पुस्तक : टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न  (Telecom Kranticha Mahaswapn)

लेखक : सॅम पित्रोदा (Sam Pitroda)

भाषा : मराठी (Marathi)

मूळ पुस्तक : Dreaming Big (ड्रीमिंग बिग)

मूळ भाषा : इंग्रजी

अनुवाद : शारदा साठे (Sharda Sathe)

पाने : ४०८

ISBN : 978-81-932936-8-3


भारतात टेलिकॉम क्षेत्राच्या आधुनिकीकरणाचा पाया ज्यांनी रचला त्या सॅम पित्रोदांचे हे चरित्र आहे. त्यांचा जन्म ओरिसात राहणाऱ्या गरीब गुजराती घरात १९४२ साली झाला. तिथपासून त्यांचे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठीचे कष्ट, अमेरिकेत उच्च शिकण घेतानाचा संघर्ष, सत्यनारायण चा सॅम होणे, आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे अमेरिकेत नवीन संशोधन करत नाव व समृद्धी मिळवण्याचा प्रवास आहे. त्याकाळी स्वप्नभूमी अमेरिकेत जाऊन स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या असंख्य भारतीयांप्रमाणे ही “कष्टातून प्रगतीची” कहाणी आहे. 


या गोष्टीला वेगळं वळण मिळालं कारण ज्या टेलिकॉन क्षेत्रात ते काम करत होते त्यातल्या सुधारणा भारतातही पोचाव्यात हे स्वप्न त्यांनी बघितलं. त्यांच्या मोठ्या लोकांशी असणाऱ्या ओळखीतून इंदिरा गांधींशी भेट घेता आली. भारतात काय टेलिकॉम क्रांती घडवता येईल, त्यासाठी देशी उत्पादने कशी बनवता येतील, खेडोपाडी फोन कसे पोचवता येतील ही योजना त्यांनी इंदिराजींसमोर मांडली. राजीव गांधी तेव्हा कॉंग्रेसचे किंवा सरकारमध्ये कोणीही नसताना कॉंग्रेसच्या घराणेशाही नुसार राजीवजींच्याकडे ती सगळी माहिती पोचली. त्यांनाही त्यात रस वाटला. आणि पित्रोदांना उदार राजाश्रय मिळाला. केवळ एक रुपया वेतनावर काम करत त्यांनी टेलिकॉम क्रांती साठी आवश्यक संस्थांचं प्रमुखपद, आयोगांचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि संशोधनांचं नेतृत्त्व केलं. गावोगावी “एसटीडी” दिसू लागले. त्याचबरोबर राजीवचे खास असल्याने निवडणूक प्रचारांपासून सामाजिक कामांच्या असंख्य योजना, प्रकल्प यांचे अध्यक्ष/प्रमुख पदावर त्यांची वर्णी लागली. उत्तम तंत्रज्ञान आणि अमेरिकेतली प्रगल्भ कार्यसंस्कृती त्यांनी आपल्या सहकाऱ्यांत रुजवली. हे स्थित्यंतर वाचण्यासारखं आहे.


राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पित्रोदांची प्रतिमा मलीन करण्याचा, भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून त्यांना दूर करण्यात आलं. ते पुन्हा अमेरिकेला गेले. नव्या संकल्पना, “मोबईल पाकिट” संकल्पना इ. वर काम केले. १३ वर्षांनंतर जेव्हा सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस निवडणूक लढवणार असताना त्यांच्यातला कॉंग्रेसचा सेवक पुन्हा जागा झाला. वाजपेयी  सरकारच्या विरुद्ध प्रचार केला. युपीएच्या १० वर्षांच्या काळात त्यांना पुन्हा उदार राजाश्रय लाभला. आणि कितीतरी योजना, आयोग यांच्या माध्यमातून “वैचारिक नेतृत्त्व” देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कॉंग्रेस राज्य गेल्यावर मात्र लगेच त्यांनी इथला कारभार आवरून अमेरिकेत परत गेले. 


आयटी क्षेत्राच्या सुरुवातीच्या दिवसांची एक आठवण


कुठल्याही एका क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्हला खूप कष्टांची गरज असतेच तशीच त्यागाची पण. त्यातला मह्त्त्वाचा त्याग म्हणजे कुटुंबाला न देऊ शकता आलेला वेळ. एखाद्या दुर्दैवाच्या वेळी आपण यश मिळवलं पण त्यासाठी काय गमावलं हे जाणवून मन कातर करणारे क्षण पित्रोदांच्या आयुष्यातही आले. राजीव यांच्या हत्येनंतर विषण्ण मनःस्थितीत केलेलं चिंतन. 


पुस्तकाच्या शेवटच्या भागात त्यांचं वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर मुक्त चिंतन आहे. नातीच्या आगमनाने आयुष्याला नवा अर्थ कसा मिळाला त्याचं भावपूर्ण वर्णन आहे.


पित्रोदांचा हा प्रवास नक्कीच वाचण्यासारखा आहे. एका हुशार तंत्रज्ञाला जर राजकीय पाठबळ मिळालं तर तो काय करू शकतो हे याचं उदाहरण आहे. पण त्यांनीच दिलेल्या माहितीवरून त्यांच्या कार्यात राजाश्रयाचाच वाटा जास्त आहे असं वाटतं. त्यांच्या गांधी घराण्याशी एकनिष्ठतेचे दर्शनही सतत घडतं. “मी आधी भरपूर कमवलं आहे म्हणून देशासाठी एक रुपया वेतनात काम करतो” असं म्हणणारे पित्रोदा राजीवची हत्या झाल्या झाल्या “माझ्या कडे तर काहीच नाही, मी कफल्ल्क आहे, मुलांचं शिक्षण कसं होणार, माझं कसं होणार ?” अशी चिंता व्यक्त करतात तेव्हा, याचा अर्थ अत्तापर्यंत तुमचा सगळा खर्च राजी -म्हणजेच कॉंग्रेस -म्हणजेच देश उचलत होता असं म्हणावं की काय असं वाटतं. मग “एक रुपया वेतनात” काम हा कागदोपत्री मानभावीपणा वातो. राजीवनंतरची दहा वर्षे गांधी लोक सत्तेत नसताना पित्रोदा सोयीस्कर लांब रहिले. त्यांना खरंच देशाची कळकळ असती तर असेल त्या सरकारला सहाय्य करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांनी का केला नाही?  कॉंग्रेसच्या प्रेमापोटी कॉंग्रेसेतर सरकारला विरोध करण्यासाठीही ते कॉंग्रेसची साथ देताना दिसत नाही. असं का? सोनिया गांधी पुढे आल्यावर लगेच ते भारतात आले. आपलं प्रचार तंत्र, बुद्धी वाजपेयींच्या विरुद्ध वापरायला तयार झाले. यूपीएच्या १० वर्षांच्या कामा  त्यांनी काय छान छान कल्पना मांडल्या हे सांगाणारे पित्रोदा, यूपीएच्या भ्रष्टाचार, अनागोंदी वर सोयीस्कर मौन बाळगतात. मोदी सरकार आल्यावर लगेच इथला गाशा गुंडाळून ते अमेरिकेत परत गेले. त्यामुळे एकूणच एक बुद्धिमान; वरून तंत्रज्ञ पण आतून राजकारणी अशा धूर्त उद्योगपतीचे हे चरित्र आहे. सरकार कोणीही असो आपले आपले काम करून देशाची प्रगती साधणारे स्वामिनाथन, कुरियन, टाटा यांच्यापुढे पित्रोदांचं व्यक्तिमत्त्व खूपच खुजं वाटतं.



———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )

———————————————————————————-






———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————