पुस्तक : The God of small things (द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स)

लेखिका : Arundhati Roy (अरुंधती रॉय)

भाषा : English (इंग्रजी)

पाने : ३४०

ISBN : 978-0-14-302857-4


बुकर पारितोषिक विजेते पुस्तक वाचनालयात समोर दिसताच उत्सुकतेने हातात घेतले तरी थोडे घाबरतच वाचायला सुरुवात केली. याचे कारण म्हणजे पारितोषिक प्राप्त पुस्तकांचा/लेखकांचा माझा अनुभव फार चांगला नाही. बुकर मिळालेले “The white tiger(व्हाईट टायगर), ज्ञानपीठ मिळवलेल्या नेमाडे यांचे हिंदू , बुकर पुरस्कारप्राप्त सलमान रश्दींचे “Shalimar the clown” ही पुस्तक मला महा कंटाळवाणी वाटली. (त्याबद्दल थोडक्यात इथे वाचू शकाल).  त्यामुळे अशा पुस्तकांच्या लेखकंच्या वाट्याला जायचं नाही असं मी ठरवलेलं. तरीही धीर करून एकदा खांडेकरांचं ययाती घेतलं आणि ते प्रचंड आवडलं. (परीक्षण). पुरस्कारप्राप्त म्हणजे कंटाळवाणं असा शिक्का नको मारायला असं वाटलं. त्यामुळे हे पुस्तक दिसल्यावर एक संधी देऊन बघूया असं ठरवलं. पण, ययाती अपवादच ठरली. हे पुस्तकही त्याच्या पुरस्कारप्राप्त भावांप्रमाणेच रटाळ ठरलं. 


पानांमागून पाने वाचली तरी कथानक काही आकार घेत नाही. एक ठिकाण, तिथली माणसं त्यांच्या सवयी, त्यांचा भूतकाळ असली वर्णनंच सतत. तेही विनाकारण तपशीलवार. “आईने मुलाला गुडनाईट-किस केलं. तिची लाळ त्याच्याचेहऱ्यावर लागली. ती त्याने पुसली. कूस वळवली”. असलं काहीतरी. समजा एखादा माणून गावातून विमनस्क होऊन बाहेर पडला तर तो कितीतरी वेळ भटकत राहिला असं वर्णन करून पुढे सरकता येतं. पण नाही; त्याला दिसणरी प्रत्येक वास्तू, वस्तू, व्यक्ती यांची पंचनामा केल्यासारखी वर्णनं. वर्णनात मुद्दामून स्तन, नितंब यांच्या आकाराचा उल्लेख. लैंगिकतेची माहिती. ही वर्णनं पुस्तकात नसावीत अशा सोवळेपणातून मी म्हणत नाही, पण कथा सांगण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे नसताना केवळ “बोल्ड” लिहिण्याचा अट्टाहास कशाला? 


भाषा तर अशी बोजड की विचारू नका. जणू काही शब्दसंग्रह बाजूला घेऊन प्रत्येक शब्दाचा सर्वात दुर्बोध समानार्थी शब्द घ्यायचा आणि वाक्य तयार करायचं. मुळातच न येणारा वाचनाचा आनंद या शाब्दिक ठेचांमुळे दुःखातच परिवर्तित होतो. प्रश्न इंग्रजी भाषेचा किंवा माझ्या कमी शब्दज्ञानाचाही वाटत नाही. कारण या पुस्तकाबरोबरच एका इंग्रजी लेखकाने लिहिलेले, जवळपास १०० वर्षांपूर्वीचे आणि साडे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळावरचे पुस्तक वाचत होतो. त्यातही अनेक नवनवीन शब्द येत होते. तरीही संदर्भावरून अर्थ कळत होता. अर्थ नाही कळला आणि शब्दकोश बघायला लागला तर, “हं इथे हाच शब्द पाहिजे होता, एक नवीन अर्थछटा कळली”, असा आनंदाचा, शिकण्याचा भाग होता. या पुस्तकाच्या वाचनात तसा आनंद नव्हता. भारतीय लेखकांचं इंग्रजी वाचताना हा वाईट अनुभव बऱ्याच वेळा येतो. साधं सरळ लिहिलं तर आपल्याला इंग्रजी लिहिता येत नाही असं लोकांना वाटेल अशा गैरसमजुतीपायी आपलं शब्दभांडाराचं प्रदर्शन करत असावेत. म्हणतात ना, बाडगा जास्त जोरात बांग ठोकतो.


पुस्तकाची सुरुवातीची ५० पाने पाने नीट वाचली, पुढची पन्नास पाने भरभर वाचली; पुढची चाळली. तरी शेवटी त्या चाळणीतून “निकं सत्त्व” काही बाहेर पडत नाही म्हटल्यावर प्रयत्न सोडून दिला. तुम्हीही काही वेळ घालवू नका असंच मी सांगेन.


———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-