पुस्तक – मस्रा (Masra)
लेखक – बेन्यामिन (Benyamin)
अनुवादक – ए. आर. नायर / जे.ए. थेरगांवकर (A. R. Nair, J.A.Therganonkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १२८
मूळ पुस्तक – आडुजीवितम् (Aadujeevitham)
मूळ पुस्तकाची भाषा – मल्याळम (Malayalam)
इंग्रजी भाषांतर – Goat days (गोट डेज)
इंग्रजी भाषांतरकार – Joseph (जोसेफ)
प्रकाशन – अनघा प्रकाशन २०१९
ISBN – दिलेला नाही
छापील किंमत – १८०/-
वाचनालयात पुस्तकं चाळताना योगायोगाने एक पुस्तक दिसलं. नाव “मस्रा”. लेखक “बेन्यामिन”. दोन्ही अपरिचित. मुखपृष्ठपण विचित्र. माणसाला बोकडाचं तोंड आणि तो काठी घेऊन उभा. पण पाठमजकूर एकदम वेधक होता. त्यावरून कळलं की हे “आडुजीवितम्” नावाच्या एका मल्याळम पुस्तकाचे भाषांतर आहे. “बेन्यामिन” हे मल्याळम मधले प्रसिद्ध लेखक आहेत. “आडुजीवितम्” च्या १०० हून अधिक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ही कादंबरी केरळातल्या महाविद्यालयात अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आणि विचार आला की इतकी प्रसिद्ध आणि विलक्षण कादंबरी असेल तर तिचं भाषांतर मराठीत आहे हे कधी ऐकलं कसं नाही ? आता, मराठीत येणारं प्रत्येक पुस्तक मला माहीत असतं असं मी म्हणणार नाही. पण मूळ भाषेत मिळालेली प्रसिद्धी बघता मराठी अनुवाद आला आहे हे कुठे साहित्य विषयक बातम्यांत ऐकलं नाही. किंवा पुस्तक लोकांनी वाचलं आहे ह्यावर “वाचन विषयक” फेसबुक ग्रुपवर पोस्ट, फोटो सुद्धा वाचायला मिळाले नाहीत. अनुवादक आणि प्रकाशक पण मी आधी न ऐकलेले. त्यामुळे कुतूहल आणि आश्चर्य अशा मिश्र भावानेतून पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचून झाल्यावर कुतूहल शमलं. पण आश्चर्य मात्र कायम राहीलं. कारण ही कादंबरी खरंच वेधक, रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे.
गेली अनेक वर्षे केरळ मधून युवक सौदी अरेबिया, दुबई, कुवेत आणि इतर आखाती देशांमध्ये जातायत. सुशिक्षित तर जातायतच पण अकुशल कामगार म्हणून पण जातायत. तिथे कारखान्यात पडेल ते काम करायचं, पैसे साठवायचे आणि भारतात आपलं जीवनमान सुधारवायचं. तिकडून मिळालेल्या पैशाचं “रुपयात” रूपांतर केलं की भरपूर पैसे. त्यातून हळूहळू सोनं, बंगला, गाडी !! एकाच पिढीत पिढीजात गरिबीपासून सुटका! यामुळे तिकडे जायला तरुण उतावीळ असतात. पण .. पण .. तिथे जायचं, कारखान्यात काम करायचं ह्या स्वप्नाने तिकडे गेलेल्या तरुणांची फसवणूक करून, जाण्यायेण्याचा खर्च व व्हिसा शुल्क च्या नावाखाली पैसे घेऊन उलट त्यांना फुकट कामावर, गुलामीच्या आयुष्यात ढकलण्याचे उद्योगही व्हायचे. अशाच एका हतभागी तरुणाची ही कहाणी आहे.
कादंबरीची सुरुवात होते सौदी अरब मधल्या एका पोलिस स्टेशन समोर उभ्या असलेल्या दोन तरुणांपासून. आपल्याला पोलिसांनी अटक करावी अशी त्यांची इच्छा आहे. सौदीतला तुरुंगातली शिक्षा म्हणजे नरकवास. पण तरी त्यांना तो परवडणार आहे कारण ते त्याहून भयानक परिस्थितून पळून आले आहेत. हे तरुण भारतातून सौदीत आले ते कारखान्यात नोकरीला म्हणून गेला. इंग्लिश येत नाही तिथे अरबीचा तर प्रश्नच नाही. पण विमानतळावरून त्यांना एक माणूस घेऊन गेला ते थेट वाळवंटात. तिथे होता “मस्रा” म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचा कोंडवाडा. आणि “कारखान्यात नोकरी” नाही तर “मेंढ्यांचा राखणदार” म्हणून गुलाम. शेळ्या-मेंढ्यांमध्येच राहायचं. त्यांची घाण काढायची. त्यांना पाणी पाजायचं. चरायला नेऊन आणायचं. दूध काढायचं. दिवस रात्र हेच काम. फक्त अस्वच्छ वातावरण नाही तर तितकंच अस्वच्छ राहणं. कारण एकच पायघोळ झगा कायम घालायचा. ढुंगण धुवायला पाणी नाही तर अंघोळ दूर आणि कपडे धुणं म्हणजे अशक्यच. एका सभ्य, कुटुंबवत्सल भारतीय तरुणाचं जणू हे स्वतःच अरबी बोकडात रूपांतर झालं ! म्हणून मुखपृष्ठावर तो बोकड..बोकड पाळणारा. ह्यातून सुटणं अशक्यप्राय कारण मालक – अरबाब – कायम बंदूक घेऊनच तयार. चूक झाली की पट्ट्याने हाणणार. त्याची सुटका होणार का ? का तो तसाच कुढत मारणार ?
वाळवंटातलं हे खडतर जीवन लेखकाने परिणामकारकपणे उभं केलं आहे. नायकाच्या मनातले भाव नेमके टिपले आहेत. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून सुटकेची आस ठेवणं तर कधी “हीच परमेश्वराची इच्छा” असं समजून अगतिकतेने स्वतःचं असं पाशवी अस्तित्व स्वीकारणं. सुटकेसाठी प्रयत्न करणं आणि त्यात येणारी असफलता अनुभवणं. हे परिस्थितीचे आणि भावनांचे हेलकावे कादंबरीभर येतात. आपण नायकाशी समरस होतो. डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो. कुठल्याही प्रसंगात वर्णन रेंगाळलं नाहीये. थोडक्यात लिहिलं आहे. आता मूळ कादंबरीत तसं आहे का अनुवादकाने थोडक्यात आटोपलं आहे महिनीत नाही. असं असलं तरी त्याची दाहकता भिडते. आता पुढे काय घडतंय हे आपण वाचत राहतो.
एक दोन प्रसंग उदाहरणादाखल
वाळवंटातला पहिला दिवस
“भयंकर परिस्थतीतून सुटका” ह्या कथासूत्रावर अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत. त्याच पद्धतीतले हे एक पुस्तक आहे. तरी प्रत्येक कथानकातली परिस्थिती वेगळी. आव्हाने वेगळी. प्रसंग वेगळे. त्यामुळे अशी पुस्तके वाचनप्रिय होतात ह्यात नवल नाही. तसेच हे सुद्धा होईल. त्यात हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे. त्याला एक विशिष्ट सामाजिक संदर्भही आहे.
amazon वर बघितलं तर मूळ मल्याळम पुस्तक २३२ पानांचं आहे. तर इंग्रजी अनुवाद “Goat days” २६४ पानाचं आहे. हे मराठी पुस्तक मात्र १२८ पानांचं आहे. आणि पुस्तकात असं म्हटलं आहे की हा “स्वैर अनुवाद” आहे. त्यामुळे ह्या अनुवादात प्रसंग गाळले आहेत का वर्णन गाळलं आहे कळायला मार्ग नाही. त्यामुळे मूळ मजकूरात अजून काय असेल ह्याची उत्सुकता आहे. जर तुम्ही वाचले असेल तर मला सांगा.
अजून एक गंमत. ह्या पुस्तकाबद्दल नेट वर शोधताना कळलं की ह्या कादंबरीवर आधारित एक “आडुजीवितम्””Aadujeevitham – The Goat Life” ह्या नावाने एक चित्रपट येतोय. तोही ह्याच महिन्यात. २४ मार्च २०२४ ला !
YouTube video link https://youtu.be/qvsiJKdDxPs?si=r_IZEf-5K6pyPfvo
तर मग वाट कसली बघताय “मस्रा” मध्ये शिरायचं धाडस करा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
परदेशातल्या वास्तव्य,कठीण परिस्थितीतून सुटका ह्यावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin vegalya zarokyatun) – डॉ. अंजली सोमण (Dr. Anjali Soman)
- झुळूक अमेरिकन तोऱ्याची ( Jhuluk Amerikan toryachi) – शरद वर्दे (Sharad Varde)
- झांझिबारी मसाला (Zanzibari Masala) – उमेश कदम (Umesh Kadam)
- पाचूचे बेट (Pachuche Bet) – हर्मन मेलव्हिल (Herman Melville) – अनुवाद – भानू शिरधनकर (Bhanu Shirdhankar)
- फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- मिस्टेक इन बँकॉक (Mistake in Bangkok) – स्वप्नील सोनवडेकर (Swapnil Sonawdekar)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- Life of Pi (लाईफ ऑफ पाय)-Yann Martel (यान मार्टेल)
- Dawn to dusk – A thrilling tale of emirates (डॉन टू डस्क – अ थ्रिलिंग टेल ऑफ एमिरेट्स) – Sophiya Vednesan (सोफिया वेडनेसन)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe