पुस्तक – डॉ. मारिया मॉंटेसरी (Dr. Maria Montessori)
लेखिका – वीणा गवाणकर (Veena Gavankar)
भाषा – मराठी
पाने – १६४
प्रकाशन – इंडस सोर्स बुक्स , पहिली आवृत्ती – जुलै २०२३
ISBN – 978-93-85509-70-4
छापील किंमत – रु. २९९/-
मी मराठी माध्यमात शिकलो. माझ्या शाळेत पहिलीपूर्वीच्या वर्गांना शिशुवर्ग आणि बालवर्ग असं म्हणत. ह्याच वर्गांना इंग्रजी माध्यमात “के.जी” किंवा “मॉंटेसरी” म्हणतात अशी माझी समजूत. पुढे कधीतरी KG चं पूर्णरूप किंडरगार्टन आहे हे समजलं. पण “मॉंटेसरी’ चा अर्थ काय हे कधी समजून घेतलं नाही. पण वाचनालयात जेव्हा हे पुस्तक बघितलं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की “मॉंटेसरी” हा काही इंग्रजी शब्द नाहीये तर ते ह्या महिलेचं – डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांचं – नाव आहे. म्हणून उत्सुकतेने हे पुस्तक वाचायला घेतलं.
हे पुस्तक डॉ. मॉंटेसरी ह्यांचं चरित्र आहे. १८७० मध्ये इटली देशात मॉंटेसरींचा जन्म झाला. त्याकाळात तिथेही मुली फार शिकत नसत. तरीही कुटुंबाच्या प्रोत्साहनाने त्या शिकल्या. डॉक्टर झाल्या. एक मुलगी डॉक्टर होते आहे हे काहींना नवलाईचं वाटलं तर काहींना अडचणीचं. त्यातून मॉंटेसरींच्या आयुष्यात घडलेल्या गमती तर काही त्रास ह्याबद्दल पुस्तकात सांगितलं आहे. पुढे वैद्यकीय व्यवसाय करताना, मुलांना तपासताना त्यांच्या लक्षात यायला लागलं की ज्या मुलांना वेडं, अर्धवट किंवा मंदबुद्धी समजलं जातं ती प्रत्येक वेळी तशी असतातच असं नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं तर ते शिकू शकतात. मग हेच तंत्र सर्वसामान्य मुलांसाठी वापरलं तर त्यांची प्रगती अजून वेगाने होईल असा विचार पुढे आला. ह्यातून जन्माला आली “मॉंटेसरी मेथड”. हे सुरुवातीचे दिवस कसे होते ह्याचं छान वर्णन पुस्तकात आहे.
मॉंटेसरी पद्धतीत पुढे महत्त्वाच्या ठरलेल्या “बालभवन” संकल्पनेची सुरुवात कशी झाली तो प्रसंग पुस्तकात आहे. एका गरीब वस्तीतल्या दिवसभर उनाडक्या करणाऱ्या लहान मुलांना एका जागी बसवून ठेवण्यासाठी काहीतरी करायची गरज होती. तर मॉंटेसरी बाईंना आपली पद्धत मुलांवर कशी काम करते आहे त्याचं निरीक्षणं करायची होती, त्यातून शिक्षणाच्या त्यांनी तयार केलेल्या साधनांत बदल करायचे होते. त्यामुळे त्यांनी गरीब वस्तीत शाळा चालवायची संधी घेतली. आणि सुरु झालं “बालभवन”. खोडकर, व्रात्य मुलं आनंदानं शिकू लागली, स्वयंशिस्त पाळू लागली. हा चमत्कार मॉंटेसरी ह्यांनी घडवला. त्यांचं नाव प्रसिद्ध होऊ लागलं.
मॉंटेसरीची आधी स्थानिक मग राष्ट्रीय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय घोडदौड झाली. मॉंटेसरी देश-परदेशात जाऊन व्याख्यानं देऊ लागल्या. त्यांच्या मेथडप्रमाणे काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या. कुठल्या कुठल्या मान्यवर कलाकार, राजकारणी, राजेरजवाडे ह्यांनी त्यांचं मत मान्य केलं; कामाला प्रोत्साहन दिलं हे सगळं पुस्तकात येतं. लोकांनी “मॉंटेसरी ओसीएशन”/”मॉंटेसरी सोसायट्या” स्थापन करून आपापल्या ठिकाणी शाळा काढल्या. महायुद्ध काळात इटलीच्या मुसोलिनीने मॉंटेसरी पद्धत देशभर राबवली पण मॉंटेसरी राजकारणात आपल्याला उघड पाठिंबा देत नाहीत हे बघून थोडे दिवसांनी तशा शाळा बंद केल्या.
मॉंटेसरी ह्यांचा एक निग्रह/दुराग्रह इथे जाणवतो की “मी सांगेन तीच पद्धत. इतर कोणीही त्यात बदल करायचा नाही. मी सांगेन त्या पद्धतीनेच शैक्षणिक साधनं वापरली गेली पाहिजेत. मी प्रशिक्षण दिलेल्या व्यक्तीलाच “मॉंटेसरी शाळा” काढता येतील अन्यथा नाही. दुसरं कोणी असं प्रशिक्षणही देऊ शकणार नाही”. ह्या एकाधिकारशाहीवर टीका झाली. त्यातून नव्या पद्धतीच्या प्रसारावर आपसूक बंधने देखील आली. मॉंटेसरींच्या समकालीन शिक्षणतज्ज्ञांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या मेथड मधल्या उणीवा दाखवल्या. त्या पैलूला सुद्धा पुस्तकात स्पर्श केला आहे.
मॉंटेसरींनी जगप्रवास केला. तर ४०च्या दशकात त्या सात वर्ष भारतात राहिल्या होत्या. गांधी, टागोर असे राष्ट्रीय नेते तर ताराबाई मोडकांसारख्या शिक्षणक्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींची त्यांच्याशी भेट झाली. त्याबद्दलही साताठ पाने आहेत. भारतप्रवासानंतर त्या पुन्हा युरोपात गेल्या. अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिल्या. १९५२ साली त्यांचं वृद्धपकाळाने निधन झालं. तिथपर्यंतचे महत्त्वाचे प्रसंग ह्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतात त्यावेळी आणि आत्ताही कुठल्या संस्था काम करतात ह्याची थोडी माहिती आहे.
काही पाने उदाहरणादाखल
डॉक्टर होताना
बालकेंद्री बालभवन
विरोधी मते
मॉंटेसरींचं आयुष्य आपल्या इथल्या समाजसुधारकांसारखं वादळी, जीवघेण्या संघर्षाचं नाही. त्यात नाट्यमयता तशी नाही. त्यामुळे प्रसार-प्रचाराबद्दलची पानं थोडी कंटाळवाणी होतात. त्या इकडे गेल्या, तिकडे गेल्या, व्याख्यान झालं, हे भेटले, इथे संस्था स्थापन झाली. हेच पुन्हा पुन्हा येतं. वाचकाच्या ते तपशील लक्षात राहणं शक्य नाहीच. त्यामुळे ते मजकुरात वाचण्या ऐवजी “पुढील ठिकाणी फिरून त्यांनी व्याख्याने दिली आणि प्रसार केला” अशी यादी दिली असती तर सोपं झालं असतं(…कदाचित मी सॉफ्ट्वेअर इंजिनिअर असल्यामुळे, मुद्द्यावर आधारित प्रेझेन्टेशन देण्याची सवय झाल्यामुळे असं मला वाटलं असेल). पुस्तक वाचताना त्यांच्या काळात नक्की किती “मॉंटेसरी शाळा” सुरु झाल्या असतील ह्याचा काही अंदाज येत नाही. पुस्तकातल्या वर्णनातून कधी वाटतं खूप प्रतिसाद मिळाला कधी वाटतं काही निवडक शाळा सुरु झाल्या.
मॉंटेसरींचं कार्य मोठं आहे, शिक्षणाला नवीन दिशा देणारं आहे हे नक्की. त्यांची पद्धत, त्या मागचा विचार समजून घ्यायचा तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं, दिलेली व्याख्यानं वाचली पाहिजेत; चरित्रात्मक पुस्तकाचं ते काम नाही. तरीही ह्या पुस्तकातून त्या पद्धतीबद्दल फारच थोडी, जुजबी माहिती येते. मुलांसाठी खेळणी/खेळ/शैक्षणिक साधनं बनवली. मुलांना थेट न शिकवता ह्या साधनांतून मुलं स्वतः शिकतील असं त्या सांगतात. इतपतंच कळतं. त्यांची ही पद्धत कशी कशी विकसित होत गेली; नवे अनुभव नव्या सुधारणा ह्यावर भर दिला असता तर पुस्तक अजून वाचनीय झालं असतं असं मला वाटलं.
मुखपृष्ठावरचं मॉंटेसरींचं साडीतलं छायाचित्र बघून मला तर असं वाटलं होतं की मदर तेरेसा किंवा सिस्टर निवेदिता ह्यांच्याप्रमाणे भारत ही त्यांची मुख्य कर्मभूमी होती की काय! तसं नसलं तरी त्या चांगल्या सात-आठ वर्षे भारतात राहिल्या. मात्र भारत वास्तव्यावरच्या साताठ पानांत आणि इतर “प्रचार-प्रसार” ह्यबद्दलच्या पानांत विशेष फरक जाणवला नाही. ही पुस्तकाची उणीव वाटली.
म्हणून, मॉंटेसरीं ह्यांच्याबाद्दल आधी काहीच वाचलं नसेल तर ह्या चरित्रातून त्यांची तोंडओळख होईल. जर त्यांच्या कामाशी निगडीत असाल तर सगळं तपशीलवार वाचणं तुम्हाला उपयोगी पडेल. त्यांच्या कामाबद्दल अजून वाचायची इच्छा निर्माण होईल. हा अल्पपरिचित/अल्पचर्चित विषय मराठीत आणल्याबद्दल लेखिका आणि प्रकाशकांचे आभार.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संथा ह्यांवरच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- आत्म्याचे नाव अविनाश (Aatmyache Nav Avinash) – डॉ. चित्रलेखा पुरंदरे (Dr. Chitralekha Purandare)
- खेळिया – कथा नरेंद्र मोदी नामक झंझावाताची (Kheliya – Katha Narendra Modi Namak Jhanjhavatachi) – सुदेश वर्मा (sudesh Verma) – अनुवादक – सुधीर जोगळेकर
- गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran) – अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो (Abhijit V. Banerjee & Ester Duflo) – अनुवाद – अतुल कहाते (Atul Kahate)
- डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) – ना.ह.पालकर (N.H.Palkar)
- थेंबे थेंबे (Thembe thembe) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- दीपज्योतिर्नमोस्तुते (Deepajyotirnamostute) – सुशीला महाजन (Sushila Mahajan )
- प्रदीप लोखंडे, पुणे-१३ (Pradip Lokhande, Pune-13) – सुमेध वडावाला(रिसबूड) (Sumedh Wadawala (Risbud)
- माझंही एक स्वप्न होतं(majhahi ek swapna hota) – वर्गीस कुरियन(Verghese Kurien) (अनुवाद – सुजाता देशमुख)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- महाराष्ट्राचा चिंतामणी लोकसत्ता विशेषांक (Maharashtracha Chintamani Loksatta Special edition) – संपादक – गिरीष कुबेर (Girish Kuber)
- मी, मनु आणि संघ(Mi, manu ani Sangh) लेखक – रमेश पतंगे (Ramesh Patange)
- लॉरि बेकर (Laurie Baker) – अतुल देऊळगावकर (Atul Deulagonkar)
- लोक माझे सांगाती (Lok maze sangatee) – शरद पवार (Sharad Pawar)
- अनंतानुभव (Anantanubhav) – डॉ. अनंत कुलकर्णी (Dr. Anant Kulkarni) – शब्दांकन – सुधीर जोगळेकर (Sudheer Joglekar)
- विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas) – दिलीप महाजन (Dilip Mahajan)
- अ-मृत पंथाचा यात्री (A-mrut panthacha yatri) – दिनकर जोशी (Dinakar Joshi) अनुवादक – डॉ. सुषमा करोगल (Dr. Shushma Karogal)
- Droupadi Murmu (द्रौपदी मुर्मू) – Kasturi Ray (कस्तुरी राय)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe