पुस्तक – The housemaid (द हाऊसमेड)
लेखिका – Freida McFadden (फ्रीडा मॅकफॅडन)
भाषा – English (इंग्रजी)
पाने – ३०६
प्रकाशन – पेंग्विन रँडम हाऊस. २०२२
ISBN – 978-0-143-46115-9
छापील किंमत – रु. ४९९/-

फ्रीडा मॅकफॅडन लिखित ही एक रहस्यमय कादंबरी आहे. पुस्तकाची सुरवात होते की एका घरातल्या वरच्या मजल्यावर एक मृतदेह सापडला आहे. पोलीस येऊन चौकशी करतायत. त्या प्रसंगातल्या बाईला वाटतंय की पोलीस आता आपल्याला पकडणार. दोन पानांत ही घटना आहे. पण ती बाई कोण, मृतदेह कोणाचा हे लेखिका सांगत नाही. पुढे एकदम तीन महिन्यांपूर्वीच्या घटनांनी कादंबरीच्या कथनाची खरी सुरुवात होते. “मिली” नावाची एक बाई “नीना” नावाच्या बाईकडे घरकामासाठी – हाऊसमेड म्हणून – कामाला आली आहे. मोठं श्रीमंत घर. नीना, तिचा नवरा अँड्र्यू आणि लहान मुलगी “सिसी” असं कुटुंब. एवढ्या मोट्ठ्या बंगल्यात श्रीमंतांकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार म्हणून मिली खुश आहे. सध्या ती बेघर आहे. एक जुनाट कार हेच तिचं घर. जुन्या कामावरून काढून टाकलेले. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिचा भूतकाळ… तुरुंगातून राहून सध्या ती “पॅरोल” वर. नीनाला हे बहुतेक माहित नसावं, म्हणूनच तिने नोकरीवर ठेवलं असावं.

नोकरी लागल्यावर तिला जाणवतं नीना चक्रम सारखी वागतेय. स्वतःच घरभर पसारा करते आणि मिलीला ओरडते. आधी एक काम सांगते आणि नंतर ते काम केल्याबद्दल मिनीलाच झापते, “तू हे का केलंस, मी तर असं सांगितलंच नव्हतं”. तिचा नवरा अँड्र्यू मात्र तिचे हे सगळे रुसवे सहन करतोय. अगदी चांगला नवऱ्यासारखा वागतोय. पण पुढे पुढे मिलीला कळतं की वरवर चांगलं दिसत असलं तरी काहीतरी कुरबुरी आहेत. काहीतरी गडबड आहे.

मिलीला राहायला दिलेली खोली पोटमाळ्यावरची. कोंदट. एखादा बेड, छोटं कपाट, छोटा फ्रीज अशी. खास म्हणजे दारालाही फक्त बाहेरून कुलूप लावता येईल अशी खोली. असं का बरं असावं ? हीच खोली मिलीला का दिली असावी ? निनाच्या चक्रमपणामागे काही तब्येतीचं कारण असेल का स्वभावच तसा? अँड्र्यू सगळं इतक्या शांतपणे सगळं कसं घेतो ? निनाला कंटाळून मिलीबद्दल त्याला आकर्षण वाटलं तर ? त्यांना मिलीच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ? किंवा मिलीला ह्या दोघांच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ? का ह्या खोलीचा काही भूतकाळ असेल ? तुरुंगातून आलेली मिली काही गुन्हा करेल का ? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर कादंबरी नक्की वाचा.

कादंबरीच्या पहिल्या भागात मिली निवेदक आहे, दुसऱ्या भागात नीना. पुन्हा मिली आणि शेवटी पुन्हा नीना. अशा शैलीत दोन्ही कडच्या वेगळ्या वेगळ्या वेळी घडणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. त्यातून हळूहळू पूर्ण कथानक आकाराला येतं. निवेदनाचा भर प्रसंगाच्या महत्त्वाच्या भागावर आहे. नेपथ्यरचनेची फापटपसारा वर्णनं नाहीत. त्यामुळे प्रत्येक पान वेगवान आहे. उत्कंठावर्धक आहे. कथानक अनपेक्षित वळणं घेते पण ती अतर्क्य नाहीत. कादंबरीत एका क्षणी एक पात्र खलनायक आणि एक नायक असं स्पष्ट चित्र उभं राहतं. खलनायकाचा हलकटपणा बघून त्याला आता कसा धडा शिकवला जातो हे बघायला आपणही उतावीळ होतो.

ही रहस्य कथा असल्यामुळे दोन तीन पानांचे फोटो देऊन काही उपयोग नाही. त्या प्रसंगाचा संदर्भ नसेल तर त्यात काही विशेष वाटणार नाही. जास्त पानांचे फोटो दिले तर कथेचा अंदाज येऊन भावी वाचकांचा रसभंग होईल. म्हणून ह्या परीक्षणात फोटो देत नाही.

पात्रांच्या तशा वागण्यामागे एक मनोवैज्ञानिक सूत्र आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा खोलवर प्रभाव कसा पडतो, त्यातून मनोविकृती कशा रुजतात हा कथानकाचा अंतःप्रवाह आहे. त्यातून कथानकाचं वैचारिक वजन वाढलं आहे. रहस्यकथा, गुन्हेगारी कथा म्हटलं की, हे असं कसं घडू शकतं; इतक्या गुप्तपणे कसं घडेल, सगळेच कसे सामील होऊ शकतील .. असे प्रश्न पडतात. ह्या पुस्तकातल्या प्रसंगांची चिरफाड केली तर असे “loose ends” सापडतीलही. पण वाचन थांबवावं असं काही लक्षात येत नाही. प्रसंगांचा झपाटा असा आहे की असे प्रश्न चट्कन उभे राहत नाहीत, किंवा मनात आले तरी आपण तात्पुरतं “असं झालं असेल” हे गृहीत धरून पुढे जातो. हे लेखिकेचं सामर्थ्य.

म्हणून ही कादंबरी मला आवडली. मी सहसा गूढकथा वाचत नाही. एक काल्पनिक खून आणि त्या खुनाचा शोध हे वाचायचा मला कंटाळा येतो. पण इथे तसं नव्हतं. नेहमीच्या ललित कादंबरी सारखे प्रसंग होते. आणि त्यातून रहस्य तयार होत होतं. ते वाचायला मजा आली. रंजक कादंबरी तुम्हालाही आवडेल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

रहस्यकथा, भयकथा, कल्पनारंजक कथानक असणाऱ्या इतर काही पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या तीनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe