पुस्तक – काकासाहेब चितळे सहवेदनेतून समृद्धीकडे (Kakasaheb Chitale – Sahavedanetun Samruddhikade)
लेखिका – वसुंधरा काशीकर (Vasundhara Kashikar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २६५
प्रकाशन – सकाळ प्रकाशन, जुलै २०२५
छापील किंमत रु.४९९/-
ISBN 978-93-49487-78-9
“चितळे बंधू मिठाईवाले” हे नाव ऐकलं नाही असा महाराष्ट्रातील माणूस विरळाच. पुण्यासारख्या ऐतिहासिक सांस्कृतिक नगरीची एक ओळख बनलेला “चितळे बंधू” हा ब्रँड आहे. चितळ्यांची बाकरवडी, श्रीखंड, इतकंच काय, दुकानाच्या चालूबंद असण्याच्या वेळा हा सुद्धा लोकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. चितळे दूध, चक्का, तूप इतर दुग्धजन्य पदार्थ मिठाया तिखट मिठाचे पदार्थ या सगळ्यांचे चाहते महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. परदेशस्थ मराठी माणसांमुळे ही नाममुद्रा सातासमुद्रापलीकडेही पोचली आहे. चव, स्वच्छता, मालाचा दर्जा ह्यातली उत्तमता त्यांनी कायम राखली आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये व व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वृद्धीच होते आहे. एका मराठी माणसाने सुरू केलेला, त्याच्या कुटुंबीयांनी वाढवलेला आणि चौथ्या पिढीपर्यंत एकत्र राहून प्रगतीपथावर राखलेला हा उद्योग असल्यामुळे; सहसा उद्योगाच्या वाटेला न जाणाऱ्या मराठी माणसासाठी अजूनच कौतुकाचा आहे.
मला तर त्यांच्या मिठाया आणि तिखटमिठाचे पदार्थ इतके आवडतात की वरचेवर दुकानात खरेदी होत असते. मित्रांना-सहकाऱ्यांना काही खाऊ न्यायाचा असेल तर तो हमखास चितळेंचाच असतो. त्यामुळे मला तर माझे मित्र थट्टेने चितळ्यांचा ब्रँड अम्बॅसेडरच म्हणतात. त्यांच्या दोन कारखान्यांना खाजगी भेट देण्याची संधी योगायोगाने मिळाली. त्यांचे वर्णन फेसबुकवरच्या माझ्या पोस्टमध्ये वाचू शकाल
सांगली जवळच्या भिलवडी गावामध्ये भास्कर चितळे अर्थात बाबासाहेब चितळे यांनी एक छोटा दुधाचा धंदा सुरू केला. त्या बीजाचा आज वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. या विस्तारात बाबासाहेबांची मुलं, सुना, नातवंडं आणि आता पतवंडंही कार्यरत आहेत. बाबासाहेबांचे चिरंजीव दत्तात्रय उर्फ काकासाहेब चितळे हे त्यापैकी एक. काकासाहेबांच्या कर्तृत्वाची, दातृत्वाची आणि सहृदयतेची विविधांगी ओळख करून देणारं असं हे पुस्तक आहे. या आधी मी काकासाहेबांबद्दल काही विशेष वाचलं नव्हतं. चितळे समूहाच्या सामाजिक कामाबद्दलही विशेष माहिती नव्हती. पण या पुस्तकातून त्या दोन्ही बद्दल फार छान ओळख झाली. चितळ्यांच्या खास पेढ्यांसारखं उद्योजगतेच्या गोड खव्याच्या आत सामाजिक बांधिलकीचं सारण कसं भरलेलं आहे हे जाणवलं.
पुस्तक वाचल्यावर असं वाटलं की, नवनवीन तंत्रज्ञान आणून, नवीन संकल्पना राबवून काकासाहेबांनी केवळ उद्योगवाढ केली असती तरीही एक यशस्वी उद्योगपती म्हणून आपल्या मनात कौतुकाचे स्थान मिळवते झाले असते. पण काकासाहेबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपला धंदा वाढवताना नफेखोरी केली नाही. आपले ग्राहक, पुरवठादार कर्मचारी यांची पिळवणूक करून उत्पन्नाचे मोठमोठे आकडे गाठण्याची खेळी केली नाही. उलट, या सर्वांचा आर्थिक, सामाजिक व वैचारिक विकास कसा होईल याची काळजी घेतली. त्याचे योग्य परिणाम दिसलेच. मालक-कर्मचारी, मालक-पुरवठादार असे कोरडे संबंध न राहता ते संबंध परस्पर विश्वासाचे झाले, जिव्हाळ्याचे झाले. चितळे समूहाच्या विस्तारित कुटुंबाचे ते सगळे भाग झाले. इतकं केलं असतं तरी एक सहृदय उद्योजक म्हणून आपला आदर दुणावला असता. पण काकासाहेब इतक्यावर थांबले नाहीत. ते ज्या गावात उद्योग करत होते त्या “भिलवडी” गावाचा, पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. शिक्षण संस्था आणि इतर सामाजिक कामांना भरभरून देणग्या दिल्या. गरजूंना मदत केली. इतकं केलं असतं तरी ते दानशूर सहृदय उद्योजक ठरले असते. पण काकासाहेब फक्त देणग्या देऊन थांबले नाहीत तर जिथे आर्थिक मदत केली आहे तिथे तिथे आपल्या अनुभवाचा वापर करून योग्य मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या. त्यांच्या दैनंदिन कामात भाग घेऊन संस्था कार्यप्रवण केल्या. ग्रामस्वच्छतेसाठी श्रमदान असो, महापूर येऊन गेल्यावर गावात झालेला गाळ काढण्याचे असो; काम काका हातात कुदळ-फावडं घेऊन कमला पुढे. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरी लग्नकार्य किंवा दुःखद प्रसंग असो, संस्थेच्या कामासाठी आलेल्या पाहुण्यांची उठबस असो; काका तिथे प्रत्यक्ष काम करत होते. हे वाचल्यावर तर कर्ता सुधारक, दानशूर, सहृदय यशस्वी उद्योजक अशी किती विशेषणे त्यांना लावावी ! समजत नाही.
इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यग्र असणाऱ्या माणसाला घरच्यांना वेळ देणं, आपल्या मुलानातवंडांशी प्रेमाचे संबंध ठेवण्यासाठी पुरेसा वेळ आणि मानसिक स्थैर्य मिळणं कठीण जातं. बऱ्याच वेळा आपण बघतो की महापुरुषांच्या सावलीत त्यांची पुढची पिढी तितकी यशस्वी वाढत नाही. समाजासाठी वाहून घेतलेल्या लोकांच्या कामाची झळ कुटुंबीयांना भोगावी लागते. पण पुस्तकात दिलेल्या वर्णानुसार काकांचे आपल्या घरच्या मंडळींशी सुद्धा अतिशय प्रेमाचे, आनंदाचे संबंध होते. एकत्र कुटुंब म्हणून नांदणाऱ्या चितळे घरात घरच्या आनंदाच्या आणि अडचणीच्या प्रसंगातही काका उपलब्ध होते.
भारतीय परंपरेने सांगितलेले चार पुरुषार्थ धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष. या ऐहिक जगातले धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ काकासाहेबांनी साधले आहेत. चौथा पुरुषार्थही नक्कीच परमेश्वराने त्यांना आनंदाने दिला असेल.
चरित्र नायकाची ही धावती ओळख वाचून तुम्हाला पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता वाटत असेल त्यामुळे थोडं पुस्तकाच्या मजकुराबद्दल सांगतो. पुस्तकात एकूण २२ प्रकरणं आहेत. त्यात काकांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्याची वर्गवारी केलेली आहे.


काही प्रकरणाबद्दल थोडक्यात सांगतो म्हणजे कल्पना येईल.
“अशी म्हैस सुरेख बाई” – म्हशीचं दूध हा चितळ्यांचा मुख्य धंदा. त्यासाठी चांगल्या जातीच्या, भरपूर दूध देणाऱ्या म्हशी निवडण्यासाठी काका परराज्यात जायचे. परिसरातील शेतकऱ्यांना, पशुपालकांना म्हशी घेण्यासाठी मदत करायचे. म्हशींचे आरोग्य सांभाळण्यासाठी डॉक्टरांची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. म्हशींचा विमा काढण्याच्या प्रक्रियेत सुद्धा त्यांनी लक्ष घालून ती शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सोपी कशी होईल हे बघितले. आजाराने म्हशी दगावणे, अपघात होणे किंवा परराज्यातून म्हैस आणताना अपघात होणे या सगळ्या गोष्टींसाठी कमीत कमी हप्त्यामध्ये जास्तीत जास्त विमा कवच त्यांनी शेतकऱ्यांना मिळवून दिलं.
“भिलवडी चे गाडगेबाबा” – गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २००२ साली भिलवडीत राबविण्यात आलं. त्यात काकांनी पुढाकार घेतला. कामाचं पूर्ण नियोजन केलं. गटारे बांधणे, शौचालये बांधणे, उद्यान तयार करणे, वृक्षारोपण करणे, वैद्यकीय शिबिर घेणे, कचरा व्यवस्थापन करणे अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी स्वतःचा अनुभव आणि नेनेतृत्त्वगुण कामाला लावले. जिथे शासकीय मदत वा गावाचा निधी कमी पडत होता तिथे चितळे समूहातर्फे पैसे देऊन काम मार्गी लावलं. राज्यात भिलवडीचा दुसरा क्रमांक आला.
“सार्वजनिक वाचनालय आणि भिलवडी शिक्षण संस्था” – फक्त इमारत बांधून, चांगली पुस्तकं तिथे आणून काका थांबले नाहीत तर जास्तीत जास्त लोक तिथे यावेत यासाठी वाचन कट्टा, पुस्तक भेट असे कार्यक्रमही राबवले. शिशुवर्गापासून उच्च शिक्षणापर्यंत सोयी उभारण्यात मोठा सहभाग घेतला.
“मी अजून जहाज सोडलेलं नाही” – भिलवडीला आलेल्या दोन महापुरात काकासाहेब भिलवडी न सोडता तिथेच राहिले. लोकांना बाहेर काढणं, जनावरांना बाहेर काढणं, बाहेरगावाहून मदत आणणं आणि त्याचं योग्य वाटप करणं ह्या सगळ्यात त्यांनी जीवाचं रान केलं ते सगळे प्रसंग यात आहेत.
काकांचे भाऊ, मुलं, सुना, नातू यांच्या काकांविषयीच्या आठवणी दोन लेखात आहेत तर. “व्रतस्थ इमानाची यात्रा ८५ वर्षांची” ह्या लेखात चितळे समूहाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला आहे. कुटुंबातल्या कुठल्या व्यक्ती कुठल्या जबाबदारीवर आहे याची माहिती दिलेली आहे.
काही पाने उदाहरणादाखल
आजूबाजूच्या होतकरू तरुणांना स्वतः आर्थिक मदत करणे, स्वतःची पत खर्ची घालून बँकेकडून मोठ्या रकमांची कर्ज मिळवून देणे आणि परतफेडीची योग्य व्यवस्था लावणे याबद्दलची दोन पाने


फक्त धान्यशेती आणि दूध इतपतच मर्यादित न राहता शेतकऱ्यांनी फळबागा कराव्यात, नवीन प्रकारची पिकं घ्यावी यासाठीही ते प्रोत्साहन देत. मार्गदर्शन करत. आर्थिक मदत देत आणि पुढाकार घेऊन संस्थात्मक काम करत त्यातील एक उदाहरण.


असंख्य सामाजिक विषयात काम करणारे काकासाहेब नेत्रदानासाठीही सक्रिय होते त्याबद्दल


अशा पद्धतीने काकासाहेबांच्या सामाजिक कामाची माहिती अतिशय जोरकसपणे या पुस्तकात येते हे या पुस्तकाचं नक्की यश आहे. पण काकासाहेबांचं पूर्ण चरित्र किंवा त्यांचा जीवनपट असा डोळ्यासमोर येत नाही. सर्वसामान्य वाचकांना चितळ्यांची मिठाई माहिती आहे पण “चितळे बंधू” म्हटल्यावर चितळ्यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत; कोण उद्योगात आहेत; त्यांची परस्पर नाती काय हे माहिती नाही. त्यामुळे ह्या चितळ्यांपैकी काकासाहेब हे नक्की कोणाचे कोण हे आधी स्पष्ट व्हायला हवं होतं. चितळे वंशवृक्षाची माहिती, काकासाहेबांच्या आयुष्यातले मुख्य टप्पे, त्याचा काळ, त्याची ठिकाणं हे थोडक्यात सांगायला हवं होतं. ही स्थलकालनिश्चिती झाल्यावर पुढची प्रकरणे अजून परिणामकारक झाली असती. प्रत्यक्ष चितळे डेअरी साठी त्यांनी केलेलं काम हे देखील तुटक तुटकपणे समोर येतं. ते अजून जोरकसपणे यायला हवं होतं. त्यांच्या बुद्धीचा, तांत्रिक कौशल्याचा वापर त्यांनी प्रत्यक्ष डेअरी साठी कसा केला; काय काय पद सांभाळली, कुठल्या भूमिका निभावल्या, उत्पादनांची संख्या गुणवत्ता आणि उत्पन्न कसं वाढवलं हा सगळा भाग तितका जोरकसपणे येत नाही. त्यांनी उद्योगात मिळवलेले यश आणि “उत्तम व्यवहाराने जोडलेले धन” हे त्यांच्या पुढच्या सामाजिक कामासाठी एक मजबूत पाया झाले आहे. तो पाया कसा घडला हे सविस्तर वाचायला मिळणं आवश्यक होतं.पुढच्या आवृत्तीत त्यात एक प्रकरण सुरुवातीला जोडावं असं मला वाटतं.
काकासाहेबांचं काम जितक्या सकारात्मकतेने आणि ऊर्जेने भरलेलं आहे ते तितक्याच ऊर्जाभरल्या शब्दांनी आपल्यासमोर आणलं आहे वसुंधरा काशीकर यांनी. निवेदन, एखाद्या व्यक्तीच्या मुलाखतीतला भाग, थोडी माहिती अशा स्वरूपातलं लेखन अतिशय प्रवाही आहे. थेट लोकांच्या तोंडून काकासाहेबां अनुभव ऐकतोय आहोत असंच वाटतं. लेखिकेने वाचकाने घ्यायचा बोध सोप्या शब्दांत सांगितला आहे. गाण्याच्या ओळी, गजलेच्या ओळी, उद्धृते ह्यांनी मजकूर नटलेला आहे. म्हणूनच पुस्तक रुक्ष चरित्र किंवा कामाची जंत्री असं होत नाही. ही एक सुंदर ललित कलाकृती आहे.
“सकाळ प्रकाशना”ने पूर्ण मजकूरही वेगवेगळ्या रंगात सादर केला आहे. ठळक शीर्षक, त्याच्याखाली दाट रेघ, डावीकडचे पानभर रेखाचित्र, चित्र मजकूर ठळक दाखवण्यासाठी रंगांचा वापर केला आहे. “Kaka says” असं म्हणत त्या त्या प्रसंगाला साजेशी काकांची वाक्ये ठळक दिलेली आहेत. वृत्तपत्रे लेखातील चौकटीप्रमाणे. यामुळे हे पुस्तक सुद्धा तितकंच देखणं आणि अभिरुचीपूर्ण झालं आहे.
पुस्तकात भरपूर फोटोही आहेत विशेष म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक छान रेखाचित्र आहे. अनंत खासबारदार यांनी ही चित्रे काढली आहेत. एक उदाहरण पहा.

महापुराच्या वेळी काकांनी केलेल्या कामा ची ओळख करून देणारे हे चित्र किती यथायोग्य आहे, सुरेख आहे, आकर्षक आहे. “अ पिक्चर इज वर्थ थाउजंड वर्ड्स” चा प्रत्यय देणारं आहे.
तर असं हे पुस्तक वाचाच. हवं तर चितळ्यांची श्रीखंड आणि बाकरवडी खात खात पुस्तक वाचा 😀😀. काकासाहेबांच्या कामाची गोडी चाखताना पदार्थांची गोडी आणि खुमारीही वाढेल. लक्ष्मी आणि सरस्वतीचं एकत्र वास्तव्य दिसेल. आपल्या वकुबानुसार समाजासाठी काही करायची ऊर्मीही वाढेल.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्यावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre) – आलोक शुक्ल (Alok Shukla) – अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)
- कथा मारुती उद्योगाची Katha Maruti Udyogachi- आर. सी. भार्गव(R.C. Bhargav) – अनुवाद :- जॉन कोलासो (John Colaco)
- कालगणना (Kalganana) – मोहन आपटे (Mohan Apte)
- काचेपलीकडचे जग (kachepalikadache jag) – विद्याधर म्हैसकर (Vidyadhar Mhaiskar)
- ’च’ची भाषा (‘Cha’chi bhasha) – अतुल कहाते (Atul Kahate)
- जेनेटिक्स कशाशी खातात ?(Genetics Kashashi Khatat?) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn) – सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
- टाटा एक विश्वास (Tata Ek Vishwas) – माधव जोशी (Madhav Joshi)
- द आंत्रप्रेन्यूअर (The Entrepreneur) – शरद तांदळे (Sharad Tandale)
- निपुणशोध (Nipunshodh) – सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)-गिरीश टिळक (Girish Tilak)
- द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)-डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick) – अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)
- ब्राह्मोस (Brahmos) – ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai) अनुवादक – अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
- भारताची अणुगाथा (Bharatachi Anugatha) – आल्हाद आपटे (Alhad Apte)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi) माधव जोशी (Madhav Joshi)
- शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman) – रिचर्ड फाईनमन (Richard Feynman) – अनुवाद – माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
- साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya) लेखक – गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
- निकोला टेस्ला (Nikola Tesla) – सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar)
- स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) – डॉ. अनंत लाभसेटवार (Dr. Anant Labhsetwar)
- ब्रँड गुरु (Brand Guru) – जान्हवी राऊळ (Janhavi Raul)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


