पुस्तक – वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाईस (Vatsalavahinincha Adhunik advhais)
लेखिका – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १५९
ISBN – 978-93-5220-337-6

हे माझं दोनशे बारावं पुस्तक परीक्षण. पण हे पुस्तक विशेष आहे. माझ्या परीक्षण लेखनातलं वैविध्य आणि सातत्य ह्याचं कौतुक लोकप्रिय मंगला गोडबोले ह्यांना वाटलं. त्यातून त्यांच्या भेटीची, गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्या स्वहस्ते, त्यांच्या स्वाक्षरीसह त्यांची नव्याने प्रकाशित झालेली दोन पुस्तके मिळाली. त्यामुळे आनंद तर झालाच पण परीक्षण लेखनाचा हुरूप सुद्धा वाढला. त्या दोन पुस्तकांपैकी एकाचं हे परीक्षण. दुसऱ्याचं परीक्षण थोड्या दिवसांनी लिहीनच.

आता पुस्तकाबद्दल …
गेल्या काही वर्षांमध्ये तुमची आमची सगळ्यांची जीवनशैली झपाट्याने बदलत गेली आहे. 90 च्या दशकात आलेल्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याच्या जोडीला वाढते यांत्रिकीकरण, इंग्रजीकरण, इंटरनेटीकरण, सांस्कृतिक सपाटीकरण अशी बरीच “करणं” ह्या बदलांमागे आहेत. सगळेच बदल वाईट नाहीत आणि सगळेच बदल चांगलेही नाहीत. एकाच बदलाचा चांगला आणि वाईट असा दोन्ही परिणाम होतो आहे. यंत्रांमुळे एकीकडे आयुष्य सोपं होतंय तर दुसरीकडे आपण शारीरिक क्षमता गमावतोय. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय पण आपल्या जवळच्या, समोरच्या व्यक्तीशी बोलायला आपल्याला फुरसत नसते, हे चित्र आहे. ह्या बदलांचा झपाटा इतका आहे की दोन पिढ्यामधलं अंतर सोडा; आपलं आपल्यालाच दहा वर्षापूर्वीचे आपण आणि आजचे आपण यात कितीतरी फरक दिसतो. पूर्वीच्या आपल्या जगण्यातल्या आनंदाच्या छोट्या-छोट्या जागा आता हातून निसटल्या आहेत असं वाटतं. हे असं निसटून जाणं संवेदनशील मनाला अधिकच खुपतं. संवेदनशील मनाची ही घुसमट मंगला गोडबोले यांनी आपल्या खास विनोदी शैलीतून मांडली आहे. त्यांनी 2020 मध्ये “लोकसत्ता” वृत्तपत्राच्या “चतुरंग” पुरवणीत लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. लेखात मांडायचा मुद्दा गंभीर असला तरी तो विनोदी शैलीत खुसखुशीत भाषेत मांडला आहे त्यामुळे वाचायला मजा येते आणि मुद्दाही थेट पोचतो.


प्रत्येक लेखात मुख्य पात्र वेगळं आहे. कधी एका सोसायटीतले प्रौढ काका, कधी एखादा तरुण मुलगा, कधी गृहिणी तर कधी आजीबाई. आपल्या आजूबाजूला रोजच्या रोज घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनातून एक मोठा सामाजिक बदल जाणवून ते अस्वस्थ होत आहेत. अस्वस्थपणा फारच वाढल्यावर ते एका हेल्पलाइनला फोन करतात. ही वत्सलाबाईंची हेल्पलाईन तुमच्या समस्येवर ठोस असं उत्तर देत नाही पण तुमच्या समस्येवर हलकेच फुंकर घालायचा प्रयत्न करते. कधी हसून त्याकडे वेगळ्या नजरेने बघायला सांगते तर कधी त्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण शरणागती स्वीकारायला सांगते. तर कधी आपल्या दृष्टिकोनातूनच बदल करायला सांगते. मुख्य पात्राला आलेल्या अनुभवातून सामाजिक स्थित्यंतराचा वेध घेतला आहे तर वत्सलाबाईंच्या बोलण्यातून दुसरी बाजू मांडण्याचा छोटा प्रयत्न. उदाहरणार्थ हल्लीच्या मुलांना आपले नातेवाईक, त्यांचं येणं जाणं फार आवडत नाही ते त्यांच्या मित्रांमध्ये आणि फेसबुक फ्रेंड्स मध्येच खुश असतात नातेवाईक त्यांना बोरिंग वाटतात. असे अनुभव घेणारी आई आणि तिचा हेल्पलाईनशी संवाद.


ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांचं पेव सध्या फुटलं आहे. पण चिमुटभर इतिहासावर स्वतःच्या कल्पनांचं कलम करुन इतिहासाच्या विडंबनकलाकृतीच जास्त होतायत. अशाच एका चित्रपटाचा दिग्दर्शक आपल्या इतिहासाच्या शिक्षिकांना भेटायला येतो तो प्रसंग.


या स्थित्यंतराच्या काळात काही गोष्टी मात्र अजिबात बदलेल्या नाहीत हं! उदा. वस्तू गोळा करायचं आपलं कौशल्य. फ्री मिळालं म्हणून घेतलं, स्वस्तात मिळालं म्हणून घेतलं, हौस म्हणून घेतलं, कोणी दिलं म्हणून घरात ठेवलं, जुन्या आठवणी जोडल्या गेले आहेत म्हणून घरात ठेवलं… असं करता करता घरातल्या वस्तूंची संख्या वाढत जाते आणि घर बदलायची किंवा आवराआवरीची वेळ आली की डोक्याला झिणझिण्या येतात. काय टाकावे काय ठेवावे कळत नाही. प्रत्येकाला दुसर्‍याची वस्तू अडचण वाटते. असाच एक अनुभव.


गृहिणी पदाची जबाबदारी आणि करियर ही तारेवरची कसरत. त्याचे अनुभव मांडणारे काही लेख आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती लोकांना आता नकोशी वाटते आहे इंग्रजी माध्यमाचा सुळसुळाट झाला आहे, मराठी मातृभाषा धड बोलता येत नाही. आपले सणवार संस्कृती नीट माहिती नाही. फक्त नथ घालून मिळवणे किंवा फेटा बांधून नाचणे असल्या फोटो पुरतीच ती राहिली आहे. अशा व्यथा मांडणारे लेख आहेत. शाळेतल्या मुलांना सुद्धा सतत कसली ना कसली शिकवणी लावून त्यांना लहान वयातच सुपरमॅन सुपरवुमन करण्याची पालकांची धडपड आहे. पूर्वीचा बालपणीचा निवांतपणा आता त्यांना मिळत नाही. ही रुखरुख सुद्धा काही लेखात आहे.
“श्रीमंत पतीची राणी” या लेखात सुखवस्तू कुटुंबातल्या एखाद्या स्त्रीने स्वतः धडाडी दाखवत काही केलं तरी ती सुखवस्तू आहे तिला सगळं आयतं कुटुंबाकडूनच मिळालं असं म्हणत तिच्या कामाचं श्रेय देत नाही हे निरीक्षण मांडलं आहे.

शहरी-निमशहरी, मध्यमवर्गीय,उच्च-मध्यमवर्गीय समाजातल्या ह्या नेहमीच्या घटनांचे बरे-वाईट कंगोरे मंगलाताईंनी मांडले आहेत. त्यांची खुसखुशीत, शाब्दिक कोट्या करणारी विनोदी शैली मला नेहमीच भावते. ह्या पुस्तकातही ती आवडली. भाषेवरची पकड, एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ, एकाच शब्दाभोवती गुंफलेले वेगवेगळे वाक्प्रचार यांच्या वापरातून मजा आणली आहे. त्यामुळे लेखांमधल्या मुद्द्यांइतकंच हे भाषिक खाद्य सुद्धा पौष्टिक आहे. ही काही नमुन्यदाखल वाक्येआम्हाला पूर्वी शिकवायचे चांगला विनोद हे शस्त्र असतं. हत्यार. आता जास्त वेळा विनोदाची हत्याच करतात एकेक जण.

“नको बाई. ती दार लावून झुंबाचे ऑनलाईन क्लासेस घेते आणि तो फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातो”.
“वास्तविक “तिला” लाइनीवर आणणं, दार उघडं ठेवून नाच शिकणं काही अशक्यप्राय नव्हतं. पण घराच्या तालावर नाचण्याच्या नादात तो पर्याय विचारातच घेतला नाही.”

“खरं तर लग्नात बहुतेक ‘बिनउपाशी’ माणसं मजबूत दुधातुपाशी जेऊन उठलेली होती पण नंतर साबुदाणे वडे थाळ्यांतून आल्यावर त्यातल्या काहींना देवभक्ती आठवली. त्यांनी भरल्यापोटी वडे हाणल्यावर काही उपाशीपोटींची झाली जराशी गैरसोय”

“… आपलं बायकांचं वेगळं पडतं ना हो”
“काय पडतं ?एक प्रपंच गळ्यात पडला की स्वतःचं सगळं मागे पडतं ? की पडतं घेण्याचं सुरक्षित वळण पडतं ?..”

मंगलाताईंची निरीक्षणशक्ती इतकी जबरदस्त आहे की आपल्याला म्हणावं लागतं की “खरंच, अगदी तंतोतंत असंच घडतं. .. असेच संवाद होतात”. त्यामुळे आपण त्यांच्या लिखाणाशी समरस होतो. लेखांमधले सगळे मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. वाचकाला “मीही असंच वागतो की काय? माझंही काही चुकत असेल का ?” असं आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत; ते ही हसत खेळत !

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

मंगला गोडबोले ह्यांच्या अजून काही पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/