पुस्तक – गौतम बुद्धांचे चरित्र (Gautam Buddhanche Charitra)
लेखक – कृष्णराव अर्जुन केळूसकर (Krushnarao Arjun Keluskar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २०८
प्रकाशन – विश्वकर्मा पब्लिकेशन, जाने २०२३. मूळ पुस्तक प्रकाशन – १८९८
ISBN – 978-93-93757-57-9
छापील किंमत – रु. २१०/-
ज्या भारतीयांनी आपल्या बुद्धिमत्तेने कर्तृत्वाने संपूर्ण जगाला प्रभावित केलं आहे अशांमध्ये महामानव गौतम बुद्धांचे नाव मुख्य आहे. बुद्धांनी सांगितलेले तत्त्वज्ञान – बौद्धधर्म अथवा बौद्धमत हे भारतात एकेकाळी खूप प्रचलित होते. पण नंतर त्यात वेगवेगळ्या कारणांनी घट होऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली हे साधारणपणे ऐकून माहिती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धर्म निवडला हेही वाचून माहिती होतेच. त्यामुळे वाचनालयात गौतम बुद्धांचे चरित्र पुस्तक दिसल्यावर ते वाचावेसे वाटले. त्यातही बाबासाहेबांनी ज्या पुस्तकाचा आपल्यावर लहानपणीच परिणाम झाला असे स्वतः सांगितले आहे ते हे जुने पुस्तक (पुनमुद्रित आवृत्ती). त्यामुळे लगेच वाचायला घेतले.
गौतम बुद्ध हे जन्माने राजपुत्र लाडाकोडात वाढलेले पण त्यांचा पिंड प्रथमपासून दया-करुणा असलेला. इतरांची दुःखे बघून कष्टी होणारा. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली की आपल्या मुलाला जगातली दुःखे बघायला लागू नयेत. पण कितीही झालं तरी मोठं होता होता त्यांच्या दृष्टीस ती पडलीच. त्यांना हे उमगलं की म्हातारपण-आजारपण-मृत्यू हे कोणालाच चुकलेले नाहीत. माणूस सतत सुखाच्या मागे धावतो पण कोणीही कायमस्वरूपी सुखी दिसत नाही. थोडा वेळ सुख प्राप्त होतं पुन्हा माणूस दुःखीच होतो. दुःखच जास्त दिसत आहे. या निरीक्षणातून त्यांनी संसाराचा त्याग करायचा निर्णय घेतला. त्या वेळच्या परिस्थितीनुरूप संन्यस्त वृत्तीने तपश्चर्या करू लागले. पण तपश्चर्या करून खाणेपिणे सोडून, शरीराला त्रास देऊन ज्ञान प्राप्त होणार नाही; उलट वासना बळावतील. शरीर खंगून काही चांगलं करण्याचा मार्गही खुंटेल अशी त्यांची धारणा झाली. त्यामुळे तत्कालीन अध्यात्मिक मतांप्रमाणे तपश्चर्या न करता ते स्वतःचा मार्ग शोधू लागले. त्यातून त्यांना बोध झाला. ते “बुद्ध” झाले. आपल्याला पटलेल्या या मार्गाचा उपदेश करु लागले. सदाचार, नीतिमत्ता, स्वतःच्या मनावर नियंत्रण, गरजांवर नियंत्रण यातूनच माणूस सुख प्राप्त करू शकतो किंवा सुखदुःखांच्या पलीकडे जाऊ शकतो. कर्मकांड, यज्ञयाग, स्वर्गनरक, भ्रमिष्ट कल्पना, उच्चनीचता यातून काही साध्य होणार नाही. हे सांगू लागले. त्यांच्या या विचारांचा परिणाम आजूबाजूच्या सर्वसामान्य लोकांवर होऊ लागला. ब्राह्मण विद्वान, राज्यकर्ते आणि धनिक सावकार अशा सर्व वर्गांमध्ये लोकांवर होऊ लागला. ते बुद्धांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागू लागले. त्यातून बरेच जण त्यांचा मार्ग स्वीकारून संन्यासी/भिक्षू म्हणून सामील झाले. तिथून बौद्ध धर्माची एका संघटित धर्माची स्थापना झाली.आपला हा विचार सर्वत्र पसरावा यासाठी त्यांनी स्वतः चाळीस वर्षे आजूबाजूच्या प्रदेशात भ्रमण केलेच तसेच आपल्या अनुयायांना देखील वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन आपल्या मताचा प्रसार करायला सांगितला. मात्र हा प्रसार शांततेने, प्रेमाने आणि करुणेने करायचा होता. तलवारीच्या जोरावर जबरदस्तीने नाही, पैशाचं वा मदतीचं आमिष दाखवून नाही किंवा चमत्कारांची आशा दाखवूनही नाही. बुद्धांनी घालून दिलेल्या या व्यवस्थेनुसार पुढेही धर्मप्रसार होत राहिला. त्याला राज्यकर्त्यांची साथ मिळाली. त्यामुळे भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, अफगाणिस्तान रशियाचा काही भाग, चीन जपान इतक्या मोठ्या भूभागावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला. त्याचे अनुयायी मोठ्या संख्येने होते. राज्यकर्ते अनुयायी होते. अनेक ठिकाणचा हा प्रमुख धर्म झाला.
गौतम बुद्धांच्या जन्मापासून त्यांचा “बुद्ध” होण्याचा प्रवास व तिथून बौद्ध मत जगभर पसरण्याचा प्रवास हा सगळा लेखकाने पुस्तकात मांडला आहे.पुस्तकात हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की बुद्धांचा विचार हा भारतीयांसाठी पूर्णपणे वेगळा नव्हता . गौतम बुद्धांच्या आधीही भारतात नाना पंथ, नाना विचारपद्धती आणि विविध तत्त्वज्ञाने नांदत होती. कर्मकांड प्रमाण मानणारा पंथ होता तसाच कर्मकांड न मानणारा वेदांतवादी पंथही होता. आचार शुद्धता मानणारा पंथ होता. पण आचरायला सोपा, सुनीतीला महत्त्व देणारा, कर्मकांड टाळणारा असा या तत्त्वज्ञानाचे एकजिनसी मार्ग बुद्धांनी लोकांसमोर मांडला. भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतलाच हा पुढचा टप्पा होता.
देव आहे का नाही? आत्मा आहे का नाही? याबद्दल बुद्धांची मतं आणि तत्कालीन पंडितांची मतं ही कशी वेगळी होती; त्यात वाद (तात्विक चर्चा) कशी झाली याची काही उदाहरणे लेखकाने दिली आहेत. गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना किंवा नवनवीन लोकांना कसा उपदेश केला याची असंख्य उदाहरणे पुस्तकात आहेत. जेव्हा अनुयायांची संख्या वाढली, भिक्षूंची संख्या वाढली तेव्हा त्यांच्यामध्ये योग्य व्यवस्था राहावी यासाठी आचार विचारांचे नियम ठरवायला लागले. काही गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या. काही गोष्टी करायला सांगितल्या गेल्या. या धर्माचं स्वरूप कसं विकसित होत गेलं हा भाग सुद्धा लेखकाने व्यवस्थित समजावून सांगितला आहे.
बुद्ध 2000 हून जास्त वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना जशाच्या तशा माहिती असणं शक्य नाही. म्हणूनच पुस्तक भले इतके पानी असलं तरी त्यात गौतम बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या घटना कमी आहेत. एखादी घटना आणि त्यावेळी झालेली दीर्घ तात्विक चर्चा असं अशी पुस्तकाची निवेदन शैली आहे. त्यामुळे या पुस्तकात चरित्र आणि घटना असा भाग वेगळा काढला तर तो जेमतेम काही पानांचाच आहे. जास्तीत जास्त भाग हा विचार आणि त्यावर केलेली साधक-बाधक चर्चा याचा जास्त आहे. या विवेचनात बऱ्याच तत्त्वज्ञानाच्या संज्ञा येतात त्यातला काही भाग कळतो तर त्यातला बराचसा भाग डोक्यावरून जातो. तो समजून घ्यायला त्या विषयाला वाहिलेलं, प्रत्येक संकल्पना सविस्तर उलगडून सांगणारं पुस्तक वाचावे लागेल हे निश्चित .पण ज्याला गौतम बुद्धांबद्दल व त्यांच्या विचाराबद्दल अगदीच जुजबी माहिती आहे त्याला हे पुस्तक नक्की आवडेल. ज्ञानात भर घालणारा ठरेल.
पुस्तकाच्या शेवटच्या भागात बौद्धा नंतरच्या या गेल्या दोन हजार वर्षात बौद्ध धर्माचा प्रसार वेगवेगळ्या देशांमध्ये कसा झाला सम्राट अशोक, राजा कनिष्क, राजा मीनांडर उर्फ मिलिंद, परदेशी प्रवासी यांचं योगदान त्यात कसं झालं याची थोडक्यात माहिती दिली आहे. ख्रिश्चन धर्म व बुद्ध धर्म, तसेच येशू ख्रिस्त आणि बुद्ध त्यांच्या आयुष्यातल्या घटना यांच्यातली साम्य स्थळ साम्य स्थळ सांगितली आहेत. कदाचित बौद्ध धर्माच्या रूढी परंपराच ख्रिश्चन धर्मियांनी पुढे चालवल्या असा तर्क मांडला आहे.
भारतात कुमारील भट्ट आणि शंकराचार्य यांनी वैदिक धर्म प्रतिपादला. बौद्धमताचे खंडन केले. बौद्धमत आणि वेदांतातील तत्त्वज्ञान यांच्या सामंजस्यातून आर्य वैदिक धर्माला पुन्हा स्थापित केले. एका अर्थाने बुद्धांप्रमाणेच स्वधर्ममत शांततामय आणि संवादमार्गातून प्रस्थापित केले. नियतीचं वर्तुळ पूर्ण झालं. थोडक्यात त्याचा वेध घेऊन लेखकाने विषयाला आणि पुस्तकाला पूर्णत्व आणलं आहे
बुद्धांचा भारतावर व जगावर परिणाम आहे त्यामुळे हे चरित्र अभ्यासणे का महत्त्वाचे आहे ह्या बद्दल उपोद्घात
संसार सोडून जाणाऱ्या राजपुत्राचे मन वळवण्याचा प्रयत्न
तात्त्विक वाद संवादाचं एक उदाहरण
हजारो वर्षांपासून माणूस अनेक प्रश्नांचा शोध घेत आहे. मी कोण? कुठून आलो? कुठे जाणार? कशासाठी जन्म घेतला? मेल्यानंतर काय होणार? मला दुःख का मिळते? मला सुख कसं प्राप्त होईल? माझ्या कर्मांचा खरंच परिणाम होतो का? का सगळं दैवाधीन आहे? अजून कोणीच सिद्ध करता येईल असं उत्तर देऊ शकलेले नाही. प्रत्येक धर्म प्रत्येक विचार पद्धती आपापल्या पद्धतीने त्यांची उत्तरं काय असावीत हे गृहीतक मांडते. प्रत्येक मांडणीत काही गुण असतात काही दोष असतात. आपल्याला जी पटते जी झेपते ती मांडणी मानावी. इतरांनाही सांगावी. ज्याला पटेल तो स्वीकार करेल. हेच आपल्या हाती आहे. माझी मांडणी सर्वश्रेष्ठ असं म्हणून हिंसा करणाऱ्या इस्लामी किंवा ख्रिश्चन धर्मश्रेष्ठतावाद्यांनी आजपर्यंत ना स्वतःचं कायमस्वरूपी भलं केलं ना जगाचं भलं केलं. आजही या घडीला सुरू असलेल्या इजरायल-हमास युद्धाद्वारे व रशिया-युक्रेन युद्धाद्वारे हेच अधोरेखित होतं आहे. त्या तुलनेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला वैदिक धर्म बौद्धांनी शांतता-संवादाच्या जोरावर मागे टाकून स्वतःचा धर्म पुढे आणला आणि त्यानंतर वैदिक विद्वानांनी पुन्हा हा शांततेच्या मार्गातून स्वधर्म स्वमत पूर्ण स्थापना केली हे जगाला दिपवून टाकणारे उदाहरण आहे. बुद्धचरित्रातून जगाने शिकायचा हा सुद्धा मोठा धडा आहे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून काही चरित्रे किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था ह्यांवरच्या इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- आत्म्याचे नाव अविनाश (Aatmyache Nav Avinash) – डॉ. चित्रलेखा पुरंदरे (Dr. Chitralekha Purandare)
- खेळिया – कथा नरेंद्र मोदी नामक झंझावाताची (Kheliya – Katha Narendra Modi Namak Jhanjhavatachi) – सुदेश वर्मा (sudesh Verma) – अनुवादक – सुधीर जोगळेकर
- गरिबीचे अर्थकारण (Garibeeche arthakaran) – अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो (Abhijit V. Banerjee & Ester Duflo) – अनुवाद – अतुल कहाते (Atul Kahate)
- डॉ. हेडगेवार (Dr. Hedgewar) – ना.ह.पालकर (N.H.Palkar)
- थेंबे थेंबे (Thembe thembe) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- दीपज्योतिर्नमोस्तुते (Deepajyotirnamostute) – सुशीला महाजन (Sushila Mahajan )
- प्रदीप लोखंडे, पुणे-१३ (Pradip Lokhande, Pune-13) – सुमेध वडावाला(रिसबूड) (Sumedh Wadawala (Risbud)
- माझंही एक स्वप्न होतं(majhahi ek swapna hota) – वर्गीस कुरियन(Verghese Kurien) (अनुवाद – सुजाता देशमुख)
- मसालाकिंग (Masalaking)- धनंजय दातार (Dhananjay Datar)
- महाराष्ट्राचा चिंतामणी लोकसत्ता विशेषांक (Maharashtracha Chintamani Loksatta Special edition) – संपादक – गिरीष कुबेर (Girish Kuber)
- मी, मनु आणि संघ(Mi, manu ani Sangh) लेखक – रमेश पतंगे (Ramesh Patange)
- लॉरि बेकर (Laurie Baker) – अतुल देऊळगावकर (Atul Deulagonkar)
- लोक माझे सांगाती (Lok maze sangatee) – शरद पवार (Sharad Pawar)
- अनंतानुभव (Anantanubhav) – डॉ. अनंत कुलकर्णी (Dr. Anant Kulkarni) – शब्दांकन – सुधीर जोगळेकर (Sudheer Joglekar)
- विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस (Vivekananda Kendratil Mantaralele Divas) – दिलीप महाजन (Dilip Mahajan)
- अ-मृत पंथाचा यात्री (A-mrut panthacha yatri) – दिनकर जोशी (Dinakar Joshi) अनुवादक – डॉ. सुषमा करोगल (Dr. Shushma Karogal)
- Droupadi Murmu (द्रौपदी मुर्मू) – Kasturi Ray (कस्तुरी राय)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe