पुस्तक – झळाळती शंभरी – “डोंबिवलीकर” मासिकाचा विशेषांक
विशेषांक संपादक – सुधीर जोगळेकर.
प्रकाशन – “डोंबिवलीकर” मासिकाचे संपादक – ना. रवींद्र चव्हाण. कार्यकारी संपादक – प्रभू कापसे. एप्रिल २०२३
भाषा – मराठी
पाने – २४०
ISSN – 2348-2699
छापील किंमत – ४०० रु.

हे माझं २७५वं पुस्तक परीक्षण आणि त्याचा विषय माझे जन्मगाव आणि वास्तव्याचे शहर “डोंबिवली” आहे हा छान योगायोग जुळून आला आहे. डोंबिवलीचे आमदार श्री. रवींद्र चव्हाण “डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवार” ही संस्था चालवतात. ह्या संस्थेच्याच्या अनेक कामांपैकी एक म्हणजे “डोंबिवलीकर” मासिक. डोंबिवलीतल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचं काम लोकांपुढे आणणे, नवनवीन विषय मांडणे, प्रसंगानुरूप विशेषांक, देखणी मांडणी ही ह्या मासिकाची वैशिष्ट्ये आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या “ऑनलाईन मराठी भाषा” शिकवण्याच्या कामाची सुद्धा “डोंबिवलीकर” ने नोंद घेतली आहे. आणि दोनदा त्याबद्दल लेख प्रसिद्ध झाले आहेत. तर ह्या डोंबिवलीकर मासिकाचा हा विशेषांक. एक पुस्तकच.

अजून एक चांगला योग ह्या पुस्तकाशी जोडला गेला आहे . ह्या विशेषांकाचं प्रकाशन झालं ते ३० एप्रिल रोजी “डोंबिवलीकर परिवार” आयोजित “आदर्श डोंबिवलीकर” पुरस्कार सोहळ्यात. “मसालाकिंग” धनंजय दातार आणि लोकप्रिय अभिनेते शिवाजी साटम ह्या अतिथींच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्याच सोहळ्यात मला सुद्धा “आदर्श डोंबिवलीकर” पुरस्कार मिळाला.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकाचा विषय स्पष्ट केला आहे. तो असा – “१८८७ ते १९४७ या काळात ज्यांनी डोंबिवली शहराच्या विकासासाठी आपले सर्वस्व अर्पून काम केलं… खऱ्या अर्थाने डोंबिवली घडवली… त्या सर्व शिल्पकारांचा परिचय करून देणारा नवीन पिढीला दीपस्तंभ ठरेल असा हा गौरव ग्रंथ”

आज डोंबिवली शहर हे संस्कृतिक शहर म्हणून उभ्या महाराष्ट्रात परिचित आहे. नवनवे उपक्रम आणि कर्तृत्त्वान व्यक्तिमत्वांमुळे ह्या शहराचे नाव ऐकले नाही अशी मराठी व्यक्ती विरळच. पण डोंबिवली हे काही पौराणिक-ऐतिहासिक वारसा असणारे शहर नाही. १८८७ मध्ये डोंबिवली रेल्वे स्थानक आलं. पण मुख्य वस्ती होती परिसरांतल्या गावांत – पाथर्ली, ठाकुर्ली, चोळे, आयरे, कोपर, भोपर इ. मध्ये. स्टेशन आल्यावर ब्रिटिश सरकारने स्टेशन परिसरात वस्ती करायला प्रोत्साहन दिले. मध्यमवर्गीय, सुशिक्षित लोकांची पावले ह्या भूभागाकडे वळू लागली. वस्ती वाढू लागली. पण ती काही हजारांतच होती. म्हटलं तर एखादं मोठं खेडंच. गावात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांच्या परिचयाच्या. लोक सुशिक्षित, सरकारी कचेऱ्यांत काम करणारे, समाजसेवेचं भान असणारे, कलासक्त, संस्कृतीप्रेमी, पांढरपेशे, वाचनप्रेमी. त्यामुळे खेड्याची आपुलकी आणि शहरी दृष्टिकोन ह्याचा सुरेख मिलाफ इथे झाला. सरकार/प्रशासन ह्यावर पूर्ण अवलंबित्त्व ना ठेवता समविचारी लोकांनी एकत्र येऊनच रस्ते, वीज, पाणी, वैद्यकीय सेवा, शिक्षणसंस्था, क्रीडा संस्था काढल्या. नवे नवे लोक इथे राहायला येत गेले. ह्या गंगेला मिळाले आणि स्व-कर्तृत्वाची ओंजळ त्यांनीही अर्पण केली. आणि आज “संस्कृतिक शहर”, “वैशिष्ट्यपूर्ण कल्पना मांडणारं शहर” आणि दुर्दैवाने “नागरी सुविधांचा बोजवारा उडालेले शहर” अश्या परस्परविरोधी ओळख असणाऱ्या शहराचा पिंड घडला. हा पिंड घडवणाऱ्या व्यक्तींपैकी १०० व्यक्तींचा अल्पपरिचय करून देणारं हे पुस्तक आहे. अजून अनेक कर्ते हात ह्या काळात राबले हे नक्की. त्यांची ओळख करून देण्यासाठी ह्या अंकाचा भाग-२, ३ काढावे लागतील.

अनुक्रमणिकेवर नजर टाकूया म्हणजे ह्यात समाविष्ट व्यक्तींची नावे तुम्हाला कळतील.पु.भा. भावे,शं.ना. नवरे, उद्योजक म्हैसकर, मंत्री नकुल पाटील, गणितज्ञ कापरेकर, व्हायोलिन वादक गजाननबुवा जोशी, दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे रामभाऊ ताम्हाणे इ. काही नावं आहेत ज्यांचं कार्यक्षेत्र डोंबिवलीच्या बाहेरही होतं. त्यामुळे डोंबिवलीकर नसणाऱ्या लोकांनाही ती व्यक्तीमत्त्वं माहिती असतील. इतर ९०% व्यक्ती ह्या डोंबिवलीकरांसाठी विशेष काम करणाऱ्या असल्यामुळे बाहेरच्यांना त्या माहीत असण्याची शक्यता कमी आहे. पण आजी-माजी डोंबिवलीकरांना ह्यातल्या बऱ्याच व्यक्ती ऐकून माहिती असतील. काहींशी त्यांचा थेट परिचय असेल. जिव्हाळा असेल. या “झळाळत्या”व्यक्तींनी उभ्या केलेल्या संस्थेत शिक्षण घेतलं असेल, उपचार घेतले असतील, कार्यक्रम बघितले असतील. त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी हे पुस्तक म्हणजे एक माहितीचा खजिना, आठवणींची मेजवानी, एका विस्तारित-कुटुंबातल्या आपल्या आज्या-पणज्यांची माहिती, त्यांचे किस्से, “आज इथे हे आहे पण तेव्हा तिथे ते होतं” अशी मजेदार माहिती..

स.वा. जोशी, टिळकनगर, पाटकर, स्वामी विवेकानंद, नेरुरकर अशा आजही चालू असणाऱ्या शाळांच्या जन्मकथा आहेत.
टोलवसुली आणि रस्ते बांधणी करणारे “आयडियल बिल्डर्स”, श्री लॉंड्री,कानिटकर पोळीभाजी केंद्र, कुलकर्णी ब्रदर्स मिठाईवाले हे आजही सुरु असलेले उद्योग कसे सुरु झाले ते कळेल.
रामनगर, दत्तनगर, पेंडसेनगर आणि काही रस्त्यांची नावं कशी आली ते कळेल
आजच्या पिढीला सुद्धा माहित असलेल्या अनेक गोष्टींचं मूळ समजेल

प्रत्येक व्यक्तीवर दोन पानी लेख आहेत. त्यात अर्धा पान फोटो आणि दीड पान मजकूर आहे. व्यक्तीचे जन्मगाव, मूळ घराणं, सांपत्तिक स्थिती, डोंबिवलीत येण्यापूर्वी काय नोकरी-व्यवसाय होता, डोंबिवलीत कशामुळे येणं झालं, कुठल्या क्षेत्रात काम केलं काय विशेष योगदान दिलं, विवाहित असल्यास जोडीदार कोण-कुठला, काही विशेष सवयी किंवा एखाददुसरा किस्सा, निधन कधी कसे झाले, पुढची पिढी काय करते आहे अशी एकूण माहिती आहे. पण ही माहिती “बायोडेटा” स्वरूपातली नाही. हे सगळे व्यक्तिचित्रणात्मक ललित लेख आहेत.

काही उदाहरणे बघूया.
पहिला डोंबिवलीकर 


पहिले नगराध्यक्ष


साहित्यप्रेमी डोंबिवलीकर


पत्रकार डोंबिवलीकर 


उद्योजक/दुकानदार डोंबिवलीकर 

ह्या लेखांतून तेव्हाची पिटुकली, हिरवी छोटी घरं छोटे रस्ते असणारी डोंबिवली दिसते. प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थभाव, सहनशुचिता, मोठी कुटुंबे, एकमेकांना साहाय्य करण्याची वृत्ती ही तेव्हाच्या पांढरपेशा पिढीची वैशिष्टय दिसतात. काँग्रेस, शेकाप, जनसंघ, शिवसेना ह्यां राजकीय पक्षांचा चढउतार दिसतो. रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी विचारांचा बालेकिल्ला ही शहराची पक्के बैठक कशी झाली हे समजतं. प्रथितयश शिक्षणसंस्थांच्या प्रसूतिवेदना दिसतात. वाचन, नाटक, धार्मिक उत्सव, गायन-वादन, समाजकार्य ह्यांची आवड डोंबिवलीकरात सहज जोपासली जाते ह्याचा मूळ धागा सापडतो. त्याचबरोबर; डोंबिवलीच्या आजच्या वाईट परिस्थितीच्या अनेक कारणांपैकी एक कारण डोंबिवलीचे “स्वतः त्रास घेऊ, पण समाजाला काहीतरी देऊ” हे धोरण असाही विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

बहुतेक लेखांमधून अपरिचित व्यक्तींच्या कामाचा अंदाज येतो. जर तुम्हाला आधीच माहिती असेल तर जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काही लेख अपवादात्मक असे वाटले की त्यात मुख्य कामापेक्षा इतर माहितीच जास्त आहे. लिखाणात बऱ्याच वेळा मजकूर कालक्रमानुसार ना येता पुढेमागे झाला आहे. त्यामुळे सलगता जाते. पण एकूण पुस्तकाचा आवाका, त्यातली माहिती आणि ते गोळा करायचे कष्ट लक्षात घेतल्यास हे तांत्रिक मुद्दे दुर्लक्षण्यासारखे आहेत. असा दस्तऐवज तयार झाला हे मोठे काम आहे. त्याबद्दल श्री. सुधीर जोगळेकर, श्री. वासुदेव गोडसे, श्री. सुधीर फणसे, श्री. श्रीकांत पावगी, श्री. सुरेश देशपांडे आणि त्यांच्या पूर्ण चमूला एक डोंबिवलीकर म्हणून मनःपूर्वक धन्यवाद !! त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आमदार श्री. रवींद्र चव्हाण आणि कार्यकारी संपादक श्री. प्रभू कापसे यांना मनःपूर्वक धन्यवाद.

प्रत्येक आजी-माजी डोंबिवलीकराने, डोंबिवलीवर प्रेम करणाऱ्या, डोंबिवलीचे आकर्षण वाटणाऱ्या प्रत्येकाने नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. आपल्या आधीच्या पिढीने शहराच्या नागरी समस्या एकत्र येऊन, पुढाकार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. “माझं गाव” अशा आपुलकीतून संस्था उभ्या केल्या. आज पुन्हा ती भावना रुजली पाहिजे. डोंबिवली नगरी गुणाने हिरा आहे तिला तसंच सुव्यवस्थेचं कोंदण मिळालं पाहिजे.

पुस्तक मिळण्याचे ठिकाण –
१) डोंबिवलीकर प्रकाशन, जी-२, आत्मानंद पद्मश्री हॉस्पिटलच्या बाजूला, श्रीखंडेवाडी, डोंबिवली(पूर्व). दूरध्वनी क्र. ०२५१-२४२०३७३

२) पै फ्रेंड्स लायब्ररी, भगतसिंग रोड, नॅचरल्स आईस्क्रीमच्या समोर. दूरध्वनी क्र. +91 9769846807/8

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-

आजी/माजी डोंबिवलीकर असाल किंवा डोंबिवलीच्या इतिहासात रस असेल किंवा शहर कसं उभं राहतं ह्याचा समाजशात्रीय अभ्यास करत असाल तर आवा ( आवर्जून वाचा )
अन्यथा – वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

शहरे, प्रदेश, देश ह्यांच्यावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe