पुस्तक – पोलादी (Poladi)
लेखिका – अनुजा तेंडोलकर (Anuja Tendolkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २६१
प्रकाशन – डिंपल पब्लिकेशन, प्रथमावृत्ती – ऑगस्ट २०२२
छापील किंमत – ४००/- रु.
ISBN – 978-93-92419-00-3

“डिंपल पब्लिकेशन”चे कौतुक मुळे ह्यांनी आपणहून हे पुस्तक मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वप्रथ त्यांचे आभार मानतो. माझ्या हौशीने पण नियमित वाचन व परीक्षणलेखनाचे श्री. कौतुक मुळे ह्यांनी “कौतुक”च केले आहे असे मी समजतो.

हे पुस्तक म्हणजे – पुरुषाला लाजवेल असे कर्तृत्त्व गाजवणाऱ्या स्त्रीचे; शब्दश: शक्तिमान असणाऱ्या स्त्रीचे; एका विलक्षण व्यक्तिमत्वाचे आत्मकथन आहे. अनुजा तेंडोलकर ह्या कोकणात वेंगुर्ला येथे राहणाऱ्या एक उद्योजिका आहेत. त्यांची स्वतःची तारकर्ली येथे पर्यटन निवासव्यवस्था (रिसॉर्ट) आहे. त्यांनी स्वतः घेतलेली मोठी बागायती, आंबा-काजू कलमे आहेत. त्या संगीत विशारद आहेत. आणि त्या महिला वेटलिफ़्टर आहेत. त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळाली आहेत. तेही वयाच्या पन्नाशीनंतर वेटलिफ्टिंग शिकायला सुरुवात केल्यावर. ह्या दणकट बाहुंमध्ये स्वयंपाकापासून तैलचित्रांपर्यंत असंख्य कला वास करतायत.

इतकं वाचल्यावर; “हे खरंच एका व्यक्तीचं वर्णन आहे ?” असं तुम्ही अचंब्याने विचाराल. पण हो हे एकाच व्यक्तीचं वर्णन आहे. मग तुमच्या डोक्यात येईल की; “जन्मजात कलागुणांना अगदी पोषक वातावरण मिळाल्यामुळेच हे शक्य झालं असेल”. तर तसेही नाही. कलागुणांना पोषक वातावरण सोडाच उलट जीवनेच्छाच मारून टाकेल अश्या भयानक परिस्थितीत त्यांचं निम्मं आयुष्य गेलं. असं त्यांचं आयुष्य आणि संकटांवर मात करून दुर्दम्यपणे उभे राहण्याचे अनुभव अनुजा तेंडोलकर ह्यांनी स्वतः शब्दबद्ध केले आहेत.

त्यांचं बालपण डोंबिवलीत एका मध्यमर्गीय कुटुंबात गेलं. पण त्यांची आई एका धार्मिक बाबाच्या नादी लागल्यामुळे आईचं प्रेम त्यांना मिळालं नाही. उलट लहानपणापासून स्वयंपाकपाण्याची, घरकामाची जबाबदारी अंगावर पडली. आईच्या शिव्या आणि लहरी वागणं सहन करावं लागलं. बेताच्या आर्थिक परिस्थितीत त्यांनी शाळा, कॉलेज पूर्ण केलं. त्यावेळेच्या रीतीनुसार लवकर लग्न झालं. मात्र परिस्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. डोंबिवलीतून एकदम वेंगुर्ल्यासारख्या तेव्हाच्या खेडेगावात, एकत्र कुटुंबात कामाच्या रागाड्यातच पडायला लागलं. सासुरवास आणि नातेवाईकांची टोमणेबाजी ज्याच्यासाठी व ज्याच्याआधारे सहन करायची तो नवरा बाहेरख्याली निघाला. राजरोसपणे त्याचे धंदे चालू होते. एक मोलकरीण असल्याप्रमाणे कामं करायची, वर नवऱ्याच्या शिव्या खायच्या, हातात पैसेपण नाहीत अशी त्यांची कोंडी झाली.

पण त्यांनी परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन उभं राहणं पत्करलं. सासरच्या वडिलोपार्जित जमिनीत राबत त्यांनी बागायती उभी केली. ते करताना जमिनीच्या व्यवहारांची माहिती घेऊन नातेवाईक, शेजारीपाजारी, गावकरी ह्यांच्याशी संघर्ष करून त्यांच्या कुटुंबाबाचा हिस्सा मिळवला. स्वकष्टाने वाढवला. दुकान, हॉटेल सुरु केले. हे सगळं करताना घरच्यांचा पाठिंबा नाहीच; उलट ‘हिलाच कोर्टकचेऱ्यांची हौस’ अशी संभावना. जेव्हा जमीन, पैसा मिळू लागला तेव्हा मात्र; ‘हे सगळं सामायिक; आमचा हिस्सा द्या’ म्हणायला लोक पुढे. एक बाई पुरुषीक्षेत्रात प्रवेश करतेय म्हणून गावकऱ्यांनी खोडे घालायला सुरुवात केली. जमिनीचे व्यवहार म्हणजे त्यात लफडी फार. त्यातून त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला. पण न डगमगता त्या उभ्या राहिल्या. त्यांचे हे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत.

बागायती, दुकान, हॉटेल ह्यांचा व्याप सांभाळत, थोडी आर्थिक सुस्थिती आल्यावर त्या इतर कला आणि गाणं शिकण्याचं आपलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याकडे वळल्या. आयुष्याच्या ज्या टप्प्यावर लोक आपले व्याप कमी करतात त्या टप्प्यावर त्या नव्या उत्साहाने “वेट लिफ्टिंग” शिकल्या. जे काम करायचं ते मन लावून, सर्वस्व झोकून ह्या वृत्तीने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. स्पर्धा जिंकल्या. इथेही – फक्त योग्य व्यायाम, आहार सराव – इतकं करून त्यांना भागणार नव्हतं. तर ह्या क्षेत्रातला भ्रष्टाचार, फसवणूक, राजकारण, हेवेदावे ह्या सगळ्यालाही पुरून उरावं लागलं. त्याचेही कितीतरी अनुभव त्यांनी दिले आहेत. क्रीडाक्षेत्राचे हे वेगळेच दर्शन आपल्याला घडते.

पुस्तक वाचताना कळले की आम्ही दोघेही डोंबिवलीकर आणि “स्वामी विवेकानंद” शाळेचे विद्यार्थी !!

आता पुस्तकातली काही पाने वाचूया…

लेखिकेच्या आईच्या विचित्र स्वभावाबदलपतीकडून अवहेलना


बागायती वाढवण्याच्या आणि जमिनीच्या व्यवहारातले टक्केटोणपेवेट लिफ्टिंग स्पर्धांचे अनुभव आणि यशही कहाणी एकीकडे करुण आणि संघर्षामुळे उत्कंठावर्धक आहे. एका वैयक्तिक “युध्दस्य कथा”च म्हणायला हवी. त्यामुळेच ह्यात अतिवैयक्तिक, छोटे छोटे कौटुंबिक प्रसंग खूप येतात. एकदा परिस्थितीचा अंदाज आला की त्याच पद्धतीचे प्रसंग ही थोडी पुनरावृत्ती वाटते. ते थोडे कमी करता आले असते.

बागायती, संगीत आणि क्रीडा अशी तीन वेगवेगळी प्रकरणे केल्यामुळे कालसंगती जाते. त्याऐवजी घटना कालानुक्रमे लिहिल्या असत्या तर, एकाच वेळी कोर्टकचेऱ्या, कौटुंबिक त्रास, व्यवसाय आणि छंद हे सगळं त्या एकत्र कसं जमवत होत्या ते नीट समजलं असतं. उद्बोधक ठरलं असतं.

खेळाच्या प्रकरणात फक्त स्पर्धांची जंत्री आणि त्यात आलेल्या वाईट अनुभवांवर जास्त “फोकस” आहे असं जाणवतं. ह्या वयात वेटलिफ्टिंगसाठी स्वतःला तयार करणं म्हणजे – आहार, व्यायाम, विश्रांती, दिनचर्या – ह्या सगळ्यात मोठा बदल करावा लागला असेल. हे सगळं कसं जमवलं हे वाचकांच्या दृष्टीने जास्त उपयुक्त ठरलं असतं.
विदारक प्रसंगांत त्यांच्या मनात जे भावभावनांचे कल्लोळ उठले असतील; त्यांनी स्वतःच स्वत:ला सावरलं असेल ती मानसिक लढाई अजून प्रकर्षाने लिहायला हवी होती. अश्या प्रसंगातून जाणाऱ्या वाचकांना त्यातून अजून धीर मिळाला असता, काही युक्ती मिळाल्या असत्या. पुस्तक अजून प्रेरणादायी आणि मार्गदर्शक झालं असतं.

अनुजा तेंडोलकर ह्यांच्या बालपणापासून आजपर्यंतच्या संघर्षाची कहाणी वाचकांना भावेल व मानसिक बळ देईल हे निःसंशय.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

कर्तृत्त्वान महिला, महिला भावविश्व, महिलांच्या समस्या ह्याबद्दलच्या इतर पुस्तकांची परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/