पुस्तक – Atomic Habits (ॲटोमिक हॅबिट्स)
लेखक – James Clear (जेम्स क्लिअर)
भाषा – English(इंग्रजी)
पाने – ३०६
प्रकाशन – पेंग्विन रँडम हाऊस युके, २०१८
छापील किंमत – रु. ७९९ /-
Atomic Habits (ॲटोमिक हॅबिट्स) हे एक स्वमदत (सेल्फहेल्प) प्रकारचं पुस्तक आहे. आपलं वागणं, अपल्या सवयी ह्यातून आपलं व्यक्तिमत्त्व जगासमोर येत असतं. आपला मूळ स्वभाव(पिंड), आपल्यावर झालेले संस्कार, त्यातून जडलेल्या सवयी आपल्या आयुष्याला आकार देत असतात. इतका, की आपण म्हणतो “माणूस सवयीचा गुलाम आहे”. पण सगळ्याच सवयी काही जन्मजात नसतात. लहानपणापासून मरेपर्यंत नवीन सवयी लागत राहतात. जुन्या सवयी सुटतात. म्हणजे आपण सवयींचे गुलाम असलो तरी स्वतःला सवय लावून घेणारे मालकही आपणच आहोत. मात्र चुकीच्या सवयी लवकर लागतात आणि चांगल्या सवयी लवकर लागत नाहीत. लागल्या तर फार काळ टिकत नाहीत. चुकीच्या सवयी झट्कन जात नाहीत. आणि इथेच लेखक जेम्स क्लिअर आपल्या मदतीला धावून येतो.
नवीन सवय लावताना आपण खूप मोठी उडी घ्यायचा प्रयत्न करतो. आता ह्यापुढे आयुष्यात फलण्या फलाण्या गोष्टीला हात लावणार नाही किंवा आता आयुष्यभर रोज अमुकतमुक करीन असं. पण ह्या “आयुष्यभरा”चं आयुष्य असतं काही दिवस; फारफार तर काही आठवडे. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. हे टाळायचं असेल तर लेखक पुस्तकात काही छान क्लृप्त्या सुचवतो. जसं की, मोठ्या गोष्टीच्या अगदी छोट्या भागाने सुरुवात करा. ती पटकन होईल अशी असली पाहिजे. म्हणजे रोज व्यायाम करीन असं म्हणायच्या ऐवजी आधी व्यायामाच्या वेळी फक्त व्यायामासाठी तयार राहीन इतकंच. त्याची सवय झाली की आता त्यावेळी बूट घालून खाली जाऊन येईन इतकंच. मग पुढे एक राउंड मारीन; बस. असं करत करत स्वतःत हळूहळू बदल केला पाहिजे. हे बदल होताना स्वतःच स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी बक्षीस सुद्धा दिलं पाहिजे.
हे असं का करायचं ह्याच्या मागे मनोवैज्ञानिक आणि जीवशास्त्रीय कारणं आहेत हे पण लेखकाने छान समजावून सांगितलं आहे. उदा. आपल्याला वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण केलं पाहिजे हे तर शेंबडं पोर ही सांगेल. पण गोड पदार्थ, तळणीचे पदार्थ दिसले की रहावत नाही. संकल्प मोडतो. पटकन तोंडात टाकलं जातं. ह्याचं कारण काय तर आपला मेंदू. माणूस नावाच्या “प्राण्याचा”मेंदू ! . डोळ्यासमोर आणा जंगलात अन्नाच्या शोधात फिरणारा प्राणी. जिवंत राहायचं तर भरपूर अन्न मिळालं पाहिजे. म्हणून जेव्हा अन्न मिळेल तेव्हा खाऊन घ्या. जास्त उष्मांक(कॅलरी) असणारं अन्नपदार्थ दिसला की खाऊन घ्यायचा. न जाणो पुन्हा अन्न कधी मिळेल. वादळ, पाऊस, दुष्काळ आला तर? शिकारीच्या भीतीमुळे बाहेर पडताच आलं नाही; तर ? म्हणून “घ्या खाऊन”. तोच मेंदू माणसात आहे. म्हणून गोडधोड दिसलं की म्हणतो; “घ्या खाऊन”.
पण आता आपण माणूस आहोत. मग आपल्या “प्राण्याच्या मेंदू”ला सांभाळत चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. म्हणूनच लेखकाचं म्हणणं आहे फक्त “आत्मसंयम” सवयी टिकण्यासाठी उपयुक्त नाही. तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचीही त्याला साथ मिळाली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो ? प्रलोभनं कमी दिसतील अश्या पद्धतीने आपल्या घरातल्या किंवा ऑफिसच्या वस्तूंची रचना करता येईल का? चुकीची गोष्ट करणं स्वतःसाठीच कठीण करून ठेवता येईल का ? उदा. मोबाईलचं व्यसन सोडायचं असेल तर म्हणजे मोबाईल स्वतः पासून लांब ठेवणं, पासवर्ड बदलून टाकणं इ. केलं तरी प्रत्येकवेळी उठून लांब मोबाईल बघायला जाणं कमी होईल. अश्या पद्धतीने चांगल्या कृती स्वतःसाठी सोप्या करायच्या ह्या नियमाचा व्यत्यास म्हणजे वाईट सवयी स्वतःसाठीच कठीण करायच्या.
सवयी टिकवण्यासासाठी अजून एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपल्या वागण्याची नोंद ठेवायची. जेणेकरून कितीवेळा आणि किती कालावधी आपण सवय पाळली; कितीवेळा मोडली हे स्वतःलाच समजेल. आपण आता सवय पाळू लागलो आहे हे बघून आपलाच हुरूप वाढेल आणि सवय टिकायची शक्यता वाढेल. अश्या कितीतरी कल्पना, सल्ले, टिप्स पुस्तकात दिल्या आहेत.
सवय लागण्याचे फायदे आहेत तसे काही धोके सुद्धा आहेत. हेही नमूद करायला आणि त्यावर चर्चा करायला लेखक विसरत नाही. म्हणजे असं की एखाद्या गोष्टीची सवय लागली की आपण त्याच पद्धतीने वागत राहू. काळानुरूप काही बदल करायला हवा, सुधारणा करायला हवी ह्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. किंवा त्या कृतीचा पुढचा टप्पा – नैपुण्य – गाठण्याऐवजी आता हे असं जमतंय तसंच चालू राहू दे. असं वाटू शकतं. हे टाळता आलं पाहिजे ह्याबद्दलही लेखकाने मार्गदर्शन केलं आहे.आपला पिंड, आपली गुणसूत्रे आणि सवयी ह्यांचा परस्पर संबंध आहे. केवळ जन्मजात हुशारी किंवा कौशल्य आहे म्हणून कोणी यशस्वी ठरत नाही. तसंच केवळ मेहनत करून अगदी योग्य दिनचर्या, सराव, रियाज करूनही अपेक्षित यश मिळणार नाही; जर उपजत गुण नसतील तर. म्हणून ह्या दोन्हीचा विचार करून आपलं ध्येय ठरवलं तर यश मिळण्याच्या शक्यता कशा वाढतील. हे लेखकाने स्पष्ट केलं आहे.
आता काही पानं वाचून बघा
“लक्ष्य” ठरवा… पण “लक्ष” ते सध्या करण्याच्या प्रक्रियेवर असू दे
सवय टिकवण्यासाठी एक सल्ला “हॅबिट स्टॅकिंग”
स्वतःची एकाग्रता भंग करणारं नको ते वागणं आपण कळूनसवरूनही का करतो ?
पुस्तकाचा सारांश एका नजरेत दाखवणारे हे दोन तक्ते
कुठल्याही स्वमदत पुस्तकात असतं त्याप्रमाणे देशोदेशींची सर्वेक्षणे; त्यांचे आकडे आणि निष्कर्ष, यशस्वी लोकांची उदाहरणे, जैवशास्त्रीय तांत्रिक माहिती ह्यात आहे. पण हे पुस्तक “अति महत्वाकांक्षी”, “अति स्वप्नाळू” असं नाहीये. बहुतेक माहिती, “टिप्स”, उपाय हे आपल्या “कॉमन सेन्स”ला पटणारे आहेत. त्यातून पुस्तकाची स्वीकारार्हता वाढली आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे लेखकाचं सांगणं प्रत्यक्ष आचरणात आणायलाही “जमण्यासारखं” आहे. कोणीही हे पुस्तक वाचून त्याप्रमाणे स्वतःत बदल केला तर फायदा निश्चितच होईल. पण जितक्या लहानपणी, तरुणपणी हे पुस्तक कोणी वाचेल त्याला कोवळ्या वयाचा फायदा घेऊन स्वतःत बदल करणं सोपं जाईल आणि झालेल्या बदलांचा आनंद घ्यायचा मोठा काळही हाताशी असेल. त्यामुळे तुम्ही वाचाच; तुमच्यापेक्षा वयाने, मानाने, ज्ञानाने, हुद्द्याने कमी असणाऱ्याला हे वाचायला सांगून त्याच्या प्रगतीत हातभार लावा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून काही स्वमदत, आरोग्यविषयक पुस्तकांची मी लिहिलेले परीक्षणे
- आहार सूत्र-भाग ३ (Aahar sutra : Part3) – डॉ. मालती कारवारकर (Dr. Malati Karwarkar )
- आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक २०१९ (Arogya Dnyaneshvari Diwali Edition 2019)
- लीन इन (Lean in) – शेरिल सॅंडबर्ग (Sheryl Sandberg) – अनुवाद : अशोक पाध्ये (Ashok Padhye)
- The Basics of Success (द बेसिक्स ऑफ सक्सेस) – Tim Connor (टिम कॉनर)
- The Psychology of Money (द सायकोलॉजी ऑफ मनी)- पैशाचे मानसशास्त्र (Paishache Manasashastra) – Morgan Housel मॉर्गन हाउजेल – अनुवाद – डॉ. जयंत कुलकर्णी (Dr. Jayant Kulkarni)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe