पुस्तक – सुगंध गमावलेला मोगरा (Sugandh gamavalela mogara)
लेखक – बेन्यामिन (Benyamin)
अनुवादक – ए आर नायर , जे ए थेरगावकर (A.R.Nair, J.A. Thergaonkar)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तकाची भाषा – मल्याळम (Malayalam)
मूळ पुस्तकाचे नाव – मुल्लपू निरमुल्ल पकलुगल (Mullappoo Niramulla Pakalukal )
इंग्रजी अनुवादाचे नाव Jasmine Days (जस्मिन डेज )
इंग्रजी अनुवादकाचे नाव – शहनाज हबीब (Shahnaz Habib)
पाने – 208
प्रकाशन – अनघा प्रकाशन. एप्रिल २०२१
ISBN – दिलेला नाही
छापील किंमत – २७५/-

ह्या पुस्तकाचे अनुवादक श्री. थेरगावकर ह्यांचं “मस्रा” पुस्तकाचं परीक्षण मी लिहिलं होतं. (https://learnmarathiwithkaushik.com/courses/masra-aadujeevitham-goat-days/) त्यांनंतर माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तेव्हा त्यांनी मला हे पुस्तक भेट दिलं. वाचनीय पुस्तकाची ही भेट दिल्याबद्दल ह्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो.

उत्तर आफ्रिकन देश ट्युनिशियामध्ये २०१०-११ साली खूप मोठं जनआंदोलन झालं. देशावर सुमारे 25 वर्ष राज्य करणाऱ्या हुकूमशाच्या विरुद्ध लोकशाहीवादी असे हे आंदोलन होतं . सर्वसामान्य लोकांनी केलेलं संप, बंद, मोर्चे, आत्मदहन अशा घटनांनी यांनी देशव्यापी स्वरूप घेतलं. शेवटी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला पायउतार व्हावं लागलं. ट्युनिशियाचं राष्ट्रीय फूल असलेल्या मोगरा अर्थात इंग्लिश मध्ये “जस्मिन” यावरून या क्रांतीला “जस्मिन रिव्होल्यूशन” असं म्हटलं गेलं ट्युनिशियाच्या आंदोलनाचं लोण आजूबाजूच्या अरब देशांमध्येही पसरलं. तिथेही सत्ताधाऱ्याविरोधात मोठी मोठी आंदोलन झाली. बऱ्याच देशातल्या सत्ताधीशांना, हुकूमशहांना पायउतार व्हावं लागलं. देश सोडून पलायन करावं लागलं. हा पूर्ण घटनाक्रम “अरब स्प्रिंग” नावाने ओळखले जातो. वरवर पाहता सर्वसामान्य लोक विरुद्ध हुकूमशहा असा हा लढा दिसतो. पण त्यात खोलात जाऊन बघितलं एकाच धर्मातल्या दोन पंथियांमधली घृणा, स्थानिक विरुद्ध उपरे, लोकशाहीवादी विरुद्ध इस्लामशाहीवादी, स्थानिक सत्ताधीश विरुद्ध बाहेरच्या देशांचे हस्तक असे वेगवेगळे ताणेबाणे आपल्याला दिसतील. ज्या देशात अशा क्रांती घडल्या तिथे सत्तांतर झालं तरी अपेक्षित शांतता व स्थैर्य आलेलं नाही. उलट बरेच देश हुकूमशाहीपेक्षा वाईट अवस्थेतल्या यादवी युद्धात ढकलले गेले. जे लोक हुकूमशाविरुद्ध एकत्र आले तेच नंतर एकमेकांचा गळा घोटण्यासाठी उद्युक्त झाले. क्रांती अर्धवट राहिली किंवा भरकटली. या सगळ्या घटनांचा राजकीय, सामाजिक, भूराजकीय आर्थिक अशा वेगवेगळ्या अंगांनी विचार केला जाऊ शकतो. तशा डॉक्युमेंटरी व लेख सुद्धा उपलब्ध असतील. पण या घटना घडत असताना त्या देशात राहणारा एक सर्वसामान्य माणूस काय अवस्थेतून जात असेल; कसा विचार करत असेल; हा सुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे. लेखक बेन्यामिन यांनी या मानवी पैलूतून अरब स्प्रिंग कडे बघितलं आहे.

इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार बेन्यामिन हे भारतीय मल्याळम असून. बरेच वर्ष आखाती देशात राहिले आहेत. त्यामुळे तिथल्या अनुभवांवर आधारित पुस्तक त्यांची प्रसिद्ध झाली आहे याआधी मी वाचलेलं “मस्रा” हे पुस्तक सुद्धा सौदी अरेबिया मधले वर्णन असणारे चित्तथरारक पुस्तक होतं. “सुगंध गमावलेला मोगरा”चं कथानक अशाच एका अरब देशात घडत आहे. देश आणि शहर लेखकाने निनावी ठेवलं आहे. कथेची नायिका आहे एक पाकिस्तानी तरुणी जी रेडिओ आरजे/निवेदिका म्हणून काम करते आहे. तिचे वडील आणि बरेच चुलते अनेक वर्षांपासून या देशात काम करतायत. काही काकू आणि बरीच चुलत भावंडं असा गोतावळा तिकडे आहे. मोठी झाल्यावर ती सुद्धा नोकरीच्या निमित्ताने या देशात आली आहे. आखाती देशांमध्ये भारतीय लोक सुद्धा कामाला आहेत त्यातही मल्याळी लोकांचा भरणा जास्त, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे समीरा काम करत असलेल्या रेडिओ स्टेशन मध्ये “मल्याळी सेवा” आणि “हिंदी सेवा” आहे. पाकिस्तानी समीराला थेट हिंदुस्थानी व्यक्तींबरोबर काम करताना सुरुवातील जड जातं. पण हळूहळू सगळं सुरळीत होतं. तरीही त्यातून मल्याळी ग्रुप आणि इतरांचा ग्रुप ह्यात सुप्त चढाओढ असतेच. ह्याचं रंजक वर्णन पुस्तकात आहे.

पाकिस्तानातून येथे आल्यावर नवीन शहराशी नवीन वातावरणाशी ती स्वतःला जुळवून घ्यायचा प्रयत्न करते आहे. नवीन मित्र जोडते आहे नवीन ओळखी करून घेते आहे. मुलींनी अनोळखी पुरुषांशी बोलण्याला गप्पा मारण्याला तिच्या घरच्यांची अडकाठी आहे. तरी घरच्यांना थोडं फसवून चकवून तिने एक म्युझिक क्लब जॉईन केला आहे ज्यात स्थानिक आहेत आणि स्थलांतरित पण आहेत. त्यातून तिला इथल्या समाजाच्या वैविध्याची जाणीव होते आहे.

जुळवून घेता घेता तिच्या लक्षात येतंय की वरवर शांत दिसणारा देश आतून खदखदतो आहे. वरवर एकसंध दिसणारा समाज आतून दुभंगलेला आहे. इस्लामी देश असला तरी सुन्नीपंथीयांची इथे राजवट आहे. शिया समाजाला दुय्यम, काफीर, तुच्छ लेखले जाते. तिच्या शिया मित्रांच्या ओळखीतून तिला कळतं की हा देश एकेकाळी शियांचा होता. पण सुन्नी राजवट आल्यानंतर शियांवर दडपशाही होते आहे. शिया त्याविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत आहेत. एकूणच सत्ताधीश हा हुकूमशहा आहे, भ्रष्टाचारी आहे, माजलेला आहे; लोकांना विकासाच्या संधी कमी आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, भ्रष्टाचारी शासन विरुद्ध सुशासन. असाही दुभंग आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश आणि इतर अनेक देशांतून लोक इथे कामाला आलेले आहेत. पोलिसात आहेत. स्थानिक लोकांवर सरकारचा विश्वास थोडा कमी आहे त्यामुळे परकीय भाडोत्री लोकांच्या आधारावर हा हुकूमशा आपलं राज्य चालवतो आहे. परदेशी लोक इथे येऊन खूप कमावतायत. त्यातून देशी विरुद्ध परदेशी अशी दरी निर्माण झालीये. नायिकेच्या -समीराच्या – नजरेतून जसं आपण बघत जातो तसतशी आपल्याला क्रांतीची बीजे आपल्याला दिसू लागतात.

पुस्तकाच्या पुढच्या टप्प्यात लोकांची आंदोलने सुरू होतात. दंगेधोपे होतात. रोजचं जगणं, कामावर जाणं चालू ठेवायचं चालू ठेवायचं म्हणजे संकटांचा सामनाच. दंगलखोर कधी गाड्या अडवतील, हुकूमशहाला मदत करणाऱ्या परदेशी व्यक्ती म्हणून कधी घातपात होईल सांगता यायचं नाही. शिया-सुन्नी वाद सुद्धा त्यांच्या ऑफिसपर्यंत मित्रमंडळीच्या टोळीपर्यंत येऊन पोहोचतो. रेडियोच्या कामामध्ये सेन्सॉरशिप लादली जाते. क्रांतीचे चटके तिला थेट समीराला बसायला लागतात. शिया मित्रांशी बोलल्यावर तिला त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या अत्याचाराच्या हृदयद्रावक कहाण्या समजतात. कोण चूक? कोण बरोबर? आपण परदेशी नागरिक म्हणून यात पडायचं का? अन्यायाला विरोध करण्यात सामील व्हायचं का व्यवस्थेला साथ देऊन आपला नोकरीधंदा टिकवायचा ? असे कितीतरी द्विधा अवस्थेत टाकणारे प्रसंग तिच्यासमोर येतात. कादंबरीच्या पुढच्या टप्प्यावर क्रांतीही पुढचा टप्पा गाठते. आंदोलनाचे स्वरूप हिंसक होतं तसं हुकूमशाचं उत्तरही हिंसक होतं. या सगळ्याचा थेट परिणाम तिच्या कुटुंबीयांवर होतो. तिला एका दुर्दैवी परिस्थितीला सामोरं जावं लागतं.

या प्रसंगात तिला आपल्या घरातल्या दुभंगाची सुद्धा जाणीव होते. या देशातच जन्माला आलेल्या चुलत भावंडांचे आणि तिचे विचार वेगळे आहेत. बरीच वर्षे इथे राहिलेल्या इथल्या पगाराला सरावलेल्या आपल्या काकवा आणि पाकिस्तानात राहणारी आपली आई यांच्यात फरक आहे. इथे मरमर कष्ट करून पै पै जमवणारे वडील आणि त्याच पैशांवर पाकिस्तानात आपल्या गावी मजेत राहणारी तरी वर वडिलांचाच दुस्वास करणारी आई यांच्यातही किती फरक आहे.

अशा असंख्य ताण्याबाण्यांची वीण लेखकाने अगदी कमी पानांत आपल्यासमोर उभी केली आहे. त्यातून समीरा स्वतःला सावरेल का? कोण चूक, कोण बरोबर हे ती ठरवू शकेल का? एकाची बाजू घेऊ शकेल का? हे समजून घेण्यासाठी तुम्ही ही कादंबरी अवश्य वाचा. पुस्तक वाचता वाचता आपसूकच समीरच्या जागी स्वतःला ठेवून आपणही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत राहतो. हे कादंबरीचं बलस्थान आहे.

काही पाने उदाहरणादाखल

परदेशात राहायला आल्यावर आपले वडील इथे कसे काटकसरीने जगत होते याची झालेली जाणीव

ऑफिसमध्ये समीरची ओळख अलीशी होते. आणि त्यातून शियासुन्नीवादाची झालेली तोंड ओळख


दंगलीला तोंड फुटल्यावर स्थानिक विरुद्ध परके अशा वादाची बसलेली झळ

पुस्तकात मुद्रितशोधनाच्या बऱ्याच चुका राहिल्या आहेत. अनुवाद पण अजून थोडा नैसर्गिक करता आला असं वाटतं. पण कादंबरीतल्या प्रसंगांच्या वेगामुळे आपण त्या चुकांमध्ये फार अडकून पडत नाही. कादंबरीतला प्रत्येक प्रसंग महत्वाचा आणि कथानक पुढे नेणारा आहे. विनाकारण वर्णनांचा फापटपसारा नाही. एक भारतीय मल्याळी लेखक, अरबी देशांवर आधारित कथानक, पाकिस्तानी व्यक्ती आणि त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद असं हे विलक्षण मिश्रण ह्या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर आलं आहे. पुस्तक मल्याळममध्ये आणि इंग्रजीमध्ये खूप गाजलं आहे नायर-थेरगावकर या द्वयीने आपल्यासाठी हे पुस्तक मराठीत आणलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मराठी वाचकांमध्ये सुद्धा हे पुस्तक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्हायला हवं असं मला मनापासून वाटतं.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe