पुस्तक : The day I stopped drinking milk  (द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क)

लेखिका :सुधा मूर्ती ( Sudha Murty )

भाषा : इंग्रजी (English)

पाने : २१२

ISBN : 978-0-143-41865-8



इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी इन्फोसिस फाउंडेशन मार्फत मोठं सामाजिक काम उभं केलं आहे. तसेच आपल्या कथा-कादंबऱ्यातून साहित्य विश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा सुधा मुर्तींचा हा इंग्रजी भाषेतील कथासंग्रह आहे.


या कथा काल्पनिक नाहीत तर लेखिकेला भेटलेल्या व्यक्तींच्या आठवणी आहेत. पण या व्यक्ती कुणी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व नव्हेत तर साध्या साध्या , मध्यमवर्गीय किंवा गरीब व्यक्ती आहेत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी साध्या माणसांनी केलेल्या परोपकाराच्या आहेत. जे स्वतः गरजू आहेत त्यांनी आपल्या पेक्षा जास्त गरजूंची मदत कशी केली याच्या गोष्टी उदा. जी स्वतः झोपडीत राहणाऱ्या गरीब गंगाने भिकाऱ्यांसाठी आंघोळीची व्यवस्था सुरू केली; चाळीतल्या गरीब मुलांनी समाजसेवा म्हणून गरीब-निराधार लोकांच्या अंत्यसंस्कारांसाठी मदत करू लागले इ. काही गोष्टी “आहे रे” वर्गातल्या व्यक्तींनीही देण्यातला आनंद कसा घेतला याच्याही आहेत. उदा. गावातल्या सधन शेतकरी असलेल्या परप्पांनी स्वतःच्या कष्टातून-पैशातून गावातल्या गरीबांसाठी भाजीमळा फुलवला; तर दुसऱ्या गोष्टीत गावच्या पाणी समस्येवर उपाय म्हणून “गावासाठी तळं” बांधा असा आग्रह गावपाटलाच्या लेकीने धरला. 


या जशा “देणाऱ्याच्या” गोष्टी आहेत तशा “घेणाऱ्यांच्याही” आहेत. सुधाजींनी फाउंडेशन मार्फत अनेक निराधार, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य केलं. एका रेल्वे प्रवासात सापडलेल्या चित्राला त्यांनी मदत केली आणि त्या मदतीचं चीज तिने केलं आणि विषेश म्हणजे जाणीव ठेवली. पण सगळेच अशी जाणीव ठेवत नाहीत याचे कटू अनुभवही सुधाजींना आले. कुणी केलेली मदत सरळ विसरून गेलं, कुणी “त्यात काय एवढं मोठं” असं म्हणणारे निघाले तर कोणी आपण मदत घेतली याची लाज वाटून भूतकाळ नाकारणरे निघाले. माणसांच्या या वेगवेगळ्या प्रवृत्तींचं दर्शन आपल्याला या गोष्टींतून दिसतं.


त्यांच्या सहवासात आलेली काही माणसं परिस्थितीनुसार कशी बदलली याच्या काही गोष्टी आहेत. त्यांना भेटलेल्या काहीं वल्लींशीही आपली ओळख त्यांनी काही करून दिली आहे. 


गेल्या २५ वर्षांत भारत खूप बदलला आहे. २५ वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या इमिग्रेशन ऑफिसरने भारताबद्दलच्या अज्ञानातून काय प्रश्न विचारलेले आणि आता प्रश्नांमध्ये किती बदल झालाय याची गंमतशीर आठवणही आहे. 


एकूणच या कथासंग्रहातल्या गोष्टी खूप “इंटरेस्टिंग” किंवा अगदी आगळ्यावेगळ्या आहेत असं नाहीत; पण कंटाळवाण्याही नाहीत. असे अनुभव आणि अश्या व्यक्ती आपल्यालाही भेटतात किंवा आजुबाजूला दिसतात. गप्पागोष्टींमध्ये आपणही एकमेकांना असे किस्से, अनुभव सांगतो. कथांचा बाज साधारण असाच आहे. काही गोष्टी उगीचच प्रकाशित झाल्या आहेत असं वाटतं. पण बहुतेक कथा एकदा वाचायला हरकत नाही.




————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

————————————————————



———————————————————————————

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-