पुस्तक – मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor)
लेखक – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ३३०
प्रकाशन – स्वयंप्रकाशित
ISBN – 978-93-5607-798-0
छापील किंमत – रू. ३५०/-
हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी लेखक डॉ. कुमार ननावरे ह्यांचे सर्वप्रथम मन:पूर्वक आभार मानतो.
अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या आधुनिक मानवाच्या सामाजिक गरजा. आधुनिक समाज व्यवस्थेत “सरकार” नावाची व्यवस्था ह्या गरजांच्या पूर्ततेसाठी काम करते. त्यासाठी नागरिकांकडून कर गोळा करते. भारतात सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारे अशा आरोग्य यंत्रणा चालवतात. त्यातून औषधोपचार, शस्त्रक्रिया कमी दरात केल्या जातात. काही औषधे सर्वांना मोफत आहेत. तर गरीबांना अजून बऱ्याच गोष्टी मोफत मिळतात. म्हटलं तर अतिशय आदर्श व्यवस्था. पण तितक्या आदर्श पध्दतीने ती चालत नाही हे आपण सगळेच जाणतो. औषधांचा तुटवडा, डॉक्टर – नर्स उपलब्ध नसणे, प्रचंड गर्दी, सवलत मिळवण्यासाठी वशिलेबाजीची गरज, लाचलुचपत, चुकीचे औषधोपचार अशा नाना समस्यांच्या बातम्या आपण वृत्तपत्रांत वाचत असतो. व्यवस्थेच्या अनागोंदीचा फटका जेव्हा रुग्णांना बसतो तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी रागाने केलेली तोडफोड, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण आणि प्रसंगी डॉक्टरला मारहाण ह्याच्या बातम्याही आपण वाचत असतो. पण ह्या बातम्यांमध्ये डॉक्टरांची बाजू काय होती हे प्रत्येकवेळी प्रकर्षाने मांडलं जातं असं नाही. कानफाट्या नाव पडलं असल्यामुळे प्रत्येकवेळी दोष डॉक्टरचाच असणार हे गृहीत धरलं जातं. सनसनाटी बातम्या तशाच दिल्या जातात. म्हणूनच ह्या गृहितकाला छेद देणारं, “सरकारी डॉक्टरां”ची बाजू मांडणारं हे पुस्तक वाचनीय ठरतं.
पुस्तकाचे लेखक स्वतः सरकारी डॉक्टर आहेत. ते त्वचारोग तज्ज्ञ आहेत. ३३ वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा बजावली आहे. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुगणालायांपर्यंत सगळ्या प्रकारच्या “सिस्टीम” कशा चालतात हे त्यांनी जवळून बघितलं आहे. त्यातून आलेले विदारक अनुभव पुस्तकात मांडले आहे.
त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर हे ह्या व्यवस्थेचा भाग आहेत पण ह्या व्यवस्थेचा बळी सुद्धा आहेत. सार्वजनिक रुग्णालयात मुळातच सर्व गोष्टींचा अभाव असतो. पुरेशी औषधं नसतात. यंत्र सामुग्री नादुरुस्त असते. लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी डॉक्टर असतात. तरी सरकारी डॉक्टर प्रामाणिकपणे होता होईल तितकी मदत करत असतात. मोफत औषधोपचार करत असतात. गरिबांचे लक्षावधी रुपये ते वाचवत असतात. पण जेव्हा अतिताण, औषध न मिळणं किंवा खरंच गंभीर प्रकृतीमुळे रोगी दगावतो तेव्हा स्थानिक राजकारणी अर्थात गुंड मध्ये पडून डॉक्टरला मारहाण करतात. ह्या राजकारणी गुंडांना फक्त आपल्या इलाक्यातल्या लोकांना आपली ताकद दाखवायची असते. पण असे प्रसंग वारंवार घडायला लागल्यामुळे कोणी सरकारी डॉक्टर व्हायला तयारच होत नाही. लोक लवकर बदली घेतात, निवृत्त होतात किंवा critical केस असेल तर जोखीम न घेता सरळ मोठ्या इस्पितळात पाठवायला सांगतात. मुळातच डॉक्टरांची संख्या कमी त्यात त्यात ह्या अनुभवांमुळे नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि नवीन यायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आहेत त्यांच्यावरचा ताण अजून वाढतो आहे. असं हे दुष्टचक्र तयार झाले आहे.
पुस्तकांमध्ये लेखकाने स्वतःची आणि स्वतःच्या सहकाऱ्यांची अशी बरीच उदाहरणे दिली आहेत अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करणारा डॉक्टर आहे पण मारहाणीमुळे त्या डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे किंवा कायमस्वरूपी तो नैराश्यग्रस्त झाला आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले अशी सुद्धा उदाहरण पुस्तकात आहेत.
“गोल्डन आवर- सोनेरी तास” हे प्रकरण अशा काही खास केसेसबद्दल सांगते ज्यामध्ये रुग्णाला अतिशय तातडीने उपचाराची गरज असते. सर्पदंश , हार्टअटॅक यामध्ये रुग्णाला योग्य प्रथमोपचार मिळाले तर तो तगून राहू शकतो. पूर्ण उपचार मिळाल्यावर त्यातून पूर्ण बाहेर येऊ शकतो. पण त्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये प्रथमोपचार मिळाले नाहीत तर मात्र केस हाताबाहेर जाऊ शकते. रुग्णाचा दुर्दैवी अंत होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा असे रुग्ण सरकारी रुग्णालयात येतात तेव्हा तिथे उपस्थितीत असलेल्या डॉक्टरांना तातडीने उपचार करावे लागतात. भले डॉक्टर हृदयरोगतज्ञ नसला तरी त्याला त्याच्या ज्ञानानुसार वकुबानुसार हे उपचार करावे लागतात. सर्पदंशावरची सगळी औषधे किंवा लसी उपलब्ध नसतील तरी हाताशी असलेली सलाईन आणि औषधे घेऊन प्रथमोपचार सुरू करावे लागतात. नियमानुसार बघितलं तर ज्याला अधिकार नाहीत असा डॉक्टर उपचार करतोय किंवा शंभर टक्के आवश्यक ते उपचार दिले जात नाहीत. पण हे वास्तव स्वीकारावे लागते. अशाच सिस्टीम मुळे हजारो लोकांचे प्राण वाचत आहेत. पण
एखादा रोगी दगावला तर डॉक्टरची नाचक्की. त्याला मारहाण होते. विभागीय/न्यायालयीन चौकशी बसली तर त्याच्या पूर्ण करिअरची बरबादी होते. चौकशी संपेपर्यंत पदोन्नती किंवा पुढचे लाभ मिळणार नाहीत. निवृत्तीला जवळ आला असेल तर निवृत्ती वेतन रोखले जाईल. मग अशावेळी कुठला सरकारी डॉक्टर स्वतःचा जीव आणि करिअर धोक्यात घालून रुग्णांना प्रथमोपचार देईल बरं? लेखकांनी याचीही कितीतरी उदाहरण लिहिली आहेत त्यातून काही डॉक्टरांनी नोकऱ्या का सोडल्या हा मुद्दा स्पष्ट केला आहे.
एकाच डॉक्टरला तीन-तीन शिफ्ट मध्ये काम करावं लागतं. सलग दोन दिवस काम करावे लागतं. मुख्य कामाबरोबरच प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि सरकारी कामांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्याही असतातच. असं असूनही म्हणे डॉक्टरांना बायोमेट्रिक उपस्थितीनोंद अनिवार्य आहे. म्हणजे सकाळी आठची-नऊची जी ठराविक वेळ असेल त्यावेळी डॉक्टर आला नाही तर त्याचा पगार कापला जातो. मग भले तो रात्री दोन वाजेपर्यंत प्रसूतीगृहात का असेना. किती हा क्रूरपणा! अमानुषता !! डॉक्टर अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा कारकुनी लोकांसमोर बाबापुता करून आपली वेतनाची कामं करून घ्यावी लागतात.
स्त्री कर्मचाऱ्यांचा त्रास या प्रकरणात महिला हक्क आणि कायदे ह्यांचा गैरफायदा घेणारे कर्मचारी आणि त्याचे प्रत्यक्ष लेखकाला आलेले अनुभव त्यांनी सांगितले आहेत. वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून डॉक्टरला अडकवण्यासाठी म्हणून विनयभंगाची तक्रार करणे वगैरे गोष्टी घडतात. ते विशद केलं आहे.
रुग्णालयातील औषध खरेदी, सामग्री खरेदी मध्ये संबंधितांचा भ्रष्टाचार चालतो अशात एखादा प्रामाणिक डॉक्टर जो त्या रुग्णालयाचा प्रशासकीय अधिकारीही असेल त्याने विरोध केला की मग हाच कसा लाजखोर आहे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचे उद्योग होतात. अँटी करप्शन ब्युरो चा सापळा रचून अशा डॉक्टरला दोषी ठरवलं जातं. खुद्द लेखक अशा खोट्या सापळ्यात अडकता अडकता कसा वाचला ह्याचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत.
आता काही पाने उदाहरणादाखल वाचूया.
अनुक्रमणिका
(पेनाच्या खुणा मला मिळालेल्या प्रतीवर आधीपासूनच होत्या 😀)
राजकीय हस्तक्षेप
गोल्डन अवर. सर्पदंशावर उपलब्ध साधनांनी उपचार आणि झाला चमत्कार
सरकारी डॉक्टरांची पदे भरण्याचे अपयशी प्रयत्न.
लेखकाने फार प्रामाणिकपणे, तळमळीने सगळे अनुभव सांगितले आहेत. विषयाचे गांभीर्य अजिबात कमी न करता, तरी गप्पा मारण्याच्या शैलीत सर्व लिहिले आहे. त्यामुळे डॉ. ननावरे ह्यांच्या समोर आपण बसून सगळं ऐकतो आहोत असंच वाटतं. वाचनाची उत्सुकता टिकून राहते. मारहाणीचा मुद्दा काही उदहरणांतूनच लक्षात येतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याची उदाहरणे आल्यामुळे तो जरा ताणला गेला आहे असं वाटलं. कदाचित लेखकाला त्या त्या डॉक्टराच्या विशिष्ट वर्तनामागे काय काय वेगवेगळी करणे असू शकतात हे अधोरेखित करायचं असेल.
पुस्तकात वृत्तपत्रांतील कात्रणे दिली आहेत. त्यातून निवेदनाची वैधता प्रस्थापित होतेच पण ह्या घटना तात्पुरत्या सनसनाटी झाल्या तरी पुढे त्याचं काही होत नाही हे सामाजिक सत्य सुद्धा पुढे येते.
ह्या समस्येवर डॉक्टर मंडळी किंवा त्यांच्या संघटना काय प्रयत्न करत आहेत, त्याचे यशापयश काय ? तसेच भविष्यात काय धोरण बदल झाले पाहिजेत हा भाग पुस्तकात आला असता तर निवेदनात तर ते पूरक ठरले असते
जीवन मरणाच्या काठावर असणारा रुग्ण, वेदनेने तळमळत असणारा रुग्ण, अचानक त्रास सुरू झालेला रुग्ण डॉक्टर समोर येतो तेव्हा आपलं ज्ञान व अनुभव पणाला लावून त्या रुग्णाला बरं करणे हे आव्हानच किती मोठं असतं !
त्याला सामोरे जाणाऱ्या डॉक्टरची वाहवाच व्हायला पाहिजे. ते काम त्याला सुरळीत करता येईल; निश्चिन्त मनाने करता येईल यासाठी जास्तीत जास्त पोषक वातावरण तयार झाले पाहिजे. त्या उलट, आपली एकूणच राजकीय आणि सामाजिक परिस्थिती त्या डॉक्टरची कुचंबणा करण्यात धन्यता मानते. हे वाचून आपण खिन्न आणि उदास होतो. जे जे या व्यवस्थित संबंधित आहेत त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं. आपल्या विवेकबुद्धीला साथ घालावी आणि हा क्रूर खेळ आपल्या परीने थांबवण्याचा प्रयत्न करावा.भ्रष्टाचाराने आणि बेशिस्तेने पोखरलेल्या आपल्या समाजात हे एका दिवसात होणार काम नाही. पण भविष्यात बदल घडेल अशी अपेक्षाठेवलीच पाहिजे. नाहीतर लेखकाने मुखपृष्ठावर म्हटलं आहे त्याप्रमाणे…पूर्वी डॉक्टरांच्या दवाखान्यात “शांतता राखा” असा फलक असायचा. भविष्यात, “डॉक्टरांकडे बंदूक आहे. वेडावाकडा विचार करू नका. नाहीतर तुमचा जीव वाचवायचे ऐवजी डॉक्टर तुमचा जीव घेतील” असे फलक दिसायला लागतील. सरकारी आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बंद होईल.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अनुभव कथनावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- अंतर्नाद – एका मासिकाचा उदयास्त (Antarnad – Eka masikacha udayast) – भानू काळे (Bhanu Kale)
- गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil) – राजेंद्र बनहट्टी (Rajendra Banahatti)
- जंगलांतील दिवस (jangalantil divas) – व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
- जंक्शन (Junction) – विनायक रत्नपारखी (Vinayak Ratnaparakhi)
- मी, मनु आणि संघ(Mi, manu ani Sangh) लेखक – रमेश पतंगे (Ramesh Patange)
- मिट्ट काळोख लख्ख उजेड (Mitta kalokh lakkha ujed) – सुमेध वडावाला रिसबूड (Sumedh Wadawala Risbud)
- रुळानुबंध (Rulanubandh) – गणेश मनोहर कुलकर्णी (Ganesh Manohar Kulkarni)
- हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan) – श्री. एम्. (Shri. M.) – अनुवादक – श्री. वि. पटवर्धन. (S.V. Patwardhan)
- हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ (How Starbucks saved my life) – मायकेल गिट्स गिल (Michael Gates Gill) अनुवाद – नीला चांदोरकर (Neela Chandorkar)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe