पुस्तक – अधर्मकांड (adharmakand)
लेखक – उदय भेंब्रे (Uday Bhembre)
अनुवादिका – अकल्पिता राऊत देसाई (Akalpita Raut-Desai)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – व्हडलें घर (vhodlem ghar)
मूळ पुस्तकाची भाषा – कोंकणी (Konkani)
पाने – १६०
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस, फेब्रुवारी २०२४
ISBN – 9789357204057
छापील किंमत – रु. २७०/-

गोव्यावरती पोर्तुगीजांची सत्ता असताना व्यापाराबरोबरच धर्मप्रसार हा देखील त्यांचा मुख्य उद्देश होता. स्थानिक हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. देवळे पाडण्यात आली. “येशूचा प्रेमाचा संदेश” बळजबरी, हत्या आणि तलवारीच्या टोकावर पसरला. पैसा, जमिनी आणि समाजात अधिकार ह्यांचं प्रलोभन दाखवून काहींना भुलवण्यात आलं. तर कुणाच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेत मदतीच्या बहाण्याने ख्रिश्चन करण्यात आलं. हे बाटणे टाळण्यासाठी अनेक कुटुंबे गोवा सोडून परागंदा झाली. बरोबर ते घेऊन गेले…आपल्या देवांच्या मूर्ती, टाक, पूजासाहित्य आणि रम्य गोव्याच्या उद्ध्वस्त आठवणी. जे राहिले, बाटले तेही सुखाने नांदले असे नाही. कारण दुसरी आपत्ती त्यांच्यासमोर उभी ठाकली, ती म्हणजे – इन्क्विझिशन. बाटलेले हिंदू खरंच ख्रिश्चन धर्माप्रमाणे आचरण करतायत ना, त्यात टाळाटाळ करत नाहीयेत ना, जुना धर्म रूढीपरंपरा पाळत नाहीयेत ना; ह्यावर नजर ठेवली जाऊ लागली. नव्या धर्माच्या “प्रेमाची दहशत” बसली पाहिजे म्हणून कुचराई करणाऱ्यांना “इन्क्विझिशन” म्हणजे चौकशीला तोंड द्यावं लागलं. चूक आढळली की घरादारावर जप्ती, जाचक कैद, अमानुष छळ आणि कधीकधी देहांत प्रायश्चित्त – जिवंत जाळून मारण्याचं. सत्ता पोर्तुगीजांची, नियम त्यांचे, धर्म त्यांचा, तपासणी त्यांची आणि निकालही त्यांचाच. मग “इन्क्विझिशन”च्या नावाखाली नकोश्या माणसाचा काटा काढायचा; एखाद्या श्रीमंतांची मालमत्ता हडप करायची; तर कधी केवळ आपली मुजोरी दाखवण्यासाठी एखाद्याचा छळ करायचा. सुमारे अडीचशे वर्ष गोवा “इन्क्विझिशन”खाली असा भरडला गेला.

कसा असेल तो काळ ? कसे वागत असतील पोर्तुगीज उमराव ? काय प्रसंगांना तोंड दिलं असेल तिथल्या हिंदू जनतेनं ? आपला धर्म सोडताना, गाव सोडताना काय कल्पांत झाला असेल ? ह्या सगळ्याचे चित्रण करणारी “अधर्मकांड” ही कादंबरी आहे. पाठमजकूर(ब्लर्ब) मध्ये म्हटलं आहे तसं – “कायतान” नावाचा जमीनदार आता बाटला आहे. पण कोणीतरी कागाळी केली की त्याने ख्रिश्चन धर्म नीट पळाला नाहीये. त्याबरोबर त्याला तुरुंगात डांबलं गेलं. साक्षी-पुरावे-समोरासमोर जबानी उलटतपासणी काही नाही. तुरुंगात त्याला पुन्हा पुन्हा एकच सांगणं “तू गुन्हा केला आहेस, कबूल कर”. कितीतरी दिवस तुरुंगात खितपत पडलेल्या कायतानचं आत काय झालं हे सुद्धा बाहेर कोणाला समजू शकत नाही. कुटुंबाची वाताहत होते. शेवटी निवाड्याचा दिवस येतो. गुन्हा कायताननं केला आहे हे आधीपासूनच ठरवलेलं फक्त जाहीर होतं आणि त्याला शिक्षा होते जिवंत जाळण्याची. त्याने काय गुन्हा केला; तुरुंगात काय झालं हे कोणाला काही कळत नाही. गुन्हेगारांची धिंड काढली गेली आणि शेवटी जाळून त्याची राख झाली एवढंच त्याच्या दूरवरच्या नातेवाईकाला कळतं.

अशी ही अस्वस्थ करणारी कादंबरी. आपल्याला १५८० च्या काळातल्या गोव्यात घेऊन जाणारी. काही पाने उदाहरणादाखल वाचा.

हिंदूंवर जाचक अटी

परचक्राची चाहूल… देव सोडावा की देश

धिंड काढायची तयारी

सुमारे दीडशे पानांच्या कादंबरीत प्रसंग वेगाने घडतात. त्यामुळे आपण उत्सुकतेने पुढे वाचत राहतो. पण वर्णनशैली सारखी बदलत राहते. कायतान ला तुरुंगात नेतायत इथून कादंबरीची सुरुवात होते आणि त्याला काही प्रसंग आठवतायत यातून सामाजिक पार्श्वभूमी दिसते. मध्येच त्रयस्थ निवेदक कायताच्या कुटुंबात घडणारे प्रसंग, त्यांचं भावविश्व मांडतो. तर मध्येच वर्णन मध्येच एखाद्या डॉक्युमेंटरी सारखे होते – facts and figures सांगणारे होते; पोर्तुगीज उमरावांचं गैरवर्तन, बाहेरख्यालीपणा; ख्रिश्चन झाल्यावरही गोऱ्या-काळ्यांमधला भेदभाव असे प्रसंग येतात. ह्या सगळ्यातून एकूण परिस्थितीची जाणीव आपल्याला होते. पण ते तुकडे नीट जुळत नाहीत. एक ललित कादंबरी म्हणून त्या भावविश्वात आपण गुंगून जात नाही. लेखकच आपल्याला भानावर आणत राहतो. त्यादृष्टीने महाबळेश्वर सैल ह्यांची ह्याच विषयावरची “तांडव” कादंबरी खूपच परिणामकारक आहे.

पुस्तकाच्या निवेदनात पात्रांची, गावांची नावं येतात, पोर्तुगीज शब्द येतात. मूळ कोकणी कादंबरीच्या वाचकांना ती नावे परिचयाची असल्यामुळे अडचण येणार नाही. पण मराठी वाचकाला ती माहिती नसल्यामुळे अर्थ चट्कन कळत नाही. उदा. कायतान आणि अल्काईद हे शब्द पुन्हा पुन्हा येत होते. ही माणसांची नावं का हुद्द्यांची नावं हा गोंधळ माझ्या मनात कितीतरी पाने चालू राहिला. पुढे पुढे बरीच नवनवीन पात्रे येतात. त्यांचे परस्पर संबंध कळायला जरा त्रास होतो. त्यातूनही परिणामकारकता कमी झाली आहे.

प्रस्तावनेत इन्क्विझिशन, त्यात होणारे अत्याचार, त्यांचा लेखकाने केलेला अभ्यास ह्यावर सविस्तर लिहिलं आहे. त्यातून मला असं वाटलं की इन्क्विझिशन हा कादंबरीचा गाभा असेल. तुरुंगातलं वास्तव्य, छळ, त्याला विरोध, ते कसं अमलात आणलं गेलं ह्याबद्दलचे प्रसंग मुख्य असतील अशी माझी अपेक्षा झाली. त्याबद्दलचे प्रसंग नक्की आहेत पण मुख्य निवेदन हे धर्मांतरण आणि त्याला लोकांचा विविधांगी प्रतिसाद ह्याभोवती आहे.

अनुवाद चांगलाच झाला आहे. मूळ मराठीच वाटतं. उलट, मध्ये मध्ये थोडी कोंकणी वाक्ये, उद्गार ठेवले असते तर गोव्याच्या वातावरण निर्मितीत हातभार हातभार लागला असता का असं वाटलं.

ह्या विषयावर तुम्ही आधी काहीच वाचले नसेल तर हे पुस्तक नक्की वाचा. “सुशेगाद गोवा”, “बीचेस आणि दारू”, “रशियन ललना”, “मोठ्ठाली चर्चेस” , “सेंट(?) झेवियर चं मढं” ह्याहून वेगळ्या गोव्याची सैर तुम्हाला घडेल. ह्या विषयावर आधी पुस्तक वाचलं असेल तरी एक उजळणी म्हणून, वेगळी मांडणी म्हणून वाचायला हरकत नाही. ज्यापणाने नाझिंनी ज्यूंच्या केलेल्या छळवणुकीची गोष्ट हॉलीवूडच्या चित्रपटांतून पुन्हा पुन्हा सांगितली जाते. तसाच हा विषयही आहे. प्रत्येक लिखाणातून नवीन काही समजेल. धर्मांधतेचा धोका तेव्हा होता, आजही आहे ह्या भीषण वास्तवाची जाणीव भारतीय समाजाला होत राहील.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
ह्या विषयावर आधी वाचले नसेल तर जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe