पुस्तक – डॅडी लॉंगलेग्ज (Daddy LongLegs )
लेखिका – जीन वेब्स्टर (Jean Webster)
भाषा – मराठी (Marati)
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
अनुवादिका – सरोज देशपांडे (Saroj Deshpande)
पाने – १४३
प्रकाशन – राजहंस प्रकाशन, २००८
मूळ पुस्तक प्रकाशन – १९१२
छापील किंमत – रु. १२०/-
ISBN – 978-81-7434-407-6

“डॅडी लॉंगलेग्ज” ही एक पत्ररूपात लिहिलेली कादंबरी आहे. एक अठरावर्षीय मुलगी जेरुशा तिची नायिका आहे. ती लहानपणापासून अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली आहे. आता शाळेचं वय संपलं तरी आयुष्यात पुढे काय करायचं हा प्रश्न तिच्यापुढे, अनाथाश्रमापुढे आहेच. तात्पुरते तरी आश्रमातच राहण्या-जेवण्याबदल्यात आश्रमाचीच सगळी कामं तिने करायची अशी सोय लागली आहे. ती हुशार आहे, थोडी अवखळ आहे. एके दिवशी आश्रमाची संचालिका तिला सांगते की आश्रमाच्या एका विश्वस्तांना तिने लिहिलेला निबंध-विनोदी शैलीतली कथा आवडली. तिच्यात कल्पकता आहे, बुद्धिमत्ता आहे हे त्यांना जाणवलं. कदाचित पुढे ती लेखिका होऊ शकेल असं वाटून पुढे प्रगती करण्यासाठी कॉलेजात पाठवायची तयारी त्यांनी दाखवली आहे. तिच्या कॉलेजचा खर्च तेच करतील. अट एकच तिने तिची प्रगती आणि रोजच्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा नियमित पत्रांतून कळवायच्या. जणू आईवडिलांना पत्र लिहितेय अशा. पण त्यांची खरी ओळख तिला सांगितली जाणार नाही. जेरुशा ला हा सुखद धक्काच असतो. पण आपल्याला मदत करणारा हा माणूस कोण ? त्याने आपलं खरं नाव गुप्त का ठेवलं आहे हे तिला काहीच कळत नाही. त्या विश्वस्तांना ती एकदाच दुरून पाठमोरं आणि ओझरतं पाहते. ते मध्यमवयीन आणि लंबूटांग आहेत. एवढंच तिच्या लक्षात येतं.

ती ही संधी मनापासून स्वीकारते. ती पहिल्यांदाच आश्रमाबाहेर खुल्या जगात एकटीने वावरु लागते. पत्र लिहू लागते. “जॉन स्मिथ” हे त्यांचं खोटं नाव तिला आवडत नाही. त्याऐवजी ती त्यांना स्वतःच नाव देते – लंबूटांग म्हणून “डॅडी लॉंगलेग्ज”. ह्याच पत्रांतून उलगडतं तिचं मन, तिचा स्वभाव. अनाथाश्रमात वाढलेली, बाहेरच्या जागत वावरायला बुजणारी ती ह्या खुल्या जगाशी कशी जुळवून घेते. कशी मोठी होते हा प्रवास आपल्याला त्या पत्रांतून उलगडतो. आपला हा भूतकाळ लोकांना, मैत्रिणींना कळला तर त्या काय म्हणतील ? हसतील, नाक मुरडतील का सहानुभूतीने वागतील. असं काहीच वाट्याला येऊ नये म्हणून ती काहीतरी कामचलाऊ उत्तरं देऊन वेळ मारून नेते. मुली ज्या विषयांवर गप्पा मारतात त्यातलं काहीच आपल्याला ठाऊक नाही म्हणून अधाश्यासारखी पुस्तकं वाचून काढते. असं ती पत्रांतून कळवते.

पत्रांत दिसते तिचा निखळ स्वभाव. “डॅडी’ ने आपली ओळख सांगावी किमान तिला उलट टपाली उत्तर तरी पाठवावं म्हणून ती मधून मधून विनवते, हट्ट करते. तिच्यासाठी “डॅडी’ हेच आपलं एकमेव माणूस या ती त्यांना चिडून पण पत्र लिहिते. पण पुढच्या पत्रात तिची चूक दुरुस्त करते “डॅडी’ने दिलेल्या मदतीमुळे तिला नवीन अनुभव घ्यायला मिळतायत ह्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. तर कधी मी तुमचे उपकार – पैसे तरी – परत करीन अशी प्रौढ भूमिका पण घेते. परीक्षेत नापास झाले हे मजेत सांगते; पण पुढच्यावेळी असं होणार नाही असा प्रेमळ वायदा पण करते. तिच्या कादंबरी लेखनाच्या कथा लेखनाच्या प्रयत्नाबद्दल लिहिते. आणि त्यात आलेलं अपयश, निराशा आणि झालेली रडारड हे पण सांगते. छोट्या छोट्या रेखाचित्रांतून ही पत्र अजून खुलतात. आश्रमातलं एकसुरी आयुष्य, लोकांच्या दयाळू नजरा ह्यांची आठवण जेव्हा जेव्हा होते तेव्हा ती अस्वस्थ होते. पण त्याच अभावग्रस्त आयुष्याच्या अनुभवामुळे आज तिला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं तिला महत्त्व आहे. त्यामुळे इतर मुलींपेक्षा ती जास्त समाधानी आहे, आनंदी आहे असं पण ती लिहिते.

चार वर्षांचा हा पत्रव्यवहार एका लहान मुलीचा तरुणीत होणारा बदल टिपतो. तिचं ज्ञान, अनुभव, जगण्याबद्दल जाणिवा कशा विकसित होत गेल्या ह्याचा हा प्रवास आहे. हाडामासाच्या माणसासारख्या राग, लोभ, क्रोध, आनंद, उत्सुकता, यश, अपयश, गंमत , धमाल, कंटाळा असे सगळे रंग पत्रांतून दिसतात. त्यामुळे वाचन रंजक होते. पण पुढे पुढे वाचताना असं वाटू लागतं की अशी पत्रे कधी संपणारच नाहीत. आयुष्यभर ती लिहू शकेल. ह्या पुस्तकाला काही तार्किक शेवट असेल का ? आणि असा विचार येऊ लागत असतानाच लेखिका एका अनपेक्षित पण सुंदर वळणार पुस्तकाचा शेवट करते. काय असेल हा शेवट ? “डॅडी” कोण हे तिला कळेल का ? ती लेखिका होईल का ? वयात आलेली पोर कॉलेजात कोणाच्या प्रेमात पडेल का ? अनाथ मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होईल ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.

असं हे पुस्तक वाचायला छान आहे. त्यातली काही पानं उदाहरणादाखल वाचा

अगदी सुरुवातीच्या काळातलं पत्र .. डॅडी शी ओळख वाढवताना … जगाची ओळख वाढवताना

न्यू यॉर्क भेट… इतकी मोठी उडी पहिल्यांदाच

अशानिराशेचा क्षण आणि नवनव्या विचारसरणींशी ओळख

पुस्तकाबद्दल थोडं नेटवर शोधल्यावर माहिती मिळाली की Jean Webster हे लेखिकेचं टोपण नाव आहे. तिचं नाव Alice Jane Chandler Webster. है पुस्तकावर आधारित चित्रपट आणि नाटकं सुद्धा येऊन गेली आहेत. युट्युबवर एक चित्रपट मिळाला https://www.youtube.com/watch?v=xl4qYg7ONak

जेरुशा च्या रूपाने अनाथ मुलीच्या मनात डोकावताना जाणवतं की अशा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत करतो ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती हळुवारपणे, त्याचा स्वाभिमान न दुखावता देता आली तर ते सोन्याहून पिवळं. आणि दुसरी गोष्ट अधोरेखित होतेच, ती म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याचा पूर्ण आनंद घेणं किती महत्त्वाचं आहे. दोन व्यक्तींची पत्ररूपाने वाढत जाणारी ओळख आणि शेवटचे अनपेक्षित वळण ही लेखनशैली आवडली. सरोज देशपांडे ह्यांनी अगदी ओघवता अनुवाद केला आहे. परीक्षेत “गचकले”, “वाग्गंगेला पूर”, “नावावर फुली मारून टाकली आहे” अशा सारख्या चपखल वाक्प्रचारांतून भाषेची खुमारी वाढली आहे. त्यामुळे जेरुशा आणि डॅडी दोघंही अमेरिकेतले मराठीच असतील असं वाटतं.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

भावनिक संबंधांवर आधारित इतर कादंबऱ्यांची मी लिहिलेली परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe