

पुस्तक – स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs)
लेखक – डॉ. अनंत लाभसेटवार (Dr. Anant Labhsetwar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २१८
प्रकाशन – विजय प्रकाशन. जून २०१४
छापील किंमत – रु. २५०/-
ISBN – दिलेला नाही.
“ॲपल” हा शब्द उच्चारल्यावर काही लोकांच्या डोळ्यासमोर सफरचंद येईल तर बहुतेक जणांच्या डोळ्यासमोर येईल “आयफोन”. ॲपल कंपनीचा “आयफोन” एक महागडा फोन. दिसायला देखणा, हाताळायला सोपा, उत्तम छायाचित्रे काढता येणारा असा फोन गेली कित्येक वर्षे मोबाईल वापरणाऱ्यासांठी “स्टेस्टस सिम्बॉल” झाला आहे. ॲपलचाच लॅपटॉप “मॅक”सुद्धा तंत्र जगतात लोकांची प्रथम क्रमांकाची पसंती असते. हातात धरण्याजोगा, वागवायला सोपा “आयपॅड” आणि भरपूर गाणी ऐकायला देणारा “आयपॉड” देखील तितकेच लोकांच्या आवडीचे. आज आपण कॉम्प्युटर वापरताना माउस वापरतो आणि “चिन्हांवर”(आयकॉन) वर क्लिक करतो त्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली ती देखील ॲपलनेच. तंत्रज्ञानाच्या युगात मोलाची कामगिरी ॲपल करू शकली ह्याचं कारण तिचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्सची दृष्टी, कलात्मकता, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची वृत्ती, अपयश पचवून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आणि बरंच काही. अशा स्टीव्ह जॉब्सचे चरित्र डॉ. लाभसेटवारांनी मराठीत लिहिलं आहे.
स्टीव्हच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करून, त्याचा जन्म, बालपण, शिक्षण, त्यातली धरसोड ह्याबद्दल सुरुवातीच्या प्रकरणात माहिती आहे. त्याचा जन्म अरबी वडील आणि अमेरिकन आईच्या पोटी त्यांच्या लग्नाच्या आधीच झाला. नाचक्की टाळण्यासाठी जन्म झाल्या झाल्या तो दत्तक दिला गेला. एका कष्टकऱ्याच्या घरात. त्यामुळे आपल्या जैविक वडिलांशी त्याचे संबंध कायमचे दुरावले. दत्तक गेल्याबद्दलचा न्यूनगंड तयार झाला. त्याची वृत्ती लहानपणापासून बंडखोर झाली. तरुणपणात तर चक्क अमली पदार्थांच्या व्यसनात बुडाला. “हिप्पी” लोकांची बेपर्वा जीवनशैली त्याने स्वीकारली. कसाबसा कॉलेजात शिकत राहिला. एका नशेडी, वाया गेलेल्या, उद्धट मुलाचं वर्णन आपण वाचतो आहोत असंच वाटतं. पण विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यांचे आकर्षण त्याला होते. त्या वस्तू उघडून बघायच्या, पुन्हा जोडून बघायच्या. ही त्याची सवयच पुढे जाऊन “ॲपल”झाली. स्टीव्हचा हा सगळा प्रवास सविस्तर मांडला आहे.
ॲपलचा दुसरा साहसंस्थापक – स्टीव्ह वोझनीयॅक – अर्थात वॉझ. ते दोघं एकत्र प्रयोग करत असताना वॉझने सुटे भाग जुळवून संगणक तयार केला. त्यासाठी स्वतः संगणक प्रणाली लिहिली. सगळं हौसेपोटी, आवडीपोटी चालू होतं. फक्त वॉझ असता तर ते काम तिथेच विरूनही गेलं असतं. पण स्टीव्हची उद्योगशीलता व दूरदृष्टी तिथे कमी आली. लोकांनी सुटेभाग घेऊन घरगुती संगणक बनवण्यापेक्षा आपण असे छोटेखानी तयार संगणक विकले तर लोक ते विकत घेतील. त्यातून फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं आणि सुरू झाली “ॲपल”. कायदेशीर कंपनी स्थापन करणे, भागीदारी ठरवणे, मग भांडवलदार गोळा करणे, त्यांचा हिस्सा ठरवणे हे सगळे सोपस्कार झाले. अमेरिकन संस्कृतीतले वातावरण उद्योगाला किती पोषक होते हे सुद्धा इथे जाणवते.
पुढच्या प्रकरणांमध्ये स्टीव्हची स्वतःची मते कशी होती आणि त्यांनी कंपनीची वेगवेगळी उत्पादने कशी घडवली ह्याची स्वविस्तर वर्णने आहेत. यंत्रांची माणसाला भीती वाटता कामा नये. ते ओबडधोबड नाही तर सुंदर दिसलं पाहिजे, हाताळायला सोपं पाहिजे हा त्याचा आग्रह – हट्टच. ते साधायचं तर यंत्रांची सामुग्री (हार्डवेअर) आणि प्रणाली (सॉफ्टवेअर) सुद्धा आपलंच पाहिजे. हा दुसरा हट्ट. आणि इतकं सगळं झालं की ते सुंदर उत्पादन विकायचं ते सुद्धा नजाकतीने. दुकानात जाणे, चौकशी करणे, विकत घेणे हे सुद्धा लोकांना आनंददायक, छाप पडणारे वाटले पाहिजे. म्हणून “ॲपल स्टोअर” सुरु झाली. हा सगळा प्रवास, ॲपलच्या प्रत्येक उत्पदनाची जन्म कहाणी, त्यावेळचे किस्से प्रत्यक्ष वाचण्यासारखेच आहेत.
हे सगळं वाचून असा समज होईल की स्टीव्ह फारच लोकप्रिय असेल व ॲपल नेहमीच यशस्वी ठरली असेल. पण तसं नाही. “हिप्पी” स्टीव्हचं वागणं आयुष्यभर चक्रमपणाचं राहिलं. पुस्तकात असं वर्णन आहे की तरुणपणात अनेक दिवस अंघोळ न केल्यामुळे त्याच्या अंगाला घाण वास येत असे. राहणं ओंगळ होतं. लोकांना ते सहन करून काम करावं लागायचं. बोलणं अतिशय तुसडं. दुसऱ्याला थेट प्रश्न, पाणउतारा, शिवीगाळ नेहमीचीच तेही चारचौघांत. कंपनीच्या कामात लोक कसे टिकले, “पापी पेट का सवाल” किंवा “येडXXX असला तरी त्याचं बोलणं खरं ठरतं आणि कंपनीला पैसा मिळतो” असा फायद्याचा विचार करून राहिले असतील बिचारे. पण जेव्हा हे चुकीचं ठरलं तेव्हा थेट स्टीव्हलाच “ॲपल”च्या बाहेर काढलं गेलं. स्वतःच्या घरातून बाहेर काढल्याचा धक्का त्याला पचवावा लागला. त्या दिवसांत त्याने “ॲनिमेशन” क्षेत्रातली “पिक्सर” कंपनी काढली. नावारूपाला आणली. “टॉय स्टोरी” चित्रपटाला ऑस्कर मिळाला. अजून बरेच चित्रपट गाजले. आणि त्यानंतर त्याचं “डिस्नी”शी पण “वाजलं”. मायक्रोसॉफ्ट चा बिल गेट्स आणि तो एकाचवेळी प्रतिस्पर्धक, टोकाचे टीकाकार आणि तरी एकमेकांसाठी काम करणारे होते. स्टीव्हच्या व्यक्तिमत्त्वाची ही नकारात्मक बाजू, थोडी व्यावसायिक क्रूर बाजूसुद्धा पुस्तकात सविस्तर मांडली आहे.
स्टीव्ह बाहेर पडल्यावर “ॲपल” बरी चालली पण काही वर्षांनी आर्थिक संकटात सापडली. हळूहळू स्टीव्ह पुन्हा “ॲपल”मध्ये येऊ लागला आणि पुढे त्याने पुन्हा कंपनीचा ताबा घेतला. पुढे नवी उत्पादने बाहेर आली. त्याला अचानक कर्करोगाने ग्रासले. तरी शेवटची चारपाच वर्षे आयफोनच्या नव्या आवृत्त्यांनी बाजारपेठ गाजवली. त्याच्या मृत्यूपश्चात सुद्धा गाजवत आहे. असा मोठा चरित्रपट पुस्तकात आहे.
काही पाने उदाहरणादाखल
अनुक्रमणिका

तरुण स्टीव्हचा भारत प्रवास


स्टीव्हच्या सौंदर्यदृष्टीबद्दल


“पिक्सर” कंपनीतला स्टीव्हचा “हम करे सो कायदा”


एक गंमत जाणवली. २०१४ मधले लेखकाचे निरीक्षण आहे की फोन कॉम्प्युटरची निर्मिती अमेरिकेत व्हावी असा आग्रह अमेरिकी राष्ट्रध्यक्ष धरत होते. ॲपल चीन मध्ये उत्पादन करत होते. आणि भारताकडे ढुंकूनही पाहत नाही. गंमत म्हणजे १० वर्षांनी अमेरिकी राष्ट्रध्यक्ष तोच आग्रह धरतायत. फक्त आता म्हणतायत की भारतात उत्पादन पुरे. भारताच्या “मेक इन इंडिया” ने कसा बदल घडवला आहे हे असं आपसूक समोर येतं.

स्टीव्हचं हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व, अस्थिर कौटुंबिक संबंध, टोकाची घृणास्पद वागणूक आणि त्याचवेळी सौंदर्यदृष्टीचे टोक गाठणे, जमान्याच्या चार पावलं पुढे जाणारी उत्पादने तयार करून अख्ख्या जगालाच पुढे नेणे हे सगळं समजून घेण्यासाठी हे चरित्र वाचलंच पाहजे. लेखकाने ओघवत्या शैलीत लिहिलं आहे त्यामुळे वाचायला मजा येते. काही काही मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे ती कदाचित कमी करता आली असती.
प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देण्याचा लेखकाचा प्रयत्न (स्टीव्ह सारखा हट्ट) दिसतो. उदा. “कृष्णधवल रंगाच्या पटलावर रंगीत चित्र उमटवण्याचा शोध लावला.. पटलावर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उंदरावर टिचकी मारण्याचा शोध लावला”. “विभागीय दुकानातून (Departmental store ) फिरताना .. “, “संगणक कृत्या (Application)”, “स्मरण चकत्या (memory chips)”, “कुठल्याही संगणकाचं आतडं म्हणजे चकत्यांचे फलक (Chip boards)”, “प्रदर्शनात गाळे (stall) आरक्षित केले” इ. हे वाचताना गंमत वाटते. हे शब्द योग्य आहेत. आपण ते वापरत राहिले पाहिजेत म्हणजे ते रुळतील. त्यासाठी लेखकांचे विशेष अभिनंदन. एक चुकीची वाक्यरचना मात्र पूर्ण पुस्तकभर खटकते. “केले जाते”, “समजली जाईल”, “बोलला गेला” ह्या कर्मणी वाक्यांमध्ये पुस्तकभर “केल्या जाते”, “समजल्या जाईल”, “बोलल्या गेला” अशी वाक्यरचना आहे. ही मुद्रितशोधनाची चूक का लेखकाच्या बोलीचा प्रभाव?
पुस्तकाचे सहशीर्षक यथायोग्य आहे. “काव्य आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून मानवी जीवन सुखकर करणारा”. विषय, आशय आणि मांडणी ह्या दृष्टीने उपयुक्त पुस्तकासाठी लेखक डॉ. लाभसेटवारांचे आणि प्रकाशकांचे आभार.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग ह्यावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM Electrnic Matadar yantre) – आलोक शुक्ल (Alok Shukla) – अनुवाद : मृणाल धोंगडे (Mrunal Dhongade)
- कथा मारुती उद्योगाची Katha Maruti Udyogachi- आर. सी. भार्गव(R.C. Bhargav) – अनुवाद :- जॉन कोलासो (John Colaco)
- कालगणना (Kalganana) – मोहन आपटे (Mohan Apte)
- काचेपलीकडचे जग (kachepalikadache jag) – विद्याधर म्हैसकर (Vidyadhar Mhaiskar)
- ’च’ची भाषा (‘Cha’chi bhasha) – अतुल कहाते (Atul Kahate)
- जेनेटिक्स कशाशी खातात ?(Genetics Kashashi Khatat?) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn) – सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
- टाटा एक विश्वास (Tata Ek Vishwas) – माधव जोशी (Madhav Joshi)
- द आंत्रप्रेन्यूअर (The Entrepreneur) – शरद तांदळे (Sharad Tandale)
- निपुणशोध (Nipunshodh) – सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)-गिरीश टिळक (Girish Tilak)
- द फेसबुक इफेक्ट (The Facebook Effect)-डेव्हिड कर्कपॅट्रिक (David Kirkpatrick) – अनुवाद : वर्षा वेलणकर (Varsha Welankar)
- ब्राह्मोस (Brahmos) – ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai) अनुवादक – अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
- भारताची अणुगाथा (Bharatachi Anugatha) – आल्हाद आपटे (Alhad Apte)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- माझी कॉर्पोरेट दिंडी (majhi corporate dindi) माधव जोशी (Madhav Joshi)
- शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman) – रिचर्ड फाईनमन (Richard Feynman) – अनुवाद – माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
- साखळीचे स्वातंत्र्य (Sakhaliche Swatantrya) लेखक – गौरव सोमवंशी (Gaurav Somwanshi)
- निकोला टेस्ला (Nikola Tesla) – सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
तमिळ गाण्यांचे बोल आणि अर्थ मराठीत
लोकप्रिय आणि सुश्राव्य तमिळ गाण्यांचे अर्थ मराठीत सांगण्याचा आणि त्याचे तमिळ बोल मराठीत(देवनागरी लिपीत) सांगण्याचा उपक्रम मी करतो आहे. बरीच गाणी मराठीत उपलब्ध आहेत.
ते वाचण्यासाठी लिंक https://learnmarathiwithkaushik.com/tamil-song-lyrics-meaning-in-marathi/
माझा हा प्रयत्न कसा वाटला ते सांगा. आवडला तर शेअर करायला विसरू नका.
तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीचं तमिळ गाणं सुचवा. ते गाणं मराठीत आणण्याचा प्रयत्न करेन.
