पुस्तक – ग्रंथ स्पंदन (Granth Spandan)
लेखक – चन्द्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १८४
प्रकाशन – ऑगस्ट २०२६, भाग्यश्री प्रकाशन
ISBN – 978-81-687601-8-9

चन्द्रशेखर टिळक अर्थतज्ञ, व्याख्याते, व्यासंगी वाचक, लेखक अशा विविध पैलूंनी परिचित आहेत. त्यांच्या वाचनाला विषयाचं बंधन नाही, लेखक कोण याचे बंधन नाही किंवा विशिष्ट विचारसरणीची पुस्तकं आहेत का असं कुठलंही बंधन नाही. चौफेर, चौरस आणि बहुआयामी असं त्यांचं वाचन आणि अभ्यास आहे. या पुस्तकात त्यांनी २९ पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. पण असं म्हणण्यापेक्षा २९ पुस्तकांबद्दल त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल.

पुढे जाण्याआधी लेखकाचा पुस्तकात दिलेला परिचय वाचा म्हणजे पुढच्या वर्णनाचे महत्त्व स्पष्ट होईल.

ह्या पुस्तकाचा प्रमुख सोहळा कोल्हापुरात झाला तर दुसरा सोहळा टिळकांच्या आणि माझ्या गावात डोंबिवलीत झाला. माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्य. ह्या कार्यक्रमात मी त्यांची मुलाखतही घेतली.

 

 

प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत त्यांचं एक वाक्य होतं की, “ना परिचय, ना परीक्षण, निव्वळ परिशीलन” असं ह्या पुस्तकातील लेखांचे लेखकाने केलं आहे. हे खरंच आहे. ते त्या पुस्तकांचा परिचय करून देत नाहीयेत तर ती पुस्तक वाचताना त्यांच्या मनात काय तरंग उठले, हृदयात काय स्पंदने उठली हे त्यांनी ते शब्दांकित केलंय. त्यामुळे पुस्तकाचं शीर्षक “ग्रंथ स्पंदन” अतिशय सार्थ आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती एका पानातून ओघळणारा थेंब आणि जणू आधीच्या थेंबातून तयार झालेले तरंग असं सुंदर चित्र आहे.

यात कथासंग्रह, कादंबरी आहे, पौराणिक कादंबरी, स्फुटलेखन, चित्रकारांची चरित्र, वैचारिक लेखन अशी विविध प्रकारची पुस्तकं ह्यात आहेत. मार्क्स आणि विवेकानंद, चाणक्य नीति, महामंत्री विदुर अशी विचारसरणीची चर्चा करणारी पुस्तक आहेत. तर शिल्पकार करमरकर, चित्रकार देऊसकर, दीनानाथ दलाल अशा नामवंत कलाकारांची चरित्र आहेत. दि. बा. मोकाशींसारख्या सारख्या प्रथितयश लेखकाचे कथासंग्रह आहेत. प्रत्येक पुस्तक हे माहितीने परिपूर्ण, वैचारिक खाद्य देणारं आणि आपल्याला अजून सुसंकृत करणारं आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.

ह्या सगळ्या पुस्तकांबद्दल लेखक व्याख्यान देतायत किंवा आपल्याशी गप्पा मारतायत अशा शैलित हे पूर्ण लेखन आहे. ते पुस्तक त्यांच्या हातात कसं पडलं त्याची गंमत लेखक सांगतात. पुस्तकातलं काय भावलं, कुठली वाक्य आवडली, कुठली वाक्यरचना किंवा कुठले शब्द लक्षात राहिले हे सांगतात. उदा. अभिराम भडकमकर लिखित सीता या पुस्तकात बद्दल लिहिताना ते म्हणतात की

सीतेचे वर्णन अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शब्दात केले आहे.
न बोलता काय आणि कसे सांगायचे हे उमगलेली
पृथ्वीचे लघुरुप
दाहक पवित्रता
निगर्वी विनम्रतेचा पुतळा
बुद्धीगर्भ तेज
ठाम वैचारिकता
बुद्धिवंता
आभाळाची स्थितप्रज्ञता
कालजया
कालातीत
वगैरे वगैरे …

म्हणजे पुस्तक वाचताना त्यांनी फक्त मजकूर वाचला नाही तर त्या मजकुराच्या शैलीचं केलेलं रसग्रहण त्यातलं वेगळेपण सुद्धा ते आपल्यासमोर मांडतात.

पुस्तक आणि त्यातला मजकूर इथपर्यंत ते सीमित राहत नाहीत, तर हे पुस्तक वाचताना या विषयावरची आणखी चार पुस्तके त्यांना आठवतात. काही वेळा याच लेखकाची अजून चार पुस्तक आठवतात. नुसती नावं देऊन ओझरता उल्लेख करून ते थांबत नाही तर सहजच दोन पुस्तकांची तुलना होते. दोन लेखकांची तुलना होते. दोन पुस्तकांच्या नायकांची तुलना होते आणि त्यातून साधक-बाधक विचार ते आपल्यासमोर मांडतात. उदा. महामंत्री विदुर या पुस्तकाबद्दल लिहिताना त्यांना आठवतं की, “विदुरावर मराठीपेक्षा हिंदी भाषेत जास्त लेखन करण्यात आले आहे…महामंत्री विदूर या व्यक्तिमत्त्वाबद्दल “सत्त्वशील” (मृणालिनी शिवाजी सावंत) आणि “विदुर” (रामकृष्ण गोविंद जानकर ) ही मराठी पुस्तक आहेत. म्हणजे या विषयावर त्यांनी आधी पुस्तक वाचलेली आहेत. अधिकाधिक पुस्तक मिळवायचा प्रयत्न केला आहे आणि नवीन पुस्तक मिळाल्यावर पुन्हा ते मनापासून वाचले आहे. किती दांडगा व्यासंग. त्यामुळे ग्रंथ स्पंदन हे पुस्तक फक्त book on books नाही तर book on books on books आहे. कारण प्रत्येक पुस्तकाबद्दल वाचताना अजून चार पुस्तकांची माहिती आपल्याला मिळते.

पुस्तक वाचताना जणू तो विषय त्यांच्या डोळ्यासमोर त्याच्या इतिहास-भूगोला सकट उभा राहत असावा. कारण पुस्तकातला प्रसंग वाचताना त्यावेळी समाजात आजूबाजूला काय घडत होतं, समकालीन व्यक्ती काय करत होत्या हे संदर्भ त्यांच्या नजरेसमोर येतात. उदा. साधना बहुळकर लिखित स्त्री चित्रकार या पुस्तकाबद्दल लिहिताना

जे. जे. स्कूलचा उल्लेख आल्यावर ते माहिती देतात की..

वास्तववादी शैली (दिसते तसे काढणे) म्हणजे बॉंबे स्कूल
जे.जे. स्कूल आणि मुंबई शेअर बाजार या दोन्ही संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचा हातभार असणारी व्यक्ती म्हणजे जमशेदजी जीजिभोय.
दोन्ही संस्थांना त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती.
दोन्ही संस्थांच्या इमारतींना त्यांचेच नाव दिले आहे.
एकंदरीतच जीजीभाई यांचा हातभार असणाऱ्या या दोन्ही संस्थांचा as is where is या तत्त्वावर असणारा विश्वास हे ह्या.

हे असं वाचून माझी मती गुंगच झाली. चित्रकलेच्या पुस्तकाबद्दल लिहिताना चित्रकला, इतिहास, शेअर मार्केट अशा अनेक मितींची सैर एका क्षणात आपल्याला घडते.

हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की लेखक पुस्तकातला मुख्य मजकूर जितक्या तन्मयतेने वाचतात तितक्याच तन्मयतेने अर्पण पत्रिका, पाठमजकूर (ब्लर्ब) चा विचार करतात. त्यातलं त्यांना काय भावलं तेही अधोरेखित केलं आहे. ते मुखपृष्ठही नीट न्याहाळतात. त्याची शैली, रंगसंगती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मुखपृष्ठाच्या रचनेचे त्यांनी लावलेले अर्थ आपल्यासमोर मांडतात. मुखपृष्ठाचा इतका बारकाईने विचार आणि त्याचं रसग्रहण मला वाटतं फार कमीच वाचक करत असतील. मी सुद्धा इतकी पुस्तक वाचतो पण मुखपृष्ठ छान आहे, बरं आहे इतकं बघून पुढे वाचायला सुरुवात करतो. “ग्रंथ स्पंदन” पुस्तक मार्गदर्शन करतं की चांगल्या वाचकांनी मुखपृष्ठावरही थबकलं पाहिजे. त्या कलाकृतीलाही दाद दिली पाहिजे. ती आवडतेय का नाही, त्यात काय वेगळेपणआणण्याचा करायचा प्रयोग केलाय हे सगळं समजून घेतलं पाहिजे. “ग्रंथ स्पंदन” मध्ये चित्रकार आणि शिल्पकार यांच्यावरच्या चार पुस्तकांचा समावेश आहे ह्यात नवल वाटत नाही. नवल तेव्हा वाटतं जेव्हा लेखक म्हणतात, की मला काही चित्रातलं कळत नाही. खरंच यांच्या एवढं तरी चित्रकलेतलं कळायला लागलं असतं तर किती मजा आली असती.

त्यांना चित्रकलेतील जसं कळतं तसं कवितेतलंही चांगलंच कळतं. ते स्वतःही कविता करतातच. त्यामुळे पुस्तकाच्या परिशीलनातून उठलेले आलेले भावनिक तरंग हा पण त्यांच्या लेखांचा महत्त्वाचा भाग आहे. लेखकांची स्वतःची जणू मुक्तछंदातली कविताच. मीना कुलकर्णी लिखित “अंतरंग” या पुस्तकावरच्या लेखाचा शेवट ते करतात

हे पुस्तक आणि पर्यायाने त्यातले लेख आपले शीर्षक सार्थ करतात…
आपले अंतरंग आपल्यालाच
… कधी कळते,
… कधी कळत नाही.
… कधी कळून न कळल्यासारखे आपण वागतो,
… कधी न कळून कळल्यासारखे…
हे पुस्तक अगदी तसेच आहे.
अंतरंग….

ह्या मुक्त छंदात्मक लेखनामुळे पुस्तकातला मजकूर बराचसा उभा, सुटा सुटा असा छापला आहे.

प्रत्येक लेखाच्या शीर्षस्थानी पुस्तकाचे मुखपृष्ठ, लेखक, प्रकाशक किंमत इ माहिती दिली आहे. त्याच बरोबरीने पुस्तक कशाबद्दल आहे, त्यात काय आहे ह्याबद्दल एक परिच्छेद सुरुवातीला हवा असं मला वाटलं. जिथे टिळकांच्या निवेदनातून हे स्पष्ट होत नाही तिथे लेखक कशाबद्दल बोलतायत हे बराच वेळ कळत नाही. अंदाजा अंदाजाने वाचावं लागतं. उदा. पहिलाच लेख खेळ मांडीयेला मध्ये टिळकांनी जणू लेखिकेला उद्देशून पत्र लिहलंय. आणि टिळकांच्या लहानपणच्या आठवणी दिल्या आहेत. त्या आठवणी जागवण्यामागे पुस्तक कसं कारणीभूत ठरलं हे न कळल्याने गोंधळ होतो. स्फुटलेखन असलेल्या पुस्तकांबद्दलही असंच झालं. शेवटपर्यंत नेमका अंदाज आला नाही. चंद्रशेखर टिळकांना पुस्तकाचे तपशील दिलेले आवडत नाहीत असा उल्लेख एका लेखात येतो. पण जितका तपशील ते लेखाच्या ओघात उघड करतात तितका तपशील सुरवातीला तरी असावा. म्हणजे लेखक आणि वाचक दोघेही एकाच तळ्याकाठी येतील आणि समान स्पंदने उठतील.

आता काही पाने उदाहरणादाखल.

“रावा” पुस्तक वाचनाचा योग कसा आला


काळ आणि अवकाश ह्याबद्दल लेखकाची “स्पंदने”

तर असं हे “ग्रंथ स्पंदन” पुस्तक आपल्याला फक्त २९ पुस्तकांची माहिती देत असे नाही तर वाचावं कसं, वाचनाचा आनंद कसा घ्यावा, विषयाचं आकलन कसं वाढवावं, मुखपृष्ठापासून पाठमजकुरापर्यंत प्रत्येक बाबीकडे अभ्यासपूर्ण आणि रसिकतेने कसं पहावं हे शिकवणारं आहे.

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

पुस्तकं, साहित्य, साहित्यिक ह्यावरच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परिक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३७२वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link