पुस्तक – हिटलर आणि भारत (Hitler Ani Bharat)
लेखक – वैभव पुरंदरे (Vaibhav Purandare)
अनुवाद – जी बी देशमुख (G.B. Deshmukh)
भाषा – मराठी (Marathi)
मूळ पुस्तक – हिटलर अँड इंडिया (Hitler and India)
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
पाने – १५८
छापील किंमत – रु. २७५/-
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस ऑगस्ट२०२४
ISBN – 9789357202909

हिटलर हे माणसाच्या इतिहासातलं एक भयानक वास्तव. त्याने लाखो ज्यू लोकांची नृशंस हत्या घडवली. स्वतःच्या विस्तारवादाने संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. पण याच हिटलरच्या काळात जर्मनीने मोठी प्रगतीही केली. नेताजी सुभाषचंद्र बोस भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हिटलरची मदत मागायला गेले होते. बर्लिन मध्ये आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन झाले. नेताजींना जपान प्रवासासाठी पाणबुडी उपलब्ध करून झाली. त्यामुळे तो भारताच्या बाजूने होता असा आपला समज होतो. हिटलर स्वतःला, जर्मन लोकांना शुद्ध नॉर्डिक आर्य वंशाचे असे उच्चवर्णीय म्हणत होता. भारतीय लोक पण स्वतःला आर्य म्हणवतात. त्यामुळे हिटलर सुद्धा आपल्यापैकीच एक होता व त्या प्रेमापोटीच त्याने नेताजींना मदत केली असेल असाही आपला समज होतो. पण शाळेत शिकलेल्या किंवा थोडंफार वाचनात आलेल्या जुजबी माहितीच्या पलीकडे जाऊन हिटलर आणि भारत संबंधांचा धांडोळा घेतला तर सत्य वेगळं  दिसतं हे सांगणारं हे पुस्तक आहे. लेखक वैभव पुरंदरे यांनी अनेक वर्षे संशोधन करून, जर्मनीतली कागदपत्रं, पुस्तकं आणि बरेच संदर्भ यांचा अभ्यास करून हिटलरला भारताविषयी नक्की काय वाटत होतं हे या पुस्तकातून मांडलं आहे.
लेखकाची पुस्तकात दिलेली माहिती

अनुक्रमणिका

आपल्याला पचायला थोडं कठीण वाटेल, पण पुस्तक वाचल्यावर समजतं की हिटलर भारतीयांना आर्य वगैरे काही समजत नव्हता. तर भारतीय एक मागास जमात आहे असंच त्याचं म्हणणं होतं. ब्रिटिश भारतावर राज्य करतायेत कारण ब्रिटिश गोरे आहेत, उच्चवर्णीय आहेत, युरोपियन आहेत, सामर्थ्यवान आहेत. त्यामुळे त्यांना भारतावर राज्य करण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे आणि तो त्यांनी वापरलाच पाहिजे. भारतीयांशी उलट ते फारच सीधेपणाने वागतायत.
ब्रिटिशांनी जसे स्वतःचे साम्राज्य पसरवले तसेच जर्मनीने करावे अशी त्याची मनीषा होती. त्यामुळे सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्याची मागणी करणारे कार्यकर्ते, भारतीय विद्यार्थी, क्रांतिकारक यांना हिटलरने अजिबात जवळ केले नाही. उलट त्याचं पुस्तक माईन कांफ आणि जर्मनीतली वृत्तपत्रे यातून भारतीयांची यथेच्छ टिंगलटवाळी करण्यात येत होती. पण दुसऱ्या महायुद्धाच्या घडामोडीत ब्रिटन जर्मनीच्या विरुद्ध उभा राहिला तेव्हा केवळ ब्रिटन विरोधी प्रचाराचा भाग म्हणून त्याने भारतीयांना थोडंसं जवळ केलं. तोंडदेखली मदत केली. बरीच टाळाटाळ करून मगच काही वर्षानंतर त्यांनी नेताजींना भेट दिली. रेडिओ केंद्र उभारण्यासाठी मदत किंवा त्यांना जपानला पाठवण्यासाठी पाणबुडी इतपतच मदत केली. त्याहून जास्त काही करण्याची तयारी त्याने दाखवली नाही. उलट नेताजी आणि जपान यांची आघाडी होऊन ते भारतावर हल्ला करू लागले तेव्हा भारत ब्रिटनच्या ताब्यातून जातो की काय अशी शक्यता निर्माण झाल्यावर तो अस्वस्थ झाला.

प्रसंगाने पुस्तकाची सुरुवात होते एका अपरिचित प्रसंगाने. हिटलरच्या काळामध्ये भारतीय विद्यार्थी बर्लिन मध्ये शिकत होते. काही क्रांतिकारक गट काम करत होते. त्यांची धरपकड झाली. त्यांना तुरुंगात डांबून मारहाण झाली. इथून निवेदन सुरु होते. पुढे माईनकांफ मधले भारतीयांवरचे उतारे, हिटलरने वेळोवेळी भाषणात लेखात भारतीय कसे कमी दर्जाचे आहेत, अडाणी आहेत, गलिच्छ आहेत ही मांडलेली मते. यांची उदाहरणे येतात. रवींद्रनाथ टागोर यांनी जर्मनीला दिलेल्या भेटीनंतर त्यांचीही निंदानालस्ती कशी झाली याची उदाहरणे आहेत. अजून बऱ्याच भारतीयांचे जर्मन भेटीचे तिथल्या नकारात्मक वातावरणाचे अनुभव पुस्तकात आहेत.

ज्यूंच्या कत्तली होत असताना गांधीबाबा ज्यूंना अहिंसा पाळा असा मूर्खपणाचा सल्ला देत होते. त्याचा राग ज्यूंना येणे स्वाभाविक होतेच. पण अशा माणसाबद्दल हिटलरलासुद्धा सहानुभूती नव्हती याची उदाहरणे आहेत.

नेताजींनी हिटलरची भेट घेण्याचे प्रयत्न कसे केले, ते कसे टाळले गेले, हिटलरचे काही अधिकारीच सुरुवातीला त्यांना भेटत राहिले आणि जुजबी मदत करत राहिले हे सगळे सविस्तर लिहिले आहे. नेताजींचा पत्रव्यवहार ह्यात दिला आहे. प्रत्यक्ष भेट झाल्यावर सुद्धा हिटलरच बडबड करत राहिला आणि स्वातंत्र्य युद्धाला ठोस मदत देण्याचं त्याने नाकारलं तो प्रसंग पुस्तकात आहे.
काही पाने उदाहरणादाखल वाचूया
भारतीय पत्रकार आणि कार्यकर्ते श्री नंबियार आणि श्री नायडू यांच्या अटकेची कहाणी


भारतीयांवर ब्रिटनचं राज्य योग्य की अयोग्य, भारताच्या लढ्याला पाठिंबा द्यायचा का नाही याबद्दलच्या त्याच्या विचारांची एक झलक


बोस हिटलर भेटीतील गोलमगोल उत्तरे

काही वर्षांपूर्वी मी म्यानमारच्या आंग सान सू ची(Aung San Suu Kyi) यांचं चरित्र वाचलं होतं. त्यात म्हटलं होतं की त्यांचे वडील आंग सान हे म्यानमारचे राष्ट्रपिता मानले जातात. त्यांनी सुद्धा नेताजींप्रमाणे ब्रिटन विरोधात जपानची सैनिकी मदत घेऊन ब्रिटिशांना हाकलून लावलं होतं. पण म्यानमार जपानच्या ताब्यात सत्ता आल्यावर त्यांनी म्यानमारवर इतके अत्याचार केले की ब्रिटिश परवडले अशी अवस्था झाली. मग आंग सानने पुन्हा ब्रिटनची मदत घेऊन जपान्यांना हुसकावून लावलं. हे पुस्तक वाचताना माझ्या मनात आलं की नेताजींची योजना सफल झाली असती; हिटलरने भारताला जास्त मदत दिली असती आणि जपानचं किंवा जर्मनीचं राज्य भारतावर आलं असतं तर कदाचित भारताची अवस्थाही आगीतून फुफाट्यात अशी झाली असती का? “कमअस्सल हिंदूं”ना हिटलरने ज्यूंप्रमाणे छळछावण्यात पाठवलं असतं का? त्या कल्पनेने अंगावर काटा येतो. भारतीयांना हिटलर बद्दल प्रेम वाटण्यात काही अर्थ नाही हे या पुस्तकातून अधोरेखित होतं.

पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही पानातच पुस्तकाच्या मजकुराचा किंवा मूळ गाभ्याचा आपल्याला अंदाज येतो. हिटलरची भारतीयांबद्दलची हिनेतेची भावना लक्षात येते. पण ती त्याने कशा कशा पद्धतीने ह्याची व्यक्त केली ह्याची बरीच उदाहरणे पुस्तकात दिसतात. हे बघून अचंबित व्हायला होतं. असंख्य व्यक्तींची नावे, प्रसंग, उधृते ह्या माहितीने भरलेलं हे पुस्तक आहे. निवेदन शैली जरा किचकट आहे. या पुस्तकाचा अनुवाद जी बी देशमुख यांनी केला आहे तो फारच बोजड झाला आहे. इंग्रजी वाक्यरचना जशीच्या तशी ठेवून शब्दशः भाषांतर केले आहे. त्यामुळे वाचताना अडखळायला होतं. बऱ्याच वेळा वाक्य गोंधळात टाकतं आणि ते पुन्हा वाचलं की मग नीट समजतं याहून. त्यामुळे पुस्तक वाचन नीरस होतं. अधिक सहज अनुवाद व्हायला हवा होता. म्हणजे पुस्तक अधिक वाचनीय झालं असतं.

लेखक वैभव पुरंदर यांनी संशोधन करून एक भीषण सत्य आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमासाठी त्यांचे खूप आभार.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link