पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)
लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni)
भाषा – मराठी
पाने – २३९
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४
छापील किंमत – रु. ३७०/-
ISBN – 9789357205337

अनुवादामुळे एका भाषेतल्या चांगल्या साहित्यकृतींची ओळख दुसऱ्या भाषिकांना होते. त्यांचा आनंद घेता येतो. त्यामुळे जगभर चांगल्या पुस्तकांचे अनुवाद होत आहेत. मराठीत सुद्धा अनेक चांगल्या साहित्यकृतींचा, वेगळे अनुभवविश्व मांडणाऱ्या पुस्तकांचा अनुवाद मराठीत केला जातो. ज्यातून मराठी वाचक आणि वाचनसंस्कृती समृद्ध होत आहे. पूर्वीप्रमाणे अनुवादाकडे दुय्यम लेखन कला म्हणून आता कोणी बघत नाही, असं मला वाटतं. उलट अनुवादकामुळे एक चांगलं पुस्तक आपल्या भाषेत आलं; त्याबद्दल सुजाण वाचक अनुवादकाला मनोमन धन्यवादच देतो. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्याही मनात येतं; अरे, किती सहज अनुवाद आहे ! आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. तरी पुस्तकात दिलेली त्यांची ही ओळख बघा म्हणजे अजून माहिती कळेल.

पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत.

पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं.
जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला, आहे ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) टर्मिनोलॉजी काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे.

शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे.
हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं.

पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल.

पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं.

आता पुस्तकातली काही पाने वाचा म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल

अनुक्रमणिका

अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव.


प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग.


अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल.


नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने.


लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे !

मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणं हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा )
इतरांसाठी जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शास्त्रीय, माहितीपर इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe