पुस्तक – श्रील प्रभुपाद (Shrila Prabhupad)
लेखक – हिंदोल सेनगुप्ता (Hindol Sengupta)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २७२
मूळ पुस्तक – Sing Dance & Pray (सिंग, डान्स अँड प्रे )
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
अनुवाद – डॉ. शुचिता नांदापूरकर- फडके आणि सौ. नयना पिकळे
(Dr. Shuchita Nandapurkar-Phadke And Nayna Pikale)
प्रकाशन – हेडविग मीडिया हाऊस, एप्रिल २०२५
ISBN – 978-81-967886-0-5
छापील किंमत – ४५०/- रु.

भारतीय संस्कृती, हिंदुधर्म, वेदांमधील ज्ञान, तत्वज्ञान हे हजारो वर्षे चालत आलेले आहे. त्याबद्दल जगभरातल्या विद्वानांना आकर्षण आणि उत्सुकता नेहमीच राहिली आहे. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी देशोदेशी नक्कीच पोचल्या असतील. पण त्या सर्वसामान्य परदेशी लोकांपर्यंत पोचवण्याचं; इतकंच नव्हे तर त्यांची जीवनपद्धती भारतीय करण्याचं काम फार थोड्या व्यक्तींना, संस्थांना जमले असेल. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे “इस्कॉन” – “हरे कृष्णा” चळवळ. परदेशी गोरे लोक भगवी वस्त्रे लेवून, मुंडन करून, “हारे रामा हारे ख्रीश्ना” असा नाचत, वाद्य वाजवत जप करतायत हे दृश्य तुम्ही बघितलं असेलच. “भगवद्गीता – जशी आहे तशी” ह्या पुस्तकाची विक्री करणारे देशी- परदेशी संन्यासी बघितले असतील. हे सगळे “इस्कॉन” – “हरे कृष्णा” चळवळीचे सदस्य. श्रीकृष्ण हे आराध्य दैवत, गीता, भागवत हे महत्त्वाचे धर्मग्रंध आणि “हरे राम हरे कृष्ण” हा जप, जगन्नाथाची रथयात्रा आणि अन्नदानाचे आयोजन ही व्यवच्छेदक लक्षणे आपल्या सहज लक्षात येतील. जागोजागी असणारी मोठमोठी “इस्कॉन मंदिरे” आणि त्यांचे भव्यदिव्य कार्यक्रम ह्यातून ही संस्था आर्थिक दृष्ट्याही भरभराटीला आली असल्याचं ही जाणवेल. एकाअर्थी ही संस्था आणि तिचे साधक हे भारताचे सांस्कृतिक राजदूतच आहेत. अशी ही महत्त्वाची धार्मिक संस्था कशी सुरु झाली, देशाबाहेर कशी पसरली आणि अ-भारतीय लोकांमध्ये इतका आमूलाग्र बदल कशी घडवू शकली हे जाणणं निश्चित औत्सुक्याचं आहे. म्हणूनच तिचे संस्थापक श्रील प्रभुपाद ह्यांचं हे चरित्र वाचनीय आहे.

श्रील प्रभुपाद ह्यांचं मूळ नाव अभय चरण डे. त्यांचा जन्म १८९६ मध्ये कलकत्त्यातील एका सुखवस्तू पण धार्मिक घरात झाला. गौडीय वैष्णव परंपरांचे ते पालन करत. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेप्रमाणे बंगाल मधली चैतन्य महाप्रभु ह्या संतांमुळे प्रचलित झालेली ही परंपरा. त्यांच्या धार्मिक वृत्तीची जोपासना लहानपणीच झाली असली तरी इतर बहुतेक संतांप्रमाणे लहानपणापासून ते एक विरक्त म्हणून राहिले नाहीत. ते संसारी होते. त्यांनी लग्न केले, मुलाबाळांसह संसार केला, नोकरी केली, व्यवसाय केला, यश अपयश पचवले. पण कृष्णभक्ती आणि सांसारिक मोहापासून दूर जाण्याची इच्छा सतत मनात तेवत राहिली. म्हणून त्यांनी ह्याविषयावर पुस्तके लिहिणे, मासिक चालवणे असे उद्योग स्वखर्चाने सुरु केले. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळात कागदाच्या टंचाईपासून वर्गणीदार गोळा करण्यापर्यंत सगळे झगडे ते करत होते. झाशी, वृंदावन, प्रयाग अशा ठिकाणी राहून मुख्य धंदा आणि प्रकाशनाचा जोडधंदा सांभाळत होते. पण भारतात त्यांना फार प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी वयाच्या सत्तरीत त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांच्या गुरूच्या आदेशानुसार पुस्तकांद्वारे जगभर कृष्णभक्तीचा प्रसार करायला निघाले. वयाच्या सत्तरीत जेव्हा माणसे शरीराने, मनाने सर्व व्यापांतून निवृत्त होऊन आराम करण्याच्या मनःस्थितीत असतात तेव्हा अभय चरण डे अर्थात संन्यासानंतरचे भक्तिवेदांत नव्या उमेदीने कार्यविस्ताराला परदेशी निघाले. हे वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. पुस्तकात हाआधीचा कालखंड, त्यांचे तोपर्यंतचे काम ह्याची बऱ्यापैकी माहिती आहे.

त्यानंतर पुस्तकात पुढचा भाग सविस्तर आहे. अमेकरिकेच्या प्रवासातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तरी ते पुढे जातच राहिले. पहिल्यांदा ते पेन्सिलव्हिनिया इथे परिचितांकडे राहिले. त्यांनी लोकांना इंग्रजीतून प्रवचन द्यायला सुरुवात केली. त्यावेळची अमेरिका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळणीतून जात होती. व्हियेतनाम युद्धासाठी तरुणांना जबरदस्तीने सैन्यात भरती व्हावे लागत होते, त्यामुळे अस्वस्थता होती. काळे – गोरे ह्यांचा वांशिक संघर्ष होता. श्रीमंतांना सर्व भौतिक सुखं मिळत असूनही समाधान नव्हते. त्यातून दारू आणि अमली पदार्थांचे सेवन वाढले होते. प्रस्थापित भांडवलशाही विरुद्ध झगडे होते. ह्या भयंकर परिस्थितीचे वर्णन लेखकाने व्यवस्थित केले आहे. त्यातून प्रभुपादांच्या आगमनाची आणि पुढील कामाची पार्श्वभूमी आणि प्रत्ययकरिता स्पष्ट झाली आहे.

“भक्तिवेदांत” ह्या नावाने त्यांनी आपले काम सुरु केले. प्रवचने, नामस्मरण आणि पुस्तक/मासिकांची विक्री ह्यातून ते संदेश पसरवत होते. स्वतः सुरात गात भजन करायचे. अन्नदान करायचे. “अमली पदार्थांची धुंदी थोडाच वेळ टिकेल पण पेक्षा कृष्णभक्तीची धुंदी चढली नाही की ती उतरणार नाही” असा त्यांचा उपदेश असे. सुरवातीला बेघर, अमली पदार्थांचे सेवन करणारे किंवा तणावग्रस्त अशा लोकांना हे काहीतरी वेगळं असल्याचं जाणवून ते प्रभुपदांकडे आकर्षित झाले. त्यांना अनुयायी मिळायला सुरुवात झाली. इतरांकडून आर्थिक मदत मिळायला सुरवात झाली. दुकानाच्या एका छोट्या गाळ्यात पहिले मंदिर सुरु झाले. अनुयायी मिळत होते. पण पाश्चिमात्य संस्कृतीशी पूर्णपणे वेगळे अशी त्यांची नियमावली होती. मांसाहार, अमली पदार्थाचं सेवन वर्ज्य होतं. साधारण लग्न संसाराला परवानगी होती. जपजाप, आरती ह्या दिनचर्येला महत्व होते. आश्रम म्हणजे काय, त्याचे नियम काय असावेत, दीक्षा कशी द्यायची ह्याचे पायंडे प्रभुपाद घालून देत होते. कितीतरी प्रसंगांतून हे पायाभरणीचे दिवस पुस्तकात उलगडून दाखवले आहेत.

पुढच्या भागात अमेरिकेत त्यांनी केलेला प्रवास, “बीटल्स” ह्या प्रसिद्ध वाद्यवृदांतील संगीतकार जॉर्ज हॅरिसन, प्राध्यापक ॲलन जिन्सबर्ग अशा प्रथितयश व्यक्तींनी घेतलेलं केलेलं शिष्यत्व, लंडनचा प्रवास आणि तिथलं काम असे प्रसंग आहेत. पुढे जगभरचा प्रवास, ठिकठिकाणी केंद्रांची स्थापना ह्याचा प्रसंगोपात उल्लेख आहे. कामाचा व्याप वाढला तसा संस्था म्हणून दैनंदिन व्यवहारांकडे बघणे, पैशाचं व्यवस्थापन ह्याचाही ताण वाढू लागला. अल्पावधीतच चळवळ फोफावली हे चांगलं असलं तरी कार्यकर्ते-साधक नवशिकेच होते. शिकवण पूर्ण अंगी मुरायच्या आधीच त्यांच्यावर एकेका केंद्राची जबाबदारी आली होती. त्यातून मतभेद, चुकीचे निर्णय, वैयक्त्तिक महत्त्वाकांक्षा असे दोषही संस्थेत दिसू लागले. प्रभुपाद पत्रांद्वारे लोकांना कसे मार्गदर्शन करत, त्यांनी नियामक मंडळ कसे सुरु केले, वाद कसे झाले असा कटू भाग सुद्धा पुस्तकात आहे.

युरोप-अमेरिकेत यश मिळाल्यावर भारतीयांचे कुतूहल वाढले, आदर वाढला असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मायापूर(प. बंगाल), वृंदावन, मुंबई इथे मोठमोठी मंदिरे आणि केंद्रे उभारायचे प्रकल्प त्यांनी हाती घेतले. तरी सगळं अगदी सुतासारखं सरळ झालं नाही. कधी जागेचे वाद तर कधी स्थानिकांकडून कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले असेही प्रकार झाले. असे पुस्तकात उल्लेख आहेत. अमेरिकेत कोर्ट कचेऱ्यांनाही तोंड द्यावं लागलं. इस्कॉनवाले लोकांचा बुद्धीभ्रंश करून स्वतःच्या कह्यात आणतात. जणू काही चेटूक करून लोकांना वाममार्गाला लावतात असाच आरोप झाला. तेव्हा संस्थेने काय प्रतिवाद केला ते पुस्तकात आहे. ख्रिश्चन लोक धर्मांतरित होतायत हे बघून चर्चने सुद्धा बदनामी करायचा प्रयत्न केला. तेव्हाही संस्थेला प्रतिवाद करावा लागला. त्याचेही प्रसंग पुस्तकात आहेत.

अशा प्रकारे प्रभुपादांच्या वैयक्तिक आणि संस्थात्मक संघर्षातून इस्कॉन नावारूपाला आली. वयाच्या सत्तरीनंतर केलेले हे अद्वितीय कार्य आहे. १९७७ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्या आवडत्या वृंदावन धामी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा जगाला कायम मार्गदर्शक राहील आणि त्यातून ते आपल्यात आहेत असा संदेश त्यांनी अखेरीस दिला. त्यांच्या अंतिम दिवसांत निवृत्तिपर होत असूनही रात्र रात्रभर जागून ते अविरत लेखन करत होते.
आता काही पाने उदाहरणादाखल वाचूया

लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

गांधीजींना प्रभुपदांचा सल्ला 

अमेरिकेतली परिस्थिती आणि आपल्या संस्कारांचा गाभा ह्यादोन्हीचा तोल सांभाळत केलेले कार्य आणि सामाजिक सहभाग 


परदेशी भक्तांचे अनुभव कथन

पुस्तक असं माहितीने भरलेलं आहे. ह्यात लोकांच्या मुलाखती, दोन व्यक्तींमधल्या संवादाचे वेचे, टीव्ही वरच्या कार्यक्रमातले अंश, खटल्यातल्या प्रतिवादाचा अंश, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मजकुराची रचना केली आहे. त्यामुळे ते एकसुरी होत नाही. पण अमेरिकन संदर्भ नीट ठाऊक नसल्यामुळे काही जागांचे, प्रसंगांचे उल्लेख लगेच समजले नाहीत. ते थोडं गुगल करून बघावं लागलं. अनुवादही चांगला झाला आहे. पण बऱ्याच ठिकाणी मूळ पुस्तकाची निवेदनशैलीच – विशेषतः संवाद लिहिले आहेत तिचे – जरा ठोकळेबाज असावी असं वाटलं, साहजिकच त्याचा परिणाम अनुवादावर झाला आहे.

प्रभुपादांचे जीवन व त्यांचे कार्य ह्याबद्दल प्राथमिक ओळख करून घेण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. अजून माहिती हवी असणाऱ्यांसाठी शेवटी संदर्भ सूची आहेच.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link

 

Jaxx Wallet

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

jaxxwallet-liberty.com

Jaxx Wallet