पुस्तक – सफाई (Saphai)
लेखक – सुमेध वडावाला रिसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १३६
प्रकाशन – नवता बुक वर्ल्ड. ऑक्टोबर २०१३
छापील किंमत रु. १४०/-
ISBN – दिलेला नाही
सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी केलेले आत्मकथनांचे शब्दांकन अप्रतिम असते. त्यांची तशी तीन चार पुस्तके मी वाचली आहेत. त्या पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे सुमेधजींनी वाचली होती. त्यांना ती आवडली. त्या ओळखीतून काही दिवसांपूर्वी त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. भरपूर गप्पा झाल्या. माझ्या वाचनाला आणि पुस्तक परिचय देण्याच्या उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहित केले.

ह्यावेळी आत्मकथनाऐवजी त्यांनी लिहिलेली ललित कादंबरी वाचली. “सफाई” ही एक सामाजिक कादंबरी आहे. दलित वर्गातल्या आणि शहरात राहूनही शहरी प्रगतीपासून काहीशा तुटक राहिलेल्या समाजाची ही कहाणी आहे. हा समाज म्हणजे सफाई कामगार समाज आहे. गावोगावी शहरोशहरी स्वतः घाणीत उतरून स्वच्छतेचे काम करणारा, नागरिकांचे आरोग्य जपणारा हा समाज. घाणीत राहून समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं म्हणजे कृतज्ञतेचा असला पाहिजे. पण ह्या समाजातील व्यक्ती आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीलाच घाणीसारखं झटकून टाकण्याची प्रतिक्षिप्त क्रिया काही लोकांकडून घडते. तर दुसरीकडे सफाई कामगार समाजातले काही लोकसुद्धा शिक्षण, स्वच्छता,आरोग्य यासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी सोयीसुविधा यांकडे दुर्लक्ष करून व्यसन, उधारी, वाईट संगती यांच्या दुष्टचक्रातच अडकून राहतात आणि पुढच्या पिढीलाही जबरदस्ती त्यात अडकवून ठेवतात. अशा दुहेरी सामाजिक परिस्थितीच्या खड्ड्यात रुतलेलं रथचक्र उद्धरण्याचं धाडस करू पाहणाऱ्या मायलेकींची ही गोष्ट आहे.
लक्ष्मी ही सफाई कामगार. तिची मुलगी समिधा. या दोघी कथेच्या नायिका. समिधाने दहावीची परीक्षा दिली आहे. लक्ष्मीचा नवरा फार विशेष काम करत नाहीये. तरी दारू आणि जुगाराच्या व्यसनापायी उधारी करत बायकोच्या जीवावर जगतोय. आजूबाजूच्या सगळ्या घरातली म्हणावी तर हीच स्थिती. या परिस्थितीतून बाहेर निघायचं तर मुलीने शिकलं पाहिजे यासाठी लक्ष्मी घरच्यांचा विरोध पत्करून मुलीला शिकवते आहे.
समिधा दहावीतलीच असली तरी मूळची समंजस, संवेदनशील स्वभावाची. बुद्धीने हुशार. त्यात वडिलांची व्यसनाधीनता, आई-वडिलांचं त्यावरून होणारं भांडण, तुटपुंज्या पगारात आईचं घर चालवणं. हे तिच्या चांगलं लक्षात आलं आहे. परिस्थितीने तिला जणू अकाली प्रौढ केलं आहे.
या दोघींच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन-तीन महिन्यातल्या घटना येथे मुख्य आहेत आणि पात्रांच्या संवादातून लक्ष्मीच्या तरुणपणाच्या, तिच्या सासूच्या काही गोष्टी कळतात. त्यांच्या वस्तीची एकूणच वैचारिक दयनीयता लक्षात येते. घर आणि नोकरी सांभाळताना लक्ष्मीची होणारी तारांबळ, कमीत कमी पैशात घर चालवणं याचा ताण, समिधासाठी पुरेसा खर्च आपण करू शकत नाही याची अपराधीपणाची भावना याचं मनोज्ञ चित्रण आहे. तर केवळ कुंकवाला आधार असणाऱ्या नवऱ्याची चिडही येते, जुने सुखाचे क्षण आठवून आपलेपणाही वाटतोय, त्याच्या व्यसनाला पैसेही द्यावे लागतायत आणि आता व्यसनाशिवाय दुसरं तो काय करणार असा समंजसपणाही मनात येतो. लक्ष्मीच्या मनाची ही विदीर्ण अवस्था छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यासमोर पूर्णपणे उभी राहते.
समिधाला मात्र वडिलांचा मनस्वी तिरस्कार वाटत असतो. ती तो स्पष्टपणे बोलूनही दाखवते. बाप-मुलगी, आई-मुलगी आणि नवरा-बायको अशा त्रिकोणातली ही रस्सीखेच आहे.
लक्ष्मी आणि समिधाच्या शिक्षणातून प्रगती साधण्याच्या प्रयत्नांना यश येईल का? बाहेरच्या समाजातले कुठले मदतीचे हात तिला उभारी देतील? तुच्छतेचे कुठले कटाक्ष कसे घायाळ करतील? तिची धडपड समजून घेण्याची कुवत त्या वस्तीतल्या लोकांकडे असेल का? रथचक्र उद्धरेल का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचा.
वाचनीय कादंबरी आहे. दोन प्रमुख नायिका असल्या तरी इथल्या प्रत्येक प्रसंगातून, त्यात क्षणभर डोकावणाऱ्या माणसांतून समाजातल्या माणसांच्या वेगवेगळ्या रंगछटा दिसतात आणि हळूहळू चित्र पूर्ण होऊ लागतं. लक्ष्मी, तिचा नवरा, तिची सासू, लक्ष्मीच्या लोकल मधल्या मैत्रिणी, तिला मदत करणारे काही जण आणि वस्तीतले लोक या सगळ्यांची वर्णने , त्यांच्या तोंडचे संवाद नैसर्गिक वाटतात. फक्त समिधाच्या तोंडचे संवाद हे फारच पोक्त, प्रौढ भाषेतले, पुस्तकी वाटतात. त्या मुलीला घरच्या परिस्थितीची जाण आहे हे आपण समजू शकतो पण जणू तिने जगाचाच अनुभव घेतला आहे असं तिचं बोलणं, आईला आणि तिऱ्हाईतांना शिकवणं हे तितकं नैसर्गिक वाटलं नाही.
कादंबरीच्या पहिल्या भागात प्रसंग सविस्तरपणे येतात आणि शेवटच्या काही पानांमध्ये फार पटपट प्रसंग घडून कादंबरी संपते.
काही पाने उदाहरणादाखल.
पैशाची तंगी, बापाचं वागणं आणि समिधाचा राग दाखवणार आहे प्रसंग


दहावीत बोर्डात पहिली आल्याबद्दल नगरसेवक सत्कार करायल येतात तेव्हा समिधाच्या बोलण्यातून वस्तीची व्यथा व्यक्त होते


समाजात बदल घडताना तो अचानक पूर्ण समाजाचा होणार नाही तर तो बदल हळूहळू आधी एकेका व्यक्तीचा, त्याच्या कुटुंबाचा होईल. अशा अनेक व्यक्ती आणि कुटुंबाच्या बदलातून रूपात सामाजिक परिवर्तनाचे प्रमाण वाढेल. ही जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर सामाजिक,ऐतिहासिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- १९४८ चं अग्नितांडव (1948 cha Agnitandav) – रंगा दाते (Ranga Date)
- आवरण (AavaraN) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )- (अनुवाद : उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)
- आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun) – सिस्टर जेस्मी (Sister Jesmi) ( अनुवाद: सुनंदा अमरापुरकर Sunanda Amrapurkar)
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०१९ Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2019
- इतिहासाच्या पाऊलखुणा दिवाळी अंक २०२० Itihasachya Paulkhuna Diwali special Edition 2020
- कृष्णदेवराय (krushadevarai) – डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली (Dr. Laxminarayan Bolli)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- दारा शिकोह (Dara Shikoh) – काका विधाते (Kaka Vidhate)
- बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika) – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
- मंत्रावेगळा (Mantravegala) – ना. सं. इनामदार (Na. S. Inamdar)
- नवे शैक्षणिक धोरण (Nave shaikashnik dhoran) – प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि मंगला गोडबोले (Pro.Dr. Nitin Karmalkar & Mangala Godbole)
- शिवनेत्र बहिर्जी (Shivanetra Bahirji) – प्रेम धांडे (Prem Dhande)
- सेर सिवराज है (Ser Sivaraj hai) – प्रा. वेदकुमार वेदालंकार (Pro. Vedkumar Vedalankar)
- सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास (Sapiens – Manavjaaticha anokha itihas) – युव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari)
- हा तेल नावाचा इतिहास आहे!… (ha tel navacha itihas ahe!..) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- मी सरकारी डॉक्टर (Mi sarakari doctor) – डॉ. कुमार ननावरे (Dr. Kumar Nanaware)
- मेड इन चायना (Made in China) – गिरीश कुबेर (Girish Kuber)
- अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) – युवाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) अनुवादक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
- खुलूस (Khuloos) – समीर गायकवाड (Sameer Gaikwad)
- Deep state (डीप स्टेट) – मंदार जोगळेकर ( Mandar Joglekar)
- विद्रोह (Vidroh) – हेन्री डेन्कर (Henry Denker) अनुवाद – लीना सोहोनी (Leena Sohoni)
- तिमिरपंथी (Timirapanthi) – ध्रुव भट्ट (Dhruv Bhatt) अनुवाद – सुषमा शाळिग्राम (Sushama Shaligram)
- जा जरा पूर्वेकडे (Ja jara purvekade) – आशुतोष जोशी (Ashutosh Joshi) अनुवाद – सविता दामले, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर (Savita Damle, Mohna Prabhudesai Joglekar)
- वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) – सदानंद दाते (Sadanand Date)
- पुढचं सोंग (Pudhach Song) – नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
- छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर (Chhatrapati Shivaji Maharaj zale nasate tar) – गजानन भास्कर मेहंदळे (Gajanan Bhaskar Mehandale)
- मोगरा फुलला (Mogara Phulala) – गोपाळ नीलकंठ दांडेकर (Gopal Neelkanth Dandekar)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे साडे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link


