पुस्तक : वाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht)

लेखक : निरंजन घाटे (Niranjan Ghate) 

भाषा : मराठी (Marathi)

पाने : २४५

ISBN : दिलेला नाही


निरंजन घाटे हे प्रसिद्ध विज्ञानकथा आणि वैज्ञानिक लेख लिहिणारे ज्येष्ठ लेखक आहेत. जितकी त्यांची पुस्तकांची संख्या भरपूर आहे (विकीपिडिया नुसार १८५ पेक्षा जास्त) तशीच त्यांची वाचन कारकीर्द ही भरपूर आहे. या पुस्तकातून त्यांनी आत्तापर्यंत वाचलेल्या, महत्त्वाच्या पुस्तकांची लेखकांची ओळख करून दिली आहे. त्यांचं वाचन अफाट आहे. त्यांना कुठला विषय वर्ज्य नाही, लेखक वर्ज्य नाही, लेखन प्रकार वर्ज्य नाही का पुस्तकप्रकार वर्ज्य नाही. कथा, कादंबऱ्या, लेखसंग्रह, चरित्रं हे नेहमीचे प्रकार आहेतच पण संशोधनांचे अहवाल,  शब्दकोश, विश्वकोश, विषयानुरूप जंत्र्या, असभ्य/चावट कथा-कविता त्यांनवरची वैज्ञानिक माहिती; भूत-पिशाच्च-प्लॅंचेट यांच्यावरची पुस्तके हे देखील आहे. म्हणूनच त्यांनी विषयानुरूप प्रकरणे ठेवली आहेत ती अशी

शब्दकोशांच्या प्रकरणातही इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे माहितीकोश असतात हे वाचून थक्क झालो मी. शब्दकोश म्हणजेफक्त डिक्शनरी किंवा विश्वकोश नाही तर विषयानुरुप माहिती मांडली जाते हे मलाही थोडं नवं होतं. उदा. ट्रकड्रायवरांच्या बोली भाषेचा कोश, लघुरूपांचा संग्रह, बायबल मध्ये येणाऱ्या शब्दांचा कोश, उच्चारांची डिक्शनरी इ.

झंगड पुस्तकं म्हणजे चाकोरी बाहेर जाऊन काही साहसं, सामजिक प्रयोग, सफरी करणऱ्या लोकांनी लिहिलेली, त्यांच्या अनुभवांवरची पुस्तकं

त्यांनी आपल्याला कितितरी पुस्तकांची नावं सांगितली आहेत, ओळख करून दिली आहे. पण ती पुस्तक परीक्षणे नाहीत आणि नुसती अकारविल्हे यादी नाही. तर त्या त्या विषयांवरच्या पुस्तकांवरच्या गप्पा आहेत.  वाचनाची सुरुवात कशी झाली, लहानपणी कुठली पुस्तकं वाचायला मिळाली हे सांगितलं आहे. प्रकरणाशी संबंधित एका पुस्तकाबद्दल सांगायला सुरुवात केली की त्या लेखकाच्या अजून पुस्तकांची नावं येतात. मग त्याचाच समकालीन लेखक कोण होता, त्याची पुस्तकं कुठली ते येतं. या लेखकाच्या विरोधी प्रतिपादन कोणी केलं ते येतं. त्याचवेळी मराठीत यातल्या कुठल्या पुस्तकाचं भाषांतर आलंय का, किंवा त्या पद्धतीने कुणी लिहिलंय का ते येतं. देशी विदेशी पुस्तकांच्या दर्जा बद्दल चर्चा होते. काही विषय परदेशात का आणि कसे लिहिले गेले यांची ते पार्श्वभूमी समजावून सांगतात. गप्पांच्या ओघात त्या त्या लेखकाचे किस्से येतात. ही पुस्तकं घाटे यांना कशी मिळाली याचे किस्से येतात. उदा. काही पुस्तकं त्यांना रद्दीच्या दुकानात किंवा जुन्या पुस्तकांच्या दुकानात योगायोगाने मिळाली. जुनी पुस्तकवाले पण अभ्यासू वाचकांना कशी पुस्तकं आठवणीने मिळवून देत याचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. विदेशातून भारतात रद्दी म्हणून, जहाजात तळात भरायचं वजन म्हणून पुस्तकं वापरली जायची आणि बंदरावर रद्दीचा लिलाव व्हायचा त्या सिस्टीम ची माहिती सांगितली आहे. त्यांच्या लिखाणाचे, संपादनाचे ही काही अनुभव सांगितले आहेत. नमुन्यादाखल ही एक दोन पानं वाचा म्हणजे कल्पना येईल.

(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)

असं माहितीने भरलेलं पुस्तक आहे हे. पुस्तक वाचताना एक मनात आलं की इतकं अफाट वाचन, विषयांच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची चिकाटी, विषयाचा सर्व बाजूने पूर्वग्रह न ठेवता अभ्यास करण्याची बौद्धिक तयारी,वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाची आवड आणि स्वतःच्या भाषेत ते मांडायची प्रतिभा हे एखाद्या संशोधकाला आवश्यक गुण घाटे यांच्यात ठासून भरले असून स्वतः ख्यातकीर्त शास्त्रज्ञ, संशोधक झाले नाहीत. इतरांच्या अभ्यासाचा, लेखनाचा अभ्यास करून त्यावर आधारित स्वतःचं लेखन त्यांनी केलं, इंग्रजीतली माहिती मराठी लोकांसमोर आणली. हे काम खूपच महत्त्वाचं आहे हे नि:संशय. पण अजून मोठं अद्वितीय काम हातून होऊ शकलं असतं. अशी कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला उपजत सुंदर गळा आहे. त्याने रियाझ करून फक्त आपल्या गाण्यावर लक्ष केंद्रित करून मोठं गायक होण्याच्या ऐवजी इतरांच्या मैफिली ऐकत, मोठ्या गायकापासून हौशी कालाकारपर्यन्त नुसती गाणीच ऐकत सुटावं, त्यांची वर्णनं करावीत, ते कसे गायले हे आपल्या आवाजात ऐकून दाखवावं. आणि एका महान कलाकाराला समाज मुकावा. तसंच काहीसं वाटलं हे.

या पुस्तकात इंग्रजी साहित्यावर जास्त भर आहे. त्याचं कारण त्यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केलं आहे की त्यांचं इंग्रजी वाचन जास्त झालं. आणि मराठी माणसाला मराठी लेखक-पुस्तकांची ओळख असेलच. ती पुन्हा करून देण्यापेक्षा अल्पपरिचित इंग्रजी साहित्यावर भर ठेवणं अधिक उपयुक्त होईल.

छायाचित्रे नाहियेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांच्या वाचनाच्या वेगाबद्दल लोक त्यांना विचारतात असा उल्लेख आहे. तो उपजतच आहे असं त्यांचं म्हणणं पडलंय. हा वेग वाढवण्यासाठी काहीच करता येणार नाही का हे ते सांगत नाहीत. इतकं वाचायला वेळ कसा मिळाला किंवा कसा काढला हा प्रश्न कुणालाही पडेल. त्याचं उत्तर पुस्तकात नाही.  

पुस्तकात इतके लेखक आणि पुस्तकांची नावं येतात की मी काही पानांनंतर ते लक्षात ठेवायचा नाद सोडून दिला. त्यावरून मला असा प्रश्न पडला की त्यांनी इतकं वाचलं त्यांच्या त्यापैकी किती लक्षात राहिलं असेल? जास्त लक्षात रहावं यासाठी त्यांनी काय केलं? सगळं लक्षात राहणं आवश्यक आहे का की पुस्तकाचा गाभा कळला की पुरे झालं? इतकी पुस्तकं, मासिकं संग्रही असताना योग्य वेळी संदर्भ सापडावा यासाठी त्यांनी काही विशेश क्लृप्त्या लढवल्या असतील का? पण या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात नाहीत. त्यांनी वाचन मार्गदर्शनावरही एक पुस्तक लिहायला हवं.

ज्याला खूप वाचनाची आवड आहे, जो स्वतःला पुस्तकी कीडा समजतो त्याला आपल्यातला एक “बकासूरकीडा” भेटल्याचा आनंद होईल आणि वाचण्याचं प्रमाण अजून वाढेल. ज्यांना वाचनाची फार आवड नाही त्यांना हे वाचता वाचता घेरी येईल आणि तो पुस्तक बाजूला ठेवेल. जो थोडंफार वाचतो त्याला आपल्या अल्पवाचनाबद्दल न्यूनगंड वाटेल किंवा पुस्तकांच्या नवीन दालनांची ओळख झाल्याने वाचायचा हुरूप वाढेल.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- पुस्तकी किड्यांनी आवा ( आवर्जून वाचा )

                                       थोडंफार वाचणाऱ्यांनी जवा ( जमल्यास वाचा )

                                       वाचन न करणाऱ्यांनी नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-