पुस्तक – भारतीय अर्थकारण (Bharatiya Arthakaran)
लेखक – चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak)
भाषा- मराठी (Marathi)
पाने – १८३
प्रकाशन – मोरया प्रकाशन, जानेवारी २०२४
ISBN – 978-93-92269
छापील किंमत – २२५/- रु.

२०१४ साली भारतात मोदी सरकार आल्यापासून त्यांनी अनेक लहानमोठे निर्णय घेतले आहेत ज्यातून भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होत आहेत. प्रत्येक निर्णय घेण्यामागचं कारण वेगळं, त्याचा परिणाम वेगळा आणि यशापयश सुद्धा वेगळं. काही निर्णय लोकांना आवडले; काही नाही. काही निर्णय खूप चर्चिले गेले तर काहींची फार वाच्यता झाली नाही. पण ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आयुष्यावर, उत्पन्नावर, खर्चावर होत आहे. जसे सरकारचे निर्णय आपल्यावर परिणाम करतायत तशी स्थानिक आणि जागतिक परिस्थितीसुद्धा आपल्यावर परिणाम करते. कोरोना हे त्याचं मोठे उदाहरण. जगात होणाऱ्या युद्धांमुळे पेट्रोलचे चढते-उतरते दर आपण बघत असतोच. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सरकारी निर्णय किंवा जागतिक परिस्थिती ह्यावर आपले थेट नियंत्रण काहीच नसते. पण त्याबद्दल कुतूहल नक्कीच असते. आपापल्या कुवतीनुसार आणि ज्ञानानुसार त्यावर चर्चा करायलाही आपल्याला आवडते. आपलं हेच कुतूहल काही प्रमाणात शमवण्याचं, चर्चा करायला काही सकस मुद्दे देण्याचं काम “भारतीय अर्थकारण” हे पुस्तक करतं. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक ह्यांनी २०१९ ते २०२३ ह्या काळातल्या मोदी सरकारच्या निर्णयांवर आणि ह्या काळातल्या इतर आर्थिक घडामोडींवर प्रसंगोपात लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे.
चंद्रशेखर टिळक हे नाव सुपरिचित आहेच. तरी त्यांचा पुस्तकात दिलेला परिचय वाचा.

काही दिवसांपूर्वीच ह्याचे प्रकाशन झाले. त्यांनतर डोंबिवलीत अर्थसंकल्पावर टिळकांचे विश्लेषण व्याख्यान झाले तेव्हा हे पुस्तक विकत घेऊन लेखकाची सही घेण्याची संधी सुद्धा मिळाली.

अनुक्रमणिका

अनुक्रमणिकेवरून लक्षात आलं असेल की पहिला भाग “जनरल” आर्थिक घडामोडींवर, समाजात होणाऱ्या बदलांवर आहे तर दुसरा भाग मोदी सरकारचे अर्थसंकल्प, काही खास घोषणा ह्यांच्यावर आहे. काही लेखांबद्दल थोडं सांगतो म्हणजे पुस्तकाची कल्पना येईल.

“चाल”बाज चीन” – जून २०२० मधला हा लेख आहे. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली, दोन्ही सैन्यांची चकमक झाली अशा बातम्या तेव्हा येत होत्या. चीनला भारताचा भाग गिळंकृत करायचा आहे हाच माझ्यासारख्याचा समज. ह्या घटनेचं अजून काही पैलू ह्या लेखात मांडले आहेत. इथे फक्त भौगोलिक आक्रमण नाही तर भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला “नाट लावण्याचं” कामसुद्धा चीनला करायचं आहे. भारताची परदेशी चलन साठ्यात वाढ होते आहे, परकीय गुंतवणूक वाढत आहे. चीनचा भविष्यातला स्पर्धक तयार होतो आहे. तो प्रवास थोपवण्यासाठी चीनचं हे पाऊल असू शकतं. युद्धाचे ढग भारतावर घोंगावतायत असं दिसलं की गुंतवणूकदार हात आखडता घेणार, शेअर बाजार मंदावणार असे नकारात्मक परिणाम भारतावर होतील.

बदलला ग्राहक, बदलता बाजार – कोरोनामुळे “घरून काम”, “घरपोच सेवा” ह्याचं प्रस्थ कसं वाढलं आहे, त्यातून दुकानांपासून हॉटेल पर्यंत आणि मोठ्या कंपन्यांपासून पूजेला येणाऱ्या गुरुजींपर्यंत प्रत्येकाची कामाची शैली कशी बदलली आहे ह्याचं निरीक्षण.

आर्थिक सुधारणांची तिशी – १९१९ साली भारतात आर्थिक उदारीकरण झालं. त्यांनतर आलेल्या सर्व सरकारांनी सुधारणांची दिशा तीच ठेवली; भले ते सरकार कुठल्याही पक्षाचे असो. आपण “यू टर्न” घेतला नाही. असं लेखकाचं निरीक्षण आहे. तीस वर्षांत अर्थव्यवस्थेत मोठे बदल काय झाले आहेत ह्याचे ठळक मुद्दे लेखकाने सांगितले आहेत.

नोटाबादलीनंतर रोकड व्यवहार – नोव्हेंबर २०२० मधला लेख आहे. कोरोना लाट तेव्हा चालू होती. तेव्हा अर्थव्यवस्थेत रोकड व्यवहार वाढले होते असं लेखकाचं निरीक्षण आहे. नोटाबादलीनंतर रोकड व्यवहार कमी होत होते, डिजिटल वाढत होते. पण कोरोनात रोकड पुन्हा वाढली, भविष्यात परत कमी होईल. लोकांच्या वर्तणुकीत हा बदल का होतो ह्याबद्दल लेखकाने आपलं मत मांडलं आहे.

सोने एके सोने – सोन्यातली आपली गुंतवणूक आर्थिक कमी आणि भावनिक जास्त असते. ह्या अनुत्पादक खर्चातून अर्थव्यवस्थेवर कसा ताण पडतो. त्यासाठी सरकारने आणलेले “गोल्ड बॉण्ड” ह्या सगळ्याची संगती मांडली आहे.

“आत्मनिर्भर भारत” – १२ मे २०२० रोजी मोदीजींनी “आत्मनिर्भर भारत” योजनेची घोषणा झाली. ते भाषण ऐकल्यावर लेखकाच्या मनात आलेले विचार, शंका-कुशंका ह्याबद्दल.

“डिजिटल रुपया” – डिजिटल रुपया म्हणजे बिटकॉइन/क्रिप्टो करन्सी नाही. पण म्हणजे नक्की काय आहे हे लेखातून कळलं नाही तरी; हे काहीतरी भारी, वेगळं आणि भारतासाठी चांगलं आहे असा विश्वास लेखकाने जागवला आहे.

“अर्थसंकल्प आणि गुलजार” – अर्थसंकल्प म्हटल्यावर तो काहींच्या अपेक्षापूर्तीचा तर काहींच्या अपेक्षाभंगाचा दिवस. सरकारची कामगिरी छानच दिसेल अशा गोंडस शब्दांत मंत्र्यांचा भाषण करण्याचा दिवस. ह्या भावभावना ज्यातून व्यक्त होतात अशा गुलजारांच्या कवितांशी सांगड घालण्याचा आगळाच प्रयत्न.

इतर लेख दरवर्षीच्या अर्थसंकल्पाचा आढावा आहे. लेखकाला जाणवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घोषणा काय आहेत हे सांगितलं आहे. तसंच अर्थमंत्री काय बोलले, किती बोलले, काय नाही बोलले, “between the lines” काय म्हणाले आणि त्याचा अर्थ कसा लावायचा ह्यावर “expert comments” आहेत. निर्णय दिसताना आर्थिक असला तरी त्यामागे राजकीय गणित काय असेल ह्याचे आडाखे बांधले आहेत. सरकारचे निर्णय “संदिग्ध” किंवा “अनाकलनीय” वाटत असतील तर तसे सुद्धा स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे टिळक जरी भाजप आणि मोदी समर्थक असले तरी लेख लिहिताना “सगळंच छान, सगळंच गोड” असं लिहिलेलं नाही. “एक खुले पत्र निर्मला सीतारामन यांना” हा लेख तर त्या कशा गोंधळलेल्या/संदिग्ध वाटल्या ह्यावरच आहे.
मात्र एकूणच “सडकून टीका”, “कठोर निंदा”, “खोट्या दाव्यांची पोलखोल” मात्र नाही. त्यादृष्टीने मोदी समर्थकांना आवडेल असं पुस्तक. जे चालू आहे ते चांगलं चालू आहे हा त्यांचा विश्वास दृढ होईल. पण “कट्टर”मोदी विरोधकांना पानोपानी मतभेदासाठी जागा दिसतील; हे मात्र नक्की.

काही पाने उदाहरणादाखल
“युद्ध आणि शेअर बाजार”

“आर्थिक सुधारणांची तिशी”

२०१८ च्या अर्थसंकल्पाविषयी

२०२१ च्या अर्थसंकल्पाविषयी

लेखक अर्थतज्ज्ञ आहेत तसेच उत्तम वक्ते आहेत, साहित्यावर प्रेम करणारे आहेत, स्वतः ललित लेखक सुद्धा आहेत. त्यामुळे आर्थिक नीतींची चर्चा करताना त्यांच्यातला “शब्दप्रेमी”, “साहित्यप्रेमी” कायम हजर असतो. शाब्दिक कोट्या, शब्दचमत्कृती, खेळकर शैली, क्वचित तिरकस टोमणे; छोटी छोटी वाक्ये अशा लेखनशैलीतून धमाल करत पुस्तक जाते. जणू टिळक आपल्याशी गप्पा मारतायत असंच वाटतं. त्यामुळे विषय जड असला तरी पुस्तक अजिबात कंटाळवाणं होत नाही. पण काही लेख जास्तच शाब्दिक झाले आहेत; अर्थतज्ञापेक्षा “लेखक” जास्त झाला आहे असं सुद्धा वाटलं. “अर्थसंकल्प उंबरठ्यावर”, “सुखाचा शोध की पिंपळपान”, “तिळगुळ घ्या गोड बोला” हे लेख वाचताना तसं वाटलं.हे पुस्तक असं खेळीमेळीच्या शैलीत लिहिल्यामुळे पटपट वाचून झालं. पण पूर्ण झाल्यावर लक्षात आलं की हे पुस्तक पुन्हा वाचायला हवं. कारण शैली हलकीफुलकी असली तरी मुद्दे “जड”, “महत्वाचे”, “विचार करण्याजोगे आहेत”. ते पुन्हा वाचून त्याच्या अनुषंगिक वाचन अजून केलं पाहिजे. ज्यातून आपली जाणीव समृद्ध होईल.

ह्या पुस्तकातून मला किती कळलं हे आत्मपरिक्षण करताना मला जाणवलं की स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय हुशारीने घेण्यात कमी पडणारा मी, “अर्थमंत्र्यांचं कसं चुकलं किंवा कसं बरोबर आहे” हे वाचायची हौस ठेवतो. आणि मला शाळेत असताना आम्हाला शिकवलेली एक मजेशीर कव्वाली आठवली.

हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

मम्मी बोली तुम टीचर बनो,
मम्मी बोली तुम टीचर बनो,
मगर ..
मगर ..
हम खुदकी पढाई कर ना सके, लोगोंको पढाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

मम्मी बोली तुम डॉक्टर बनो,
मम्मी बोली तुम डॉक्टर बनो,
मगर ..
मगर ..
हम अपनी दवाई पी ना सके, लोगोंको पिलाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

मम्मी बोली तुम इंजिनियर बनो,
मम्मी बोली तुम इंजिनियर बनो,
मगर ..
मगर ..
हम अपना घर बना ना सके, लोगोंका बनाना क्या जाने ?
हम छोटे छोटे बच्चे है हम, पढना पढाना क्या जाने ?

असो, लेखकाच्या नादाने माझ्यातला शब्दप्रेमी जागा झाला वाटतं. तुमच्यातला शब्दप्रेमी, “अर्थ”प्रेमी, वाचनप्रेमी, मोदीप्रेमी, चिकित्साप्रेमी जागा करून हे पुस्तक नक्की वाचा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अर्थकारण, पैसा, गंतवणूक, उद्योग इ. वरची इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe