पुस्तक – पुढचं सोंग (Pudhach Song)
लेखक – नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २३२
प्रकाशन – रायटर पब्लिकेशन फेब्रुवारी २०२५
छापील किंमत ३००/- रु.
ISBN – 978-93-342-07439

डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनात लेखक नितीन थोरात याच्याशी भेट झाली तेव्हा त्याचं “सोंग” हे पुस्तक विकत घेतलं होतं. मला ते पुस्तक खूप आवडलं. डिसेंबर २०२५ मध्ये “पुणे पुस्तक महोत्सवा”मध्ये पुन्हा नितीन ची भेट झाली तेव्हा या कादंबरीचा पुढचा भाग आलेला दिसला. लगेच “पुढचं सोंग” आणि त्याच्या प्रकाशनाचं अजून एक पुस्तक विकत घेतलं.

पहिल्या भागाचे मी लिहिलेले परीक्षण आणि त्या कथेचा थोडक्यात गोषवारा तुम्हाला पुढील लिंकवर वाचता येईल. ते वाचा म्हणजेच मी या पुस्तकाबद्दल जे लिहिलं आहे त्याचा संदर्भ तुम्हाला लागेल.
https://learnmarathiwithkaushik.com/courses/song/

पहिल्या भागात कथानायक संजयने स्वतःला तृतीयपंथी/हिजडा करून घेतलं आहे. त्याचं नाव आता “तम्मा” आहे. हिजड्यांच्या पंथातच तो राहतोय. हिजड्यांसारखं साडी नेसणं, मेकअप करणं आणि लोकांकडून भीक मागून पैसे गोळा करणं ही त्याची दिनचर्या झाली आहे. गावकऱ्यांनी केलेला अन्याय, जातीभेदाचा त्रास, प्रेयसी वरचे व्यक्त न करता येणारे प्रेम ह्या सगळ्याचा उबग येऊन त्याने तृतीयपंथी होण्याचा निर्णय घेतला होता. जात-धर्म-लिंगविरहित असा हिजडा आपण बनू; आपल्याला त्रास देणाऱ्यांना चांगला हिसका दाखवू असं त्याच्या मनात होतं. पण काही वर्षे लोटली तरी त्याची ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. इतकंच नव्हे तर स्वतःच्या या नव्या अस्तित्वाशीही तो अजून पूर्णपणे एकरूप झालेला नाही. नव्या वास्तवाशी जुळवून घेत जगणं नियतीलाही मान्य नाही.

ज्या गावाततून तो पळून आला त्या गावातल्या लोकांची त्याची पुन्हा भेट होते आणि आपल्या गावाची ओढ त्याला वाटू लागते. आपले आईवडील, अडचणीत साथ देणारे आपले मित्र ह्यांना पुन्हा भेटावेसे वाटू लागते. मित्रांना शोधण्याच्या प्रयत्नात त्याला त्याच्या हिजडेपणाचं मोल द्यावं लागतं. तरी तो त्यांना भेटतो तम्माने गावात जाण्याचा आग्रह सोडून आपल्याबरोबर राहावं ही मित्रांची इच्छा असते. पण गावाला भेट द्यायची त्याची इच्छा अनावर होते. गावात कोणी ओळखू नये, आई-वडिलांनी ओळखावं अशी योजना करून सर्वजण ते धाडस करतात. गावात पोहोचल्यावरही त्याला अनेक धक्कादायक गोष्टी करतात काही नवीन संदर्भ लागतात.

या धक्क्यांनी त्याची द्विधा मनस्थिती अजूनच गहिरी होते. हिजडा बनवण्याचा निर्णय चुकीचा का बरोबर? आपण शरीराने, मनाने खरोखरच हिजडा झालो का? आपण आपल्या जुन्या लोकांना विसरलो का? आपल्याला वाटत होतं तसं एक कणखर हिजडा बनवून अन्याय करणाऱ्या लोकांना लोकांशी दोन हात करू शकलो? हे सगळं कशासाठी गेलं त्यापेक्षा पुरुषच राहिलो असतो तर चाललं असतं का? प्रेम विसरून गेलो असतो तर चाललं असतं का? आपली प्रेयसी काय करत असेल? आता या अवस्थेतही त्या आपल्याला स्वीकारेल का? आई वडील काय म्हणतील? आपण असे तृतीयपंथी आहोत हे कळल्यावर गावातले आपले शत्रू आपली कशी फजिती करतील? आई-वडिलांना काय त्रास देतील ? असे असंख्य प्रश्न, त्यात नियतीने घातलेल्या प्रश्नांची भर. असा हा प्रश्नांचा आणि हळूहळू त्याची उत्तरं सापडत जाण्याचा प्रवास आहे.

कादंबरीच्या पहिल्या भागात तरुण पुरुष संजय हिजडा बनतो. लाक्षणिक अर्थाने हिजड्याचा सोंग घेतो. त्यात हतबलपणा लक्षात आल्यावर हे सोंग टाकून मूळचं रूप घ्यावं अशी इच्छा त्याला होते. पण परिस्थिती त्याला अजून काय काय सोंगं घ्यायला लावते हे कादंबरीच्या दुसऱ्या भागात दाखवलं आहे. म्हणूनच “पुढचं सोंग” हे नाव बरोब्बर आहे.>
काही पाने वाचून बघा

तम्माच्या डोक्यात माजलेलं विचारांचं काहूर


गावात पोचल्यावर आठवणींनी उध्वस्त झालेला तम्मा आपली ओळख दाखवू शकत नव्हता, काही विचारू शकत नव्हता.

मनःशांती मिळावी म्हणून पंढरपूरच्या वारीतल्या दिंडीतल्या लोकांशी तो संवाद साधतो तेव्हा.

या कादंबरीचे उपशीर्षकच “वाळवंटी प्रेमाचा हिरवा गार अंत” असे आहे. त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की वाळवंटात भाजणारा दाहक संघर्ष या पुस्तकात मांडलेला आहे पण शेवट मात्र सुखांत झालेला आहे. हा सर्व प्रवास वाचनीय आहे. नितीन थोरात यांनी पहिल्या भागाप्रमाणेच अतिशय गतिमान कथानक, वेगवेगळे योगायोग, नियतीचे खेळ ह्यातून संजय उर्फ तम्माचे आयुष्य, त्याची तगमग प्रभावीपणे सादर केली आहे. दोन भागांची तुलना केली तर मागच्या भागापेक्षा या भागात प्रसंगाचे चढ-उतार अजूनच जास्त आहेत. तरी पहिला भाग काकणभर सरस होता. इथेही भाषा रांगडी, गावरान आणि मनातल्या शिव्यांचा स्पष्ट उल्लेख करणारी आहे. दुसऱ्या भागात बऱ्याच वेळा तम्माच्या पूर्वायुष्यातल्या घटनांची पुनरुक्ती झालेली आहे. तीच ती माणसं पुन्हा पुन्हा भेटण्याचे योगायोग फारच घडत आहेत असंही वाटतं पण, पहिल्या भागाच्या वेळी लिहिलं होतं तेच आताही लिहावसं वाटतं. हे असं कसं होऊ शकतं; किंवा या ऐवजी काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे होतं असे विचार मनात येतील. पण प्रसंगांचा वेग, संवादाची पकड यातून ते वाचताना हे सगळं आपण चटकन बाजूला टाकून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो हे मला जास्त भावलं.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link