पुस्तक – द मदर (The Mother)
लेखिका – पर्ल बक (Pearl Buck)
अनुवादक – भारती पांडे (Bharati Pande)
भाषा – मराठी
मूळ पुस्तक – The Mother (द मदर)
मूळ पुस्तकाची भाषा – English इंग्रजी
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, एप्रिल २०२३
ISBN 9789357200103
छापील किंमत – रु. ३००/-
पर्ल बक ह्या अमेरिकन लेखिकेची “द गुड अर्थ” ही त्रिखंडात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे. ह्या कादंबरीचे भारती पांडे भारती पांडे ह्यांनी केलेले अनुवाद आधी मी वाचले आहेत. त्या कादंबऱ्या मला आवडल्या. त्यांचेही परीक्षण मी लिहिले होते.
काळी (Kali) https://learnmarathiwithkaushik.com/courses/kali-the-good-earth/
पिढी दर पिढी (Pidhi dar pidhi) https://learnmarathiwithkaushik.com/courses/pidhi-dar-pidhi
ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हटलं आहे की “द गुड अर्थ” कादंबरीचा तिसरा भाग. पण नेटवर शोधल्यावर असं वाटतं आहे की हा तिसरा भाग नसून स्वतंत्र कादंबरी आहे. तसेच ह्यातल्या पात्रांचा आणि कथानकाचा इतर तीन पुस्तकांशी सबंध नाहीये. असो !
सुमारे १०० वर्षापूर्वी चीनमधल्या खेड्यात घडणारे हे कथानक आहे. कथेची नायिका ही एक तरुण शेतकऱ्याची तरुण बायको आहे. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसांगात ह्या बाईच्या मनाची होणारी घालमेल, भावनेचे आवेग ह्याचं भावगम्य चित्रण म्हणजे ही कादंबरी आहे.
तिला मुलं आहेत. म्हणून पुस्तकभर तिचा उल्लेख “आई” असाच आहे. “आई”, तिचा नवरा, म्हातारी सासू, दोन मुले असं कुटुंब आहे. स्वतःच्या मालकीची थोडी आणि खंडाने कसायाला घेतलेली थोडी; अशा जमिनीवर हे दांपत्य शेती करतंय. वर्षभर सतत शेतीची कष्टाची कामे ते करतायत. नवऱ्याला शेतात मदत करून झाल्यावर घरचा स्वयंपाक आणि कामंही “आई”ला आहेतच. “आई” असो की गावातल्या इतर स्त्रिया, सगळ्यांची अवस्था अशीच. त्यातच पुन्हा पुन्हा होणारी बाळंतपणं आहेतच. पण ह्यात कष्टाचा भाग असला तरी आनंदाचा आणि स्वाभिमानाचा भाग सुद्धा आहे. मी दरवर्षी पोटुशी राहते; मी “उपजाऊ जमीन” आहे वांझोटी नाही, माझी प्रसूती चट्कन होते; धडधाकट मुलं जन्माला येतात; “मुलगे” जास्त होतात मुली कमी .. ही सगळी त्यांच्या अभिमानाची स्थानं. तर असं हे निसर्गचक्र आणि प्रसूतीचक्रात अडकलेलं संथ आणि तोचतोचपणा असलेलं आयुष्य.
“आई”चं आणि तिच्या नवऱ्याचं एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांच्या सहवासाची सवयही आहे आणि कडाक्याची भांडणही आहेत. हे चाकोरीबद्ध आयुष्य असंच जात राहणार अशी मनात खात्री असताना तिचा नवरा परागंदा होतो. ते लोकांना कळू नये म्हणून तो बाहेरगावी नोकरीसाठी गेल्याचं ती खोटं सांगते. लोकांना खरं वाटावं असे काही बनाव रचते. आपला नवरा परत येईल ही आशा उरी बाळगून कच्च्याबच्च्यांसह कष्ट करून ती त्यांना वाढवू लागते. काही वर्षे जातात. पण एक बाई म्हणून – दरवर्षी गर्भवती राहण्याची सवय असलेला एक देह म्हणून – तिला हा विरह सहन होत नाही. तिचा पाय घसरतो. एक मोहाचा क्षण ती टाळू शकत नाही. पण अनौरस मूल पोटात वाढतंय म्हटल्यावर ती गुपचूप गर्भपात करून घेते. ह्या अनुभवातून मनाने खचते. शरीराने पिचते. तिची ही व्याकुळता लेखिकेने यथार्थपणे चित्रित केली आहे.
झाल्या घटनेचा तीव्र पश्चात्ताप तिला होत असतो. “आपण पाप केलं, आपल्या पापाची शिक्षा आपल्याला मिळत राहील” अशी भीती तिच्यामानात वास्तव्य करते. काळ पुढे सरकतो आहे. मुलं मोठी होतायत. मोठा मुलगा तिला कामात मदत करतोय. लहान मुलगा उडाणटप्पूपणा करतोय. तरी लहानग्यावर तिचा जास्त जीव आहे. आईच्या ह्या वागणुकीमुळे मोठ्या मुलाची कुचंबणा होत असते. शेवटी आई त्याचं लग्न लावून देते. इतके दिवस सून असणारी, घराची मालकीण असणारी “आई” आता “सासू” आणि “घरची म्हातारी” झाली आहे. धाकटा मुलगा पळून शहरात जातो. कधीमधी येतो. अशाच संथ पद्धतीने कथानक पुढे जात राहतं. अजून काही बरे वाईट प्रसंग घडतात. प्रत्येक वाईट प्रसंगी “आपल्या पापाची शिक्षा” ही तिची भावना उचल खात राहते. आपला वंश खुंटणार का ही भीती तिला सतावत राहते. कौटुंबिक वातावरणातल्या ह्या बदलांचं वर्णन सुद्धा अतिशय तपशीलवार केलं आहे.
ह्या शेतकरी कुटुंबाचे संथ आणि चाकोरीबद्ध जीवनाचे वर्णन
नवरा परागंदा झाल्यावरची विरहिणी अवस्था
मोठ्या मुलाच्या लग्नाचा आणि नवी सून घरी येण्याचा प्रसंग. चिनी रीतीरिवाजानुसार ती एका सवाष्णीच्या हातून सुनेसाठी कपडे शिवून घेते अशी ह्या प्रसंगाची सुरुवात आहे.
टीव्ही वरच्या दैनंदिन मालिकांप्रमाणे नवेनवे प्रसंग घडत राहतात. खरं बोलायचं तर, लेखिका थांबली म्हणून; अन्यथा अजून दोनतीनशे पानं लिहीत राहू शकली असती. लेखिकेची “काळी” ही कादंबरी मला खूप आवडली कारण त्यात एका कुटुंबाची आणि त्यावेळच्या खेड्याची कहाणी होती. त्याचा पुढचा भाग असलेली “पिढी दर पिढी” पण चांगली होती. त्यात जुन्या चीनच्या बदलत्या समाजाचं चित्रण होतं. त्यातुलनेत ही कादंबरी एकच एक पात्राची, अतिशय संथ, करुण आणि ताणलेली वाटली. नवरा जाणं, विरह सहन करणं, पाय घसरणं, मुलांची भाऊबंदकी, सासू-सुनेचे ताणलेले संबंध हे सगळे विषय सुद्धा खूप गोष्टी, कादंबऱ्या आणि “डेली सोप” मालिकांमध्ये चावून चोथा झालेले विषय. कथानक चीन मध्ये घडत असलं तरी ते भारतातल्या एखाद्या खेड्यात असंच घडलं असतं असं वाटतं. त्यामुळे चिनी कदंबरी असा वेगळेपणा जाणवत नाही. जरी वाचायला कंटाळा आला नाही तसंच आपण पात्राशी समरस झालो तरी पुस्तक पूर्ण केल्यावर खूप वेगळं वाचल्याचा भाव येत नाही. विशेषतः आधीच्या दोन कादंबऱ्यांनी वाढवलेल्या अपेक्षांसमोर हे पुस्तक अगदीच फुसके ठरते. लेखिकेची शैली एकसुरी वाटू लागते. म्हणून “काळी” ला “आवर्जून वाचा” ; “पिढी दर पिढी” ला “जमल्यास वाचा” तर ह्या कादंबरीला “वाठीनावाठी” म्हणावंसं वाटत.
अनुवादिका भारती पांडे ह्यांना पुन्हा १००% मार्क. सहज, सोपं आणि आपल्या मातीतलं वाटेल तरी चिनी ठसा मिटणार नाही असा ओघवता अनुवाद.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
शेतकरी/ग्रामीण जीवनावर आधारित अजून काही पुस्तकांचे परीक्षण
- अहिराणी गोत (Ahirani Got) – डॉ. सुधीर रा. देवरे (Dr. Sidhir R. Deore)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- काजळमाया (Kajalmaya) – जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- करुणाष्टक (Karunashtak) – व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
- झाडाझडती (Jhadajhadati) – विश्वास पाटील (Vishwas Patil)
- टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird ) – हार्पर ली (Harper Lee) अनुवादक – विद्यागौरी खरे (Vidyagauri Khare)
- तांडव(Taandav)- महाबळेश्वर सैल(Mahabaleshwar Sail)
- पाडस (padas) – मार्जोरी किनन रॉलिंग्ज (Marjorie Kinnan Rawlings) – अनुवाद – राम पटवर्धन
- पथेर पांचाली (Pather Panchali) लेखक : बिभूतिभूषण बॅनर्जी ( Bibhutibhushan Banerjee) -अनुवाद : प्रसाद ठाकूर (Prasad Thakur)
- पारखा (Parkha) – डॉ. एस.एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa) – अनुवाद : उमा वि. कुलकर्णी (Uma V. Kulkarni)
- बारोमास (Baromas) – सदानंद देशमुख (Sadanand Deshmukh)
- भोकरवाडीतील रसवंतीगृह (bhokarawadItIl rasavantIgruh) -द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
- माणसे आरभाट आणि चिल्लर (Manase arabhat ani chillar)-जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
- मालवणी कथा (Malavani Katha)
- हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ(Hindu Jaganyachi sammruddh adagal) – भालचन्द्र नेमाडे(Bhalachandra Nemade)
- टारफुला (Tarphula) – शंकर पाटील (Shankar Patil)
- पिढी दर पिढी (Pidhi dar pidhi) – पर्ल बक (Pearl Buck) अनुवाद – भारती पांडे (Bharati Pande)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe