पुस्तक – मृत्युंजय (Mrutyunjay)
लेखक – शिवाजी सावंत (Shivaji Sawant)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ६०१
प्रकाशन – कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती १९६७
ISBN – ह्या आवृत्तीत दिलेला नाही.
“मृत्युंजय” ही मराठीतील अतिशय गाजलेली आणि लोकप्रिय कादंबरी. इतकी, की बऱ्याच जणांनी मराठीच्या अभ्यासक्रमाबाहेरचं पहिलं पुस्तक वाचलेलं असतं ते “मृत्युंजय”. काही लोक असे बघायला मिळतात; जे म्हणतात, “मी फार पूर्वी थोडं वाचायचो; किंवा फारच थोडं वाचलं आहे.. मृत्युंजय वगैरे”. तर असं हे १९६७ साली प्रथम प्रकाशित झालेलं पुस्तक. ५५ वर्षांनंतरही आपली जादू टिकवून आहे. अजूनही नवीन आवृत्त्या/पुनर्मुद्रण होत आहे. पुन्हा पुन्हा त्यावर लोक लिहीतही असतात त्यामुळे ह्या कादंबरीच्या परीक्षणाची तशी गरज नाही आणि मी नव्याने काही सांगावं असं नाही. तरी मी पण माझ्या पुस्तक परीक्षणाच्या यादीत हे पुस्तक वाचलं ह्याची इतर पुस्तकांप्रमाणे नोंद व्हावी आणि मला त्यातलं काय आवडलं हे सांगावं म्हणून हे छोटे लिखाण.
“मृत्युंजय” कादंबरी ही महाभारतातलं पात्र “कर्ण” ह्याच्या जीवनावर आधारित आहे. कुंतीला लग्नाआधी मंत्रसामर्थ्यामुळे सूर्यापासून झालेला मुलगा कर्ण. कुमारिका असताना मूल झाल्यामुळे ती जन्मतःच त्याचा त्याग करते. एका पेटाऱ्यात ठेवून नदीत सोडून देते. हा पेटारा वाहत वाहत दुसऱ्या गावी जातो. तिथे एका सारथ्याला तो सापडतो. तो सारथी अधिरथ आणि पत्नी राधा त्याचा सांभाळ करतात. कर्ण नाव ठेवतात. त्याला जन्मतःच कानात कुंडलं आणि अंगावर कवच असतं. शस्त्रास्त्रांची आवड असते. अधिरथ धृतराष्ट्रांचा सारथी असल्यामुळे ते वसुसेनाला हस्तिनापुरात शिकायला घेऊन येतात. गुरु द्रोण ह्यांच्या आश्रमात पाठवतात. कर्ण एक सारथीपुत्र आहे; क्षत्रिय नाही त्यामुळे द्रोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण तिथून आयुष्यभर सारथीपुत्र/सूतपुत्र म्हणून त्याची अवहेलना होत राहते. तरी तो शास्त्रविद्येत प्रविण होतो. त्याचा पराक्रम सगळ्यांना दिसत असतो. मात्र कितीही कर्तृत्व दाखवा त्याला क्षत्रियांच्या बरोबरीचा मानायला कोणी तयार होत नाही. तू हलक्या कुळातला आहेस हे सांगून त्याला कमी लेखलं जातं. दुर्योधन ह्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतो.
कर्णाच्या ह्या दुर्दैवी आयुष्याचे भावपूर्ण चित्रण म्हणजे “मृत्युंजय”. ह्या कादंबरीचं स्वरूप आत्मकथनासारखं आहे. आधी कर्ण आपल्या बालपणाबद्दल सांगतो. मग कुंती आपल्या बालपणाबद्दल, आयुष्याबद्दल सांगते. तिचं जीवनसुद्धा काही सोपं नाही. ती एक राजकुमारी. पण वडील तिला बालपणी मित्राला दत्तक देतात. तिथं तिचं आयुष्य बदलतं. दुर्वासांनी दिलेल्या वरामुळे कुमारी माता बनते आणि आयुष्य बदलतं. मग राजा पांडुची पत्नी होते. पण त्याला मिळालेल्या शापामुळे वनवास भोगावा लागतो. पांडु मरण पावल्यावर विधवा राजमाता म्हणून पुन्हा हस्तिनापूर. पुढे कौरव-पांडवांचा कलह आणि कर्ण-पांडवांचा संघर्ष तिला बघावा लागतो.
कर्णाच्या बालपणावरून कथानक पुढे जाते ते त्याची पत्नी वृषाली, शोण, दुर्योधन, कर्ण ह्यांच्या निवेदनांतून. शेवटचे प्रकरण आहे श्रीकृष्णचे निवेदन. कर्णाचं धैर्य, शौर्य, औदार्य, अवहेलनेतून आलेला कडवटपणा, त्याचा प्रतिशोध घेण्याची ऊर्मी, त्याला दुर्योधनाने दिलेलं बळ आणि त्यातून आलेली कौरवांशी निष्ठा वाहण्याची गुलामी हे सगळे ताणेबाणे स्पष्ट होतात. कर्णावर प्रभाव टाकणाऱ्या दुर्योधन, कुंती आणि श्रीकृष्ण ह्यांची मनोभूमिका त्या त्या निवेदनातून कळते. इतर पात्रांचे वर्तन फक्त दिसते. ह्या सगळ्या वर्णनातून कर्ण आणि त्याच्या सभोवतालच्या पात्रांच्या मनोभूमिका आपल्या समोर स्पष्ट उभ्या राहतात. अश्वत्थामा आणि कर्ण ह्यांच्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या संवादात “जीवन म्हणजे दवबिंदू आहे … जीवन म्हणजे वस्त्र आहे ..” अशा प्रकारचे जीवनविषयक तात्विक चर्चा मध्येमध्ये घडते
श्रीकृषणाचं निवेदन मात्र प्रसंग वर्णन जास्त आहे. त्याचं हे सगळे प्रसंग घडण्या/घडवण्यामागचं तत्त्वज्ञान मात्र नीट ठसत नाही. त्यामुळे, कर्ण, दुर्योधन, कुंती जशा ठसतात तसा कृष्ण ठसत नाही. कदाचित कर्ण आणि कृष्ण ह्या दोन प्रभावी व्यक्तिमत्त्वांची तुलना होऊन “कादंबरीच्या नायकावरून” वाचकाचं लक्ष कमी होईल; विचार प्रवाह तात्त्विक चर्चेकडे वळेल आणि त्यामुळे कादंबरीचा अपेक्षित परिणाम साधणार नाही असा साहित्यिक विचार करून लेखकाने कृष्णाला आवरते घेतले असावे.
महाभारतात प्रत्येक पत्राचा एक स्वभावधर्म/पिंड आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घटना घडतायत ज्यातून चांगलं किंवा वाईट काहीतरी करायला प्रत्येक जण उद्युक्त होतो आहे. पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर; पूर्ण नायक किंवा पूर्ण खलनायक; पूर्ण दोषी किंवा पूर्ण निर्दोष असं कोणी दिसत नाही. स्वभाव, परिस्थिती, घटना अश्या अनेक घटकांच्या मिश्रणातून प्रत्येकाच्या स्वभावाची नवी घडण होते आहे; त्यातून ते नवी परिस्थिती तयार करतायत आणि काही अनिच्छेने घटना घडत आहेत; त्यातून पुन्हा नवी परिस्थिती, नवे अनुभव; असं रोमहर्षक चित्रण आहे. हजारो वर्ष झाली तरी महाभारत अजूनही आपली मोहिनी सर्वांवर टाकतं आहे आहे; त्याचं कारण हेच असावं. महाभारताच्या ह्या आत्म्याला साजेसं असंच हे मृत्युंजय !
पुस्तकाची भाषा पौराणिक पुस्तकांना असते तशी भारदस्त, संस्कृतप्रचुर आहे. त्यातून साधली जाणारी भावचित्रनिर्मिती, रसनिष्पत्ती अगदी रोचक, त्यामुळे कथानक सर्वपरिचित असलं तरी आपण उत्सुकतेने आणि रंगून वाचत राहतो.
उदाहरणादाखल काही पाने.
द्रोणाचार्यांकडचे शिक्षण पूर्ण झाल्यावर शौर्यदर्शनाच्या समारंभात कुंती कर्णाला बघते. त्याचा पराक्रम, “सूतपुत्र” म्हणून लोकांनी केलेला अपमान आणि अंगदेशाचा राजा म्हणून दुर्योधनाने दिलेला मान असं सगळं बघते. तेव्हाची तिची अवस्था
“वस्रहरणाच्या” प्रसंगी जे घडतंय ते अनैतिक पण ते पूर्णपणे अयोग्य का ? दोषी फक्त कौरवच का ? जुगारी युधिष्ठिर आणि अहंकारी द्रौपदीच्या कर्माचीच ही फळं नाहीत का ! तरी तिने एकदा आपल्याकडे मदत मागावी मग “अबलेचं” रक्षण करायला मी तयार आहे असल्या विचारांच्या भोवऱ्यात अडकलेला कर्ण
कर्णाच्या पराक्रमाचे त्याचा भाऊ “शोण” ह्याच्या निवेदनातून वर्णन
पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि निवेदक पात्रांची चित्रे दीनानाथ दलालांची आहे.
इतकी प्रसिद्ध आणि वाचनीय कादंबरी तुम्ही वाचली नसेल तर नक्की वाचा हे वेगळं सांगायला नको.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
पौराणिक विषयांवर आधारित अजून काही पुस्तकांचे परीक्षण
- अद्वैताचं उपनिषद (Advaitach Upnishad) – शुभांगी भडभडे (Shubhangi Bhadbhade)
- आचार्य द्रोण (Acharya Dron) – अनंत तिबिले (Anant Tibile)
- ययाति (Yayati) – वि.स. खांडेकर (V.S. Khandekar)
- रामकथामाला (Ramkathamala) – दीपाली नरेंद्र पाटवदकर (Deepali Narendra Patwadkar)
- शिल्पकथा (Shilpakatha) – पुरुषोत्तम विठ्ठल लेले (Purushottam Viththal Lele)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe