पुस्तक – टाटा एक विश्वास (Tata Ek Vishwas)
लेखक – माधव जोशी (Madhav Joshi)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २२४
प्रकाशन – मोरया प्रकाशन. जानेवारी २०२४
ISBN – 978-93-92269-49-3
छापील किंमत – रु. ३००/-

२० जानेवारी २०२४ ला डोंबिवलीत माधव जोशी ह्यांच्या “टाटा एक विश्वास” पुस्तकाचं प्रकाशन उदय निरगुडकर आणि श्रीकांत बोजेवार ह्यांच्या हस्ते झालं. ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. तिथेच पुस्तक विकत घेऊन लेखकाच्या स्वाक्षरीने प्रत मिळाली.

माधव जोशी हे नाव कॉर्पोरेट क्षेत्रात प्रसिद्ध आहेच. डोंबिवलीकर असल्यामुळे डोंबिवलीत ते विशेष प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या सामाजिक आणि कलाविषयक उपक्रमांचे आयोजक म्हणून.. इतरांनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांचा मुक्त आस्वादक म्हणून. त्यांच्याबद्दल अधिक माहिती पुस्तकात पुढील प्रमाणे दिली आहे.

मागच्या वर्षीच त्यांचं “माझी कॉर्पोरेट दिंडी” पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्याचं मी लिहिलेलं परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल.
https://learnmarathiwithkaushik.com/courses/majhi-corporate-dindi/

“टाटा” हे नाव भारतातल्या अनेक पिढ्यांना परिचित नाव. “नमक हो “टाटा”का, टाटा नमक” असं म्हणत आपल्या जेवणातलं मीठ टाटांचं असतं. “टाटा स्टील” द्वारे बांधकाम आणि उद्योगांत पोलाद त्यांचं असतं. इंडिका, सुमो, नेक्सॉन सारख्या गाड्या त्यांच्या असतात. छोटीशी “नॅनो” त्यांची असते तर मोठमोठाले ट्रक त्यांचे असतात. लाखो उच्चशिक्षितांना वाव देणारी आयटी क्षेत्रातली “टीसीएस” आहे. तर आलिशान वास्तव्याचा आनंद देणारी “ताज” हॉटेल्स त्यांची आहेत. … किती नावं सांगायची
ही जशी कंपन्यांची व उत्पादनांची नावं मोठी तशीच टाटांनी सुरु केलेल्या सामाजिक संस्थांची यादी पण मोठी
टाटा सामाजिक विज्ञान संस्था ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस TISS ), टाटा मूलभूत संशोधन संस्था(Tata Institute of Fundamental Research); एखाद्याला केमो थेरपीसाठी “टाटा” ला जावं लागतं असं म्हटलं की आपल्याला काळजीत पडणारी “टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालय” असो किंवा नावात टाटा नसलेल्या “राष्ट्रीय” संस्था NCPA, राष्ट्रीय विज्ञान संस्था (IISc) असो. कितीतरी.

जमशेदजी टाटा, जे. आर.डी टाटा आणि रतन टाटा हे प्रमुख सर्वसामान्यांना सुद्धा आदरणीय, अनुकरणीय आणि लोभस वाटणारी व्यक्तिमत्त्व. म्हणूनच पुस्तकाचं समर्पक नाव आहे “टाटा” – एक विश्वास. टाटा समूहाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या वाटचालीचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. समूहाच्या प्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वांची ह्यात ओळख करून दिली आहे. त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, सुरु केलेल्या नव्या कंपन्या, आपल्या संपत्तीचे उदार हस्ते केलेले दान, सुरु केलेले सामाजिक काम ह्याची माहिती आहे. दीडशे वर्षांचा हा कालखंड आहे. अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक उलथापालथी ह्यात झाल्या. १८६८ मध्ये पारतंत्र्याच्या काळ होता. इंग्रज काही स्थानिक उद्योगांच्या बाजूचे नव्हतेच. महायुद्धे झाली. फाळणी झाली. स्वातंत्र्य मिळाले तरी समाजवादी-नियंत्रणवादी अर्थनीती उद्योगस्नेही नव्हती. १९९१ साली आर्थिक उदारीकरण झाले. विदेशी कंपन्यांची तीव्र स्पर्धा तयार झाली. पुढे आयटी युग आले. आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI चे युग आले. ह्या सगळ्या चढउतारांतसुद्धा टाटा समूह टिकलाच नाही तर वाढला. नवनवीन क्षेत्रांत कंपन्या उभ्या करत राहिला. ह्या प्रवासाबद्दल आपल्याला पुस्तकातून छान समजून येईल.

टाटा समूहात अनेक कंपन्या आहेत. वेळोवेळी त्याचं नेतृत्व “टाटा” आडनाव नसलेल्या व्यक्तींनीसुद्धा केलेलं आहे. त्यातले अनेक टाटांइतकेच कर्तबगार, आपला ठसा उमटवणारे होते. त्यापैकी जे. आर. डी. टाटांच्या वेळच्या रुसी मोदी, दरबारी सेठ, सुमंत मुळगावकर, अजित केरकर, नानी पालखीवाला ह्यांच्या कारकीर्दीचा मागोवा सुद्धा पुस्तकात घेतला आहे.

जे. आर.डी टाटा आणि रतन टाटा ह्यांची कारकीर्द कित्येक दशकांची. त्यामुळे त्यांच्याबद्दल मजकूर साहजिकच जास्त आहे. उद्योगाचा इतका मोठा डोलारा सांभाळायचा म्हटल्यावर मतमतांतरे, कुरबुरी आणि वाद होणारच. निवेदनाच्या ओघात लेखकाने त्याबद्दल सुद्धा थोडं लिहिलं आहे. वर नावं लिहिलेले कंपनी प्रमुख आणि काही इतर “जे आर डीं”च्या काळात जणू स्वतंत्र संस्थानिक झाले अशी लोकांची तक्रार असायची. रतन टाटा आल्यावर त्यांना अशा प्रस्थापितांचा विरोध सहन करावा लागला. रतन टाटा ह्यांनी त्यात बदल घडवून समूहाला वेगळ्या शिस्तीत आणलं. ह्याबद्दल थोडी माहिती मिळते. रतन टाटा पायउतार झाल्यावर सायरस मिस्त्री प्रमुख झाले. पण टाटा-मिस्त्री वाद गाजला. तो घटनाक्रम नक्की काय होता ह्यावर सुद्धा एक प्रकरण आहे.

“नीरा राडिया टेप्स” , “टू जी घोटाळा” ह्यात टाटांचं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. टाटांना संसदीय चौकशी समितीसमोर जावं लागलं. न्यायालयीन खटला लढावा लागला. आणि त्यातून टाटा समूह सहीसलामत बाहेर पडला. ह्यावेळी टाटा समूहातले कायदेविषयक अधिकारी म्हणून खुद्द लेखक माधव जोशी ह्यांचा सहभाग होता. त्याचा अनुभव लेखकाने आपल्याशी शेअर केला आहे.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर उल्लेख आहे “टाटा-डोकोमो”चा. जपानच्या “डोकोमो”शी करार करून टेलिकॉम कंपनी स्थापन झाली. पण तो उद्योग फायदेशीर ठरला नाही. त्यामुळे करारानुसार टाटा समूह डोकोमोला ७६०० कोटी रुपये देणं लागत होता! टाटा समूह द्यायलाही तयार होता. पण सरकार आणि रिझर्व्ह बँक इतकं परकीय चलन देशाबाहेर पाठवायला तयार नव्हते. तेव्हा “आमचं सरकार परवानगी देत नाही” असं म्हणून गप्प न बसता उलट न्यायालयीन खटल्यात टाटांनी डोकोमोची बाजू घेतली. आणि पैसे “देण्यासाठी” भांडले. आणि पैसे “दिले”. ७६०० कोटी ! “टाटा” म्हणजे विश्वास हे शब्द सार्थ ठरवणारे असे दोन तीन खास किस्से पुस्तकात आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आणि नंतर रतन टाटांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि नेतृत्व ह्यावर एक लेख आहे.

ह्या पूर्ण पुस्तकात उद्योगाची वाढ ह्याच बरोबरीने सामाजिक काम कसं सुरू झालं हे प्रसंगोपात येतंच. तरी “टाटा ट्रस्ट” करत असलेल्या कामांवर एक स्वतंत्र लेख आहे.

रतन टाटांनी म्हटलं आहे कि जे. आर. डीं व्यतिरिक्त त्यांच्यावर वर प्रभाव पडणाऱ्या दोन व्यक्ती आहेत – “बोस” कंपनीचे अमर बोस आणि “कमिन्स” कंपनीचे हेन्री शॅच. त्यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे.

पुस्तकातली काही पाने उदाहरणादाखल

अनुक्रमणिका

पोलाद कंपनी काढावी हे जमशेदजी टाटांचं स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकलं नाही. ते त्यांच्या मुलाने दोराबजी टाटा ह्यांनी पूर्ण केलं. वडिलांसारखेच कर्मचारीस्नेही राहून. आणि दानशूरपणा करून. त्याची एक झलक


लॅक्मे हा सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड सुद्धा टाटांनीच सुरु केला. लॅक्मे म्हणजे फ्रेंच भाषेत लक्ष्मी. हे मला ह्या पुस्तकात कळले. नाजूक सौंदर्यवतींसाठी “लॅक्मे” आणि रांगड्या ट्रक चालकांसाठी “टेल्को” !


टूजी विवाद


ट्रस्ट चे थेट काम

असं माहितीने भरलेलं पुस्तक आहे. ह्यातलं एकेक व्यक्तिमत्त्व, एकेक कंपनी, एकेक संस्था हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. हे सगळं एका पुस्तकात मांडताना मर्यादा येणं स्वाभाविक आहे. तरी देशाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या, राष्ट्रनिर्मितीसाठी संपत्तीनिर्मिती करणाऱ्या, भरभरून दान देणाऱ्या तरीही प्रसिद्धीपराङ्मुख राहणाऱ्या समूहाचे हे शब्दचित्र वाचकांना नक्की आवडेल. अजून कुतूहल जागृत करेल. वाचनातून एखाद्या सुप्त उद्योजकाला त्यातून प्रेरणा मिळेल. एखाद्या धनाढ्याच्या मनात दानत जागवेल. ज्यांनी शिक्षण, उपचार किंवा व्यवसाय इ साठी प्रत्यक्षपणे टाटा संस्थांची मदत घेतली असेल त्यांना त्यामागचे अनामिक हात दिसतील. ह्या समूहात आणि संस्थांत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कामाचा गौरव झालेला दिसेल.

मराठीत कॉर्पोरेट क्षेत्राबद्दलचं साहित्य तसं कमीच आहे. त्यातही अनुवादित पुस्तकं जास्त दिसतात. त्यामुळे माधव जोशी ह्यांनी ही दोन पुस्तके लिहिली आहेत थेट मराठीत लिहिली आहेत; इंग्रजी भाषांतराच्या आधी ती मराठीत प्रकाशित केली आहेत हे विशेष. एक मराठीप्रेमी व्यक्ती म्हणून लेखक-प्रकाशक द्वयीचे खास आभार !

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अर्थकारण, पैसा, गंतवणूक, उद्योग इ. वरची इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe