पुस्तक – पिढी दर पिढी (Pidhi dar pidhi)
लेखिका – पर्ल बक (Pearl Buck)
अनुवादिका – भारती पांडे (Bharati Pande)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – A house divided (अ हाऊस डिव्हायडेड)
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, मे २०२२
ISBN – 978-9392482694
छापील किंमत – ४४०/- रु.
काही दिवसांपूर्वी पर्ल बक ह्यांच्या प्रसिद्ध “गुड अर्थ” कादंबरीचा मराठी अनुवाद “काळी” वाचला होता. ते पुस्तक खूप आवडले होते. (त्याचे परीक्षण ह्या लिंकवर वाचू शकाल https://learnmarathiwithkaushik.com/courses/kali-the-good-earth/ ). “Good Earth”, “Sons”, आणि “A house divided” अशी त्रिखंडात्मक कादंबरी आहे. ह्यातल्या तिसऱ्या पुस्तकाचा “पिढी दर पिढी” हा अनुवाद आहे. पहिल्या पुस्तकात “वांग लुंग” नावाच्या एका सामान्य चिनी खेडूत शेतकऱ्याचं जीवन दाखवलं होत. तो स्वतःच्या कष्टाने आणि नशिबाच्या झोक्यांनी एक प्रतिष्ठित जमीनदार होतो. आणि तिथे ती कादंबरी संपते. दुसऱ्या भागात त्याच्या मुलांच्या वेगवेगळ्या आयुष्याचं वर्णन आहे. तर ह्या तिसऱ्या भागात त्याच्या नातवांच्या आयुष्याच्या तारुण्याचा कालखंड आहे. “युआन” नावाच्या नातू हा मुख्य नायक आहे. परिस्थितीच्या आंदोलनांतून कधी इकडे तर कधी तिकडे झुकणाऱ्या; आयुष्य समजून घेऊ पाहणाऱ्या संवेदनशील युआनची ही कहाणी आहे.
युआन आपल्या वडिलांबरोबर – टायगर वांग – बरोबर वाढतोय. टायगर हा सैन्य राखून सत्ता गाजवणारा स्थानिक सरदार आहे. त्याने युआन ला सैनिकी शाळेत पाठवले. पण लढाई, शस्त्र, लोकांकडून जबरदस्तीने कर वसूल करणे हे युआनच्या स्वभावातच नाही. तो संवेदनशील, थोडा स्वप्नाळू, कवी मनाचा, शेतीबद्दल अनामिक ओढ असणारा आहे. हे द्वंद्व त्याच्या आयुष्यात असताना; तो जिथे शिकतोय तिथले गुरुजी तिथल्या विद्यार्थ्यांना सरदार लोकांच्या अन्यायाविषयी सांगतायत. म्हणजे पुढे-मागे त्याला क्रांतीत सामील व्हायला लागेल आणि ते सुद्धा स्वतःच्या वडिलांच्या विरुद्ध लढायला लागेल अशी चिन्हे आहेत. दुहेरी कात्रीत सापडलेला युआन आपलं आयुष्य वेगळ्या वाटेवरून चालायचा प्रयत्न करतो. प्रत्येक टप्प्यावर त्याला दोन भिन्न मार्ग दिसतात. खेड्यात राहायचं का शहरात ? शहरातल्या परदेशी लोकांच्या सवयी चांगल्या की आपल्याच चिनी पारंपरिक सवयी चांगल्या ? क्रांती करून सत्ता उलथवून गरिबांच्या हाती सत्ता आली पाहिजे; का आळशी, स्वाभिमानशून्य, लाचार गरिबांशी आपल्याला काही घेणं देणं नाही ? हे ठरवण्यात त्याची मानसिक ओढाताण होते. परदेशात गेल्यावर त्याला तिथल्या सोयी सुविधा, लोकांची ज्ञानलालसा आकर्षक वाटते पण लोकांचा गौरेतरांकडे बघण्याचा तुच्छभाव सुद्धा जाणवतो. चीनबद्दल त्यांचं आकर्षण दिसतं तसंच चीन मधलं दारिद्र्य, अज्ञान ह्याचा फायदा घेऊन धर्मप्रसारासाठी उत्सुक लोकही दिसतात. मोकळ्याढाकळ्या वागणाऱ्या मुलींचं अप्रूपही वाटतं आणि “आपल्या चिनी घरंदाज स्त्रिया” असं वागणार नाहीत हा सूक्ष्म अभिमान सुद्धा त्याच्या मनात येतो. युआनला कुठलाही मार्ग परिपूर्ण वाटत नाही. दोन्ही मार्गांवर तो जायचा प्रयत्न करून बघतो. दोन्हीकडे त्याला थोडं समाधान मिळतं आणि दोन्हीकडे कुचंबणा. कुठल्याही एकाच एक गोष्टीचा आंधळा अभिनिवेश बाळगणाऱ्या त्याच्या भावंडांचा भ्रमनिराससुद्धा त्याला दिसतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रेम म्हणजे काय; कुठली मुलगी आपल्याला जीवनसाथी म्हणून आवडेल ह्याची पण त्याची चाचपणी सुरु आहे. वेगवेगळ्या मुलींचे वेगवेगळे अनुभव देखील तो घेतोय.
सैनिकी शाळा-खेडं-शहर-परदेश-पुन्हा चीन मधलं शहर- क्रांती झाल्यावरची नवीन राजधानी असा युआनच्या आयुष्याचा मोठा कालखंड ह्यात मांडला आहे. त्याला हे वेगवेगळे अनुभव येतायत कारण त्याकाळात चीन मधली परिस्थिती सतत बदलते आहे. सरंजामशाही, युरोपियनांनी काबीज केलेली शहरं आणि कम्युनिस्ट क्रांती अश्या संघर्षाचा हा कालखंड. त्यामुळे चिनी समाजात कशी घुसळण होत होती हे ह्यातून टिपलं जातं. सामाजिक आणि वैयक्तिक विचारसरणीलाही धक्के बसत होते. पूर्वी आईवडील आपल्या मुलांची लग्न स्वतःच्या सोयीने बघत आता मुलांना ते पटत नव्हतं. मुलींना स्वयंनिर्णयाचा अधिकार पाहिजे होता. खाणं-पिणं आणि कपड्यांची स्टाईल सुद्धा परदेशी हवी असं वाटायला लागलं होत. गरीब-श्रीमंत; शहरी-खेडूत; स्थानिक-परदेशी; स्वदेशप्रेमी-परदेशप्रेमी; राजप्रेमी-क्रांतिकरी अश्या ताण्याबाण्यांनी सुंदर गुंफलेली ही कादंबरी आहे.
काही प्रसंग वाचूया
सैनिकी शाळा आणि आपले म्हातारे सरदार वडील ह्यांना कंटाळून युआन आपल्या मूळगावी, शेतातल्या मातीच्या घरात राहायला येतो. सरदाराचा मुलगा आलाय म्हणजे नक्कीच त्याचा काहीतरी डाव असणार असा संशय गावकऱ्यांना येतो. पण युआनच्या मनात त्यांच्या बद्दल प्रेम, कुतूहल, त्यांच्या सध्या जीवनाचा हेवा, वाईट सवयींचा राग अशा मिश्र भावना उमटतात.
युआनचा चुलतभाऊ मेंग हा बंडखोर विद्यार्थ्यांच्या/तरुणांच्या गटात काम करणारा असतो. युआन ने सुद्धा त्यात सामील व्हावं; बुरसटलेल्या विचारांतून देशाला वाचवावं असा त्याचा आग्रह असतो. त्यांच्या चळवळीतली आणि एक तरुणी युआनचे वर्गमैत्रिण असते. ती युआनला लाडीगोडी लावून चळवळीत ओढायचा प्रत्यन करते. ह्या प्रयत्नांना बधून युआन गुप्त बैठकीत सामील होतो तेव्हा.
परदेशात राहताना परकेपणा जाणवत असताना त्याच्यावर माया करणारे शिक्षक त्याला भेटतात. हे शिक्षक त्याला ख्रिश्चन धर्मात ओढायचा सुद्धा प्रयत्न करत असतात. त्यांच्या मुलीला हे जाणवत असत. ती धर्मबिर्म ना मानणारी नव्या विचारांची मुलगी असते. पण आईवडिलांचा मान ठेवून त्यांना थेट विरोध करत नाही. स्वदेश-परदेश; स्वधर्म-परधर्म; प्रेम-आकर्षण-मैत्री ह्या भावनिक गुंतागुंतीचा प्रत्यय.
“शेंग”, “मेंग”, “आय-लान” आणि युआन ही चुलत भावंडं. शेंगला परदेश मनापासून आवडला. तिथेच राहायची, तिथलंच होऊन जायची. आनंदात, सुखासमाधानात राहायचं हे त्याचं स्वप्न. पण कुटुंबाच्या आग्रहाखातर त्याला चीन ला परत यावं लागतं. मेंग आता क्रांतीमुळे आलेल्या नव्या सरकारात मोठ्या हुद्द्यावर आहे. पण तिथेही तो नाराज आहे. युआन स्वखुशीने परत आलाय पण आयुष्यात नक्की काय करायचंय ह्याचा गोंधळ त्याच्या मनात. छानछोकीत रमणारी, एका प्रौढ माणसाशी तिसरं लग्न केलेली आय-लान. पारंपरिक विचारांचे त्यांचे आईवडील. हे सगळे एकत्र येतात तेव्हा…. “पिढी दर पिढी” आणि “अ हाऊस डिव्हायडेड” हे पुस्तकाचं शीर्षक सार्थ करणाऱ्या प्रसंगातला एक भाग
“काळी”प्रमाणेच अतिशय संथ लयीत चालणारं कथानक आहे. छोटे छोटे प्रसंग आहेत. तो प्रसंग कुठे घडतोय, कसा घडतोय, पात्रांची देहबोली कशी आहे ह्याचं योग्य ते आणि योग्य तेवढंच वर्णन आहे. ह्या वर्णनातून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो आणि लेखिकेला जे सांगायचं आहे तो भाव अधोरेखित होतो. फार सनसनाटी असं काही घडत नाही पण तरीही गोष्ट सतत नवनवीन आणि अनपेक्षित वळणं घेत राहते. पुढे काय घडेल ह्याची उत्सुकता लागते पण ती एका रहस्य कथेसारखी नाही…म्हणजे कधी एकदा रहस्य कळून हे पूर्ण होतंय असं नाही … काहीतरी वेगळीच … लेखिके तू सांगता राहा मी ऐकत राहतोय; असा भाव मनात येतो. “काळी” वाचताना पण हेच जाणवलं होतं. साडे तीनशे पानं ही लय ठेवणाऱ्या पर्ल बक ह्यांना प्रणाम. भारती पांडे ह्यांनी ह्या “इंग्रजी हिऱ्याला मराठी सोन्याचं कोंदण” दिलं आहे. भाषांतर सहज, प्रभावी आणि प्रवाही झालाय. त्यासाठी भारती पांडे ह्यांना प्रणाम. तर हे पुस्तक मराठीत आणल्याबद्दल “मेहता पब्लिशिंग हाऊस” ला धन्यवाद.
“काळी” मधला काळ जुन्या चीन मधला होता. तो काळ आपण आत्ता अनुभवू शकत नाही. त्याचं फक्त वर्णन वाचू शकतो. त्यामुळे त्या काळाचं प्रभावी वर्णन असणारी “काळी” ही आवर्जून वाचावी अशी वाटली. “पिढी दर पिढी” मधला काळ थोडाच जुना आहे. त्यात दिसणारे सामाजिक बदल आज भारतातही आपण अनुभवतो आहोत. त्या अनुभवांवरचं ललित लेखन सुद्धा खूप होतं आहे. कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा अगदी नवीन विषय सध्या बहु-लिखित झाला आहे. केवळ म्हणून “आवर्जून वाचा” ऐवजी “जमल्यास वाचा” ही श्रेणी द्यावीशी वाटली.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
शेतकरी/ग्रामीण जीवनावर आधारित अजून काही पुस्तकांचे परीक्षण
- अहिराणी गोत (Ahirani Got) – डॉ. सुधीर रा. देवरे (Dr. Sidhir R. Deore)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- काजळमाया (Kajalmaya) – जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- करुणाष्टक (Karunashtak) – व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
- झाडाझडती (Jhadajhadati) – विश्वास पाटील (Vishwas Patil)
- टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird ) – हार्पर ली (Harper Lee) अनुवादक – विद्यागौरी खरे (Vidyagauri Khare)
- तांडव(Taandav)- महाबळेश्वर सैल(Mahabaleshwar Sail)
- पाडस (padas) – मार्जोरी किनन रॉलिंग्ज (Marjorie Kinnan Rawlings) – अनुवाद – राम पटवर्धन
- पथेर पांचाली (Pather Panchali) लेखक : बिभूतिभूषण बॅनर्जी ( Bibhutibhushan Banerjee) -अनुवाद : प्रसाद ठाकूर (Prasad Thakur)
- पारखा (Parkha) – डॉ. एस.एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa) – अनुवाद : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
- बारोमास (Baromas) – सदानंद देशमुख (Sadanand Deshmukh)
- भोकरवाडीतील रसवंतीगृह (bhokarawadItIl rasavantIgruh) -द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
- माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)-जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- मालवणी कथा (Malavani Katha)
- हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ(Hindu Jaganyachi sammruddh adagal) – भालचन्द्र नेमाडे(Bhalachandra Nemade)
- टारफुला (Tarphula) – शंकर पाटील (Shankar Patil)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–