पुस्तक – थेंबे थेंबे (Thembe thembe)
लेखिका – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १६६
ISBN – 978-93-91469-07-8

ह्या आधीच्या २१२व्या पुस्तक परीक्षणात म्हटलं होतं त्याप्रमाणे लोकप्रिय लेखिका मंगला गोडबोले यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग आला होता. त्यांची नुकतीच प्रकशित झालेली दोन पुस्तकं त्यांच्या स्वाक्षरीसह मिळाली. २१२ वं परीक्षण त्यातल्या एका पुस्तकाचं होतं. हे दुसरं. “महिला बचत गट” ह्या विषयावरचं.

महिला बचत गट ह्या बद्दल प्रत्येकाला थोडीतरी माहिती असेलच. महिला एकत्र येऊन स्वतःची अल्पबचत एकत्र करून काही पुंजी तयार करतात आणि गटातल्याच कोणाला कर्जाऊ रक्कम देतात. त्यातून कोणी आपली घरगुती नड भागवते तर कोणी छोटामोठा व्यवसाय सुरु करते. ठराविक मुदतीत घेतलेली रक्कम सव्याज परत करते. समजायला अतिशय सोपी संकल्पना. पण ह्या छोट्या संकल्पनेने फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी अल्पउत्पन्न वर्गातल्या महिलांना आधार दिला आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायला मदत केली आहे; गरिबीवर मात करायला मदत केली आहे. महिला बचत गट (पुस्तकातलं लघुरूप – मबगट ) दाखवत असलेला हा दृश्य परिणाम झाला. त्याचे अदृश्य असे सामाजिक परिणाम कितीतरी मोठे आहेत. मबगट स्थापन होणे, चालवणे, वाढणे इतर गटांशी सहकार्य करून महागट होणे ह्या प्रत्येक पातळीवर सहभागी स्त्रियांचा आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक विकास होतो. एक अबोल आणि रक्तविहीन सामाजिक क्रांतीच !
“थेंबे थेंबे” हे पुस्तक ह्या परिणामांचा मागोवा घेते. मबगटांचे महत्त्व अधोरेखित करते.ह्या संकल्पनेची सुरुवात कशी झाली. भारतात आणि भारताबाहेर ह्या बचतीचे स्वरूप कसे होते हा थोडा इतिहास पुस्तकात मांडला आहे. मग मबगट कसा स्थापन होतो, चालवला जातो, लिखापढी कशी ठेवली जाते हा तांत्रिक भाग आहे. ह्यासंबंधी सरकारी योजना पूर्वी कुठल्या होत्या, सध्या कुठल्या आहेत आहेत; बँका व नाबार्ड सारख्या संस्था मबगटांना कर्ज कश्या देतात इ. माहिती आहे. त्यानंतर बऱ्याच यशस्वी मबगटांची, त्यांनी सुरु केलेल्या उद्योगांची माहिती आहे.
मबगट चळवळीत मोठं योगदान देणाऱ्या; अनुकरणीय पायंडे पडणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांची ओळख आहे.
ही सगळी माहिती देताना त्या त्या योजनेमुळे फक्त बायकांवरच नाही तर त्यांच्या कुटुंबियांवर आणि पूर्ण गावावर कसा सकारात्मक परिणाम झाला हे मुद्देसूदपणे मांडलं आहे.अनुक्रमणिका
काही पाने उदाहरणादाखल
मबगटांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वरूप; बडोदानरेश सयाजीराव गायकवाडांनी राबवलेली कल्पना आणि ब्रिटिश काळातले कायदे.
मबगटात कर्ज कसं दिलं जातं, कसं वसूल केलं जातं ह्याबद्दलची ही पाने


गटांमुळे सहभागी महिलांच्या व्यक्तिमत्त्वात व त्यांच्याकडे बघण्याच्या कुटुंबाच्या दृष्टेकोनात कसा फरक पडतो ह्याचं हे एक विश्लेषण.



महत्कार्य करण्याऱ्या व्यक्तींपैकी एक संजूताई केळकर

शेवटी कोरोनाकाळात पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी च्या नेतृत्त्वात मबगटांच्या मार्फत गावोगावी योग्य माहिती पोचवणे, गावातून शेतीउत्पन्न गोळा करून शहरांतल्या ग्राहकांपर्यंत पोचवणे असं मोठं काम केलं गेलं. त्याबद्दल सांगितलं आहे. संगठनाच्या सकारात्मक आणि रचनात्मक वापरातून मबगट ही किती सुप्त ताकद आहे हे पटल्याशिवाय राहणार नाही.

सामाजिक प्रभाव मांडताना पुस्तकात मुद्द्यांची पुनरुक्ती झाली आहे. तो भाग कदाचित थोडा कमी करता आला असता. बँकांच्या, इतर पतसंस्थांच्या योजना हा तांत्रिक भाग समजतो पण लक्षात राहणं कठीण आहे.

महिला बचत गट ह्या उपक्रमाची ज्यांना ओळख नाही किंवा केवळ तोंडओळख आहे अश्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचून ह्या सुप्त क्रांतीची सविस्तर ओळख करून घेतलीच पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे गट आहेत का हे पाहावं, जमल्यास त्यांना आपण काही सहकार्य करावं; आपल्या ओळखीच्या गरजू स्त्रियांना त्याची ओळख करून द्यावी; सामाजिक प्रश्नांवर नुसती चर्चा करण्यापेक्षा त्याची आवाक्यातली उत्तरं शोधणाऱ्या ह्या प्रवासात सहभागी व्हावं असं आपल्याला वाटल्याशिवाय राहणार नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/