पुस्तक – साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya)
लेखक – गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २४५
छापील किंमत – ३०० रु.
प्रकाशन – मधुश्री पब्लिकेशन, मे २०२२
ISBN – 978-81-95377-24-4

“ब्लॉकचेन” ह्या गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या आणि फोफावणाऱ्या तंत्रज्ञानाची सखोल ओळख करून देणारं हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे हे इंग्रजीतून मराठीत भाषांतरित पुस्तक नाही तर ते स्वतंत्र मराठी पुस्तकच आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नेटवर उपलब्ध माहिती गोळाकरून ती मराठीत आणली आहे असंही नाही. तर मराठी वाचकाला, तंत्रज्ञानाशी जवळून संबंध नसणाऱ्या व्यक्तीला योग्य अश्या पद्धतीचा मूळ मराठी मजकूर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान नवं असूनही त्यावर प्रत्यक्ष काम केलेल्या लेखकाने स्वानुभवातून लिहिलं आहे. लोकसत्ता वृत्त्तपत्रात लेखकाने जी लेखमाला चालवली होती त्या लेखांचा हा लेखसंग्रह आहे. हे पुस्तक मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक नमुना ठरेल. त्यासाठी लेखक गौरव सोमवंशी, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मधुश्री पब्लिकेशन व इतर सहभागी लोकांना मी सर्वप्रथम खूप धन्यवाद देतो.

पुस्तकात दिलेला लेखकाचा परिचय

“ब्लॉकचेन” हे तंत्रज्ञान सध्या “बिटकॉइन” आणि तत्सम आभासी चलनांमुळे नेहमी चर्चेत असते. एका बिटकॉइन ची किंमत अमुक अमुक रुपये वगैरे बातम्या ऐकायला येतात. पण म्हणजे “बिटकॉइन” नक्की काय, ते चलन कसं झालं, लोक त्यासाठी पैसे का देतायत हे समजून घेण्यासाठी पुस्तक अतिशय योग्य आहे.
“बिटकॉइन” हे आभासी चलन आहे. म्हणजे आपल्या हातात नोटेसारखं येत नाही. पण नोट म्हटली तरी शेवटी तो कागदाचा तुकडाच.म्हणून नोटेला “किंमत” कशी प्राप्त होते हे समजलं की “बिटकॉइन” ला मूल्य कसं प्राप्त होतं ते कळतं. म्हणून लेखकाने अतिशय सध्या सोप्या भाषेत, दैनंदिन उदाहरणांतून “पैसा”, “चलन”, “बँक” ही संकल्पना पहिल्या काही प्रकरणांत समजावून सांगितली आहे.
नंतर “बिटकॉइन” मागचं तंत्रज्ञान, संगणक शास्त्रांतील संकल्पना (हॅश, एन्क्रिप्शन, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम इ.) समजावून सांगितल्या आहेत. आयटी क्षेत्रात काम न करणाऱ्या लोकांनाही बरीच कल्पना त्यातून येईल. पुढच्या प्रकरणांसाठी वाचक तयार होईल.

मग प्रत्यक्ष “बिटकॉइन” चलनाची माहिती, गुणधर्म, त्याची सुरुवात कशी झाली हे सांगितलं आहे. “बिटकॉइन” प्रमाणेच इतर कूटचलने (क्रिप्टो करन्सी) कशी आली; हा इतिहास आणि त्यामागची सामाजिक कारणे विशद केली आहेत. एका कूटचलनातल्या तांत्रिक त्रुटींचा उपयोग करून एक मोठा घोटाळा कसा झाला आणि त्यावर काय तोडगा काढला गेला हे एका प्रकरणात आहे. “नवा गडी नवे राज्य” प्रमाणे “नव्याप्रकारचे चलन आणि नव्या नव्याप्रकारच्या चोऱ्या” असंच म्हणावं लागतं.

“ब्लॉकचेन” तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर “बिटकॉइन” रूपात झाला असला तरी. तो केवळ एकच एक उपयोग नाही. माहिती एकाच ठिकाणी न साठवता अनेक ठिकाणी साठवायची, एकाच एका मध्यवर्ती संस्थेकडे सगळी मालकी नाही तर माहितीवर सर्वांचा अधिकार; एकदा नोंद झाली की ती अपरिवर्तनीय इ. “ब्लॉकचेन”ची तत्त्वे आहेत. ह्या तत्वांचा वापर करून वेगवेगळ्या देशांत त्याचा वापर सुरु झाला आहे. फक्त आर्थिक नोंदणी नव्हे तर जमिनीच्या मालकीची नोंदणी, हिऱ्यांचा व्यापार, शेती व्यवस्थापन अश्या भिन्न भिन्न क्षेत्रांतल्या संगणकीकरणात “ब्लॉकचेन”चा वापर सुरु झाला आहे. ह्या वापरातून व्यवस्था अधिक पारदर्शी आणि विश्वासार्ह होतायत असं लेखकाचं प्रतिपादन आहे. भारतात तामिळनाडू राज्याने ब्लॉकचेन धोरण आखलं आहे. लेखकाने स्वतः छत्तीसगड राज्य सरकारच्या एका ब्लॉकचेन प्रकल्पावर काम केलं आहे. महाराष्ट्रात काही शेतकी कंपन्या हे वापरू लागल्या आहेत. ही सगळी उदाहरणं सविस्तपणे देऊन नव्या तंत्रज्ञानातून सामाजिक बदल कसा घडू शकण्याच्या सुखद शक्यता अधोरेखित केल्या आहेत.

अनुक्रमणिका



काही उदाहरणे बघूया.
“वितरित” आणि “विकेंद्रित” ह्या संकल्पना सोप्या शब्दांत


बिटकॉइन ची संख्या २.१ कोटी अशी पक्की ठरवलेली आहे. त्याबद्दल.


घाना देशात जमीन व्यवहार नोंदणी साठी ब्लॉकचेन वापरले गेले त्याबद्दल


पुस्तक वाचताना काही शंका मनात येतात. ब्लॉकचेन सिस्टीम मधले संगणक चालवण्यासाठी खूप मोठे संगणक लागतात. त्यासाठी खूप ऊर्जाही खर्च होते असं लेखकाने मांडलं आहे. पण मग ह्या विकेंद्रित रचनेमध्ये सहभागी संगणक सुद्धा असेच मोठे पैसेवाल्यांचे, कंपन्यांचे असणार किंवा सरकारचेच ना ? मग ज्या सामाजिक विकेंद्रीकरणाच्या उद्देशाचा उल्लेख वारंवार झाला ते कसं साध्य होणार हा गोंधळ मनात तयार झाला.

दुसरं म्हणजे ब्लॉकचेनच्या सामाजिक वापराची जी उदाहरणे दिली त्यात ती यंत्रणा सरकारची किंवा एखाद्या कंपनीने उभारली आहे. म्हणजे सगळा विदा (data) त्या कंपनीकडे आहे. त्यांच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल app वर ज्या सोयी असतील त्याच सोयी त्याचे वापरक (user) वापरणार. त्यांना तेवढाच data दिसणार. मग पारदर्शकता कशी?

आणि ज्या सिस्टीम ची उदाहरणे दिली आहेत ती नेहमीच्या संगणकीकरणाची वाटली. तिथे ब्लॉकचेनच का? इतर विदासाठा (डेटाबेस) तंत्रज्ञान का नाही हे स्पष्ट होत नाही. कदाचित हा तिसरा मुद्दा खूप तांत्रिक असल्यामुळे ह्या पुस्तकाच्या परिघाबाहेरचा आहे. पण पहिले दोन मुद्दे तरी पुढच्या आवृत्तीत विशद करावेत ही लेखकाला विनंती.

वरच्या शंका आणि पुस्तकातली पाने वाचून तुमच्या हे लक्षात आलं असेल की पुस्तकाने नव्या तंत्रज्ञानाची फार छान तोंडओळख करून देत, त्याची भीती घालवत उलट अजून जिज्ञासा जागवली आहे. तेही मराठीत. तांत्रिक संज्ञांना सोपे मराठी प्रतिशब्द वापरून. लेखनशैली अतिशय खेळकर आहे. किचकटपणा नाही. किचकट भाग छान छोटे छोटे घास करून भरावला आहे 🙂

लेखक, प्रकाशक आणि लोकसत्ता ह्या तिघांची ही अभिनव निर्मिती तुम्हालाही नक्की आवडेल. त्यांनी अजून ताज्या आणि तंत्रज्ञान-विज्ञाना बद्दल मराठीत लिहत राहावं ही त्यांना विनंती!

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान विषयांवरील पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe