पुस्तक – निकोला टेस्ला (Nikola Tesla)
लेखक – सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १८६
प्रकाशन – राजहंस प्रकाशन. मे २०२३
ISBN – 978-93-91469-21-4
छापील किंमत – रु. २७०/-

भारतात सध्या निवडणुकांचे वारे सुरु आहेत. भारतातल्या निवडणुका म्हटलं की एक वाक्य नेहमी येते ते म्हणजे “बिजली सडक पानी”. आधुनिक जगात अन्न-वस्त्र-निवारा इतकीच मूलभूत गरज “बिजली” अर्थात विजेची आहे. विजेची उपलब्धता ही जनतेच्या विकासासाठी अत्यावश्यक बनली आहे. हजारो वर्षांचा मानवी इतिहास बघता गेल्या दोनेकशे वर्षांमध्येच “वीज” हा ऊर्जेचा मुख्य स्रोत झाला आहे. पण हा बदल झाला कारण; मोठ्या प्रमाणावर वीज निर्मती करणं शक्य झालं. एका ठिकाणी निर्माण केलेली वीज तारांच्या माध्यमातून लांब लांब पर्यंत नेणं शक्य झालं. विजेचा ऱ्हास कमीत कमी ठेवत हे वहन शक्य झालं. घरापर्यंत वीज पोचल्यावर त्यावर चालणारी कितीतरी उपकरणं तयार झाली. जगभरातल्या मानवांना ऊर्जेचं हे वरदान मिळालं ते देशोदेशीच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कारखानदार-उद्योगपतींमुळे. त्यांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे “निकोला टेस्ला”. सध्या आपल्या घरात जी वीज येते ती “अल्टरनेटिंग करंट” म्हणजेच “ए.सी.” प्रकारची. अशा विजेचं मोठ्याप्रमाणावर उत्पादन आणि वितरण शक्य आहे हे निकोलाने आपल्या संशोधनांतून सिद्ध केलं. भंडलवालदारांची मदत घेऊन अशी वीज निर्मिती आणि वितरण करणारे प्रकल्प अमेरिकेत उभे केले. आणि मानवी आयुष्यात क्रांती घडवली.

निकोला आयुष्यभर संशोधन करत राहिला, प्रयोग करत राहिला. त्याने नवनवीन तंत्रज्ञान तयार केलं. मोठया मोठ्या भांडवलदारांची मदत घेऊन त्या उपकरणांची मोठ्या प्रमाणावर (लार्ज-स्केल) उत्पादनही केलं. त्याने लावलेल्या शोधांची यादी तुम्ही नेटवर बघितलीत तर मुख्य नावे दिसतील
AC Power (alternating current)
Tesla Coil
Magnifying Transmitter
Tesla Turbine
Shadowgraph
Radio
Neon Lamp
Hydroelectric Power
Induction Motor
Radio Controlled Boat
काही वेळा त्याच्या संशोधनावर आधारित किंवा ते अजून पुढे नेत इतर संशोधकांनी ह्यात प्रगती केली उदा. रिमोट कंट्रोल, बिनतारी संदेशवहन, रेडियो, क्षकिरण, रडार इ.
अशा “निकोला टेस्ला”चं चरित्र श्री. सुधीर फाकटकर ह्यांनी आपल्यासमोर मराठी पुस्तकस्वरूपात आणलं आहे. निकोलाच्या जन्मापासून मृत्यपर्यंत पूर्ण आयुष्य ह्यात समाविष्ट आहे.

निकोलाच्या बालपणापासून त्याच्या शोधक वृत्तीची झलक आपल्याला दिसते. बऱ्याच वेळा अशा संशोधकांमध्ये आढळून येणारा एककल्लीपणा त्याच्यातही दिसतो. असे लोक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतात आणि तो ध्यास चुकीच्या गोष्टीचा लागला तर सोन्यासारख्या आयुष्याची माती होते. निकोलला सुद्धा तरुणपणी जुगाराचा नाद लागला. त्यात तो वाहवत चालला होता. पण कुटुंबाने त्याला सावरलं आणि तो पुन्हा अभ्यासाकडे वळला. हे आपल्याला पुस्तकातून कळतं.

त्याची बुद्धिमत्ता आणि “वीज” ह्याविषयातला रस बघून प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन ह्यांना भेटण्याची संधी मिळाली. एडिसन ह्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. डायरेक्ट करंट अर्थात DC वीज प्रवाहाद्वारे ते दिवे पेटवत होते. DC वीज निर्मिती, वितरण ह्यामध्ये एडिसनची कंपनी काम करत होती. अमेरिकेत विजेचा प्रसार होऊ लागला होता. तिथे निकोलाने काम केलं. पण निकोलाच्या डोक्यात AC प्रकारची वीज घोळत होती. एडिसनला ते पटलं नाही. आणि पुढे कामाच्या मोबदल्यावरून निकोलाने कंपनी सोडली. आपली कल्पना राबवण्यासाठी भांडवालदार शोधले. एडिसन विरुद्ध निकोला ह्यांचा व्यावसायिक संघर्ष सुद्धा सुरु झाला. त्यात पुढे अनेक चढउतार येत गेले. ते सगळं वर्णन पुस्तकात आहे.

निकोलाच्या जे शोध लावत होता त्याची “पेटंट” घेत होता. त्या शोधाचा व्यावसायिक वापर करून जेव्हा उद्योग सुरु होई. तेव्हा निकोलाला स्वामित्त्वहक्काचे शुल्क – रॉयल्टी – मिळत असे. त्यातून निकोला श्रीमंत सुद्धा झाला. राहणीमान सुद्धा उंची हॉटेलांमध्ये असे. तो तरुण असताना त्याची आई त्याच्या लग्नाच्या मागे लागली होती. पण निकोलाचं प्रेम विज्ञानच होतं. पुढील आयुष्यात पण त्याच्यावर भाळलेल्या स्त्रिया भेटल्या पण निकोला मात्र अविविवाहित राहून त्याचं संशोधन-उद्योगातच रममाण राहिला. निकोलाच्या ह्या वैयक्तिक आयुष्याचं दर्शन पण पुस्तकात घडतं. भारतीयांसाठी खास बाब म्हणजे स्वामी विवेकानंद ह्यांच्याशी निकोलाची झालेली भेट. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचारांचा निकोलावर प्रभाव पडला. तो प्रसंग पुस्तकात आहे.

निकोलाचं आयुष्य मात्र कायम यशस्वी सुखकर राहिलं असं नाही. त्याच्या काही कल्पना काळाच्या पुढे होत्या. त्यासंशोधनासाठी, मूर्त स्वरूपात आणण्यासाठी आवश्यक भांडवल मिळालं नाही. काही प्रयोग अर्धवट सोडावे लागले. काही व्यवहार आतबट्ट्याचे ठरले. आग लागून चालू प्रकल्प भस्मसात झाले. तर पहिले महायुद्ध आणि मंदी ह्यामुळे उद्योग दिवाळखोरीत काढावे लागले. पैसा-प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या निकोलाला, राहत्या जागेचं भाडं भरलं नाही म्हणून कितीतरी वेळा हॉटेलांनी बाहेर काढलं. इतकंच काय नोबेल पारितोषिक सुद्धा त्याला जाहीर झालं आणि रद्द झालं. एडिसन, मार्कोनी सारख्या शास्त्रज्ञांशी स्पर्धा, पेटंट च्या दाव्यांविषयी न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा अपयश आलं. एका जग बदलून टाकणाऱ्या संशोधकाची ही परिस्थिती बघून आपल्याला वाईट वाटतं.

काही पाने उदाहरणादाखल
लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती

निकोला आणि एडिसनची भेट

निकोलाच्या तंत्रावर आधारित जलविद्युत प्रकल्प नायगरा धबधब्यावर तयार करण्यात आला. पण ते काम सुरु असताना त्याच्या प्रयोगशाळेला आग लागून नुकसान झालं. तरी त्यातून सावरून प्रकल्प पूर्ण झाला. एक संशोधन करता करता दुसरं एक मोठं संशोधन आपोआप घडत होतं. क्ष-किरणांची जाणीव कशी झाली त्याबद्दल.


एक तांत्रिक वर्णन. भविष्यवेधी निकोला

असा निकोलाच्या आयुष्याचा बहुअंगी वेध घेण्याचा प्रयत्न पुस्तकात आहे. निकोलाने काय शोध लावला, तंत्र पुढे आणलं हे प्रसंगोपात येतं. पण ते तांत्रिक शब्द फारच जड वाटले. मी एक इंजिनियर असून आणि मराठी माध्यमात शिकलेला असूनही ती वर्णनं फार डोक्यात शिरली नाहीत. आकृत्या काढून अजून स्पष्टीकरण दिलं असतं तर समजलं असतं. पण मग ते विज्ञानाचं पाठ्यपुस्तक झालं असतं. एक ललित चरित्र झालं नसतं. आणि इतर वाचकांना ते कंटाळवाणं झालं असतं. म्हणून कदाचित लेखकाने तांत्रिक विवरण मर्यादित ठेवलं असावं. पुस्तकाच्या शेवटी काही पाने “index” सारखी जोडून जर त्यात हे विस्ताराने टिपले तर पुस्तक आणखीन माहितीपूर्ण होईल.

मराठीत चरित्र भरपूर येत असतील तरी वैज्ञानिकांची चरित्र कमी दिसतात. त्यात “मसाला” कमी असतो आणि तांत्रिक किचकटपणा जास्त असतो. त्यामुळे वाचक सुद्धा जरा तिकडे कमी वळतात. तरी लेखक आणि प्रकाशकांनी हे धाडस केलं ह्याबद्दल दोघांचे आभार. वाचकांनी सुद्धा स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी अशी पुस्तकं जमतील तेव्हा वाचली पाहिजेत.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्यावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe