पुस्तक : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (The Power of your subconscious mind)

लेखक : डॉ. जोसेफ मर्फी (Dr. Joseph Murphy)

भाषा : मराठी (Marathi)

मूळ पुस्तक भाषा : इंग्रजी (English)

अनुवाद : प्रा. पुष्पा ठक्कर (Pro. Pushpa Thakkar)

ISBN : 978-81-7786-596-7मन चिंती ते वैरी न चिंती असं आपण मराठीत म्हणतो. म्हणजे, आपलं मन अश्या शक्यता पडताळून पाहत असतं, अश्या विचित्र, प्रतिकूल परिस्थिती निर्माण करू पाहतं की ज्याची कल्पना आपल्या शत्रूनेही केली नसेल. समजा असं व्हायला लागलं की आपलं मन जे विचार करतं तेच प्रत्यक्षात यायला लागला तर? तर अगदीच अनावस्था प्रसंग ओढवायचा. आपल्याला वाटतं तसं प्रत्यक्षात होत नाही हेच बरं आहे. पण खरंच असं होत नाही का ? आपल्या मनातल्या विचारांना काहीच ताकत नाही का ?

तर तसंही नाहीये. आपल्या मनाला त्याच्या विचारांना खरंच खूप ताकद आहे. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मर्फी म्हणतात विचारांना गोष्टी प्रत्यक्ष घडवून आणण्याची ताकद आहे. आपल्या मनाचे चेतन मन आणि अचेतन मन असे दोन भाग आहेत. आणि हे अचेतन मन प्रचंड शक्तिशाली आहे. तुमच्या मनात जे विचार करता, जे स्वप्नचित्र रंगवता ते प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद तुमच्या मनात आहे. म्हणूनच तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवर तुमचे नियंत्रण असणे आवश्यक आहे.
मर्फी काय म्हणतात पहा.

विचार बदला तर तुमचं नशीब बदलेल; विचार बदला तर तुमचा आयुष्य बदलेल. हे वाक्य आपण ऐकतो त्यामागचं तत्त्वज्ञान आणि कदाचित विज्ञान या पुस्तकात असं सांगितलं आहे. हे पुस्तक जरी पावणेतीनशे पानी असलं तरी लेखकाला आपल्याला जे सांगायचं आहे ते एक-दोन पानात पूर्ण सांगण्यासारखं आहे. पूर्ण पुस्तकभर याच तत्त्वाची पुन्हा पुन्हा उजळणी केली आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगळे उदाहरण देऊन हा मुद्दा आपल्या मनावर ठसवण्याचा; त्याची सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

काही महत्त्वाचे मुद्दे :

या पुस्तकात लेखकाने स्वतः घेतलेले अनुभव, इतरांनी त्यांना सांगितलेले अनुभव दिलेले आहेत. अशाप्रकारे मनात चांगले विचार आणून, मन शांत करून मनाला योग्य त्या प्रार्थनेची सवय लावून आयुष्यात कसे बदल घडवले याची उदाहरणे आहेत. हे एक उदाहरण वाचा.

मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, चांगले विचार मनात कसे आणायचे यासाठी सर्वसाधारणपणे आपण प्राणायाम, योग ध्यानधारणा इत्यादी मार्ग अवलंबतो; एकाग्रता वाढवण्यासाठी मानसिक व्यायाम करतो तशी काही तंत्र, मंत्र, युक्त्या व्यायाम आहार इत्यादी सविस्तर दिलेले नाही. त्यामुळे पुस्तक पूर्ण वाचायचा कंटाळा येतो. मी एखाद दोन प्रकरणं वाचली आणि पुढची प्रकरण फक्त चाळून पुस्तक बाजूला ठेवलं.

पुस्तकात दिलेली उदाहरणं सुद्धा खूप अतिशयोक्त वाटतात. मनाची शक्ती खरच इतकी असेल का, यावर लगेच विश्वास बसणे कठीण आहे. बायबल आणि ख्रिश्चन धर्मग्रंथातील या रचनांचा पुस्तकात जागोजागी उल्लेख आहे. हिप्नॉटिझम करून लोकांना फसवणारे, नाचायला लावणारे, वेडेवाकडे चाळे करायला लावणारे भोंदू ख्रिश्चन पादरी आपण टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात बघितले असतील. त्यांच्याकडे आलेले लोक थोड्या प्रार्थना केल्यानंतर लगेच, “आता माझ्या सगळ्या वेदना बऱ्या झाल्या, सगळे त्रास गेले”, असा आरडाओरडा करतात. या सगळ्या प्रकाराचं आपण त्याचं पुस्तक स्वरूप वाचतोय की काय असं वाटतं. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या विषयावर जास्त वैज्ञानिक पुस्तक लिहायला हवं होतं असं असा मला वाटलं. कदाचित लेखकाचा असा अनुभव असेल की लोकांना विज्ञानबिज्ञान काही नको, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा सोपा मार्ग पाहिजे. आणि त्यावर विश्वास बसायला पाहिजे. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच पद्धतीचं “द सीक्रेट” पुस्तक वाचलं होतं. (त्याचं परीक्षण द सीक्रेट – रहस्य (The Secret) – रॉंडा बर्न (Rhonda Byrne) – अनुवाद – डॉ रमा मराठे)

तरीही नकारात्मक विचारांमुळे शरीराला होणारा त्रास आणि त्या मनोवृत्तीने घेतलेले चुकीचे निर्णय टाळून जितकं होता होईल तितकं आनंदी राहणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, प्रसंगी स्वतःलाही माफ करणं महत्त्वाचे आहे हे मात्र आपल्याला नक्की पटेल आणि त्या दृष्टीने आपल्या आयुष्यात आपण बदल केला तरच हे पुस्तक वाचण्याचा आपल्याला फायदा झाला असं म्हणता येईल. 

आणि लेखक म्हणतो त्याप्रमाणे मनाच्या शक्तीद्वारे तुम्ही जर काही चमत्कार घडवू शकलात तर नक्की सांगा.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-