पुस्तक – सोंग (Song)
लेखक – नितीन अरुण थोरात (Nitin Arun Thorat)
भाषा – मराठी (Marathi)
पाने २२२
छापील किंमत रू. ३००/-
प्रकाशन – रायटर पब्लिकेशन जाने २०२०
ISBN – 9789-3342-01413

पुण्यात झालेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये तरुण लेखकांचा एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात सध्याचा गाजणारा लेखक नितीन थोरात याचाही समावेश होता. परिसंवादानंतर तिथे आयोजित पुस्तक प्रदर्शन व विक्रीच्या दालनात त्याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. थोड्या गप्पा झाल्या. त्याच्या प्रकाशनाच्या दालनात त्याची गाजणारी ऐतिहासिक आणि पौराणिक विषय असणारी पुस्तकं मला दिसली. पण मला आत्ता त्या प्रकारचं वाचायची इच्छा होत नव्हती. तेवढ्यात हे पुस्तक दिसलं “सोंग – मुखवट्यामागे दडलेली कोवळी प्रेम कथा”. हे वेगळं आहे म्हणून विकत घेतलं. पण प्रेमकथा आणि तीही एका तरुण लेखकाने लिहिलेली म्हटल्यावर कॉलेजमधले प्रेम, गावातलं प्रेम प्रेमाच्या आणा-भाका, रुसवे फुगवे, घरच्यांचा विरोध अशा पठडीच्या वाटेने ती जाईल की काय अशी मला शंका होती. पण पुस्तकाचं पहिलं वाक्यच वाचलं आणि आपल्याला कोणीतरी जोरदार धपाटा घालून भानावर आणतंय असंच वाटलं. पहिलं पान वाचल्यावर लक्षात आलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. त्यातले खटकेदार संवाद, ग्रामीण भाषा आणि त्या भाषेत आढळणारा शिव्यांचा मुक्त संचार याने पहिल्या पानातच मला खेचून घेतलं आणि मी उत्सुकतेने पुढे वाचू लागलो. तासभर वाचन कसं झालं हे कळलंच नाही. त्यादिवशी रात्री उशीर झाला होता म्हणून पुस्तक बाजूला ठेवलं पण दुसऱ्या दिवशी कधी एकदा काम संपून पुस्तक वाचायला घेतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी तासभर मिळाला त्यामुळे पुढे वाचलं. तिसऱ्या दिवशीही तासभर वाचल्यावर थोडीच पानं राहिली होती. आता पुस्तक खाली ठेववेना. मग उशीर झाला तरी कादंबरी वाचून ती पूर्ण केली. हे पुस्तक पूर्ण कथेचा पहिला भाग आहे. दुसरा भाग “पुढचं सोंग” सुद्धा लवकरच वाचलं पाहिजे हे मनाशी पक्क झालं. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा नितीनला मेसेज करून कादंबरी आवडली हे कळवलं. तेव्हापासून सविस्तर लिहिण्यासाठीचा वेळ शोधत होतो आणि आज तो मिळाला.
कथा-कादंबरी या ललित प्रकारात बरेच दिवसांनी असं खिळवून ठेवणारं कथानक वाचायला मिळालं. पुस्तकाचं कथाबीज छोटं असलं तरी निवेदनशैली, संवादप्रधानता, साधे सोपे आणि कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलेले संवाद या सगळ्याची मजा खूप आली.

महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात घडणारी ही कथा आहे. मराठा समाजाचे बाहुल्य असणारे हे गाव. सुतार, चांभार, लोहार अशी इतर बलुतेदारांची घरे सुद्धा आहेत. गावगाड्यानुसार प्रत्येक समाजाचे लोक आपापला पारंपरिक व्यवसाय करत आहेत. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यावर मराठा कुटुंबांची पकड. आणि त्या पकडीतून होणारी राजकीय स्पर्धा आलीच.
या गावाची परंपरा अशी आहे की जत्रेत पौराणिक प्रसंग सादर केले जातात. दशावतारी नाटकाप्रमाणे त्यात मुखवटे घालून कलाकार नाचतात. प्रत्येक जातीकडे प्रत्येक घराण्याकडे एक ठरलेला प्रसंग नाट्यप्रवेश दिलेला आहे. त्या त्या कुटुंबाने परंपरागत ते सादर करायचं. लोहार कुटुंबाकडे नाट्यप्रवेश आहे “सीता बाळंतीण” नावाचा. गर्भवती सीतेला लवकुश ही मुलं होतात हे त्यात दाखवायचं आहे. पण गावासमोर घरातली बाई नाही नाचणार हं. लोहार घरातील पुरुष मंडळी साडी नेसून, केशभूषा वेशभूषा करून हे सोंग सादर करतात. इतके वर्ष हे सोंग वठवलेले लोहार बाबा आता आपल्या मुलाकडे ही रीत सोपवतायत. पण बारावीतल्या तरुण संजयला साडी नेसून असं गावकऱ्यांसमोर येणे काही पटत नाही, रुचत नाही. पण त्याचे वडील काही ऐकत नाहीत. शिव्या घालत मुस्काडात मारत त्याला नाटकाला उभं करतात. आणि तरुण संज्याच्या अंगावर साडी चढते!!
संजय त्याच्याच वर्गातल्या एका मराठा कुटुंबातल्या मुलीवर प्रेम करत असतो. उघड उघड बोलणं शक्य नाही म्हणून फक्त खाणाखुणांनीच भावना व्यक्त होत असतात. आता गावच्या जत्रेत साडी नेसून उभं राहायचं आणि प्रेक्षकांत ती असणार म्हणून त्याला जास्तच लाज वाटत असते. पण त्याचा मित्र त्याला पटवतो की आज उलट तुला तिच्याकडे थेट बघता येईल, ते सुद्धा कोणाच्याही लक्षात न येता. हेच एक दुःखात सुख. एका तृतीयपंथीयाच्या मदतीने तो साडी नेसून तयार होतो. हो नाही करता करता सोंग पूर्ण होतं. आणि विशेष म्हणजे त्या मुलीलासुद्धा संज्याचं साडी नेसणं आणि त्याचा अभिनय आवडला असं त्याला कळतं.

सोंग पूर्ण होतं. जत्रा पूर्ण होते पण साडी नेसलेल्या संज्या हा टवाळ गावकऱ्यांच्या चेष्टेचा थट्टेचा विषय झाला नसता तरच नवल. हे साडी नेसणं संज्याला किती महागात पडणार आहे ? आपल्या प्रेयसीला आवडतं म्हणून तो असा साडी नेसत राहील? गावकऱ्यांची टवाळकी कुठली पातळी गाठेल? संज्याचं आणि कविताच प्रेम पुढे जाईल का? दोन समाजातली उच्चनीचता त्यांच्या प्रेमाच्या आड येईल का?

अशी ही वेगळीच प्रेम कथा आहे जी प्रियकर आणि प्रेयसी मध्ये थेट शब्दांनी व्यक्त होत नाहीये. या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीला सामाजिकतेचे ताणेबाणे, स्त्री- पुरुष-तृतीयपंथीय या लिंगव्यवस्थेचे पदर जोडले गेले आहेत. याहून जास्त काही सांगितलं तर कादंबरीची कथा पूर्ण उघड होईल. लेखकाने संवादातून व प्रसंगांतून संजय हे मुख्य पात्र, त्याचा मित्र असिफ, संजय चे वडील, गावातील इतर समाजातली माणसं, तृतीयपंथी, खलनायक प्रतिनायक, ज्या पद्धतीने उभे केले आहेत ते लेखकाचं मोठं यश आहे असं मला वाटतं.

चार पानं उदाहरणादाखल वाचा म्हणजे तुम्हाला अजून कल्पना येईल.
कादंबरीची सुरुवात


गावाबाहेर राहणारा पण गावगाड्याचा भाग असणारा चांगल्या स्वभावाचा तृतीयपंथी “बलम”, संजय आणि त्याचा मित्र अशप्या ह्यांची काही प्रसंगामुळे चांगली मैत्री होते. त्यांच्या गप्पांचा एक भाग.


या पुस्तकातली पात्र बोलताना शिव्या देतात आणि पुस्तकात त्या तशाच्या तशा लिहिल्या आहेत. वाचकांना ते खटकण्याची शक्यता आहे. पण त्या कुठेही अश्लीलतेसाठी मुद्दामून दिलेल्या नाहीत. तर गावातले दोन मित्र किंवा भांडाभांडीच्या वेळी दोन माणसं जशा सहज शिव्या देतात तशाच त्या आलेल्या आहेत. संवादांमध्ये होणारा जातीचा उल्लेख मला थोडा जास्त वाटला स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष होऊन, विशेषतः ॲट्रॉसिटी कायद्याच्या वरवंट्याखाली लोक असताना आजही इतक्या उघड उघडपणे जातीपातींचा उल्लेख होत असेल का; असा मला प्रश्न पडला. मी काही खेडेगावात राहत नाही त्यामुळे मला प्रत्यक्ष अनुभव नाही. लेखकाचा तो प्रत्यक्ष अनुभव किंवा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असावा. हे खरं असेल तर फारच वाईट अवस्था आहे आपली.
पण याबद्दल सुरुवातीलाच लेखकाने इशारा दिलेला आहे.

कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करताना कादंबरीतले काही कच्चे दुवे सापडू शकतील. हे असं कसं होऊ शकतं; किंवा या ऐवजी काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे होतं असे विचार मनात येतील. पण प्रसंगांचा वेग, संवादाची पकड यातून ते वाचताना हे सगळं आपण चटकन बाजूला टाकून पुढे उत्सुकतेने वाचत राहतो हे मला जास्त भावलं.

तुम्ही नक्की वाचून बघा ही कादंबरी आणि तुमचा अभिप्राय मला आणि लेखकाला नक्की कळवा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर ऐतिहासिक, सामाजिक पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link