पुस्तक : The True Story of Sunburn ( द ट्रू स्टोरी ऑफ सनबर्न )

लेखक : Shailendra Singh ( शैलेंद्र सिंघ )

भाषा : English (इंग्रजी)

पाने : ३१३

ISBN : 978-93-83359-73-8



“सनबर्न” हा भारतात होणारा आशियातील सगळ्यात मोठा संगीत-नृत्य महोत्सव आहे. पण संगीत महोत्सव म्हटल्यावर “सवाई गंधर्व” सारखा सात्त्विक सोज्वळ कार्यक्रम असेल असं वाटत असेल तर तसं नाही. हा पाश्चात्य धांगडधिंगा नच-गाण्याचा महोतस्व आहे. गणपतीच्या मिरवणुकीत रात्री उशीरा किंवा रेंगाळलेल्या मिरवणुकीत पहाटे जो “डीजे” नाच चालतो त्याचं अति व्यापक रूप. मोठे पटांगण. लाखोंची गर्दी. कानठळ्या बसवणारे संगीत. प्रकाशझोत. परदेशातून आलेले डीजे. “हँड्स इन द एअर.. आर यु फ*** एन्जॉयिंग इट?” चे चित्कार. दारू च्या नद्या. चित्रविचित्र कपडे, वेशभूशा आणि व्यक्तींची सलगी असा एकूण माहोल म्हणजे “सनबर्न”.  त्याला EDM (Electronic Dance Music) म्हणतात इंटरनेट वर शोधलंत तर बरीच माहिती आणि चित्रफिती बघायला मिळतील.

जी कंपनी सनबर्न आयोजित करते तिच्या प्रमुखाने सनबर्नची जन्मकथा सांगितली आहे. कल्पना कशी सुचली, हेच नाव कसं घेत्लं, काय अडचणी आल्या इ. त्या नंतर गेल्या सात-आठ वर्षांतल्या महोत्सवांचा आढावा घेतला आहे. कोण कोण डीजे आले होते, काय विशेष घडलं इ. ही कंपनी आणि वायकोम यांच्या झालेला व्यावसायिक वाद याबद्दल लिहिलं आहे. 


पुस्तक सचित्र आहे. पुस्तकात या महोत्सवाची खूप छायाचित्रे आहेत. ग्राफिकल डिझाइन्स आहेत. पुस्तक इतकं सचित्र आहे की आपण एखादी डॉक्युमेंटरीच पाहत आहोत असं वाटतं. पुस्तकाचं हे रुपडं खूप आवडलं. म्हणून खूप फोटो मी पण काढलेत तुम्हाला लक्षात यावं म्हणून. 






मी स्वतः असला दणदणाट काही मिनिटांच्या वर सहन शकत नाही. त्यामुळे मला या प्रकारच्या इव्हेंचं काही अनुभव आणि आकर्षण नाही. पण वाचनाचा एक फायदा असतो की आपण दुसऱ्यांचे अनुभव – जाणून घेऊ शकतो. त्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मी घेतलं. पण एकूण धांगडधिंगा संगीताप्रमाणे हे पुस्तकही फार वेळ वाचू शकलो नाही. फार रस वाटला नाही. थोडं वाचलं बरचसं चाळलं. 



मी सनबर्न चा चाहता असतो तरी इंटरनेट वर साधारणपणे जी माहिती मिळली असती त्यापेक्षा खूप वेगळं किंवा महत्त्वाचं माझ्या हाती लगलं आहे असं मला वाटलं नसतं. एखाद्या कार्यक्रमाची खूपखर्च करून काढलेली स्मरणिका जशी असते – वाचनीय कमी आणि संग्राह्य जास्त; स्मृतिमूल्य जास्त – तसं वाटलं.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) 

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-