठी आवश्यक गुण त्यांच्यात होते. कुशाग्र बुद्धीमत्ता, आकलनशक्ती, आकडेमोडीतला वेग उपजतच होते. त्यामुळे त्यांचे किस्से हे “माहिती-रंजक” (इन्फोटेनममेंट) प्रकारचे वाटतात.
पुस्तकात सुरुवातीला त्यांनी लहानपणच्या आठवणी सांगितल्या आहेत. खेळणी, वस्तू तोडणे, मोडणे पुन्हा जोडणे ह्या त्यांच्या आवडीतून भविष्यातल्या शास्त्रज्ञाची चुणूक दिसते. जगप्रसिद्ध एम.आय.टी. विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. आणि पुढच्या शिक्षणासाठी ते प्रिन्स्टन मध्ये गेले. महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुलांच्या खोड्या काढल्या. आणि संशोधन करण्यासाठी काहीतरी अचाट प्रयोग करताना प्रयोगशाळेची खोलीच उद्ध्वस्त होण्याचा पराक्रम देखील केला.
तेव्हा दुसरे महायुद्ध सुरु होण्याच्या मार्गावर होते. अमेरिकेने अणुबॉम्ब बनवायची गुप्त योजना आखली. त्यात फाईनमन ह्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळात संगणक असे नव्हते पण गणनयंत्रे होती. इतक्या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी आकडेमोड करायला मशिनरी कशी आणली; तिच्यावर “उचापती” करून आकडेमोडीचा वेग कसा वाढवला हे वाचणं मजेशीर आहे. पण इथेही त्यांच्यातला “खोडकर मुलगा” गप्प बसला नाही. गोपनीय प्रकल्प असल्यामुळे इथे काम करणाऱ्या लोकांचा पत्रव्यवहार “सेन्सॉर” होऊन जात असे. फाईनमन यांना कुठली गोपनीय माहिती फोडायची नव्हती. पण “सेन्सॉर”ला टाळून पत्र बाहेर पाठवायचा उद्योग त्यांनी केला. पत्रात असं काहीतरी लिहायचं की तपासनीसांना संशय वाटावा आणि मग त्यांनी डोंगर पोखरून उंदीर काढावा. असल्या खोड्या ते करत. इतकंच काय कपाटांना कुलुपं लावलेली असतात. ती कुलुपं आणि एकूणच कपाटं कशी तकलादू आहेत हे दाखवून देण्यासाठी ते चक्क पिनांनी कुलूप उघडायला शिकले. “नंबर लॉक” असेल तर क्रमांक कसा शोधून काढता येईल ह्याची तंत्र पुस्तकं वाचून शिकले. लोकांची गोपनीय पत्रं चोरून पुन्हा त्यांनाच देऊन चकित करायला लागले. ह्या सगळ्यांचं वर्णन त्यांनी पुस्तकात केलं आहे.
पुढे ते सुट्टीसाठी म्हणून किंवा प्राध्यापकीच्या कामासाठी बरेच महिने ब्राझीलला होते. तिकडे ते वाद्य शिकले. बार मध्ये जाऊन मुलींबरोबर नाचगाणी केली. “मुली कशा पटवायच्या” आणि त्यासाठी सोज्वळपणा टाकून जरा धटाई कशी दाखवायची” हे त्यांच्या मूळ स्वभावाशी विसंगत असलं तरी एक आव्हानासारखं ते शिकले.
ब्राझील मधली घोकंपट्टीवर आधारित शिक्षणपद्धतीबद्दलचे त्यांचे अनुभव वाचताना भारतात आजही तीच परिस्थिती आहे हे जाणवतं.
त्यांचा एक चित्रकार मित्र होता. त्याला विज्ञानात काही रस नव्हता आणि ह्यांना चित्रकलेत काही गती. एकदा त्यांनी ठरवलं की मित्राने ह्यांना चित्रकला शिकवायची आणि ह्यांनी त्याला विज्ञान. फाईनमन ह्यांची ग्रहणशक्ती आणि एखादा किडा डोक्यात शिरला की त्याचा पाठपुरावा करायची वृत्ती इथे चांगली दिसते. ते चित्रकलेच्या वर्गाला जाऊ लागले, चांगली चित्रं काढू लागले इतकं की त्यांची चित्रं विकली जाऊ लागली. प्रदर्शन भरवलं गेलं. पण खोडकर स्वभाव आणि चक्रमपणा तिथेही डोकावलाच. एका “मसाज पार्लरच्या” मालकाला जरा उत्तान चित्र काढून द्यायचं कबूल केलं. पुढे काही कारणामुळे ते रद्द झालं तर थेट वेश्यागृहापर्यंत जाऊन ते ह्यांनी विकायची खटपट केली.
कर्मठ धार्मिक ज्यू लोक धर्म आणि विज्ञान ह्यात कशी गल्लत करतात, शाळेच्या अभ्यासक्रमासाठी पाठयपुस्तकांची निवड कशी अवैज्ञानिक पद्धतीने होते ह्याचेही त्यांचे अनुभव आहेत.
हॉटेलात टीप देताना वैज्ञानिक तत्त्व वापरून वेटरची काढलेली खोडी
एखादी नवीन संकल्पना कळली की स्वतः प्रयोग करून त्याची खात्री करून घ्यायची फाईनमन ह्यांची वृत्ती अनेक प्रसंगांत दिसते. त्यातला एक प्रसंग.
लास वेगास मधल्या नाईट क्लबचा अनुभव
कर्मठ धार्मिक ज्यू लोकांबरोबर चर्चेचा एक प्रसंग
मोठ्या विद्यापीठातली भक्कम पगाराची नोकरी कशी “टाळली”
असे आंबट-गोड-कडू-तिखट अनुभवांनी, किश्श्यांनी भरलेलं पुस्तक आहे. लेखकाची शैली सुद्धा पुस्तकाला साजेशी गप्पा मारणारी आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही. तरी पुढच्या प्रकरणात काय असेल हे वाचायची खूप उत्सुकता वाटत नाही. म्हणूनच हे पुस्तक पूर्ण करायला मला खूप दिवस लागले. “बौद्धिक खोड्यां”चं वेगळेपण जाणवतं. पण “हसून हसून पुरेवाट” असं काही होत नाही. पुस्तकात मध्येमध्ये विज्ञान डोकावतं पण ते इतकं प्रगत पातळीवरचं आहे की ते समजत नाही. खूप सकस, माहितीपूर्ण वाचल्याचं समाधानही मिळत नाही. ४००+ पानांनऐवजी दीडशे/दोनशे पानांत केलं असतं तर ते जास्त वाचनीय झालंअसतं.
अनुवाद फार बोजड झाला आहे. काही वेळा शब्द, वाक्यरचना खटकतात. अनुवाद वाचतो आहोत हे सतत जाणवत राहतं.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–