पुस्तक – अमृतवेल (Amrutvel)
लेखक – वि.स. खांडेकर (V. S. Khandekar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १५०
छापील किंमत – रु. १८०/-
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती १९६७
ISBN – 9788177666281

“अमृतवेल” ही वि.स. खांडेकरांची गाजलेली कादंबरी आहे. जीवनविषयक तत्त्वचिंतन करणारी कादंबरी आहे. माणसाच्या आयुष्यातले दुःख कसे आहे; त्याला कसा प्रतिसाद दिला जातो आणि कसा प्रतिसाद दिला गेला पाहिजे ह्याबद्दल विचार मांडणारं; तेही ललित गोष्टीरूपातून मांडणारं हे पुस्तक आहे.

कादंबरीची नायिका नंदा दुःखात आहे कारण तिचा होणारा पती लग्नाच्या आधीच अपघातात मरण पावला आहे. त्यामुळे ती उद्विग्न झाली आहे. आत्महत्या करावी असे वाटण्याइतपत तिची अवस्था वाईट झाली आहे. ह्या वातावरणातून वेगळ्या वातावरणात गेली तर तिला बरं वाटेल असं मत तिच्या स्नेही आणि कुटुंबीयांचं होतं. आणि अशी संधी चालून येते. तिची कॉलेज मधली मैत्रीण – वसू – आता एका श्रीमंत घराण्याची सून झाली आहे. तिला स्वतःच्या सोबतीला (कम्पॅनियन म्हणून) कोणीतरी हुशार स्वभावाने चांगली अशी महिला सहकारी हवी असते. त्यामुळे नंदा वसू बरोबर तिच्या गावाला जाते. श्रीमंतांची हवेली; नोकरचाकर; मोठी लायब्ररी अशी सगळी सुखं वसूच्या आयुष्यात आहेत. पण वसू सुखी नाही. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नाही हे तिला दिसतं. हे असं का होतं आहे आणि आपण वसूला काय मदत करू शकतो ह्याचा शोध घ्यायचा नंदा प्रयत्न करते. तिला सगळ्यांच्या पूर्वायुष्यातल्या घटना कळतात. वसूचं वागणं विक्षिप्त आहे कारण तिच्या नवऱ्याचं वागणं विक्षिप्त आहे. आणि त्याच्या विक्षिप्त वागण्याचं कारण त्याच्या लहानपणी घडलेल्या घटना; एका कुटुंबाची शोकांतिका आहे.

कथानकात पात्रांचे एकमेकांशी संवाद होतातच; पण एकमेकांशी थेट बोलायचा संकोच वाटल्यामुळे पात्रे घरातल्या घरात एकमेकांना दीर्घ पत्रं लिहितात. आपलं मन मोकळं करतात. अशाच जुन्या पत्रांतून पूर्वायुष्यातल्या घटना कळतात आणि नवीन घटना घडतात. पत्रांमधून पात्रे आपापल्या बाजू मांडतात. त्यांच्या वागण्यामागचं तत्त्वज्ञान सांगतात. त्यातून उभी राहते एक साधकबाधक चर्चा. ह्या जगण्याचं ध्येय काय ? माणसाच्या आयुष्यात जी दुःखे येतात त्यांना सामोरे कसे जावे ? पैसा मिळवण्याची इच्छा, आपल्या माणसांची माया मिळावी अशी इच्छा, कामवासना इ. भावना सगळ्यांच्याच ठायी असतात. त्यात चूकही काही नाही. पण माणूस त्यांच्या आहारी गेला तर अधःपतन कसं होतं. हे दिसतं. माणूस स्वतःचीच सुखे उपभोगत राहिला तर शेवटी त्याच्या अतिरेकातून दुःखच प्राप्त होतं. स्वतःची दुःखे कुरवाळत बसूनही दुःखाचं निराकरण होत नाही; उलट उद्वेग वाढतच जातो. हा आयुष्यातला विरोधाभाससुद्धा अधोरेखित केला आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांची दुःखे समजून घेऊन त्यांना आधार देत जगलो; आनंद आणि त्रास वाटून घेत जगलो तर हे आयुष्य अधिक हितकर आणि पूर्णत्वाकडे जाणारं असेल हा संदेश त्यातून अधोरेखित होतो.

दीडशे पानी छोटी कादंबरी असली तरी त्यात अनेक प्रसंग घडतात. “तत्वज्ञान चर्चा” काय करायची हे लेखकाने ठरवून त्याबरहुकूम योजलेले प्रसंग आहेत. त्यात सहजता कमी आहे. “हे असं कसं होईल”, हा विचार वाचकाच्या मनात वेळोवेळी येईल. पण कादंबरीत कुठलाही प्रसंग जास्त रेंगाळत नाही. त्यामुळे आपण वाचनात गुंगून जातो. प्रसंगांची वर्णनं आटोपशीर तरी परिणामकारक आहेत. एकूण भर तत्त्वचिंतनावर असला तरी ते मांडण्याची लेखकाची शैली विद्वज्जड शब्दांची नाही. “सगळं डोक्यावरून गेलं” असं असं होत नाही किंवा कंटाळवाणं होत नाही. “पत्रांतून संवाद” ह्या स्वरूपामुळे वाद-विवादाच्या फैरी घडतायत असं चित्र शक्यतो नाही. जिथे आहे तिथेही ते फार लांबवलेलं नाही. ती चर्चा वाचकाने आपल्या मनात करावी; “आपलाच वाद आपणाशी” करावा अशी लेखकाची भूमिका असावी. कादंबरीच्या वाचनीयतेत त्यामुळे भरच पडली आहे.

आता काही पाने वाचूया.

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

प्रियकराच्या निधनाने कोलमडून पडलेल्या नंदाला तिच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रातला भाग

नंदा आणि देवदत्त (वसू चा नवरा) ह्यांची ओळख होते तेव्हा

इतरांच्या आयुष्यात घडलेल्या भयानक गोष्टी समजल्यावर, त्यावर विचार केल्यावर नंदाच्या चित्तवृत्तीत झालेला बदल.

ज्यांना अशा गंभीर, तत्वज्ञानात्मक पुस्तकं आवडतात त्यांना नक्कीच आवडेल. इतरांनाही विचारप्रवृत्त करणारं तरीही एक वाचनीय कथानक म्हणून नक्की आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कादंबऱ्यांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe