पुस्तक – Going Viral (गोइंग व्हायरल)
लेखक – Balram Bhargava (बलराम भार्गव)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – १९७
प्रकाशन – रूपा पब्लिकेशन, २०२१
ISBN – 978-93-5520-022-8
छापील किंमत – रु. २९५/-
२०२० साली भारतात आलेल्या कोरोना साथीने प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम केला. अनेकांचे निधन झाले, कोणी आप्त स्वकीय गमावले, व्यवसाय उद्योग ठप्प झाले. लॉकडाऊन सारख्या अभूतपूर्व परिस्थितीचा अनुभव सर्वांना घ्यावा लागला. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरून काम केले. पण डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि सुरक्षाव्यवस्था, शेतकरी, मालाची ने-आण करणारे वाहतूकदार, अत्यावश्यक कर्मचारी हे मात्र घरून काम करू शकत नाहीत. त्यांना आपल्या कार्यस्थळी जावंच लागत होतं. पुढे लसीचा शोध लागला. भारतीय लस बाजारात आली. सरकारद्वारे मोठ्याप्रमाणावर लसीकरण राबवण्यात आले. त्यातून दीडेक वर्षांनी साथीचा प्रभाव कमी झाला. निर्बंध शिथिल झाले. परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. ह्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती लसीकरणाने आणि ती निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांनी. म्हणूनच कोरोनाकाळात पडद्यामागे राहून आपले कर्तव्य निभावणाऱ्या ह्या शास्त्रज्ञांच्या मोलाच्या कामगिरीबद्दल आपली समज वाढवणे हे आपले कर्तव्यच ठरते. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) अर्थात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद चे मॅनेजिंग डायरेक्टर असणाऱ्या बलराम भार्गव ह्यांनी लिहिलेले “गोइंग व्हायरल” पुस्तक त्यात आपल्याला चांगले उपयोगी आहे.
२०१९ साली चीन मध्ये कोरोना आला त्या बातम्या आपण ऐकत होतो. मग युरोपात उडालेल्या हाहाकाराच्या बातम्या आपण ऐकल्या. भारतीयांना थेट फटका तेव्हा बसला जेव्हा देशव्यापी टाळेबंदी जाहीर केली गेली. पण आपल्या सरकारी यंत्रणा, ICMR आणि संबंधित संशोधन संस्था आधीपासूनच कामाला लागल्या होत्या. युद्धपातळीवर काम करत होत्या. ते काम कसं कसं झालं, कुठल्या अडचणी येत होत्या, त्यावर शास्त्रज्ञांनी कशी मात केली, सरकार-प्रशासन कसं खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं होतं ह्या वस्तुस्थितीचं वर्णन पुस्तकात केलं आहे. “सरकारी काम आणि सहा महिने थांब” हा आपला पिढ्यांपिढ्यांचा अनुभव. पण कोरोनायुद्धात सहा महिनेच काय सहा दिवसही न थांबता ही प्रणाली धडाक्याने काम करत होती. हे ह्या पुस्तकाने अधोरेखित केलं आहे. महामारीत झालेले मृत्यू, त्रास हे कोणीच नाकारणार नाही. पण पूर्ण यंत्रणा अशी राबली म्हणून इतक्यावरच निभावलं अन्यथा अतिभयंकर स्थिती उद्भवली असती; हे जाणवून आपल्या वेदनांवर नक्कीच फुंकर मारली जाईल.
आता ह्या पुस्तकातल्या प्रकरणांबद्दल एकेक करून बघूया.
Preparing for apocalypse – चीन आणि इतर देशांतल्या कोरोना स्थितीवर पहिल्यापासून भारत सरकार आणि ICMR लक्ष ठेवून होते. त्यातूनच बाहेरून आलेल्यांची चाचणी करणं सुरु झालं. विषाणूवर संशोधन सुद्धा सुरु झालं. सरकार तज्ज्ञांची मदत घेत होतं आणि मत विचारत होतं. संपूर्ण टाळेबंदी आणि परदेशी प्रवासावर बंदीचे डॉ उपाय तज्ज्ञांनीच सुचवले. अशा सुरुवातीच्या दिवसांबद्दल काही पानं ह्या प्रकरणात आहेत.
Coronavirus the science explained – विषाणू म्हणजे काय, तो कसा पसरतो ह्याचं सामान्य विज्ञान आधी सोप्या शब्दांत समजावून सांगितलं आहे. संशयित रुग्ण्याच्या रक्तातून किंवा इतर स्रावांत दिसणारे विषाणू वेगळे काढले जातात. मग प्रयोगशाळेतल्या रसायनात त्याची मुद्दामून वाढ केली जाते. असं “व्हायरस सूप” मग पुढच्या टप्प्यावर तपासणीसाठी पाठवलं जातं. “वर्णनाशी मिळत जुळता” गुन्हेगार विषाणू हाच आहे का हे बघितलं जातं. विषाणूला वेगळं काढणं- “isolating”- एकदा जमलं की मग त्याची कंबख्ती भरलीच समजा. आपल्या शास्त्रज्ञांनी ही करामत मार्च २०२० मध्येच केली. पण Its easier said than done. शास्त्रज्ञ कसे दिवसरात्र एक करत होते आणि तो “युरेका क्षण” कसा होता त्याबद्दल ह्या प्रकरणात वाचा.
“Testing Times” आणि “The Game Changer” – कोरोना टाळण्याचा उपाय सापडला नव्हता. त्यामुळे साथ रोखण्याचा एकच मार्ग होता. तो म्हणजे साथ पसरू न देणे. म्हणजेच ज्याला कोरोना झालाय त्याला इतरांपासून वेगळे काढणे. पण विषाणूच नवीन, तर त्याला शोधून काढायचं तंत्र तर समजायला हवं. ते समजलं की तशा तपासण्या करणारी उपकरणं आणि यंत्र तयार व्हायला हवीत. (आठवतायत ना नाकात घातलेल्या काड्या !). ती कारखान्यात तयार होणार कशी ? कारण देशभर टाळेबंदी. त्यासाठी लागणारा कच्चा माल परदेशातून येणार कसा ? कारण प्रवासावर निर्बंध ? यंत्र तयार झाली तरी देशभर पोचणार कशी ? कारण देशभर टाळेबंदी. पोचली तरी ती वापरून “सॅम्पल” गोळा करणारे कुशल मनुष्यबळ गावोगावी कसे तयार होणार ? अभूतपूर्व चक्रव्यूहात आपण सगळे होतो. पण शास्त्रज्ञ-कारखानदार-कच्चा माल पुरवठादार-वितरक-सरकार सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावर कशी मात केली. innovative पद्धती शोधल्या गेल्या. RT-PCR हा आपल्या ओळखीचा झालेला शब्द त्यातलाच एक अभिनव प्रकार. सरकारने भराभर परवानग्या दिल्या, भारतातच त्या काड्या आणि रसायनं तयार झाली. सुरुवातीला फक्त पुण्यातल्या “विषाणू संस्थेत” तपासणी व्हायची तशा अनेक लॅब्स देशात उघडल्या. कोट्यवधी लोकांची तपासणी झाली. हे तपशील, अडचणी आणि त्यावर शोधलेले मार्ग तुम्ही ह्या प्रकरणात वाचू शकाल.
Why research matters – उपचार असो वा लस ते ठरवण्यासाठी प्रयोग आणि संशोघन आवश्यक आहे. टाळेबंदीच्या काळात “काळाशी स्पर्धा” करत संशोधन व्यवस्था कशी वाढवली, शास्त्रज्ञांनी कसे काम केले ह्याबद्दल थोडंसं आहे. साथ चालू असताना मध्यंतरी “प्लाझ्मा थेरपी” चा वापर सुरु झाला. हा वापर सुद्धा एक तर्कशुद्ध असा पर्याय होता. पण तो नक्की काम करतो का हे सिद्ध करण्याइतपत वेळ आपल्या हातात नव्हता. तरी त्यावर कसे संशोधन झाले ह्याचे ओझरते वर्णन आहे.
An Indian Vaccine : From dream to roll out – एखाद्या रोगावरची लस कशी काम करते; लसीचे वेगवेगळे प्रकार कोणते ह्याचं सामान्य विज्ञान आधी समजावलं आहे. मग भारताने “निष्क्रिय विषाणू” – inactive virus प्रकार का निवडला, लस कशी तयार केली, त्याचे आधी उंदरांसारख्या लहान प्राण्यांवर आणि मग माकडांवर प्रयोग झाले हे सांगितलं आहे. “भारत बायोटेक” नावाच्या खाजगी पण नावाजलेल्या कंपनीशी करार करून संशोधक व उद्योजक एकत्र कामाला लागले. अर्थात “पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप” मधला सुसंवाद कसा साधला गेला त्याविषयी सुद्धा लिहिलं आहे.
The moment of Truth – माकडांवर झालेल्या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसल्यावर “फेज ३” अर्थात माणसांवर प्रयोग सुरु झाले. पण हे सगळे प्रयोग पूर्ण होऊन निकाल हाती येईपर्यंत थांबणं शक्य नव्हतं. म्हणून सरकारने “आपत्कालीन परिस्थिती” नियमानुसार लस माणसांना द्यायला परवानगी दिली. पण हा देशवासीयांच्या जीवाशी खेळ नव्हता तर “साईड इफेक्ट” नाहीत किंवा गंभीर नाहीत; पण फायदा होण्याची शक्यता जास्त आहे हे शास्त्रज्ञांनी पटवून दिल्यामुळेच सार्वत्रिक लसीकरणाचा. पुढे माणसांवर झालेल्या प्रयोगांचे निष्कर्ष सुद्धा सकारात्मक आले. ही प्रक्रिया कशी झाली ते ह्या प्रकरणात आहे.
Rise of a vaccine Superpower – देशी लशीची मोठ्या प्रमामानावर निर्मिती करण्यात आली. कोट्यवधी लोकांना मोफत अथवा स्वस्तदरात लस दिली गेली. जगभरात ती निर्यात करण्यात आली. आणि “लस महासत्ता”म्हणून आपला उदय झाला. ह्या आधीही आपण कुठल्या लसी बनवत होतो, लस निर्मितीत, निर्यातीत व इतर देशांतल्या वापरात भारतीय लसींचं प्रमाण मोठं आहे. त्याबद्दल थोडी माहिती आहे. लसीकरण सुरु झाल्यावर सुरुवातीला लोकांनी अविश्वास दाखवला तेव्हा लोकांचे शंकानिरसन करण्यासाठी ICMR ला योग्य माहिती देण्यासाठी सुद्धा पुढे यावं लागलं. साथीच्या काळात वेगवेगळे उपचारपद्धती पुढे आल्या. ज्या उपायांचा फायदा दिसतोय पण तोटा दिसत नाही अशा उपचारांना मान्यता देण्यात आले. पण पुढच्या प्रयोगांतून, निरीक्षणांतून ते प्रकार उपयुक्त सिद्ध झाले नाहीत तर ते मागे घेण्यात आले. लसीचे डेल्टा आणि इतर व्हेरियंट बद्दलचे निष्कर्ष सुद्धा प्रकाशित करण्यात आले. एकूणच शास्त्रज्ञांना ह्यावेळी “संवाद साधक” सुद्धा व्हावं लागलं.
उरलेल्या पानांत तळटीपांबद्दल माहिती (नोट्स) आणि “index” आहे.
आता काही पाने वाचा
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
पुस्तकाची भाषा सोपी आहे. वैज्ञानिक तपशील सहज समतील अशा भाषेत आणि थोडक्यात मांडले आहेत. परिस्थितीचं गांभीर्य आणि संशोधकांची धावपळ, तारांबळ नैतिक द्विधा अवस्था वाचकांपर्यंत टोकदारपणे पोचेल असं वर्णन आहे. पण ते कुठेही सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा “आम्ही किती महान” हे दाखवण्यासाठी लिहिलेलं वाटत नाही. त्यातून ह्या महान संशोधकांबद्दल आदर दुणावतो. केंद्र सरकार आणि प्रशासन ह्यांनी केलेल्या सहकार्याची उदाहरणे आहेत. पण “पंतप्रधान” असा उल्लेख एक दोनदाच आला आहे. “मोदी” असा उल्लेख मला आढळला नाही. त्यादृष्टीने हे सरकार किंवा भाजप ह्यांचा “प्रोपगंडा” वाटत नाही. परदेशी लस कंपन्या, औषध कंपन्या ह्यांचं सहकार्य किंवा विरोध; त्यातलं राजकारण, काही किस्से; आतल्या खबरी, गौप्यस्फोट, आरोप असा ही काही भाग नाही. त्यादृष्टीने अजिबात सनसनाटी नाही. सर्वसामान्यांना माहिती देणारं शुद्ध-सात्विक “academic” पुस्तक आहे. भारतातल्या सामाजिक-राजकीय समस्या, त्रास, भ्रष्टाचार ह्यांच्याबद्दल आपण नेहमीच लिहत , वाचत असतो. सरकारला-प्रशासनाला शिव्या घालत असतो. जे योग्यच आहे. पण कोरोना काळात ह्याच व्यवस्थेने अभूतपूर्व काम केलं त्याचं कौतुकही आपण केलं पाहिजे. “युद्ध काळात” एकत्र येऊन देदीप्यमान कामगिरी करणारे आपण “शांततेच्या काळात” इतके विस्कळीत आणि विचित्र का वागतो? ह्या रोगावरची लस कुठला शास्त्रज्ञ शोधून काढेल का ? असा प्रश्न हे पुस्तक वाचताना मनात आला.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
विज्ञानावर/तंत्रज्ञानावर आधारित इतर पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- आहार सूत्र-भाग ३ (Aahar sutra : Part3) – डॉ. मालती कारवारकर (Dr. Malati Karwarkar )
- जेनेटिक्स कशाशी खातात ?(Genetics Kashashi Khatat?) – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
- टेलिकॉम क्रांतीचं महास्वप्न (Telecom Kranticha Mahaswapn) – सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
- द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (The Power of your subconscious mind) लेखक : डॉ. जोसेफ मर्फी (Dr. Joseph Murphy) – अनुवाद : प्रा. पुष्पा ठक्कर (Pro. Pushpa Thakkar)
- प्लँटोन (Planton) – डॉ. संजय ढोले (Sanjay Dhole)
- ब्राह्मोस (Brahmos) – ए. शिवतनू पिल्लई (A. Sivathanu Pillai) अनुवादक – अभय सदावर्ते (Abhay Sadavarte)
- योगिक प्राणायाम (Yogik Pranayam) – डॉ. के. एस. जोशी (Dr. K.S. Joshi) (अनुवाद – डॉ. अरूण मांडे (Dr. Arun Mande) )
- व्हिटॅमिन्स (Vitamins) – अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये (Achyut Godbole & Dr. Vaidehi Limaye)
- शुअरली यू आर जोकिंग मि. फाईनमन (Surely you are joking Mr. Feynman) – रिचर्ड फाईनमन (Richard Feynman) – अनुवाद – माधुरी शानभाग (Madhuri Shanbhag)
- AADHAR-A Biometric history of India’s 12-Digit Revolution आधार-अ बायोमेट्रिक हिस्टरी ऑफ इंडिया’ज १२-डिजिट रिव्हॉल्युशन – Shankar Aiyar ( शंकर अय्यर )
- The Idiot brain (द इडियट ब्रेन) – Dean Burnet (डीन बर्नेट)
- QED (क्यूईडी)-Richard Feynman (रिचर्ड फेनमॅन )
- The Watson Dynasty(वॉटसन डायनॅस्टी)-Richard S. Tedlow(रिचर्ड एस.टेड्लोव)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe