पुस्तक – मोरबांगडी (Morbangadi)
लेखिका – डॉ. छाया महाजन (Dr. Chhaya Mahajan)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १६२
प्रकाशन – एक दिशा मन्वंतर पब्लिकेशन. १९९३
छापील किंमत – रु. २६६/-
ISBN – 978-81-950433-6-1
सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजात घडणाऱ्या कौटुंबिक घटना, बोलले जाणारे आणि टाळले जाणारे विषय, त्यात गेल्या काही वर्षांत झालेले बरेवाईट बदल, आणि हे बघत असताना संवेदनशील मनात जी विचारांची आवर्तने उठतात त्याचे शब्दांकन म्हणजे “मोरबांगडी” हे ललित गद्य. ह्यात १९ लेख आहेत. एकेक लेख साताठ पानी आहे. विषय वेगवेगळे आहेत. एक मुख्य विषय घेऊन त्या अनुषंगाने मनात येणारे विचार, आयुष्यात घडलेल्या घटना, दुसऱ्यांकडून ऐकलेले किस्से लेखात येतात. मग त्या घटनेतल्या व्यक्तीच्या मनात डोकावण्याचा थोडा प्रयत्न आणि त्यातून परिस्थितीचा साधकबाधक विचार आहे. काही वेळा, एका गोष्टीचा विचार करताना आलेली आठवण, त्यातून दुसराच विचार, तिसराच किस्सा असा लेखाचा ओघ आपल्या अचपळ मनाचे दर्शनही घडवतो.
पहिलाच लेख “हिशेब”. ह्यात लेखिकेच्या लहानपणी त्यांच्या आजोबांच्या हाताखाली काम करणाऱ्या नानामामांचे व्यक्तिचित्रण आहे. स्वभावाने प्रेमळ पण बुद्धीने हिशेबात कच्चे. घरचा शेतमाल घेऊन विकायला बाजारात जाऊन विकण्याची जबाबदारी त्यांची. हिशेबात चुकले की आजोबांची बोलणी खायचे. मोठ्या माणसाने बोलणी खावी ह्याचं मुलांना अप्रूप वाटायचं. हा पैशाच्या हिशेबाचा किस्सा. मग “हिशेब” ही संकल्पना घेऊन, वेळेचा हिशेब, आयुष्याचा हिशेब असा तिचा विस्तार लेखिका करते. “भोळसट रंगाबाबाची पोरगी भामट्याने फितवली”, “अवेळी प्रेमात पडून छबीने आत्महत्या केली ” ह्यातून आयुष्याचा हिशेब चुकल्याचे दाखले आहेत. पुढे ह्या सगळ्या घटना बघताना स्वतःच्या मनात काय विचार आले होते, आपल्या स्वतःच्या आयुष्याचा हिशेब जमला आहे का असा आत्मसंवाद रंगला आहे.
“नमस्कार” – मोठ्यांना, गुरुजनांना नमस्कार करणे ही आपली संस्कृती. त्यात आदर, सन्मान ही भावना असते. त्याला प्रतिसाद म्हणून समोरच्याकडून आशीर्वाद येतो. पण हल्ली वाकून नमस्कार करायची पद्धत कमी होते आहे. नव्या पिढीला मोठ्यांना नमस्कार करायची लाज वाटते, अवघडल्यासारखं वाटतं. नमस्काराबद्दल विचार करताना लेखिकेच्या लहानपणी, नवविवाहितेने शेजारी मोठ्यांना नमस्कार केला नाही म्हणून घरात झालेली वादावादी आठवली. तर आता मुलं देवालाही नमस्कार करायला टाळाटाळ करतात इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत हे जाणवतंय.
“अलिप्त” ह्या लेखात शहरातल्या आणि गावाकडच्या लोकांच्या मनोवृत्तीतला फरक मांडला आहे. शहरात राहणारे, नावाजलेले मान्यवर कार्यक्रमाच्या निमित्ताने, सत्काराच्या निमित्ताने छोट्या गावांमध्ये येतात. तिथल्या लोकांचा आदरसत्कार घेतात. अगदी घरच्यासारखे मोकळेपणाने रहातात. मात्र हेच शहरी लोक स्वतःच्या शहरी आलेल्या, घरी आलेल्या लोकांचे स्वागत करण्यात कोतेपणा करतात, प्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. ह्याचे लोकांनी सांगितलेले अनुभव लेखात आहेत.
“हरवण्याचं दुःख” मध्ये घरात ठेवलेले पैसे हरवले आणि त्याची शोधाशोध ह्याची धमाल आहे. पैसे हरवले तर ते आता कायमचे गेले हे स्वीकारून पुढे जाण्याचा सल्ला एक पोक्त व्यक्ती देते. त्यातून “हरवणे” ह्या कल्पनेचा विस्तार करत अकाली मृत्यूमुळे प्रेमाची व्यक्ती “हरवण्याचं दुःख” मांडलं आहे.
“रातराणी” लेख नववर्ष स्वागताबद्दलचा आहे. ३१ डिसेंबरची रात्र लोक नाचत, गात आनंदाने साजरी करतात. नवीन वर्षाचं उत्साहाने, जल्लोषात स्वागत करतात. ३१ डिसेंबर हा काही आपला पारंपरिक सण नव्हे, तो साजरा करण्याची पद्धतही पाश्चात्य. पण आपण ते मनापासून स्वीकारलं आहे. कुठल्याही धार्मिक सणांमध्ये, रीतीरिवाजांपेक्षा खूप वेगळेपणा ह्यात आहे. मोकळेपणे, सर्वांगाने नाचण्याची, चित्कार करण्याची, स्वतःचा असा स्वीकार करण्याची मुभा ३१ डिसेंबरची रात्र आपल्याला देते. हे वेगळेपण लेखिकेने अधोरेखित केलं आहे.
काही पानं उदाहरणादाखल.
साबणाचे फुगे उडवण्याच्या खेळण्यामागची तात्विक दृष्टी


लहान मुलाला घेऊन पहिला विमान प्रवास करताना उडालेली तारांबळ आणि मदतीचा हात


आपत्ती व मानवाचे त्यातून सावरणे ह्याबद्दलचे चिंतन


असे खूप वेगवेगळे लेख ह्यात आहेत. मजेशीर किस्से, भावनिक चिंतन ह्यातून सगळे लेख वाचनीय झाले आहेत. बहुतेक लेख हे स्मरणरंजन करणारे (नॉस्टॅल्जीक), “गेले ते दिन गेले” अशा स्वरूपाचे आहेत. थोडे उदासवाणे, मानवी हतबलता दाखवणारे आहेत. मराठी भाषेतले वाक्प्रचार, हल्ली कानावर कमी पडणारे शब्द इथे वाचायला मिळतात. अगदी कमी वाक्यांत नेपथ्य उभं करण्याची हातोटी लेखिकेची ताकद दाखवते. सुंदर उपमा आणि वर्णनं ह्यातून नेमके भाव वाचकांपर्यंत पोचतात. त्यामुळे सकस भाषेतले पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतो.
“पाऊस” – लेखिकेच्या लहानपणी गावात पाऊस पडून गेल्यावर चांदणं पडलं असेल तर बैलगाडीतून सगळे चांदणी रात्र बघायला बाहेर पडत. त्याचं वर्णन लेखिका करते “नांगरटीमुळे शेतात छोट्या छोट्या खड्ड्यांत थोडं थोडं पाणी साचलेलं असायचं. त्यात चांदण्याची प्रतिबिंब पडायची. शेतभर, मातीच्या पणत्यांत पाण्याचं तेल असायचं आणि चांदण्या ज्योती होऊन त्यावर नाचायच्या. त्या जमिनीतल्या पणत्या तेऊन उठायच्या. दिवाळीची आरास फिक्की पाडावी”. व्वा ! काय विलक्षण उपमा.
“ऊन” लेखातला प्रसंग. लेखिकेचे आजोबा लहान मुलांना मुद्दामून उन्हातून बाहेर फिरायला पाठवायचे. त्यावर रागावलेल्या आजीला त्यांचं सांगणं असायचं “घरादाराचा उन्हाळा होतो. म्हणून पोरांनी ऊन पाहावं. आपल्या डोक्यावर सावली आहे तोवर ठीक आहे. पण छप्पर गेलं आणि उन्हाळाच डोक्यावर आला तर तयारी असावी”. आजोबांचं हे परखड काव्य आजीला अभद्र वाटलं. ती म्हणाली, “छप्पर असताना मोठाल्या खिडक्या-दारांतून ऊन कळत नाही की काय? त्यासाठी छप्परच नको उडायला, डोळे उघडे असले की झालं”.
“दुपार” ह्या लेखात वर्णन आहे की.. सकाळची कोवळीक कणाकणानं बदलते आणि होते दुपारची प्रौढा. ही प्रौढा प्रत्येकाची आहे …दुपार आणि झोप हे समीकरण आहे. सकाळपासून केलेल्या कामानं थकलेलं मन आणि शरीर या प्रौढीची वाट पाहतं. जसं वाक्य लिहिताना लागणार स्वल्पविराम, तशी ही दुपार. दुपारची विश्रांती हा खरा स्वल्पविरामच. खरी झोप नव्हे. दुपार हे मानाचं अंगण आहे. स्वतःचं हक्काचं तिथे ते एकटं बागडतं”
अशी कितीतरी सुखावणारी, टोचणारी, गुदगुल्या करणारी पण थेट भिडणारी वाक्यं आणि वर्णनं वाचनाचा आनंद द्विगुणित करतात.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर लेखसंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- अहिराणी गोत (Ahirani Got) – डॉ. सुधीर रा. देवरे (Dr. Sidhir R. Deore)
- आघाडीचे महिला नेतृत्व (Aaghadiche mahila netrutv ) – सुधा मेनन (Sudha Menon)- अनुवाद : सुमिता बोरसे (Sumita Borase)
- गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil) – राजेंद्र बनहट्टी (Rajendra Banahatti)
- चिकन सूप फॉर सोल(Chicken soup for soul) – जॅक कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन
- चित्तर-बित्तर (Chittar-Bittar) – सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
- चार्वाक (Charvak) – सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar)
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) – गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
- जमात ए पुरोगामी (Jamat E Purogami) – डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे (Dr. Satchidanand Shevde & Dr. Pareexit Shevde)
- झुळूक अमेरिकन तोऱ्याची ( Jhuluk Amerikan toryachi) – शरद वर्दे (Sharad Varde)
- फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
- बोलगप्पा (Bolgappa) – शरद वर्दे (Sharad Varde)
- बायकांत पुरुष लांबोडा (Baykant Purush Lamboda) – डॉ. शंतनू अभ्यंकर (Dr. Santanu Abhyankar)
- बे दुणे पाच (Be dune pach) – सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
- माझी जन्मखेप (Mazi Janmkhep) लेखक – मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste)
- रामकथामाला (Ramkathamala) – दीपाली नरेंद्र पाटवदकर (Deepali Narendra Patwadkar)
- वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाईस (Vatsalavahinincha Adhunik advhais) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link



