पुस्तक – The perfect encounter (द परफेक्ट एन्काउंटर )
लेखक – Arun Harkare (अरुण हरकारे)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – २०८
ISBN – दिलेला नाही
ह्या पुस्तकाचे लेखक श्री. अरुण हरकारे यांनी स्वतः मला पुस्तक भेट दिलं. ह्याबद्दल त्यांचा आभारी आहे. माझं प्रामाणिक मत – जसं असेल तसं – मला मांडायला मला सांगितलं. इतके प्रसिद्ध आणि अनुभवी लेखक असूनही एका सध्या वाचकाच्या मताचाही आदर करणारा हा दिलदारपणा खरंच अनुकरणीय आहे.
गुन्हेगारी जगावर आधारित ही कादंबरी आहे. एक कुख्यात गुंड “येडा गफूर” खंडणी, बलात्कार आणि खून यांसारख्या गुन्ह्यांत सामील आहे. पोलीस इन्स्पेक्टर राजन एका खोट्या चकमकीत(एन्काऊंटर) त्याला ठार मारतात. वरिष्ठांच्या आदेशावरून, मंत्र्यांच्या तोंडी आदेशानुसारच हे घडवलं गेलेलं असतं. ह्या हत्येने अस्वस्थ झालेले गफूर चे साथीदार इन्स्पेक्टर राजन ला अडकवण्यासाठी प्लॅन करतात. त्यासाठी त्यांना साथ मिळते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारण्यांची आणि पोलीस दलातल्याच काही अधिकाऱ्यांची. पण राजन असेच अडकणार का ? का त्यांना कोण आणि कसं सोडवेल ? चोरावर मोर कोण ठरेल ?
जास्त काही सांगून गोष्ट उलगडून सांगत नाही पण एकदोन प्रसंग उदाहरणा दाखल देतो.येडा गफूर एकदा पळून जाण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवतो तो प्रसंग
एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजन ला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा डाव गुंड राजकारणी खेळतात. राजकारणाच्या दबावामुळे वरिष्ठांना सुद्धा बोटचेपी भूमिका घ्यावी लागते तो प्रसंग.
पुस्तकात पुढे काय होतं याची उत्सुकता वाटते. पण एकूण सर्व प्रसंग फार सरधोपट चितारले आहेत असं वाटतं. प्रसंगांतले बारकावे कमी टिपले आहेत. पोलीस, गुंड, राजकारणी अशी त्रिपात्री असताना प्रत्येक प्रसंगात तिन्ही बाजू काही ना काही हालचाल करत राहणारच. दोन बाजू गप्प राहिल्यात असं होणार नाही. एखाद्या बिल्डर/राजकारण्याचं अपहरण झाल्यावर त्यांच्या संबंधितांमध्ये केवढी खळबळ माजेल. अपहरण करणाऱ्यांचे आणि तो शोधून काढणाऱ्यांचे उद्योग समांतर चालतील. ज्याचं अपहरण होतंय तो सुटकेसाठी काहीतरी प्रयत्न करेल. त्यात हे पुस्तक थोडं कमी पडतं असं वाटलं. बॉक्सिंग सारख्या एकाचवेळी घडणाऱ्या खेळींपेक्षा बुद्धिबळाप्रणे एक जण चाल खेळतो मग समोरचा मग पुढचा असं वाटत राहतं. त्यामुळे उत्सुकता वाटते, थरार नाही.
पात्र योजना सुद्धा तशी काळी-पांढरी अशी आहे. व्यक्तीमत्वांचे, संवादातले, परस्परसंबंधांतले कंगोरे दिसत नाहीत. कर्तबगार पोलीस ऑफिसर, प्रामाणिक साथीदार, भ्रष्ट राजकारणी आणि गुंड अशी टिपिकल रचना आहे. त्यामुळे खूप वेगळं काही वाचल्याचा अनुभव येत नाही.पोलिसांना एन्काऊंटर करणं का भाग पडतं हे पुस्तकातून ध्वनित करायचा प्रयत्न आहे. गंमत म्हणजे, कायद्याच्या कचाट्यात न अडकता “व्यवस्थित” एन्काऊंटर कशी करावीत ह्या सूचनांची यादीच पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात आहे.
पुस्तक दोनशे पानी असलं तरी मोठ्या टाइपातलं आणि सुटसुटीत ओळींत छापलेलं आहे. नाहीतर सव्वाशे दीडशे पानीच झालं असतं असा अंदाज आहे. त्यामुळे लवकर वाचून होतं. पुस्तकाची भाषा अगदी सोपी इंग्रजी आहे. बऱ्याच ठिकाणी व्याकरणाच्या, स्पेलिंग्ज च्या चुका मुद्रितशोधनातून सुटल्या आहेत.ज्यांना गुन्हेगारी विषयांवर वाचायला आवडतं त्यांना पुस्तक आवडेल. जे अश्या पुस्तकांकडे क्वचित वळतात(माझ्यासारखे) किंवा या जगताबद्दल समजून घेण्याची इच्छा आहे त्यांना ह्या पुस्तकाच्या वाचनातून खास असं वाचल्याचा अनुभव येणार नाही.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-
———————————————————————————
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–