पुस्तक – सूर्योपासना (Suryopasana)
लेखक – निखिल कुलकर्णी (Nikhil Kulkarni)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १०४
प्रकाशन – विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग,जून २०२२ (Vivekananda Kendra)
छापील किंमत – १५०/- रू.
ISBN – दिलेला नाही

सूर्यनमस्कार हा शब्द ऐकला नसेल असा मराठी माणूस विरळाच. सूर्यनमस्कार घालणारे लोकही बरेच आहेत. परंतु सूर्यनमस्कार न घालणारे लोक दुर्दैवाने जास्त आहेत. म्हणूनच सूर्यनमस्कार का घालावेत हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येणे आवश्यक आहे. त्या प्रयत्नांमधलेच हे पुस्तक आहे.
जे लोक सूर्यनमस्कार घालतात ते सुद्धा बहुतेककरुन ह्याकडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून बघतात. पण हेच सूर्यनमस्कार एका ध्यान-धारणे प्रमाणे केले तर मनाची शांतता, एकाग्रता साधता येईल हे ह्या पुस्तकाने दाखवलं आहे.
इतकंच नाही; तर शरीरातली चक्रे, कुंडलिनी ह्या संकल्पना लक्षात घेऊन जर सूर्यनमस्कार घातले तर अध्यात्मिक प्रगतीही साधता येईल ह्याकडे पुस्तक दिशानिर्देश करते.
एकूणच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यनमस्कार कसे घालावेत याचं सोपं आणि सुटसुटीत मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.

लेखक स्वत: उच्चिद्याविभूषित आहेत. आधुनिक तांत्रिक ज्ञान आणि सूर्यनमस्काराचा अभ्यास असा दुहेरी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यामुळे त्यांचं सांगणं फक्त भावनिक नाही तर तार्किक सुद्धा आहे. लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती.

अनुक्रमणिका

पहिले प्रकरण – सूर्यनमस्काराचे प्राचीन उल्लेख कुठे आढळतात, अर्वाचीन काळात स्वामी रामदास आणि औंधचे राजे यांच्यामुळे सूर्यनमस्कारप्रचारात मोलाची भर कशी पडली हे सांगितले आहे.

दुसरे प्रकरण – मनाची एकाग्रता, विचार थांबणे या “संप्रज्ञात समाधी”च्या संकल्पनेबद्दल सांगितले आहे. आपल्या मेंदूची एकावेळी चार कामे करण्याची क्षमता, त्याचा पूर्ण वापर इ. संकल्पना पाश्चात्य वैद्यकीय ज्ञान आणि संशोधनाचा आधार घेऊन स्पष्ट केल्या आहेत.

तिसरे प्रकरण – आपल्या शरीराचे एक नैसर्गिक चक्र आहे जे सूर्याच्या भ्रमणाशी निगडित आहे; पचन चांगलं असेल तर आपली तब्येत कशी चांगली राहते आणि सूर्यनमस्कार यासाठी कसे फायदेशीर ठरू शकतात हे तिसऱ्या प्रकरणात आहे.

चौथे प्रकरण – आत्मा, ऊर्जा, प्राण या संकल्पना सोप्या शब्दात समजून सांगितले आहेत जेणेकरून पुढच्या प्रकरणांमध्ये त्यांचा संदर्भ घेता येतो.

पाचवे प्रकरण – सूर्यनमस्कार कुठेही घातले तरी शरीराला त्याचा फायदा होईलच पण त्यांचा मानसिक-अध्यात्मिक फायदा घ्यायचा असेल तर योग्य स्थळे कशी निवडावीत याबद्दल मार्गदर्शन.

सहावे प्रकरण – प्रत्येक स्थितीमध्ये श्वास घ्यावा/सोडावा/रोखून धरावा याबद्दल संक्षेपात मार्गदर्शन आहे. अशा पद्धतीने श्वासावर लक्ष केंद्रित केलं की हळूहळू आपल्या विचारांची साखळी तुटून ध्यानाची अवस्था साधणं  कसं शक्य आहे हे समजावून सांगितलं आहे. श्वास आणि विचार ह्याचं अद्वैत आपल्या मनावर बिंबवतं.

सातवे प्रकरण- सूर्यनमस्काराच्या आधी आणि नंतर कुठल्या प्रार्थना म्हणाव्यात जेणेकरून आपल्याला या सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल; या कृतज्ञतेचा आपल्या शरीरावर कसा सकारात्मक परिणाम होतो हे सांगितले आहे.

आठवे प्रकरण – सूर्यस्तुती – सूर्याची बारा नावे आणि त्याचा भक्तीपूर्ण अर्थ काय हे सांगणारं प्रकरण.  सूर्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी, त्याच्या तेजाविषयी आदर दाखवणारी, सूर्याकडून मिळणाऱ्या चैतन्याने आनंदित करणारी ही नावे आहेत.

नववे प्रकरण – आपल्या शरीरात सात चक्रे आहेत, तीन नाड्या आहेत असं तुम्ही वाचलं असेल. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, इडा-पिंगला नाड्या अशी नावे कदाचित तुम्ही वाचली असतील. ही चक्रे आणि नाड्या काय भानगड आहे हे सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कल्पना अतिशय गहन आहेत आणि या पुस्तकाचा तो मूळ उद्देशही नाही. त्यामुळे शंभर टक्के समजेलच असं नाही मात्र सूर्यनमस्कार घालताना एकेका चक्रावर लक्ष केंद्रित करण्याचे फायदे काय हे यातून आपल्याला नीट समजतं.

दहावे प्रकरण -मेडिटिव्ह फॉर्म – यात आधीच्या प्रकरणांचा गोषवारा घेऊन सूर्यनमस्कार म्हणजे एक प्रकारचे ध्यान कसे आहे हा मुद्दा पुन्हा सांगितला आहे.

अकरावे प्रकरण – एरोबिक फॉर्म – एरोबिक व्यायाम प्रकारात हृदयाची गती मोठ्या प्रमाणावर वाढवली जाते. यातून आपला दमसास स्टॅमिना वाढवला जातो. सूर्यनमस्कार भराभर घालण्याने आपण हे साध्य करू शकतो. म्हणून ज्यांना सूर्यनमस्कार नीट जमत आहेत व ज्यांचा चांगला सराव झाला आहे अशांनी आपली गती वाढवून एरोबिक प्रकाराने सूर्यनमस्कार कसे घालावे याचं मार्गदर्शन आहे.

बारावे प्रकरण – संगीत विचार- संगीत किंवा गाणी लावून सूर्यनमस्कार घातले तर एकाग्रता होण्यासाठी मदतच होईल. ते कसे याबद्दल थोडक्यात माहिती आहे. कुठले संगीत ऐकावे याबद्दल स्वानुभव सांगितले आहेत.

नंतर वेगवेगळ्या वेबसाईट आणि पुस्तके ह्यांची संदर्भसूची आहे.

आता काही पाने उदाहरणादाखल बघू

इतिहासातले उल्लेख


नमस्कार आणि श्वास ह्याच्या मिलाफातून विचारांवर नियंत्रण.


स्थितींचा फोटो.

चक्र विचार


एरोबिक

ह्या पुस्तकाचा भर प्रत्यक्ष सूर्यनमस्कार शिकवण्यावर नसून; हे बिंबवण्यावर आहे की ते घातलेच पाहिजेत आणि विशिष्ट पध्दतीने घालावेत. त्यामुळे ह्यातल्या स्थितींचे फोटो आहेत. पण प्रत्येक स्थितीवर सविस्तर मार्गदर्शन नाही. प्रत्येक स्थिती समजून घ्यायची असेल तर इतर पुस्तके किंवा योग गुरूचे मार्गदर्शन घ्यावे लागेल.
महत्त्वाच्या पारंपरिक विषयाचा त्याच्या आधुनिक आणि बहुविध अंगांनी वेध घेणारे अवश्य वाचावे असे हे पुस्तक.

पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क –
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग,
अश्विनी हाईट्स, ग्राहक पेठेजवळ, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०
फोन नं. –
(०२०)२४४३२३४२ / ९८८१०६१६८६

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

आरोग्य, स्वमदत, मानसशास्त्र, शरीरशास्त्र इ संबंधित इतर पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/