पुस्तक – भारत माझ्या नजरेतून (Bharat majhya najaretoon)
लेखक – कोबी शोशानी (Kobbi Shoshaani)
अनुवादक – गौरी जोशी (Gauri Joshi)
भाषा – मराठी
मूळ पुस्तक –
שבעה נהרות שבעה שערים הודו ישראל
(shav’a neharot shav’a sharim hodo yisral)
अर्थ – सात नद्या, सात दरवाजे, भारत, इस्राएल
मूळ पुस्तकाची भाषा – हिब्रू
पाने – २००
प्रकाशन – बुकगंगा पब्लिकेशन, मे २०२६
छापील किंमत – रु. २९९/-
ISBN – 978-93-47786-53-2
एक भारतीय म्हणून भारताचं वर्णन करा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय लिहाल? किंबहुना काय काय लिहाल? हजारो वर्षांची संस्कृती आणि परंपरा लिहाल. मोठमोठ्या साम्राज्यांचा इतिहास, हजारो वर्षांची आक्रमण आणि त्याला पूर्ण उरलेला भारत हे लिहाल. जाती व्यवस्था सामाजिक अव्यवस्था याबद्दल लिहाल. भारताच्या भाषा, वेशभूषा, खानपान ह्यातलं वैविध्य लिहाल. उत्सवप्रियता हे लिहाल. इतिहासातले महत्त्वाचे टप्पे, प्रमुख व्यक्तिरेखा यांबद्दल लिहाल. कितीही पान लिहिलं तरी भारतासारख्या खंडप्राय देशाचं समग्र वर्णन करणे अशक्यच. अशावेळी भारतात काही वर्ष राहिल्यावर एखाद्या परदेशी व्यक्तीला, “तुला भारत कसा दिसला, तुझ्या मनात भारताची प्रतिमा काय तयार झाली” हे विचारलं तर तो काय सांगेल? आपण भारतीय दुसऱ्याला कसे जाणवतो, वास्तव आणि प्रतिमा यात किती अंतर आहे हे तपासून बघायला आवडेल का? तसं असेल तर “भारत माझ्या नजरेतून” हे पुस्तक वाचलं पाहिजे.
कोबी शोशानी ९० च्या दशकात वर्षभर भारतात होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी २०२१ ते २५ मध्ये इस्रायल देशाचे भारतातील कौन्सिल जनरल म्हणून काम केले. त्यावेळी त्यांचे ऑफिस मुंबईमध्ये होते. परक्या देशातल्या दूतावासात काम करणे म्हणजे दुसऱ्या देशाची सांस्कृतिक, राजकीय, लष्करी जडणघडण तपशीलवार समजून घेणे, तिचा स्वदेशाच्या हितसंबंधाच्या दृष्टीने सकारात्मक वापर करणे, दोन देशातील संबंधात विविध पातळ्यांवर सुधारणा घडवून आणणे. या जबाबदाऱ्या पाडायचा व भारत देश मनापासून समजून घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. ते करताना भारत कसा दिसला ह्याचे अनुभव त्यांनी पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
सुरुवातीच्या काही प्रकरणात ब्रिटिशराज, स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यानंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा त्यांनी धावता आढावा घेतला आहे. तेव्हा डेव्हिड ससून हे प्रथितयश ज्यू असामी भारतात होते. त्याचाही उल्लेख आहे. भारत आणि इजरायल अगदी लागोपाठ स्वतंत्र झाले त्या दोन्ही देशांच्या विकासाच्या टप्प्यांची ही तुलना कथनाच्या ओघात होते. नेहरू आणि इंदिरा गांधी यांची कार्यपद्धती ही समाजवादी आणि थोडी डाव्या विचारसरणीकडे झुकणारी होती. इस्रायलच्या सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वाचीही धारणा अशीच होती. गेल्या काही वर्षात भारतात बदल होऊन उजव्या विचारसरणीकडे नेतृत्व आलं आहे, तशीच परिस्थिती तिकडे आहे. हे समान टप्पे त्यांनी छोटी छोटी उदाहरण देऊन सांगितले आहेत.
भारतात जातीव्यवस्था खोलवर रुजलेली आहे. इस्रायलमध्ये त्या अर्थाने जातीव्यवस्था नाही. मात्र भेदभावाची एक सुप्त जाणीव तिथेही आहे. युरोपातून गेलेले गोरे ज्यू – अश्केनाझी – ज्यू स्वतःला इतरांपेक्षा थोडे वरचे वरिष्ठ मानतात. सरकारमधली महत्त्वाची पदे, महत्वाच्या नियुक्त्या होताना हा भेदभाव दिसतो असे लेखकाचे निरीक्षण आहे. त्याचीही उदाहरणे लेखकाने मनमोकळेपणे सांगितली आहेत.
भारतातील भगवद्गीता रामायण महाभारत हे ग्रंथ, ब्रह्माविष्णूमहेश अशा संकल्पना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, समाजाच्या चार वर्णांची निर्मितीची पुरुषसुक्तातले वर्णन, वेगवेगळे सण उत्सव यांची मोघम ओळख त्यांनी वाचकाला करून दिली आहे. ज्यू परंपरांमध्ये त्यातलं काय दिसतं ही तुलना आहे. अभारतीय वाचकांसाठी तो भाग उपयुक्त आहे.
“मोदी युग” या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि इजरायल चे बेंजामिन नेतन्याहू यांची मैत्री, मोदींचा परराष्ट्र धोरणाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, आलिंगन देऊन नेत्यांना भेटणे, राम मंदिर निर्माण, 370 कलम हटवणे, भारतीय अस्मितेला बढावा देणे अशी मोदी राजवटीची व्यवच्छेदक लक्षणं समजावून दिली आहेत. राम मंदिर निर्माण आणि जेरुसलेम मधील मशिदीचा वाद, काश्मीर आणि पॅलेस्टाईन ह्याची तुलना करून इस्रायली वाचकावर परिस्थितीचं गांभीर्य ठसवलं आहे.
भारताचे अण्वस्त्र धोरण, महत्त्वाचे उद्योजक, मुंबई नगरी याबद्दलच्या प्रकरणात अशाच प्रकारे गोषवारा घेतला आहे. अंबानी-अदानी ही नावं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या बंडखोरी मुळे झालेले सत्तापरिवर्तन, आदित्य ठाकरे, शरद पवार या सगळ्यांचे मोघम उल्लेख एका परकीय माणसाच्या लिखाणात वाचताना मजेशीर वाटलं. भारतात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या बदलाकडेही इतर देशांचं किती बारकाईने लक्ष आहे हे जाणवलं.
भारतातही ज्यू अगदी कमी संख्येने का होईना राहतात. कोकण परिसरात राहणारे बेने इस्रायली आणि केरळातील कोचीन ज्यू यांची माहिती पुस्तकात आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात ज्यूधर्मीयांच्या नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या प्रसंगाला या पुस्तकात स्थान मिळणं अपेक्षितच होतं. मुंबईत आल्यावर लेखकाने त्या स्थळालाही भेट दिली. त्याचंही वर्णन आहे. ज्यू वारसा टिकवण्याचे सरकार आणि सामाजिक संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. त्याबद्दल काही परिच्छेद आहेत.
भारतीय समाजाचं वर्णन अजून व्यापक करताना “बॉलिवूड” प्रकरणात महत्त्वाचे कलाकार कोण, त्यांची लेखकाने घेतलेली भेट, काश्मीर फाईल चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्यामुळे झालेला वाद हेही पुस्तकात आहे. दोन देशातल्या लोकांचे परस्पर संबंध यावेत एकमेकांना समजून घ्यावं यासाठी लेखक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना हजेरी लावतो, लोकांची संवाद साधतो, त्याबद्दल समाज माध्यमांवर लिहितो त्याची उदाहरणे दिली आहेत.
उपसंहार या भागात लेखकाने इजरायली परराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज, राजदूतांची नियुक्ती, पदोन्नतीची प्रक्रिया याबद्दल त्याला जाणवलेल्या समस्या आणि नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य वाचकाला तो भाग फार समजेल असं वाटत नाही.
काही पाने उदाहरणादाखल.
अनुक्रमणिका

स्वातंत्र्यलढ्याच्या धावत्या आढाव्यातली दोन पाने. गांधी, जिना, मोपले, नाविकांचे बंड अशा विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न.


लेखकाचे जनसंपर्काचे प्रयत्न


अमीर खान बरोबर फोटो काढल्याने टीका आणि काश्मीर फाईल बघितल्याबद्दलही टीका. बदलत्या सामाजिक जाणिवांचा प्रत्यक्ष अनुभव.


लेखकाची निवेदनशैली थेट आहे. फार आडपडदा ठेवून लिहिलेलं नाही. तरीही “सामान्य ज्ञान” ह्या सदरात मोडेल अशीच माहिती आहे. वादग्रस्त ठरेल किंवा खूप आतली बातमी असं काही नाही. बरेच मुद्दे सांगायचे असल्यामुळे निवेदनाचे रूळ खटाखट बदलतात. त्यामुळे वाचताना सतत अडखळायला होतं. उदा., एका परिच्छेदात आपण योगा बद्दल वाचत असतो आणि अचानक पुढच्या परिच्छेदात खेळाबद्दल वर्णन येतं आणि ते दोन परिच्छेद संपतायत न संपतायत तोच, लेखक आणि एका सायकलपटूच्या भेटीची चार वाक्य येतात. त्याऐवजी छोटे छोटे परिच्छेद करून, एकेक उपशीर्षक दिलं असतं तर वाचनीयतेत भर पडली असती.
मराठी भाषांतर ठीक झालं आहे. बऱ्याच वेळा इंग्रजी वाक्यरचना तशीच ठेवून भाषांतर केलं आहे असं वाटतं. शब्दरचना चुकीची नाही पण त्यात मराठी आत्मा गवसत नाही. सतत हे वाक्य इंग्रजीत कसं लिहिलं असेल हे लक्षात येत राहतं. त्यामुळे मुळातच विस्कळीत असलेल्या मजकुरात अजूनच ठेचकाळायला होतं.
हे पुस्तक मुळात इस्रायली लोकांना भारताची ओळख करून देण्यासाठी आहे. ते काम पुस्तकाने बरंच चांगलं केलं आहे. पण ह्या अनुवादातून मराठी वाचकाला भारताबद्दल काही नवं सापडणार नाही. इस्रायलबद्दल थोडी माहिती कळेल. तो ऐवज खूप मोठा आहे असं नाही. तरी भारताबद्दल इतर लोक काय विचार करतात हे वाचायचं असेल तर हे पुस्तक वाचा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर लेखसंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- अहिराणी गोत (Ahirani Got) – डॉ. सुधीर रा. देवरे (Dr. Sidhir R. Deore)
- आघाडीचे महिला नेतृत्व (Aaghadiche mahila netrutv ) – सुधा मेनन (Sudha Menon)- अनुवाद : सुमिता बोरसे (Sumita Borase)
- गोष्टी घराकडील (Goshti Gharakadil) – राजेंद्र बनहट्टी (Rajendra Banahatti)
- चिकन सूप फॉर सोल(Chicken soup for soul) – जॅक कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन
- चित्तर-बित्तर (Chittar-Bittar) – सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
- चार्वाक (Charvak) – सुरेश द्वादशीवार (Suresh Dwadashiwar)
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) – गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
- जमात ए पुरोगामी (Jamat E Purogami) – डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे (Dr. Satchidanand Shevde & Dr. Pareexit Shevde)
- झुळूक अमेरिकन तोऱ्याची ( Jhuluk Amerikan toryachi) – शरद वर्दे (Sharad Varde)
- फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
- बोलगप्पा (Bolgappa) – शरद वर्दे (Sharad Varde)
- बायकांत पुरुष लांबोडा (Baykant Purush Lamboda) – डॉ. शंतनू अभ्यंकर (Dr. Santanu Abhyankar)
- बे दुणे पाच (Be dune pach) – सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
- माझी जन्मखेप (Mazi Janmkhep) लेखक – मनोज शिंगुस्ते (Manoj Shinguste)
- रामकथामाला (Ramkathamala) – दीपाली नरेंद्र पाटवदकर (Deepali Narendra Patwadkar)
- वत्सलावहिनींचा आधुनिक ॲडव्हाईस (Vatsalavahinincha Adhunik advhais) – मंगला गोडबोले (Mangala Godbole)
- मोरबांगडी (Morbangadi) – डॉ. छाया महाजन (Dr. Chhaya Mahajan)
- पुण्यभूमी भारत (Punyabhumi Bharat) – सुधा मूर्ती (Sudha Murty) अनुवादिका – लीना सोहोनी (Leena Sohoni)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


