पुस्तक – मिट्ट काळोख लख्ख उजेड (Mitta kalokh lakkha ujed)
लेखक – सुमेध वडावाला रिसबूड (Sumedh Wadawala Risbud)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २६०
प्रकाशन – रोहन प्रकाशन. जाने २०२२
छापील किंमत – ३४०
ISBN – 978-93-92374-37-1
“एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन … दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास”. मुखपृष्ठावरची ही ओळ पुस्तक कशाबद्दल आहे हे सांगते आणि उत्सुकता निर्माण करते. दत्ता श्रीखंडे ह्यांचे स्वानुभव श्री. रिसबूड ह्यांनी शब्दबद्ध केले आहेत. “दत्ता”चं आयुष्य प्रचंड वादळी ठरलं आहे. गरिबी, नशा, गुन्हेगारी, पोलिसी सजा ह्या सगळ्या पायऱ्या पायऱ्यांनी “मिट्ट काळोख” असणारं आयुष्य तो जगत होता. पुण्याच्या मुक्तांगण संस्थेनं त्याला सुधारणेचा किरण दाखवला. तो त्याने डोळे भरून पहिला. तो सुधारला. त्याच्या आयुष्यात “लख्ख उजेड” पडला. तो यशस्वी व्यक्ती झाला. “दत्ता”ने आपले सगळे अनुभव, त्या मागच्या भावना अतिशय प्रामाणिकपणे ह्या पुस्तकात मांडल्या आहेत.
मुंबईचे उपनगर असलेल्या अंबरनाथ मधील एका गरीब वस्तीत जन्माला आलेला दत्ता. लहानपणापासून अभ्यासाची नावड. त्यात आजूबाजूचं वातावरण काही फार शिस्तीला पोषक असं नाही. उनाड मित्र पण अनायासे मिळाले. त्यामुळे शाळा सोडून फुकट हिंडण्याची सवय लहानपणीच लागली. ह्या टुकारपणाला घरून तरी किती पैसे मिळणार. त्यापेक्षा आपणच काहीतरी करून कमावू ही भावना मनात आल्यावर हॉटेल मध्ये पोऱ्याची नोकरी धरली. इतक्या लहान वयात “कमावता”होण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला पण त्यासाठी मरेस्तोवर काम, गलिच्छ राहणं, अपमान, अन्याय असं सगळं सुद्धा सहन करावं लागलं. त्यातून सुटका झाली ती पुढच्या नोकरीमुळे .. जी होती मटक्याच्या, जुगाराच्या अड्ड्यावर. मटका, जुगार, पोलिसांच्या धाडी, गुन्हेगार ह्याची ओळख झालीच पण चरस , गर्द त्यातून मिळणार क्षणिक आनंद ह्याचीही ओळख झाली. आणि ओळख कसली! व्यसनांनी गळाभेटच घेतली !! पैसा मिळाला की तो व्यसनांत उडवायचा आणि ती नशा उतरली की पुढच्या नशेसाठी पैसा कमवायचा. कुटुंबाची वाताहत आणि शरीराचीही. पण नशेने शरीराचा असा ताबा घेतलेला की नशा नाही केली तर त्याची प्रतिक्रिया म्हणजे उलट्या-जुलाब-पोटदुखी-प्रचंड वेदना ! पुस्तकातल्या नशेडी लोकांच्या भाषेत “टर्की” लागणे. त्यामुळे नशा पाहिजेच, पैसा पाहिजेच. मग तो कसा का मिळो. त्यातून चोरी, पाकिटमारी चा मार्ग त्याने स्वीकारला. आणि झाला एक सराईत गुन्हेगार. मग पुन्हा पुन्हा तुरुंगवास. तडीपारी.
हा सगळ्या पुस्तकाचा जवळपास निम्मा भाग आहे. लेखकाने तो अतिशय प्रभावीपणे लिहिला आहे. नशा करताना कशी “मझा” यायची, नशा करायची संधी मिळवण्यासाठी दत्ता काय काय करायचा क्लृप्ती लढवायचा ह्याचं मनोरंजक वर्णन आहे. पाकिटमारांचं जग, त्यांचे परवलीचे शब्द, पोलिसांकडून होणारी धरपकड, मारहाण, तुरुंगातलं वातावरण ह्याचं रसभरीत वर्णन आहे. खरं म्हणजे आपल्याला ते वाचताना मजा येते. कारण दत्ता बेरडपणे त्याची मजाच घेत होता. नशेपुढे सगळंच गौण होतं.
तुरुंगवासात असताना नशा करणं कठीण व्हायचं. त्यामुळे “टर्की”ला तोंड देत का होईना तगून राहावं लागायचं. महिनापंधरा दिवस गर्द पासून दूर राहिल्यामुळे उलट तुरुंगवास मानवायचा; तब्येत सुधारायची. त्यामुळे बाहेर पडल्यावरही हे सगळं बंदच ठेवायचं ही भावना बळावायची. पण ते तेवढ्यापुरतंच. इतरवेळीही मध्ये मध्ये आपण वागतोय हे चुकीचं आहे असे त्याला वाटायचं. मात्र “आजपासून सगळं बंद” हा संकल्प थोडावेळच टिकायचा. ते वाचताना ती धडपड, तडफड वाचताना आपणही भावुक होतो. परिस्थितीचे आणि भावनांचे हे झोके वाचकाला वेगळीच वाचनानुभूती देतात. एका वेगळ्याच दुनियेची सैर घडवतात.
असाच एकदा “आता सुधारायचं” चा झटका आला. कोणाकडूनतरी “मुक्तांगण” ची माहिती कळली. डॉ. अनिता-अनिल अवचट, त्यांचे कुटुंबीय, डॉ. आनंद नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयाचा एक भाग म्हणून व्यसनमुक्ती केंद्र चालवत होते. तिथे दत्ता दाखल झाला. व्यसनाधीन माणसाला गुहेगार, टाकाऊ न समजता त्याच्यातल्या “माणसा”ला साद घालण्याची “मुक्तांगण”ची पद्धत होती. समुपदेशन, शारीरिक-मानसिक व्यायाम, योग्य आहार, हाताला सतत काम ज्यातून मनही गुंतून राहील असे वेगवेगळे उपाय त्यात होते. पूर्वी व्यसन करणारे पण आता व्यसनमुक्त झालेले लोक स्वतःचे अनुभव सांगत.
मुक्तांगणमध्ये पुन्हापुन्हा राहिल्यावर दत्ता सुद्धा व्यसनातून बाहेर पडला. मुक्तांगणचा एक भाग झाला. तिथेच आधी सहाय्यक मग स्वयंपाकी म्हणून नोकरी करू लागला. संस्थेच्या पुढाकारातून त्याचं लग्न झालं, स्वतःचं घर झालं. स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु केला. इतकंच काय बी.ए. एमए ची पदवी मिळवली. वाममार्गाला लागलेली बुद्धी मुक्तांगणने मुक्त करून सन्मार्गाला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकेकाळाचं नशेने उध्वस्त केलेलं शरीर असलं तरी दत्ताजींनी मनापासून व्यायाम सुरु केला. नुसते सुदृढ होऊन थांबले नाहीत तर शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन “महाराष्ट्रश्री” पर्यंत मजल मारली. अजूनही बरेच काही चांगले उद्योग त्यांनी केले; वेगवेगळ्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी “मन की बात” मध्ये त्यांचं कौतुक केलं. हे सगळं पुस्तकात मांडलं आहे.
दत्ताजींच्या आयुष्याने घेतलेली कलाटणी अचंबित करणारी आहे. अवचट कुटुंब, डॉ. नाडकर्णी आणि त्यांचे सहकारी ह्यांनी शांतपणे पण किती महान कार्य उभं केलं आहे, हे जाणून आपण नतमस्तक होतो. ह्या सगळ्यांबद्दलच्या विशेषतः “मोठ्या मॅडम” अर्थात अनिता अवचट ह्यांच्याबद्दलच्या भावना प्रसंगोपात आल्या आहेत. त्या भावनांशी आपणही पूर्णपणे सहमत होतो.
नायकाचं आयुष्य हे नाट्यमयतेने भरलं असल्यामुळे त्यावरचं पुस्तक वाचनीय ठरलंच असत. पण श्री. रिसबूड ह्यांच्या खुसखुशीत लेखन शैलीने पुस्तक दुप्पट वाचनीय झालं आहे. नर्मविनोदी लेखन शैली, शब्दचमत्कृती, शाब्दिक कोट्या ह्याची धमाल आहे. त्यामुळे प्रसंग कठीण, करुण असले तरी पुस्तक वाचन रडकं होत नाही. गुंड, पोलीस किंवा गर्दुल्ले ह्यांच्या तोंडची भाषा शिव्यांसकट तशीच ठेवली आहे.
आता काही पानं वाचूया म्हणजे पुस्तकाची, शैलीची कल्पना येईल.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
अनुक्रमणिका
मटका, जुगार, गर्द आणि गुन्हेगारीचे संस्कार
व्यसनीची “व्यसन”दीक्षा … नको तिथे आपुलकी दाखवल्यामुळे व्यसन सोडणं कसं कठीण होतं
मुक्तांगणच्या कार्यपद्धतीचा एक प्रसंग
हल्ली आपण कोणाचा वाढदिवस असेल, लग्न ठरलं, बढती मिळाली, काही कर्तृत्व गाजवलं की विचारतो ; “अभिनंदन, पार्टी कधी ?” त्यातून बऱ्याच जणांना विचारायचं असतं की “दारू पार्टी” कधी? न पिणारे सुद्धा ते सहजपणे किंवा गमतीत घेतात. पण हेच जर कोणी दत्ताजींना म्हटलं असतं तर ? सहज..गंमत म्हणूनच घेतलेला “एकच प्याला” त्यांच्या आयुष्याचा घात करून गेला नव्हता का ? दारू, सिगरेट आणि नशा ह्यांना मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा खरंच कोणाच्या फायद्याची. त्याप्रतिष्ठेपायी व्यसनांकडे वळणाऱ्या तरुण पिढीने हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण ही वाट निसरडी आहे. “नियंत्रित शौक” कधी अनियंत्रित होतील कळणार नाही.
म्हणूनच तुम्ही निर्व्यसनी असाल; असलं भयानक जीवन वाट्याला आलं नसेल तर हे वाचून तुम्ही आपल्या सुदैवाचे आभारच मानाल.
अजून एक जाणवलं. आपल्याला भले अश्या पदार्थांचं व्यसन नसेल; पण टीव्ही, मोबाईल, समाज माध्यमं, बातम्या, व्हॉट्सअप फॉरवर्ड, हिंसक घटनांचे व्हिडीओ, अश्लील चित्रफीती, मोबाईल गेम ह्यांचं व्यसन आपल्यापैकी बऱ्याच जणांना नकळत लागलं आहे. आपली अवस्था दत्ता इतकी वाईट दिसत नसली तरी आपल्या मनःस्वास्थ्याचा, वेळेचा लचका ही व्यसनं तोडतायत हे नक्की. त्यापासून स्वतःला सावरण्याची सुरुवात केलीच पाहिजे.
म्हणूनच एक गंभीर सामाजिक समस्या व तिच्यावर मात करणारी हे यशोगाथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
स्वानुभव कथनावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran) – अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो (Abhijit V. Banerjee & Ester Duflo) – अनुवाद – अतुल कहाते (Atul Kahate)
- घर सैनिकाचे (Ghar Sainikache)- डॉ. नीलिमा निशाणदार (Dr. Neelima Nishandar)
- चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala) – उपेंद्र पुरूषोत्तम साठे (Upendra Purushottam Sathe)
- नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra) – उदयन् आचार्य (Udayan Acharya)
- निपुणशोध (Nipunshodh) – सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)-गिरीश टिळक (Girish Tilak)
- पांडेपुराण (Pandepuran) – पीयूष पांडे (Peeyush Pandey) – अनुवाद – प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas) – विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil )
- माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi) माधव जोशी (Madhav Joshi)
- राशा (Rasha)-शरद वर्दे (Sharad Varde)
- लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna) – सागर रायकर (Sagar Raykar)
- वाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht) – निरंजन घाटे (Niranjan Ghate)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan) – श्री. एम्. (Shri. M.) – अनुवादक – श्री. वि. पटवर्धन. (S.V. Patwardhan)
- I am no messiah (आय अॅम नो मसीहा) – Sonu Sood with Meena K. Iyer (सोनू सूद व मीना के. अय्यर)
- Lost and Founder (लॉस्ट अॅंड फाउंडर) – Rand Fishkin (रॅंड फिश्किन)
- हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ (How Starbucks saved my life) – मायकेल गिट्स गिल (Michael Gates Gill) अनुवाद – नीला चांदोरकर (Neela Chandorkar)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या २०१२ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe