पुस्तक – The Baba Ramdev Phenomenon (द बाबा रामदेव फेनॉमेनन)
लेखक – Kaushik Deka (कौशिक डेका)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – १८४
ISBN – 978-81-291-4597-0

बाबा रामदेव हे भारताच्या घरोघरी पोचलेलं नाव आहे. टिव्हीवर त्यांचे कार्यक्रम बघून योगासने, प्राणायाम करणारे बरेच लोक आहेत. त्यांनी सांगितलेल्या घरगुती उपायांद्वारे स्वतःच्या विकारांवर नियंत्रण मिळवणारे लोकही बरेच आहेत. योग आणि प्राणायाम याचा इतका प्रचार-प्रसार करत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाचा तो भाग होईल अशा सोप्या पद्धतीने सादर करणे ह्यासाठी रामदेवबाबांना नक्कीच श्रेय दिले पाहिजे. रामदेव बाबांची कंपनी “पतंजली”ची उत्पादने – टूथपेस्ट, मध, तेल, नूडल्स, शाम्पू – अशी कितीतरी आहेत . आणि तीही लोकप्रिय आहेत. इतकी लोकप्रिय की गेल्या काही वर्षात बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालाऐवजी लोक पतंजलीची उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यामुळेच एक साध्या संन्यासी ते योगगुरू ते पासून लाखो करोडोची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे संस्थापक म्हणून झालेला त्यांचा प्रवास कुतूहलाचा विषय ठरतो. योग आणि स्वदेशी उत्पादनाबरोबरच भारतीय संस्कृतीअनुरूप शिक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, राजकीय व्यवस्था परिवर्तन अशा क्षेत्रातही त्यांचा वावर असतो. एकांतात रमणारा किंवा अध्ययन-अध्यापन यातच समाधान मानणारा हा संन्यासी नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व हा देखील कुतूहलाचा विषय ठरतो. आपलं हे कुतूहल थोड्याफार प्रमाणात शमवण्याचे होण्याचे काम कौशिक डेका यांच्या या पुस्तकाने केले आहे.

पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती

अनुक्रमणिका


पुस्तकाच्या सुरुवातीला भाग बाबा रामदेव त्यांच्या प्राथमिक जडणघडणीवर आहे. बालपण, अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे अर्धवट सोडावे लागलेलं शिक्षण, योगाभ्यास करून आपल्या अपंगत्वावर केलेली मात, औपचारिक शालेय शिक्षण पुरेसे न वाटल्यामुळे पारंपारिक शिक्षण घेण्यासाठी घर सोडून गुरुकुलात जाणं, आचार्य बालकृष्ण यांची ओळख, योग, जडीबुटी, वेद उपनिषद आजचा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास इ. भाग आहे.

एक संन्यासी म्हणून ते ध्यानधारणेत आणि अध्ययन-अध्यापनात रमले असते. पण संन्यासी माणसाचं ज्ञान हे समाजकल्याणासाठी उपयोगात आले पाहिजे; त्याने समाजाभिमुख असलं पाहिजे या त्यांच्या भूमिकेमुळे मग योग, शिक्षण आणि औषधनिर्मिती याची सुरुवात झाली. पुढे पतंजली उद्योगाची पायाभरणी झाली. त्यांची योगा क्लासेस घेण्याची सुरुवात त्यानंतर आयुर्वेदिक उत्पादने जडीबुटी लहान प्रमाणात तयार करायची सुरुवात आणि त्यातून कंपनीची सुरुवात याबद्दल आहे.

पतंजलीची आर्थिक उलाढाल गेल्या काही वर्षात कशी वाढली; बहुराष्ट्रीय कंपन्यांना पतंजली चा वेगळा विचार का करावा लागला पतंजलि मॉडेल नक्की काय आहे हा “बाबा रामदेव फेनॉमेनन” चा महत्त्वाचा भाग पुढे आहे.

पुस्तकात इथून पुढे सुरुवात होते ती रामदेव बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या कार्याचा चहुबाजूने वेध घेण्याची. शिक्षण विषयक प्रकरणात रामदेव बाबांनी सुरू केलेल्या शाळा व विद्यापीठांची माहिती आहे. त्यात भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय शिक्षण पद्धतीवर असणारा भर दिला जातो. सरकारने सुद्धा ही शिक्षणपद्धती मान्य करावी यासाठी त्यांचा आग्रह आहे. पण केंद्र सरकारकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये असं निरीक्षण लेखकाने नोंदवले आहे.

उदाहरणार्थ

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात झाली त्यातही रामदेवबाबा सक्रिय होते. त्यांनी वेळोवेळी राजकीय भूमिका घेतल्या. त्या कालखंडात घडलेल्या घटना, रामदेव बाबांनी केलेली विधाने, त्यांच्यावर झालेली टीका ह्यावर एक प्रकरण आहे.

रामदेव बाबांची विचारसरणी सहाजिकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व हिंदुत्ववाद यांच्याशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे ह्या पक्ष संघटनांची त्यांचे चांगले संबंध आहेत. भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यात पतंजलीचे उद्योग किंवा संस्था स्थापन यासाठी कमी दराने जमिनी दिल्या गेल्या आहेत किंवा सवलती दिल्या गेल्या आहेत आणि त्याबद्दल दोन्ही बाजूंनी त्यावर टीका आणि समर्थन हे देखील केला गेला आहे त्याबद्दलचे “डेटा” आहे.

एकीकडे भाजपा बद्दल आपुलकी आणि चांगले संबंध दिसतात तरी मतभिन्नता देखील आहे. त्यामुळेच 2014 च्या निवडणुकीत रामदेव बाबांनी मोदींना उघड पाठिंबा दिला होता तरी त्यानंतर मोदींच्या कामा बद्दल काही वेळा नाराजी उघड केली आहे. ही मतभिन्नता; भाजपाशी सुधारणारे किंवा ताणले जाणारे संबंध याचा ऊहापोह आहे.

उद्योग धंदा करायचा म्हटलं की सरकारी यंत्रणांशी सुसंवाद आणि त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागावं लागतं. प्रत्येक वेळी भाजपाचं सरकार असेलच असं नाही. त्यामुळे रामदेवबाबांनीही भाजपाचे कट्टर विरोध असणाऱ्या पक्षांचीही आपले चांगले संबंध ठेवले आहेत. इतर पक्षांनीही वेळोवेळी त्यांच्या उद्योगांना मदत केली आहे त्याबद्दल एका प्रकरणात आहे.

उदा. योगाचा स्वअभ्यास आणि घर सोडून जाण्याचा प्रसंग


पतंजली ची व्यूहरचना आणि कार्यशैलीतील वेगळेपण सांगणारी ही पाने

  

पतंजली समोरची आव्हाने
पतंजलीच्या जाहिरातींत रामदेव बाबाच “मॉडेल”. त्यामुळे मॉडेल वर कोट्यवधींचा खर्च नाही. पण भरपूर खर्च केला जातो. “स्वदेशी” उत्पादने घ्या हा आग्रह त्यांचा जाहिरातींचा गाभा. त्याबद्दलची ही काही पाने

शिक्षणाकडे भारतीय पद्धतीने बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यासाठी बाबांचे कार्य ह्याची एक झलक
हे पुस्तक रामदेव बाबांचा चहूअंगांनी वेध घ्यायचा प्रयत्न करते. लेखनाने त्यांची मुलाखत घेतली आहे. पण पुस्तकाचा इतर सर्व भाग हा वृत्तपत्रांतल्या बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह वाटतो. अबक विषयावर रामदेवांनी असं विधान केलं होतं. त्यावर क्ष व्यक्तीने तसं विधान केलं होतं. अमुक वृत्तपत्राच्या लेखात लेखकाचं असं म्हणणं आहे. तमुक रिपोर्ट नुसार पतंजलीचे आकडे असे आहेत इ. असं एकूण स्वरूप आहे. ह्या सगळ्या ताज्या घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे आपल्याला त्या साधारण माहिती असतात. बातम्या वाचलेल्या असतात. पण पडद्यामागे काय घडलं होतं हे समजण्यात आपल्याला जास्त रस असतो. किंवा त्या घटनेचं पृथक्करण अपेक्षित असतं. पुस्तकाकडून ही अपेक्षा पूर्ण होत नाही. पुस्तकात रामदेव बाबांच्या संस्थाची नाव, त्याची अर्थी उलाढाल, त्यांना मिळालेल्या जागा ही आकडेवारी येते. पण ते सगळं लक्षात राहणं कठीण आहे. तसंच पुस्तक प्रकाशित झालं तेव्हापासून (२०१७ पासून) आजपर्यंत त्यात कितीतरी बदल झाला असेल. पुस्तकाच्या मजकुराचा जो अर्क आहे – “फेनॉमेनन” मागची रामदेव बाबांची भूमिका; आलेल्या अडचणींवर मात कशी केली, एक माणूस म्हणून ते कसे आहेत – तो फार कमी हाती लागतो. त्यामुळे अभ्यासपूर्ण पुस्तकाऐवजी रामदेव ह्यांच्यावरचा अहवाल वाचतोय असं वाटतं.

पुस्तक छोट्या आकारातलं कमी पानांचं आहे. मजकूर कठीण नाही. त्यामुळे लवकर वाचून होईल. बाबा रामदेव ह्यांच्याबद्दल थोडीफार नवी माहिती कळेल. काही छायाचित्र पहायला मिळतील.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

उद्योग आणि उद्योजक यांच्याविषयीच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

  • परदेशात उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या धनंजय दातार यांच्या पुस्तकाबद्दल इथे वाचू शकाल
  • स्वबतंत्र्यपूर्व काळातले उद्योजक ओगले कुटुंबीयांवरच्या पुस्तकाबद्दल इथे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/