पुस्तक – मेड इन चायना (Made in China)
लेखक – गिरीश कुबेर (Girish Kuber)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २५५
प्रकाशन – राजहंस प्रकाशन. मे २०२४
छापील किंमत – रु. ४५०/-
ISBN – 97881119625178

“लोकसत्ता” वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर ह्यांची आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण ह्यावरची बरीच पुस्तके गाजली आहेत. त्याच मालिकेतील अजून एक ताजे पुस्तक “मेड इन चायना”. भारताचा शेजारी देश चीन बद्दल भारतीयांच्या भावना संमिश्र असतात. जुना देश आणि संस्कृती म्हणून ते आपल्यासारखेच आहेत अशी भावना असते. तर चीनच्या युद्धखोरीमुळे शत्रुत्व वाटते. स्वस्त आणि उपयुक्त चिनी उत्पदनांचं आकर्षण. तर जगाची उत्पादनक्षमता ताब्यात घेऊन जगावर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेची धडकी. विज्ञान-तंत्रज्ञान-क्रीडा स्पर्धा ह्यांमध्ये चीनचा दबदबा निर्माण करण्यासाठी लहानपणापासून कठोर मेहनत करणाऱ्या चिनी लोकांबद्दल आदर. तर इंटरनेटचा वापरसुद्धा “सरकारी देखरेखीखाली” करायला लागतो असे आयुष्य जगणारे चिनी लोकांबद्दल सहानुभूती. अशा आपल्या संमिश्र भावना योग्यच आहेत. कारण चीन आहेच तसा. संमिश्र-व्यामिश्र. तो तसा का बनला ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक “”मेड इन चायना”.

पुस्तकात सुरुवातील ऐतिहासिक चीन मध्ये कोणाची राजवट होती; कोणाचा पराभव करून कोण पुढे आले; काही शे-हजार वर्ष जुन्या काळात कुठले तत्वज्ञ होऊन गेले ह्याचा धावता आढावा घेतला आहे. मग माओंचा उदय कसा झाला ते थोडक्यात सांगितलं आहे. “कवी-क्रांतिकारी-क्रूरकर्मा” प्रकरणात माओंच्या व्यक्तिमत्त्वाचे परस्परविरोधी पैलू, चक्रमपणा ह्याबद्दलचे किस्से सांगितले आहेत.

तिथपासून पुढचा पुस्तकाचा भाग म्हणजे माओंपासून आत्तापर्यंत कोण कोण राष्ट्रप्रमुख झाले, ते त्यापदापर्यंत कसे पोचले ह्याची तपशीलवार माहिती आहे. भारताप्रमाणे तिथे लोकशाही नाही. एकपक्षीय सत्ता आहे. त्यामुळे माझी कल्पना अशी होती की तिथे पक्षांतर्गत चर्चा, वादविवाद होऊन पुढचा सत्ताधीश ठरत असेल आणि किमान वरच्या स्तरावर तरी घाणेरडे राजकारण, एकमेकांचे पाय ओढणे हा प्रकार नसेल. पण हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की आपल्यापेक्षा भयंकर राजकारण तिथे चालतं. कारण जो राष्ट्रप्रमुख होतो तो सर्वसत्ताधीश हुकूमशहाच होतो. त्याच्या विरुद्ध काही मतप्रदर्शन केलं की सूडबुद्धीने कारवाई होणार. कधी तुरुंगवास, कधी दूर खेड्यात कष्टाचं जीवन जगण्याची शिक्षा तर कधी थेट मृत्युदंड. त्यामुळे विद्यमान राजा ऐन भरात असताना त्याची हांजी हांजी करणारे लोक उच्चपदांवर, मोक्याच्या पदांवर बसून माया गोळा करणार. विरोधी गट तोंडदेखलं समर्थन करून योग्य वेळेची वाट बघणार. राजाचा भर ओसरायला लागला की विरोधकांच्या कुरुबुरी सुरु. आणि काही वर्ष, काही बळी जात जात सत्तांतर झालं की पारडं दुसऱ्या बाजूला फिरणार. कालचे “राजनिष्ठ” आता “राजद्रोही” तर कालचे “क्रांतिकारी” आज “आदर्श कार्यकर्ते”. जुन्या राष्ट्रप्रमुखाची सुद्धा तातडीने उचलबांगडी किंवा जाहीर अपमान सुद्धा ! मग तोच जुना खेळ पुन्हा सुरू.

माओंच्या काळात “डेंग शियाओपिंग” ह्यांना असा त्रास भोगायला लागला पण मागाहून ते सत्ताधीश झाले. आत्ताचे अध्यक्ष “क्षी जिन पिंग” ह्यांच्या वडिलांवर पण राज्यकर्त्यांची खप्पामर्जी झाली होती. त्यामुळे “क्षी जिन पिंग” तरुण असताना हालअपेष्टा आणि अपमान सोसत जगले. पण आता ते सत्तेत आहेत. आणि विरोधक त्रासात.

पुस्तकातला बराचसा भाग ह्या राजकीय खेळी, कोणी कोणी विरोध केला, कोणावर काय कारवाई झाली, किती लोक मारले गेले, कुठली आंदोलनं झाली, कशी चिरडली गेली, कशी फोफावली ह्याचे सुरस-चमत्कारिक किस्से आहेत. त्यामुळे चिनी राजकारणातली कितीतरी नावे ह्या विवेचनाच्या ओघात येतात.

चीन वाढत असताना अमेरिकेचं तिकडे लक्ष होतंच. रशिया तर कम्युनिस्ट म्हणून चीनला जवळचाच. ह्या देशांच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी चीनबद्दल घेतलेली भूमिका हा भाग सुद्धा निवेदनाच्या ओघात येतो. लेनिन, गोब्राचेव्ह, किसिंजर, क्लिंटन, हो ची मिन्ह वगैरेंचे दाखले आहेत. चीनला कधी पाठिंबा, कधी विरोध. चीनची उत्पादनक्षमता बघून व्यापाराच्या दृष्टीने सहकार्य तर मानवाधिकार डावलले जातायत ह्याबद्दल नक्राश्रू ढाळणे हे पूर्वीपासून चालू आहे. गंमत म्हणजे पुस्तकात सुरुवातीला उल्लेख आहे की युरोप पेक्षा चीन प्राचीनकाळी प्रगत असल्यामुळे ते स्वतःला उच्चभ्रू समजत तर युरोपियन लोकांना रानटी, अप्रगत, अडाणी. त्यामुळे तेव्हाच्या चीनच्या राजाने ब्रिटनच्या राजदूताचा अपमान केला होता आणि अगदी अलीकडे “डेंग शियाओपिंग” ह्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांचा. त्या इतक्या संतापल्या की ब्रिटनला परत आल्यावर म्हणाल्या “चीनच्या एकाही नेत्याला जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार कसा चालतो ह्याची काडीचीही अक्कल नाही !”

पुस्तकाच्या निवेदनात एक दोन प्रकरणं चीनच्या आर्थिक धोरणांवर आहेत. विशेषतः “डेंग शियाओपिंग” ह्यांच्या अर्थनीतीमुळे – नियंत्रित भांडवलशाही -मुळे आज दिसणाऱ्या चीनची पायाभरणी कशी झाली हे सांगितलं आहे. “विशेष आर्थिक क्षेत्र” – special economic zone (सेझ) ही कल्पना त्यांनी मंडळी. सेझ मध्ये लोकांना मुक्तद्वार दिलं. कामगार कायदे, मानवीहक्क वगैरेंची फारशी तमा ना बाळगता उत्पादन करायला प्रोत्साहन दिलं. उत्पादन करताना त्यामागचं तंत्र, मंत्र आणि रहस्य सुद्धा शिकून घ्यायला आणि चक्क त्याची चोरी करायला प्रोत्साहन दिलं. त्यातूनच सुरु झाला चीनच्या वस्तूंनी जग काबीज करायचा प्रवास. चांगली उत्पादने पण तिथे बनू लागली आणि “चाले तो चांद तक, नाही तो शाम तक” अशी नकली उत्पादने पण तिथलीच. इंटरनेटवर नियंत्रण ठेण्यासाठी गूगल ला बंदी पण चीनचं गूगल – “baidu” तयार झालं. स्वतःची “फायरवॉल” सारखी तंत्रे विकसित केली. असे कुठले महत्त्वाचे निर्णय चीनने घेतले ह्याबाद्दल पुस्तकात माहिती आहे. “क्षी जिनपिंग” ह्यांचा पण मोठा वाटा आहे. ते आता तहहयात अध्यक्ष झाले आहेत. आपलं म्हणणं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर ते करतात. कोविड ची साथ, चीनचं “टाळेबंदी”चं कडक धोरण आणि त्यातून मंदावलेली अर्थव्यवस्था इथे पुस्तकाचा शेवट होतो. परिशिष्ठात चीनच्या व्यापाराबद्दल, संरक्षण धोरणाबद्दलची आकडेवारी आहे.

पुस्तकातला हा अर्थविषयक भाग थोडा गोंधळात टाकणारा वाटला. कारण एकीकडे सेझमुळे व्यापारवृद्धी झाली असं म्हटलं आहे तर दुसरीकडे चीनची अर्थव्यवस्था रसातळाला गेली; चलनवाढ, बेरोजगारी ह्यांनी कळस गाठला असं सुद्धा म्हटलं आहे. पुढे मध्येच चीनच्या आर्थिक प्रगतीबद्दल उदाहरणं आहेत तर मध्येच कशी अधोगती होते आहे ह्याचे. आता चीनची अर्थव्यवस्था उताराकडे लागली आहे असं लेखकाला वाटतं आहे. अर्थव्यवस्थेत चढउतार होत असतातच. पण पुस्तकातून १०६० ते २०२४ मधला आर्थिक प्रवास सलग डोळ्यासमोर उभा राहत नाही. भविष्याचा वेध घेतला जात नाही. लेखकाचे मुख्य लक्ष “राजकारण आणि सत्ताबदल” ह्याकडेच राहिले आहे.

काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

माओ आणि डेंग ह्यांच्यातला सुप्त संघर्ष

सेझ ची सुरुवात

मुक्त बाजारपेठेचे फायदे घेत स्वतःची बाजारपेठ मात्र नियंत्रित ठेवण्याचा चीनचा दुटप्पीपणा. परकीय गंगाजळीचा प्रचंड साठा ह्याबद्दल

भारत-चीन युद्ध ह्याविषयी बरंच लिखाण उपलब्ध आहे तर “डोकलाम- गलवान”वाद ह्याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही. म्हणून हे दोन्ही मुद्दे पुस्तकात घेतले नाहीयेत असं लेखकाने मनोगतात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पूर्ण पुस्तकात भारत फार क्वचित दिसतो.

माओंनी केलेली क्रांती, “ग्रेट लीप फॉरवर्ड”, “सांस्कृतिक क्रांती” वगैरेचे संदर्भ पुस्तकात येतात. पण तो नक्की काय प्रकार होता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर पुस्तकातल्या वाक्याचं गांभीर्य कदाचित लक्षात येणार नाही असं मला वाटलं. त्याबद्दल थोडं इंटरनेटवर वाचून मग हे पुस्तक वाचलं तर जास्त फायदा होईल.

आपण चिनी नावांचे उच्चार त्याच्या रोमन स्पेलिंग प्रमाणे करतो. पण त्यांचे खरे उच्चार वेगळे आहे. Mao Zedong ह्या स्पेलिंगमुळे त्याचं मराठी लेखन “माओ त्से तुंग”, “माओ झेडॉंग” असं केलं जतन. पण त्याचा मूळ उच्चार साधारण “माओ द्झ दोंग”. परिशिष्टात अशा नावांची आणि त्यांचे मूळ उच्चार देवनागरीत दिले आहेत.

चीन म्हणजे माओ आणि त्यांच्या विचाराने चालणारा देश अशीच माझी कल्पना होती. पण पुस्तक वाचून तो समज बदलला. नव्या चीन च्या धोरणात “डेंग” ह्यांचे योगदान, माओंच्या पूर्णपणे विरुद्ध आर्थिक भूमिका, नंतरच्या राजकारण्यांनी वेळोवेळी बदललेले पवित्रे आणि तरीही आम्ही “माओ आमचं दैवतच” हे म्हणत राहायची मखलाशी वाचून आपल्या राजकारण्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

गिरीश कुबेरांचे वृत्तपत्रातले लेख किंवा अग्रलेख वाचणाऱ्यांना त्यांचा मोदीविरोध, भाजपविरोध परिचित आहे. पुस्तकात मोदी, भाजप येत नसले तरी तिकडची हुकूमशाही वृत्ती आणि मोदी ह्यांच्यात कसं साम्य आहे जाता जाता सुचवायची संधी लेखकाने सोडली नाहीये हे पण चतुर वाचकाच्या लक्षात येईल.

चीन हा देश आणि त्याचं भूत-भविष्य-वर्तमान ह्यावर कितीही लिहिलं तरी कमीच आहे. गिरीश कुबेरांच्या ह्या पुस्तकातून चीनचं अंतर्गत राजकारण आणि आर्थिक निर्णयांची मालिका ह्याचा अंदाज मराठी वाचकाला येईल. पुस्तकातली नावे, मुद्दे, प्रसंग अजून कुतूहल निर्माण करतील. त्यादृष्टीने एक सकस वाचनानुभव म्हणून सुजाण वाचकांनी अवश्य वाचावं.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe