पुस्तक – खुलूस (Khuloos)
लेखक – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १९६
प्रकाशन – रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने २०२३
छापील किंमत – रु. ३००/-
ISBN – 978-93-92374-67-8
“वेश्या” हा शब्द किंवा त्याअर्थाचे शब्द सुसंकृत कुटुंबात जाहीरपणे उच्चारले जात नाहीत. चारचौघांमध्ये बोलताना असे शब्द उच्चारले गेले तरी ते बहुतेकवेळा दुसऱ्याला शिवी देतानाच. ते शब्द, तो शरीरविक्रयाचा व्यवसाय आणि तो चालणाऱ्या जागा म्हणजे सभ्य समाजासाठी निषिद्ध बाब. पण गावोगावी अशी बदनाम वस्ती असते हे प्रत्येकालाच ठावूक असतं. सभ्य लोक तिकडे जात नाहीत, सभ्यतेचा बुरखा पांघरलेले लोक तिथे गेल्याचं उघडपणे सांगत नाहीत तर असभ्यांना तिथे गेल्याशिवाय करमत नाही. पण लेखक समीर गायकवाड तिथे गेले आहेत ते वेश्यांचं माणूसपण मान्य करून; ते माणूसपण समजून घेण्यासाठी. त्यातून त्यांना ज्या असंख्य स्त्रिया भेटल्या त्यांचे अनुभव ह्या पुस्तकात शद्बबद्ध केलेले आहेत. पुस्तकात वेगवेगळ्या वेश्यांच्या आयुष्याबद्दल, त्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगांचे वर्णन आहे. लेखकाच्या मनोगतात लिहिलेला हा परिच्छेद पुस्तकात काय वाचायला मिळेल हे सांगतो
“या गोष्टी ज्या स्त्रियांच्या आहेत त्या आता हयात आहेत की नाहीत हे देखील छाती ठोकपणे सांगता येणार नाही या बायका खोट्या नाहीत की यांची दुःख बेगडी नाहीत. त्यांनी स्वीकारलेलं हे आयुष्यही त्यांचं स्वतःचं नाही. जगाने लादलेलं हे बाईपणाचं ओझं त्यांनी अगदी इमानाने असोशीने आयुष्यभर जतन केलंय. त्याची तक्रारही कधी कुठे केली नाही. जरी त्याची कुठे कैफियत केली असती तरी त्याचा काही उपयोग झाला नसता हे कदाचित त्यांना ठाऊक असावं. या गोष्टींमधल्या नायिका जीवनाच्या विविध टप्प्यावर भेटत गेल्या. काही प्रत्यक्ष भेटल्या तर काहींच्या निव्वळ स्मृतींची अनुभूती. तर काहींची चित्तरकथा ऐकीव असली तरी ती काही सांगोवांगीची बात नाही. त्याला आगापिछा आहे, शेंडी-बुडखा आहे. या कथांमध्ये भौगोलिक संदर्भ मात्र नाव बदलून लिहिले आहेत.”
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
ह्या सगळ्या बायका काय तिथे आनंदाने येतात ? स्वखुशीने येतात ? आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळवण्यासाठी मोलमजुरी करताना शरीर झिजवणे किंवा शरीर विकून – झिजवणे ह्यात समाज नैतिक – अनैतिक असा भेद करतो ना ! मग ह्या बायका तिथे आनंदाने कशा येत असतील ? “शरीरविक्रय” करणाऱ्या ह्या बायकांना “बाजारबसव्या” हा हेटाळणीपूर्वक शब्द वापरला जातो. पण त्यांना बाजारात बसायला भाग पडणारा समाजच आहे. ह्या जहाल वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. बहुतेकींना लहानपणीच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच विकलं होतं. गरीबीपोटी उत्पन्नाचं साधन म्हणून ह्या मुलींना धंद्याला लावण्यात आलं. काहीवेळा जवळच्या पुरुष नातेवाईकांनीच शारीरिक अत्याचार केले आणि वर मुलीलाच कुलटा ठरवून घराबाहेर घालवलं आणि ह्या धंद्याकडे ढकललं. “डोक्यात जट आली” ही अंधश्रद्धा सुद्धा पुरेशी होते. काही जणींना मित्राने तर कधी प्रत्यक्ष नवऱ्यानेच फसवून परगावी आणलं आणि जबरदस्ती विकून टाकलं. अशा कितीतरी करुण कहाण्या पुस्तकात आहेत.
बाजारात बसायला लागणे हाच खरा तर दुर्दैवाचा परमोच्च बिंदू असायला हवा. पण ही तर दुर्दैवाची सुरुवात ठरते. शारीरिक अत्याचार, पैशांची फसवणूक, घरादारापासून कायमचं तुटलेपण, व्यसनाधीनता आणि अनाम मरण अशा पुढच्या पायऱ्याही ठरलेल्या. ह्या करुण वास्तवाची जाणीव करून देणारं हे पुस्तक आहे. कामातून मिळणारे पैसे पै पै करत साठवायचे. पण तिथेही चोऱ्यामाऱ्या होऊन लुबाडणूक होते. पैसे साठवून तरी करणार काय ? मग ते पैसे व्यसनात उडवले जातात. देणी, उधारी ह्यांचं दुष्टचक्र सुरु होतं. कधी एखादं गिऱ्हाइक प्रेमाच्या गोष्टी बोलतं, जीव लावतं आणि गोडबोलून पैसे घेऊन पळून जातं. ह्या नादात दिवस गेले आणि बाळाला जन्म द्यायचं ठरवलं तर हाल दुप्पटच. बाळ सांभाळून धंदा करायचाच. नवरा असेल तर तोही मारहाण करून पैसे उकळणार. पोलीस, राजकारणी बडी धेंडं ह्यांची अरेरावी विकृती सुद्धा झेलावी लागते. असे अंगावर शहारे आणणारे प्रसंग पुस्तकात आहेत.
“कुंटणखाना” हेच घर आणि तिथल्या इतर बायका, मालकीण, दल्ले , गिऱ्हाईक हेच आता आपले नातेवाईक, आपले सर्वस्व हे नाईलाजाने मान्य केले जाते. मग इथेच कोणी कोणाची मानलेली बहीण होतं, कुणी आई. एकमेकींना भावनिक आधार देतात. एखाद्या गिऱ्हाइकाच्या प्रेमात पडून दिवस जाऊन कोणी होतं खरं आई. अशा दुसरीच्या मुलांना जीव लावून कोणी पुरवून घेतं आपलं आईपणाचं स्वप्न. ज्या मनाने अजून खमक्या आहेत त्या बनतात इतरांचा आधार. गिऱ्हाईक – दलाल ह्यांच्याकडून होणाऱ्या फसवणुकीत एकमेकांसाठी खंबीर पणे उभं राहून , कधी जीवाची बाजी लावून संकट टाळतात. कधी त्यांच्यातही चालते सुप्त स्पर्धा तर कधी “मालकीण” होण्यासाठीची लढाई. असे बरेच किस्से पुस्तकात आहेत. बाहेरच्या समाजातून वेगळ्या काढून छोट्या समाजात कोंडल्या गेलेल्या ह्या वेश्यांमध्येही दिसतात तेच गुण-दोष-भावना-राग-लोभ. म्हणून त्यांच्यातलं माणूसपण अधोरेखित करणारं हे पुस्तक आहे.
कोरोना काळात सगळं जग बंदी झालं. “स्पर्श टाळा”, “एकमेकांपासून दूर रहा” हे सांगणं म्हणजे वेश्याव्यवसायाला विपरीतच. त्यामुळे ह्याकाळात वेश्यांच्या हलाखीत भरच पडली. काही जणी उपासमारीने मेल्या अशीही काही उदाहरणं पुस्तकात आहेत. गणपती, नवरात्र, ईद, ख्रिसमस ह्या उत्सवांच्या काळात सगळीकडे धामधूम असते. बाजारपेठा सजतात. तशीच चलती असते “चमडीबाजारात” सुद्धा. त्याबद्दलसुद्धा एकदोन लेख आहेत. वेश्यांच्या मुली साहजिक ह्याच धंद्याकडे वळवल्या जातात तर मुलं दलाल, गुंड, व्यसनाशी संबंधित कामात गुरफटली जातात. ह्यावर एक लेख आहे.
एकूण वास्तवच भयाण असल्याने पुस्तकाचं वाचन आपल्यालाही अस्वस्थ करतं. पण त्या अंध:कारात प्रकाशाची तिरीप असावी असे दोन लेख आहेत. काही स्वयंसेवी संस्था ह्या वेश्यांना मदत मिळावी, त्यांच्या मुलांनी ह्या बाजारातून बाहेर पडावं, फसवणूक झाली असेल तर न्याय मिळावा, थोडंफार शिक्षण मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत आहेत. एनजीओ च्या कामाचं एक यशस्वी उदाहरण “एक कळी वाचली” लेखात आहे. तर गुजराथ मधील प्रसिद्ध संत व प्रवचनकार “मुरारीबापू” ह्यांनी वेश्यांना सनामनापूर्वक वागणूक कशी दिली ह्यावरही एक लेख आहे.
पुस्तकाची काही पाने उदाहरणादाखल
कोठीची मालकीण पन्नीबाई आणि तिथे धंदा करणाऱ्या सुरखी चं हे वर्णन. एकदा धंद्यात पडलं की त्याचे छक्केपंजे समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.
नलिनी गरीब घरी जन्माला आली. लहानपणी आई वारली. सावत्र आईने छळ केला. वडिलांनी तिला काकाकडे – सिद्धू – कडे पाठवलं. पण अवस्था आगीतून फुफाट्यात. दारिद्र्य आणि नीतिहीन कुटुंब ह्यामुळे मुली ह्या धंद्यात कशा ढकलल्या जातात ह्याचं प्रातिनिधिक उदाहरण
शकीला आणि नसीम ह्या आईमुली. दोघीही धंदा करणाऱ्या. नसीम ला शंका आली की आईला पैसे मिळतात पण तिच्याकडे तेवढी शिल्लक नाही. ती कोणाला देते ? मुलीने आईचा पाठलाग केला आणि तिला दिसलं वेगळंच सत्य. तिला दिसलं आपल्या आईमधलं मातृप्रेम
लेखकाच्या शैलीने पुस्तकातलं गांभीर्य, दैन्य यथार्थ टिपलं आहे. तरी पुस्तक रुक्ष सरकारी अहवाल होत नाही. ह्याचं कारण लेखकाची शैली खेळकर, कधी विनोदी तर कधी नागवं सत्य मांडायला आवश्यक अशी रोखठोकच. अश्लील वर्णन कुठे नसलं तरी नक्की काय होतं आहे ह्याचा थेट भाव पोचतो. लेखांचा शेवट बहुतेक वेळा एका साहित्यिक-ललित अंगाने त्या प्रसंगाचे अमूर्त वर्णन करत केलेला आहे.
आपल्या समाजाचा एक भाग कसा आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने हे वाचलंच पाहिजे. ह्या वाचनातून वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन माणुसकीचा तरी होईल. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार मदतीचा हातही पुढे करावासा वाटेल. तितकं झालं तरी हे पुस्तकाचे लेखक – प्रकाशक ह्यांच्या कामाचं चीज झालं असं म्हणता येईल.
शेवटी पुस्तकाबद्दल लेखकाचे शब्दच उसने घ्यायचे तर ..
“खुलूस” म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था, निष्ठा … किटाळ ठरवून समाज ज्यांचा तिरस्कार करतो, त्यांच्यातील निर्मळ सच्चेपणाचा धांडोळा घेणाऱ्या या रेड लाईट डायरीज …”
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link