पुस्तक – रुळानुबंध (Rulanubandh)
लेखक – गणेश मनोहर कुलकर्णी (Ganesh Manohar Kulkarni)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १४६
प्रकाशन – शब्दमल्हार प्रकाशन. ऑक्टोबर २०२३
ISBN – 978-93-91807-24-5
छापील किंमत – २६०/-
“झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी… पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया !” हे सगळ्यांचं आवडतं बालगीत. रेल्वे प्रवास करताना खिडकीच्या बाहेरून पळती झाडे, नवनवीन गावे, बदलती स्टेशने, त्याच्यावरची माणसे व विक्रेते, वल्ली सहप्रवासी, त्यांच्याशी गप्पा, गर्दी-गोंधळ अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण रेल्वे प्रवासाचा आनंद घेत असतो. खिडकीतून बाहेर बघताना इतकी मजा येते, तर थेट इंजिनात बसल्यावर कसं वाटत असेल? हा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावला असेलच. रेल्वेमध्ये ज्यांच्या ओळखी असतील किंवा काही खास परवानगी मिळवून हा अनुभव घेणे शक्य असेल अशा लोकांनी रेल्वे ड्रायव्हर बरोबर प्रवास करूनही बघितला असेल. पण असे फार कमीच ऐकू येते. त्यामुळे प्रत्यक्ष बसायला मिळाले नाही तरी इंजिनात बसण्याचा अनुभव कसा असतो ह्याची उत्सुकता नक्कीच असेल. आपली हीच उत्सुकता पूर्ण करण्याचं काम हे पुस्तक करत आहे.
पुस्तकाचे लेखक गणेश कुलकर्णी हे पश्चिम रेल्वेच्या पश्चिम रेल्वेत जलदगती गाड्या (एक्सप्रेस) यांचे इंजिन चालक आहेत. गाडी चालवताना कसं सतर्क रहावं लागतं, काय काय गोष्टी समोर दिसतात, काय घटना घडतात, कशा प्रकारचा मानसिक ताणतणाव झेलावा लागतो इ. चं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलं आहे. वेगवेगळ्या नियतकालिकांत लेखकाने आपले अनुभवविश्व मांडणारे लेख लिहिले आहेत. असे हे पूर्वप्रसिद्ध लेख या पुस्तकात संग्रहित करून वाचकांसमोर सादर झाले आहेत.
इंजिनचालक गाडी चालवतो म्हणजे हिरवा सिग्नल दिसला की वेग वाढवायचा, लाल सिग्नल दिसला की गाडी थांबवायची आणि कोणी रूळ ओलांडताना समोर दिसलं की हॉर्न वाजवून त्याला सावध करायचं अशी या कामाबद्दलची माझी साधी सोपी कल्पना. पण जितकं हे साधं वाटतं तितकं ते साधं नाही. कारण सतत सिग्नल कडे लक्ष ठेवणं, त्यानुसार गाडीचा वेग कमी जास्त करणं, आजूबाजूला रेल्वे संबंधित जी चिन्ह असतात ते वाचून त्याप्रमाणे कृतीणं कर हे खूप एकाग्रतेचं काम आहे. त्यातही इंजिनात इंधन सतत जळत असतं त्यामुळे इंजिन तापलेलं असतं. दिवसाचा प्रवास असेल तर उन्हामुळे ते आणखी तापणार. अशा परिस्थितीत आपल्या ड्युटीच्या वेळेत पूर्ण वेळ शरीर आणि मन सतर्क ठेवून काम करायचं, जर त्यात काही चूक झाली तर स्वतःचे आणि गाडीतल्या हजारो प्रवासांचे प्राण धोक्यात. असं हे कामाचं अतिशय आव्हानात्मक स्वरूप लेखकाने आपल्यासमोर प्रभावीपणे मांडलं आहे.
रेल्वेच्या गाडीखाली येऊन होणाऱ्या अपघाताच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. ते वाचून आपण हळहळतो. पण ज्या गाडीखाली हा अपघात होतो त्या गाडीच्या चालकाची अवस्था कशी होत असेल? समोर व्यक्तीचे मरण दिसतंय पण काहीच करू शकत नाही. गाडीचा ब्रेक अचानक दाबला तर गाडी रुळावरून घसरेल आणि एका व्यक्तीला वाचवायच्या नादात शेकडो लोक मृत्युमुखी पडतील. त्यामुळे मनावर दगड ठेवून गाडी पुढे हाकावीच लागते आणि गाडीचा वेग कमी होऊन गाडी पुढे थांबवली जाते. आणि मग त्या छिन्नविछिन्न झालेल्या देहाची वर्दी पोलिसात द्यायची. रुग्णवाहिका बोलवायची. जर इंजिनामध्ये त्यामुळे काही अडकले असेल तर ते स्वतःच्या हातानेच काढायचे. असला भयंकर, भीतीदायक, नकोसा अनुभव दुर्दैवाने इंजिनचालकाला पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. असे स्वतःचे आणि इतर चालकांचे अनुभव लेखकाने सांगितले आहेत. अपघातांचीच दुसरी बाजू आहे आत्महत्या. आत्महत्या करायला आलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे काही यशस्वी आणि काही यशस्वी प्रयत्न लेखकाने दिले आहेत. ते वाचताना अंगावर शहरा येतो; डोळ्यात पाणी येतं.
काम संपलं की इंजिनचालकांसाठी काय सोयी असतात, तिथे वल्ली ड्रायव्हर कसे भेटतात, कामाच्या स्वरूपाचा शरीरावर कसा परिणाम होतो, कटुंबिक आयुष्यही “डिस्टर्ब” असतं, मग हे ताण-तणाव लेखक कसे घालवतो ह्याचे पण अनुभव आहेत. इंजिनचालकालाच्या कामाची ही गंभीर बाजू जशी आहे तशीच या कामात येणारे आनंददायक अनुभव सुद्धा आहेत. इंजिनमधून दिसणारी सुंदर निसर्ग दृश्ये व बदलणारे हवामान ह्यांचा अनुभव येत असतो. त्याचे छान वर्णन लेखकाने केले आहे.
फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रेल्वे लेखकाच्या आयुष्यात नाही तर रेल्वे हा त्याच्या अभ्यासाचा, आकर्षणाचा आणि आनंदाचा सुद्धा भाग आहे हे पुस्तकातले काही लेख वाचून कळतं. “युद्ध आणि रेल्वे” या लेखात रेल्वेच्या जागतिक इतिहासावरती एक नजर टाकली आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतूक आणि त्यातही लष्करी साधनसामग्री, कुमक आणि सैन्य यांची नेआण करण्यासाठी रेल्वे लाईन टाकल्या गेल्या हे लेखकाने स्पष्ट केलं आहे. युरोपियन युद्धांमध्ये व महायुद्धांमध्ये रेल्वेचा सामारिक वापर कसा केला गेला, त्यात झालेल्या त्रुटी किंवा गडबडीमुळे युद्धही हरलं गेलं अशी अपरिचित उदाहरणं लेखकाने दिली आहेत.
“चित्रपट आणि रेल्वे” या लेखात मराठी हिंदी चित्रपटांमध्ये रेल्वेचा कसा वापर झाला आहे, दृश्यांमध्ये रेल्वे कशी दिसते, काही वेळा रेल्वेच्या आजूबाजूला कथानक कसं घडतं, रेल्वेत काय काय चित्रित झालं आहे याचा मागवा घेतला आहे.
“यात्रेतली गुन्हेगारी” मध्ये रेल्वेत घडणाऱ्या चोऱ्यामाऱ्या व त्यासाठी चोर वापरत असलेल्या क्लृप्त्या, प्रवाशांचा निष्काळजीपणा तर कधीकधी भोळेपणा याचे किस्से सांगितले आहेत. ज्याच्या वस्तूंची चोरी झाली त्याच्यासाठी ते निश्चित त्रासदायक आहेत पण वाचकांसाठी ते थोडे गमतीशीर आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने जागरूक करणारे आहेत.
“चकवा” आणि “एका काठीचा प्रवास” हे लेखकाचे स्वतःचे एक प्रवासी या भूमिकेत आलेले अनुभव आहेत. एक प्रवास तसा लहानसा पण गाड्यांचा गोंधळ, अपुरी माहिती आणि चुकीचे मार्गदर्शन यामुळे काही तासांचा प्रवास चार-पाचपट कसा झाला हे “चकवा” या लेखात आहे. एकदा लेखकाने दुसऱ्या गावात एक काठी( पोलिसांचा दंडुका असतो तशी) विकत घेतली आणि परत येताना ती गाडीत विसरला. रेल्वे कर्मचारी असल्यामुळे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ती काठी मिळवायचा प्रयत्न केला. आणि ती काठी सुद्धा मजल दरमजल करीत मजेशीर घटना घडवत लेखकापर्यंत येऊन पोचली. त्याची धमाल लेखकाने “एका काठीचा प्रवास” सांगितली आहे.
कामाचा ताण घालवण्यासाठी श्री. कुलकर्णी ह्यांनी कला व साहित्य यांची आवड जाणीवपूर्वक जोपासली. त्यांच्या या प्रगल्भतेची आणि व्यासंगाची जाणीव पुस्तक वाचताना आपल्याला पदोपदी होते. लेखकाचं संवेदनशील मन दिसतं तसंच खुसखुशीत लेखनशैली दिसते. शेरोशायरी किंवा गाण्यांचा वापर त्यांनी केला आहे. शब्दांची निवड व वाक्यरचना यातून आपण लेखक आपल्याला खिळवून ठेवतो. त्यामुळे मुळातच इंटरेस्टिंग असणारा हा विषय अजून वाचनीय होतो. पुस्तकाच्या उच्च अभिरुचीची ओळख मुखपृष्ठावरच्या मोहक रेल्वे तालचित्राने होते. मला हे चित्र खूप आवडलं. विजय बिस्वाल ह्यांचं पेंटींग आहे.
आता काही पानं उदाहरणादाखल
चालकाच्या कामातला किचकटपणा आणि अष्टावधानी राहण्याची गरज
काम संपल्यावर
रेल्वेच्या युद्धकालीन महत्त्वाचे एक उदाहरण
परिस्थितीच्या रेट्यामुळे लेखकाला ही नोकरी स्वीकारावी लागली असली तरी मूळचा पिंड हा लेखकाचा-कलाकाराचा आहे ते आपल्याला नक्की जाणवतं. त्यामुळे ह्या अनुभवांचं शब्दांकन करण्याची दुसऱ्या कोणी गरज भासली नाही.
त्यांच्या या व्यसंगाचा अनुभव मला त्यांच्या मुलाखतीत आला. डोंबिवलीत ध्रुव नॉलेज अकॅडमीने त्यांची मुलाखत आयोजित केली होती. श्री माधव जोशी यांनी ती मुलाखत घेतली. हे पुस्तक, त्यांचे अनुभव, कलाप्रियता अशा विविध विषयांना मुलाखतीत स्पर्श करण्यात आला. मी प्रत्यक्ष त्या मुलाखतीला उपस्थित होतो. ती मुलाखत तुम्ही युट्युब वर ऐकू शकाल. मग तर तुमची उत्सुकता अजूनच वाढेल.
Youtube video link – https://www.youtube.com/watch?v=xjdg2NNFWl0
पुस्तक ऑनलाईन विकत घ्यायला उपलब्ध दिसतंय. या पुस्तकाद्वारे गणेश कुलकर्णी इंजिनचालकाच्या अनुभव विश्वात घेऊन जातायत. चालकाच्याच्या खुर्चीवर बसवतायत. समोरच्या काचेतून दिसणारी दृश्य आपल्याला बघायला देतायत. मग अशी ही संधी तुम्ही आम्ही का बरं सोडायची? पुस्तक विकत घेण्याचं तिकीट काढायचं की दिलाच आपल्याला रेल्वेने हिरवा झेंडा. तेव्हा द्या शिट्टी आणि सुरू करा प्रवास सुरू करा “कू….. कू…”
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
स्वानुभव कथनावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran) – अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो (Abhijit V. Banerjee & Ester Duflo) – अनुवाद – अतुल कहाते (Atul Kahate)
- घर सैनिकाचे (Ghar Sainikache)- डॉ. नीलिमा निशाणदार (Dr. Neelima Nishandar)
- चौऱ्याऐंशी पावलं (Chauryaainshi Pavala) – उपेंद्र पुरूषोत्तम साठे (Upendra Purushottam Sathe)
- नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra) – उदयन् आचार्य (Udayan Acharya)
- निपुणशोध (Nipunshodh) – सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)-गिरीश टिळक (Girish Tilak)
- पांडेपुराण (Pandepuran) – पीयूष पांडे (Peeyush Pandey) – अनुवाद – प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas) – विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil )
- माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi) माधव जोशी (Madhav Joshi)
- राशा (Rasha)-शरद वर्दे (Sharad Varde)
- लडाख : एक उत्तुंग स्वप्न (Ladakh : Ek Uttunga Swapna) – सागर रायकर (Sagar Raykar)
- वाचत सुटलो त्याची गोष्ट..एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर (Vachat sutalo tyachi gosht) – निरंजन घाटे (Niranjan Ghate)
- सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन (Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahtan) – श्री. एम्. (Shri. M.) – अनुवादक – श्री. वि. पटवर्धन. (S.V. Patwardhan)
- I am no messiah (आय अॅम नो मसीहा) – Sonu Sood with Meena K. Iyer (सोनू सूद व मीना के. अय्यर)
- Lost and Founder (लॉस्ट अॅंड फाउंडर) – Rand Fishkin (रॅंड फिश्किन)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- द आंत्रप्रेन्यूअर (The Entrepreneur) – शरद तांदळे (Sharad Tandale)
- बायकांत पुरुष लांबोडा (Baykant Purush Lamboda) – डॉ. शंतनू अभ्यंकर (Dr. Santanu Abhyankar)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe